रमेश पाध्ये

‘समाज प्रबोधन पत्रिके’त १९७९ साली माधव दातार एक सदर चालवत होता. त्या सदरासंदर्भात मी पत्रिकेचे संपादक स. ह. देशपांडे यांच्याशी बोलल्यावर त्यांनी मला सांगितले की माधव माझ्या कुळाचा म्हणजे डाव्या विचारांचा आहे. त्या वेळी मुंबई विद्यापीठात पीएच.डी. करीत होता आणि मीही श्रीमती कांता रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र या विषयाचे मार्क्‍सवादी आकलन जाणून घेण्याचा प्रयास करीत होतो. कामाच्या धामधुमीत आमची प्रत्यक्ष भेट झाली नाही. परंतु त्यानंतर सुमारे पाच वर्षांत, मी ‘मॅन्स वलर्डली गुड्स’ या पुस्तकाचा अनुवाद प्रकाशित करण्यासाठी धडपडत असतपाना पुस्तकाची एक प्रत त्याने आगाऊ नोंदवावी यासाठी त्याला ‘आयडीबीआय’मध्ये जाऊन भेटलो. त्याने २५ रु. देऊन प्रत नोंदवली आणि यानंतर आमच्या दोघांत मैत्रीचे बंध निर्माण होण्यास सुरुवात झाली.

माधव उच्चविद्याविभूषित आणि आयडीबीआयमध्ये मॅनेजर. मी बीए आणि कारकुनी करणारा. परंतु माधवची थोरवी म्हणजे आमच्या शिक्षणातील वा नोकरीतील तफावतीचा परिणाम जराही न होता मैत्री वाढू शकली. माधवचा पिंड मुळातच अ‍ॅकेडेमिक. त्यामुळे कोणत्याही अर्थशास्त्रीय प्रश्नाचा विचार करताना तो त्या संबंधित विद्वज्जनांचे विचार लक्षात घेऊन आपले विचार ठामपणे मांडणारा. तसेच कोणत्याही प्रश्नावर भाष्य करण्यापूर्वी तज्ज्ञांचे निरूपण विचारात घेणारा. त्यामुळे त्याचे लिखाण वाचणे हा एक आल्हादक अनुभव असे.

माधवने आयडीबीआय बँकेत वरिष्ठ पदावर काम केल्यामुळे त्याच्यावर जबाबदारीचे मोठे ओझे होते. तरीही त्याने अर्थचित्रे, महाराष्ट्र- एका संकल्पनेचा मागोवा आणि १८५७ चा उठाव- काल आणि आज अशी पुस्तके लिहिली. तसेच निवृत्तीनंतर त्याने ‘अच्छे दिन- एक प्रतीक्षा’ आणि ‘फ्यूचर ऑफ पब्लिक सेक्टर बँक्स इन इंडिया’ ही पुस्तके पूर्ण केली. याव्यतिरिक्त नियतकालिके/ दैनिके यांत नैमित्तिक लिखाणही केले. यापैकी ‘फ्यूचर ऑफ..’ या इंग्रजी पुस्तकात, वेळीच योग्य पावले उचलली नाहीत तर बँकिंग व्यवसाय आणि परिणामी एकूण अर्थव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता संभवते, यावर नेमके बोट ठेवून त्याने त्याची या संदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. माधव व्यक्तिस्वातंत्र्याला परमोच्च स्थान देणारा होता. तसेच अर्थव्यवस्थेत बाजारपेठेचे प्रभुत्व मान्य करणारा विचारवंत होता. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करणारे आणि बाजारपेठेमध्ये नको तेव्हा नको तसा हस्तक्षेप करणारे सरकार त्याच्या दृष्टीने टीकेचे लक्ष्य बनणे स्वाभाविक ठरत होते. त्या तपासणीतून ‘अच्छे दिन..’ हा ग्रंथ साकारला आहे.

माधव हा सफाईने इंग्रजीत विचार मांडू शकत होता. इंग्रजीपेक्षा मराठीत लिहिणे त्याला कठीण पडत असणार. मात्र कटाक्षाने तो मराठी भाषेत व्यक्त होत राहिला. आजच्या जमान्यात मातृभाषेवर असे प्रेम करणारी माणसे विरळाच!

माधवचा मित्रपरिवार खूपच मोठा होता. तो आपल्या वैचारिक भूमिकेच्या संदर्भात पुरेसा आग्रही असणारा असला तरी दुसऱ्या व्यक्तीला न दुखावता आपले विचार त्यांच्या गळी उतरवण्यात वाकबगार होता. तो एककल्ली बिलकूल नव्हता. ‘अर्थशास्त्र एके अर्थशास्त्र’ अशा खोलीत त्याने स्वत:ला कोंडले नव्हते. अर्थशास्त्र हा त्याच्या आवडीचा, म्हणून अभ्यासाचा विषय होता. तसेच त्याला शास्त्रीय संगीत ऐकण्याची आवड होती. मोकळा वेळ मिळाला की नवनवीन प्रदेशांत भटकंती करणे हा त्याचा छंद होता. तसेच नाटक, चित्रपट पाहण्याची आवडही त्याला होती. या सर्व छंदांसाठी, आवडीच्या गोष्टींसाठी तो वेळ कोठून आणायचा असा मला प्रश्न पडे.

गेले सुमारे वर्षभर तो ‘अर्थ आणि अन्वय’ हा ब्लॉग लिहीत असे. २८ एप्रिलला त्याने या ब्लॉगवरील शेवटचा लेख लिहिला. अखेरच्या दिवसापर्यंत त्याचे लिखाण सुरू होते, ते असे. तो माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान होता. त्याची प्रकृती चांगली होती. त्यामुळे कालौघात माझ्यावर मृत्युलेख त्याने लिहायला हवा होता. पण तो माझ्या आधी गेला. तो असा अचानक आणि अकाली गेल्यामुळेआज प्रत्यक्षात माधववर मृत्युलेख लिहिण्याची वेळ माझ्यावर आली आहे. खरं तर अशी वेळ माझ्यावर यायला नको होती.

padhyeramesh27@gmail.com