प्रा. डॉ. ज्ञानेश्वर भामरे
कीर्तन म्हणजे लोकजागृतीचे साधन; पण सध्या कीर्तनाच्या नावाखाली विनोदी एकपात्री प्रयोग वा कलापथकसदृश कार्यक्रम सादर करण्याचे यशसूत्र अनेकांनी हेरल्याचे दिसते. या लाटेमुळे खऱ्या वारकरी कीर्तनाचे स्वरूप झाकोळले जाण्याची शक्यता आहे. असे होऊ नये म्हणून कीर्तनाचे खरे स्वरूप माहीत होणे गरजेचे आहे..
महाराष्ट्रात अलीकडे निवृत्ती महाराज इंदुरीकरांच्या कीर्तनावरून समाजाच्या सर्व थरांतून – राजकारणी, समाजसेवक, प्रसारमाध्यमे, वारकरी, विचारवंत, लेखक आणि कीर्तनकारांकडून त्यांच्या समर्थनार्थ आणि विरोधी अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. संत तुकारामांचे वंशज आणि तत्त्वज्ञान व वारकरी संप्रदायाचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी इंदुरीकरांच्या कीर्तनाबद्दल परखड मत व्यक्त केले आहे. ते म्हणतात, ‘‘कीर्तन म्हणजे करमणूक नव्हे. ‘विनोदाचार्य’ निर्माण होणे ही कीर्तन परंपरेची अधोगती आहे. इंदुरीकरांचे कीर्तन त्यात बसत नाही. ‘विनोदाचार्य’ हे काही कीर्तनकाराचे विशेषण नाही.’’ डॉ. मोरेंच्या या प्रतिक्रियेतून एक प्रमुख प्रश्न उद्भवतो; तो म्हणजे इंदुरीकरांचे कीर्तन हे वारकरी कीर्तन प्रकारात बसत नाही का? याचा अर्थ वारकरी कीर्तन हे इंदुरीकरांच्या कीर्तनापेक्षा वेगळे असले पाहिजे.
इथे एक बाब लक्षात घ्यायला हवी, की काही वेळा जीवनात कळत-नकळत चुका होतात. मोठय़ा माणसांच्या चुकादेखील तेवढय़ाच मोठय़ा असू शकतात, म्हणून त्यांनी दिलेले सामाजिक योगदान, सत्कर्मे एका क्षणात एखाद्या चुकीमुळे अव्हेरली जातात असे नव्हे. उलट हातून घडलेल्या चुकांमधून बोध घेऊन भावी आयुष्यात त्या व्यक्तीचे कार्य अधिकच उजळून निघण्याची शक्यता असते. या दृष्टीने इंदुरीकरांकडून झालेल्या चुकीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल, तर त्यांना मोठय़ा मनाने माफ करण्याचा उदारपणाही दाखवायला हवा. एवढे मात्र खरे की, हा वाद अनेक अंगांनी होत असून याबाबतची चर्चा थांबायचे नाव घेत नाही.
सध्या ग्रामीण भागात कित्येक बाल-युवा, अनुभवी कीर्तनकार कीर्तनाच्या नावाखाली कीर्तनकाराच्या वेशात आपला विनोदी एकपात्री प्रयोग किंवा कलापथकसदृश कार्यक्रम सादर करताना दिसत आहेत. या नवोदित, नवजात कीर्तनकारांमध्ये ‘विनोदाचार्य’ ही बिरुदावली रूढ होत आहे. बऱ्याचदा या बिरुदावल्या स्वयंघोषित असतात; नाही तर सवंग अभिरुची असणाऱ्या, फुटकळ विनोदाला दाद देणाऱ्या श्रोत्यांकडून व्यक्त झालेल्या असतात. अशी बिरुदावली मिरविण्यात काही कीर्तनकार धन्यता मानतात. या लाटेमुळे वारकरी, खऱ्या वारकरी कीर्तनाचे स्वरूप, आकृतिबंध झाकोळले जाण्याची शक्यता आहे. असे होऊ नये म्हणून कीर्तनाचे स्वरूप माहीत होणे गरजेचे आहे. नवोदितांनी संतांनी वर्णन केलेल्या कीर्तनाचा कित्ता गिरवावा, ज्यांना लोकरंजनातून केवळ प्रबोधन घडवायचे त्यांनी ‘कीर्तन’ या माध्यमाचा वापर न करता इतर माध्यमांचा वापर करावा. इतर सर्जनशील कार्यक्रम निर्माण करावेत.
वारकरी कीर्तन कसे असते, याचा धांडोळा संत ज्ञानेश्वर-नामदेवांपासून एकनाथ-तुकोबा-निळोबा यांच्यापर्यंतच्या वारकरी संतांच्या अभंगांतूनच घ्यावा लागेल. वारकरी कीर्तनाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, वारकऱ्यांच्या फडावर (देहूकर, वास्कर, देगलूरकर, सातारकर, सिऊरकर, आळंदीकर, पंढरपूरकर आदी) कीर्तन कसे सादर केले जाते यावरून, तसेच वारकरी संप्रदायाचे पूर्वाश्रमीचे कीर्तनकार, अभ्यासक, विचारवंतांच्या चिंतनातून, निरीक्षणांतून, अनुभवांतून व्यक्त झालेल्या विचारांतून ‘कीर्तन’ ही संकल्पना समजू शकते. त्यातल्या त्यात, शंभरी गाठलेल्या वै. जोग महाराज स्थापित आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेद्वारे दिले जाणारे ‘कीर्तन सादरीकरण प्रशिक्षण’ म्हणजे वारकरी कीर्तन, असे आत्मविश्वासाने म्हणता येते. पुण्यातील स. प. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तत्त्वचिंतक शं. वा. तथा मामा दांडेकर या संस्थेत अध्यापक म्हणून कार्यरत होते. वै. जोग महाराजांनी तर्कशुद्ध गद्य युक्तिवाद करून अभंगाचा अर्थ स्पष्ट करण्यास सुरुवात केली. संस्थेतील अध्यापक आणि कीर्तनकार याच पद्धतीने कीर्तने करीत निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, नामदेवकालीन संतांपासून एकनाथ- तुकाराम- निळोबाकालीन संतांचे अभंगच निरूपणासाठी संदर्भ, पुरावा (प्रमाण) म्हणून देत असत. कीर्तन प्रशिक्षण देणारी ही एकमेव मातृसंस्था आहे.
कीर्तनाचे स्वरूप..
कीर्तन एक भक्ती प्रकार. लोकजागृतीचे साधन. कीर्तन म्हणजे भक्तीविषयक निरूपण. आत्मकर्तव्याची जाणीव निर्माण करण्यासाठी कीर्तनाचा उपयोग होतो.
वारकरी कीर्तनाच्या स्वरूपाबद्दल विचारक गं. बा. सरदार म्हणतात, ‘‘वारकरी पंथीयांनी आपल्या धर्मप्रचारासाठी नवे वाक् पीठ निर्माण केले. त्यांची निरूपणे, कीर्तने यांचा थाट अगदी वेगळा आहे. पंडितांच्या पुस्तकी प्रवचनाशी किंवा हरदासांच्या दरबारी कीर्तनाशी त्यांचे यत्किंचितही साम्य नाही. लोकांत आत्मीयता व आत्मविश्वास उत्पन्न होण्यासाठी लोकांतील पुढारी आघाडीवर यावे लागतात. वारकरी पंथाने लोकांतून धर्मप्रवक्ते निर्माण केलेत.’’ लोकमान्य टिळकांच्या मते, ‘‘धर्माचा आणि नीतीचा उपदेश हा कीर्तनाचा आत्मा होय. गायन-वादनाची जोड ही जेवणाच्या वेळी उदबत्त्या लावल्याप्रमाणे होय.’’ राम शेवाळकर कीर्तन स्वरूपाबद्दल म्हणतात, ‘‘ज्ञानवंचित बहुजन समाजाचे होणारे पतन पाहून कासावीस झालेल्या सहृदय अंत:करणातून जे कनवाळू उद्गार बाहेर पडले, त्यांचे अभंग झालेत आणि या अभंगांचा आधार घेऊन कीर्तनातून समाजशिक्षण दिले गेले..’’
कीर्तनाचे प्रयोजन स्पष्ट करताना वै. धुंडामहाराज देगलूरकर म्हणतात, ‘‘प्रबोधन, करमणूक ही कीर्तनाची अवांतर प्रयोजने असून ‘ईश्वरप्राप्ती’ हे प्रमुख प्रयोजन आहे. कीर्तन म्हणजे एकपात्री नाटक, हे म्हणणे कीर्तनाचा अपमान आहे. कीर्तनाचा हेतू आत्महित, आत्मोद्धार आणि लोकोद्धार हा आहे.’’
संत नामदेव म्हणतात, ‘‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी॥’’ संत एकनाथ कीर्तनाची मर्यादा सांगताना म्हणतात, ‘‘भक्तिज्ञान विरहित इतरा गोष्टी न वदाव्या। प्रेमभरे वैराग्याच्या युक्ती निवराव्या॥ जेणे करोनि मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची। ऐसी कीर्तन मर्यादा संताघरची।।’’ कीर्तनातून सगुण चरित्रे सादर करावीत, असे त्यांनी म्हटले आहे. ‘‘जैसे कीर्तन करावे। तैसे वर्तुनि दावावे॥’’ ही कीर्तनकाराची जबाबदारी स्पष्ट केली आहे. संत तुकाराम कीर्तनाचे महत्त्व सांगतात, ‘‘कथाकाळी लागे सकळा समाधी। तत्काळ हे बुद्धी दुष्ट नासे॥’’ हरिकथेशिवाय कोणी स्वार्थासाठी कीर्तन करीत असेल, तर हरिभक्तांनी तेथे चित्त घालू नये, असा इशाराच त्यांनी दिला आहे- ‘‘हरिकथेविण इच्छिती स्वहित। हरिजन चित्त न घाला तेथे॥ जाईन भंगोनि आपला विश्वास। अवघीया नास कारणांचा॥’’ तिकडे लक्ष घातले तर कीर्तनावरील विश्वासच उडेल, असे तुकोबांचे सांगणे आहे.
सादरीकरणाचा आकृतिबंध..
(१) वीणेकरी ‘रामकृष्णहरी’ हे भजन, ‘सुंदर ते ध्यान’ हा अभंग गातो. मागे टाळकरी अर्धवर्तुळाकार उभे राहतात. मृदंगवादक बाजूला असतो. (२) ‘विठोबा रखुमाईऽ’ठायी धुमाळीत भजन चालू असताना कीर्तनकाराचे आगमन होते. कीर्तनकार आणि वीणेकरी एकमेकांस वाकून नमस्कार करतात. कीर्तनकार नमनपर अभंग म्हणतो आणि नंतर ज्या अभंगावर कीर्तन करावयाचे तो अभंग गातो. (३) दोन टाळकरी त्या अभंगाचे गायन करतात, त्याला ‘चाल’ असे म्हणतात. (४) कीर्तनकाराचे अभंगनिरूपण सुरू होते. मधूनमधून दर सात-आठ मिनिटांनी ‘विठ्ठलऽ विठ्ठलऽ’ असा जयघोष होत राहतो. अभंग सोडविण्यासाठी इतर अभंगच प्रमाण (पुरावा/ संदर्भ) म्हणून वापरतात. प्रमाण म्हणून भावगीते, भक्तिगीते, चित्रपट – नाटय़गीते, पोवाडे, लावण्या, संतांव्यतिरिक्त इतर कवींच्या कविता, स्वकृत काव्य म्हणण्यास वारकरी कीर्तनात मनाई असते. निरूपणामध्ये अभंगाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी कीर्तनकाराकडून प्रश्ननिर्मिती केली जाते. या प्रश्नांची उत्तरे प्रमाणासह कथन करणे म्हणजे निरूपण. तीच अभंगाची सोडवणूक होय. यात दृष्टांत, उदाहरणे, संतचरित्रे, गीताभागवत संदर्भ, प्रबोधन, विनोदनिर्मितीही असते; परंतु केवळ विनोद किंवा केवळ प्रबोधन असे स्वरूप नसते. कीर्तनकाराने केलेले विनोद हे बीभत्स, अश्लील, कुणाची खिल्ली, टिंगल, निंदा करणारे नसतात. राजकारणावरील भाष्यदेखील टाळले जाते. (५) निरूपणानंतर पुन्हा चाल ही भैरवी रागात म्हटली जाते. (६) शेवटी निरूपणास घेतलेल्या अभंगाचा भावार्थ, सारांश, संदेश, निष्कर्ष सांगितला जातो. आणि आरती होऊन कीर्तन संपते.
थोडक्यात, हरिभक्ती रुजवणे, जिज्ञासू, आर्त, मुमुक्षु अशा साधकांना मार्गदर्शन करणे हेच कीर्तनाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. इंदुरीकरांचे कीर्तन हे उपरोक्त कथन केलेल्या वारकरी कीर्तनाच्या निकषांवर उतरत नाही.
(लेखक ‘तुकाराम गाथे’चे अभ्यासक आहेत.)
dnyaneshwarbhamare900@gmail.com