गुलजार.. शायर, गीतकार, लेखक, पटकथाकार.. त्यांनी ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात आपलं लेखन, त्या मागचं विचार करणं, आजचं सामाजिक वास्तव, बदलता सिनेमा यावर भाष्य केलं होतं. त्यातील काही विचार तुकडे पुन्हा वाचकांसाठी..त्यांना ज्ञानपीठ जाहीर झाल्यानिमित्त.

प्रत्येकजण भवताल आपल्या आत रिचवत असतो. माझंही तसंच. तेच माझ्या लिहिण्याबाबतही. माझ्या भवतालाशी, माझ्या काळाशी माझी गाठ बांधलेली आहे. अगदी घट्ट. त्यामुळे तेच माझ्या लेखनात उतरतं. जो भवताल माझ्या लेखनात येतो, त्याचाच मीही एक घटक आहे. माझं लेखन हे त्याला दिलेला प्रतिसादच. त्यात जे अनुभवाला आलं तेच मी लिहितो. माझा प्रवास हा असा आहे- सोपा आणि सरळ. याचं कारण मला माझ्याविषयी नाही, तर तुमच्याविषयी सांगायचं असतं. आपल्या समाजाविषयी, आपल्या काळाविषयी बोलायचं असतं. या काळाने काय काय दाखवलं आपल्याला. स्वातंत्र्य मिळालं, सोबत फाळणीची भळभळती जखमही. तिथून आजवर खूप काही बदललं. काळ पुढे सरकत राहिला तसं पिढया बदलल्या, भाषा बदलल्या, अवघं जीवनच बदलून गेलं. हा बदल माझ्या नजरेसमोर झालाय. त्याचा स्पर्श मलाही झालाय. तेच टिपण्याचा प्रयत्न मी करतो. नव्हे, मी माझ्यासमोर आरसा घेऊनच बसलोय. त्यात जे दिसतं तेच लिहितो.

Freedom of press, right to dignity,
वृत्तपत्र स्वातंत्र्याचा वापर प्रतिष्ठेच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यासाठी नको – उच्च न्यायालय
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

हेही वाचा >>> सात रंग के सपने!

****

कवितेचा रस्ता

मला कवितेचा रस्ता मिळाला आहे. मला जे म्हणायचं आहे, माझा राग, प्रेम सारं काही त्यातून व्यक्त होतं. चित्रकला, संगीत, गायन आदी कलांमध्ये काही तरी भरल्या भरल्यासारखं जाणवत राहतं. लेखन ही एकमेव कला अशी आहे जी अतिशय एकांतात चालते. त्या अर्थाने ती लोन्ली आर्ट आहे. इतर कलांमध्ये हे एकटेपण नाही. तुमच्याकडे शब्द आहेत, भाषा आहे, विचार आहे मग व्यक्त व्हा, इतकं ते सोपं आहे!

****

मुझको भी तरकीब सिखा कोई!

कुठल्याही सृजनशील व्यक्तीच्या खासगी आयुष्याचे संदर्भ त्याच्या सृजनामागे, अभिव्यक्तीमागे असतात. मात्र त्या अभिव्यक्तीचे स्वरूप असे ठेवले जाते की ते खासगी संदर्भ कळू नयेत. कवितेत प्रतीमा-रूपकांचा वापर हा कवीची वैयक्तिक दु:खं झाकण्यासाठीच होत असतो. मात्र कवी त्याच्या वैयक्तिक अनुभवांविषयीच सांगत असतो-

‘मुझको भी तरकीब सिखा कोई,

यार जुलाहे!

अक्सर तुझको देखा है कि ताना बुनते

जब कोई तागा टूट गया या ख़त्म हुआ

फिर से बांध के

और कोई सिरा जोडम् के उसमें

आगे बुनने लगते हो

तेरे इस ताने में लेकिन

इक भी गांठ गिरह बुनतर की

देख नहीं सकता है कोई

मंने तो इक बार बुना था एक ही रिश्ता

लेकिन उसकी सारी गिरहें

साफ़ नजर आती हैं मेरे यार जुलाहे!’

****

सिनेमांनी काय करायला हवं?

सिनेमांनी स्वत:चं साहित्य रचायला हवं. आजचे सिनेमे नेमकं ते करतायत. सिनेमाची ही अनवट चित्रभाषा प्रगल्भपणे टिपण्याएवढं आज दृश्यकला माध्यम विकसित झालं आहे. त्यामुळे आजचे सिनेमे साहित्यातून काही उचलत नाहीयत. त्यांना जे सांगायचं आहे ते ते स्वत:च सांगतायत. त्यांनी आजचे विषय वेचले आहेत, तेही वर्तमानपत्रांतून, कुठल्या कथा-कादंबरीतून नाही. त्यांच्या गोष्टी आजच्या आहेत. माझ्या मुलीने- मेघनाने ‘तलवार’ सिनेमा केला. न्याययंत्रणेचं काम कसं चालतं, यावर त्यातून चपखल भाष्य केलं गेलं आहे. या नव्या पिढीला जे म्हणायचं आहे, ते ते म्हणतायत. आज विविध विषयांवर सिनेमे बनतायत. मला वाटतं ही प्रगती आहे.

****

..तर भाषा आणखी विकास पावतील

‘‘गेली जवळपास ५० वर्ष मी महाराष्ट्रात राहतो आहे. मराठीला अभिजात भाषेता दर्जा लवकरात लवकर मिळावा असं मला वाटतं. मराठी किंवा अन्य भारतीय भाषांना मी प्रादेशिक भाषा मानत नाही, त्या राष्ट्रीय भाषाच आहेत, असं माझं मत आहे. फक्त त्यांच्याशी जोडलेलं अर्थकारण वाढीला लागलं आणि त्यांच्यात होणाऱ्या बदलांचं स्वागत केलं तर या भाषा आणखी विकास पावतील.’’

****

मोठेपण असं ठरतं..

वयाने नाही तर शहाणीवेनं मोठेपण ठरत असतं. आताच्या पिढीबद्दल मला फारच आशा आहेत. मी या पिढीचा हात हाती घेऊ पाहतो, त्यांच्याबरोबर चालायचा प्रयत्न करतो. मात्र त्यांचा वेग अफाट आहे.

‘म दौड दौड कर कदम मिलाता हूँ

उफ्स् ये जिंदगी कितनी तेज चलती है..’

****

मी सर्जनशील डावा आहे..

आज कम्युनिस्ट पक्ष ऱ्हासाकडे वाटचाल करू लागला आहे. याचं कारण काळाबरोबर न बदलणं. आजही ते रशियन क्रांतीतच अडकून पडले आहेत. परंतु माझं वैयक्तिक मत विचाराल, तर आजही सर्व उपलब्ध पर्यायांत मला कम्युनिस्टच सर्वात प्रामाणिक वाटतात. मूल्यांशी घट्ट बांधलेले हे लोक आहेत. आणि हे म्हणण्याचं मला स्वातंत्र्य आहे, कारण मी सर्जनशील डावा आहे!