आपल्याकडे पशुधन मोठय़ा संख्येने आहे, तरीही दूधनिर्मितीत मात्र आपण खूपच मागे आहोत. आता केंद्राने दुग्धविकास योजना हाती घेतली असून या पाश्र्वभूमीवर दुग्ध उद्योगासमोरील आव्हानांची चर्चा करणारा लेख.
केंद्र सरकारने २०१२ मध्ये राष्ट्रीय दुग्धयोजनेच्या पहिल्या टप्प्यास मंजुरी दिलेली असून २०१७ पर्यंत या योजनेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी २२४२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. उत्पादनक्षमतेसह दूध उत्पादनात वृद्धी, दूध संकलनासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण व विस्तार तसेच दूध उत्पादनाच्या बाजारपेठेची उपलब्धता, ही या योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत. जनावरांच्या जनुकीय क्षमतांचे गुणवृद्धीकरण, उत्तम वळूंची व त्यांच्यापासून उत्तम गुणांच्या वीर्यमात्रेची निर्मिती व जोपासना, त्याचबरोबर जैवसुरक्षेची उपाययोजना ही यासंबंधीची धोरणेही अधोरेखित करण्यात आली आहेत. तूर्तास, ही योजना देशातील दूध उत्पादनातील अग्रेसर अशा १४ राज्यांत राबविली जाणार असून महाराष्ट्राचाही समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पशुधन संख्या व दूधनिर्मिती :
अद्ययावत पशुगणनेनुसार २००७-२०१२ या पाच वर्षांत या पशुधनात वाढ होत असल्याची नोंद झाली. तथापि, संकरित गायवर्गीय जनावरांची संख्या मात्र २०१२ सालच्या पशुगणनेत ३९.७३ लाख इतकी वाढलेली दिसून आली. देशभरात विस्तृत प्रमाणावर राबविण्यात आलेल्या संकरीकरणाबरोबरच विविध विकास योजना व जनजागृती कार्यक्रमाचे हे श्रेय असल्याचे मानले जाते. मात्र याबरोबरच देशी पशुधनाची संख्या रोडावली. १९९७ सालातील १७८.७८ लाखात असलेली ही संख्या २००३ मध्ये १६०.४९ लाख व २०१२ साली सर्वात कमी म्हणजे १५१.७२ लाख इतकी झाली. दुसऱ्या बाजूला म्हैसवर्गीय जनावरांच्या पशुधनात मात्र सातत्याने वाढ होताना दिसून आली आहे. १९५१ सालच्या केवळ ४३.४ लाख या संख्येवरून या पशुधनाची संख्या २०१२ पर्यंत १०८.७ लाख इतकी वाढली. म्हैसवर्गीय जनावरांना उत्पादनात दिलेली प्रथम पसंती याला कारणीभूत असल्याचे मानले जाते. विशेष समाधानाची आणि अभिमानाची बाब ही की, दूध व दुग्धजन्य पदार्थाचे प्रमाण लक्षणीय असे वाढले असल्याचे दिसून येते आहे. १९५०-५१ सालच्या केवळ १७ लाख टन या प्रमाणावरून २०१२-१३ सालापर्यंत १३२.४ लाख टन इतकी गरुडझेप ही किरकोळ बाब नाही. दर दिवशी प्रतिव्यक्ती २०११-१२ साली चक्क २९० ग्राम इतकी उपलब्धता होण्याइतपत वाढ झाली असून, आता आपण कित्येक वर्षांनंतर भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेच्या (२८० ग्राम) आवश्यकतेच्या प्रमाणापेक्षा अधिक दूधनिर्मिती होताना पाहत आहोत. ही वाढ जागतिक पातळीवरील प्रमाणकाच्या (१.५ टक्के) किती तरी पुढे (५ टक्के) आहे.
ही सगळी आकडेवारी अतिशय प्रागतिक संकेतांची असली तरी या सर्व समृद्धीला एक बेचव करणारी वस्तुस्थिती ही आहे की, अजूनही प्रत्येक जनावरामागे (गाय किंवा म्हैस) केलेल्या गुंतवणुकीनुसार व जनावराच्या क्षमतेनुसार आपण लाभाचे गणित साकार करू शकलेलो नाही. प्रत्येक जनावरामागे जेवढे दूध उत्पादन व्हायला हवे तितके ते होत नाही, ही खरी गंभीर बाब आहे. जगातील १७ टक्के पशुधनापासून आपण जगाच्या केवळ १६ टक्केच दूधनिर्मिती करीत असून अमेरिका मात्र जगाच्या केवळ ६ टक्केच पशुधन संख्येच्या बळावर जगाच्या १२.५ टक्के दूध उत्पादन करते आहे, यावरून आपण आपल्याच क्षमता कशा अविकसित ठेवलेल्या आहेत हे समजून यावे. शिवाय, काही अपवाद वगळता, किती तरी पशुरोगांवर अजूनही आपण प्रभावी नियंत्रण मिळवू शकलेलो नाहीत. लाळ्या खुरकुत या केवळ एका रोगावर आपण नियंत्रण मिळवले, तर वर्षांकाठी २० हजार कोटी रुपयांचे नुकसान टळून, दुग्धोत्पादनात थेट पाच टक्के इतकी भरघोस वाढ होऊ शकते.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on dairy business
First published on: 17-12-2015 at 01:14 IST