अमित शहा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘भारतीय संस्कृतीचा जागर करत, त्याआधारे देशबांधवांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करण्याचा लोकमान्य टिळकांचा प्रयत्न होता. त्यांचे म्हणणे होते की, खरा राष्ट्रवाद भूतकाळातील गौरवाच्या पायावरच निर्माण केला जाऊ शकतो.’’.. लोकमान्य टिळकांच्या विचारकार्याचे त्यांच्या स्मृतिशताब्दी समाप्तीनिमित्ताने केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेले हे स्मरण..

१ ऑगस्ट १९२० रोजी, अजरामर स्वातंत्र्यसैनिक आणि महान विचारवंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी इहलोकीची यात्रा संपवून परलोकी प्रस्थान केले. लोकमान्यांचे निधन होऊन आता १०० वर्षे झाली; मात्र त्यांचे व्यक्तित्व, त्यांचे विचार आणि त्यांनी सुरू केलेल्या परंपरा आजही तितक्याच कालसुसंगत आहेत, जितक्या त्या १०० वर्षांपूर्वी होत्या. त्यांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व वर्तमानकाळासाठी एक अमूल्य वारसा आहे. एक असा वारसा- ज्यात व्यक्ती, समाज आणि राष्ट्र या तिन्ही घटकांना मार्गदर्शन करण्याचे कालातीत सामर्थ्य आहे.

लोकमान्य टिळक बहुआयामी क्षमतांचे धनी होते. शिक्षक, अधिवक्ता, पत्रकार, समाजसुधारक, विचारवंत, तत्त्वज्ञ, प्रखर वक्ता, नेता, स्वातंत्र्यसैनिक अशा विविध भूमिकांत त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या होत्या. या सर्व भूमिकांमध्ये त्यांची प्रतिभा आणि बुद्धिकौशल्य अत्यंत स्पष्ट स्वरूपात दिसून येते. खरे तर, बाळ गंगाधर टिळक यांची विलक्षण क्षमता आणि व्यापक व्यक्तिमत्त्व समजून घेणे इतके सहजसोपे नाही. टिळकांच्या व्यक्तिमत्त्वात एक असे तेज होते, अशी ऊर्जा होती, ज्यामुळे जनसामान्यांबरोबरच विद्वान, असामान्य व्यक्तीही त्यांच्याकडे सहजच आकर्षित होत असत. त्यांच्या व्यक्तित्वाच्या प्रभावामुळेच, टिळकांपासून मिळालेल्या ऊर्जेतून महात्मा गांधींना ‘स्वदेशी’चा मंत्र मिळाला; मदनमोहन मालवीय यांनी स्वत:ला बनारस हिंदू विद्यापीठाच्या स्थापनेच्या कार्यात झोकून दिले; तर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अरविंद घोष यांनी टिळकांपासून प्रेरणा घेत क्रांतीचा मार्ग पत्करला.

देशाच्या स्वातंत्र्याविषयी टिळकांचे मत अगदी स्पष्ट होते. ते काँग्रेसमधले असे पहिले नेते होते, ज्यांनी ‘संपूर्ण स्वराज्या’ची मागणी करत, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच!’ अशी गर्जना केली. या एका घोषणेने स्वातंत्र्यलढय़ाला जनचळवळीत रूपांतरित केले होते. सर्वसामान्य जनतेला स्वातंत्र्यलढय़ात सहभागी करून घेण्याविषयी त्यांचे असे मत होते की, भारतीयांना आपल्या संस्कृतीच्या वैभवाची ओळख करून दिली तरच त्यांच्यात आत्माभिमान आणि राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण केली जाऊ शकते. याबद्दल त्यांनी ‘मराठा’मध्ये लिहिले होते की, ‘खरा राष्ट्रवाद भूतकाळातील गौरवाच्या पायावरच निर्माण केला जाऊ शकतो.’

मला असे वाटते की, १९५१ साली भारतीय जनसंघाची स्थापना झाली, तेव्हा त्याच्या मुळाशी कुठे ना कुठे टिळकांचेच विचार होते. कारण भारतीय जनसंघाने भारताच्या विकासाचा जो आराखडा तयार केला होता, तो कुठल्याही परदेशी विचारांवर आधारित नव्हता; तर भारतीय तत्त्वज्ञान, संस्कृती आणि ज्ञानावर आधारलेला होता.

भारतीय संस्कृतीचा जागर करत, त्याआधारे देशबांधवांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करण्याचा टिळकांचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. ज्यात प्रामुख्याने सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवाजी महाराज जयंती उत्सवाचा समावेश होतो. टिळकांच्या पुढाकाराने सुरू झालेले हे उत्सव आजही मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. या सांस्कृतिक जागरातून स्वातंत्र्यासाठीचे राष्ट्रीय आंदोलन- जे त्याआधी काँग्रेसच्या काही नेमस्त नेते आणि त्यांच्या अनुयायांपुरतेच मर्यादित होते, त्या आंदोलनाला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत व्यापक स्वरूप देण्याचे अवघड, मात्र अत्यंत महत्त्वाचे काम त्यांनी केले. जर टिळकांचे संपूर्ण आयुष्य पाहिले तर आपण म्हणू शकतो, भारताच्या स्वातंत्र्य लढय़ाला खऱ्या अर्थाने ‘भारतीय’ स्वरूप देण्याचे काम कोणी केले असेल, तर ते लोकमान्य टिळकांनी केले! जनमानसाशी कायम नाळ जोडलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे टिळक महाराज; आणि यामुळेच त्यांच्या नावामागे ‘लोकमान्य’ ही उपाधी स्वाभाविकपणे जोडली गेली!

अनेक महत्त्वपूर्ण कार्यासोबतच, टिळकांनी राष्ट्रवादी पत्रकारितेच्या माध्यमातूनही देशात स्वातंत्र्याची ज्योत सतत प्रज्वलित ठेवण्याचे काम केले. इंग्रजी भाषेतील ‘मराठा’ आणि मराठी भाषेतील ‘केसरी’ वृत्तपत्रातून त्यांनी लिहिलेले अग्रलेख लोकांपर्यंत पोहोचत, तेव्हा त्यातील एकेक शब्द इंग्रज राजवटीच्या विरोधात विद्रोहाची ठिणगी पेटवणारा आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याची ज्वाळा धगधगती ठेवणारा असे. आपल्या अग्रलेखांमधून टिळक इंग्रज राजवटीतील क्रौर्य आणि भारतीय संस्कृतीविषयी इंग्रजांच्या मनात असलेल्या हीन भावनेवर कठोर टीका करत. या जळजळीत अग्रलेखांचे इंग्रजांना इतके भय वाटत असे, की त्यामुळेच त्यांनी अनेकदा टिळकांविरुद्ध राजद्रोहाचा खटला चालवून त्यांना तुरुंगात टाकले होते.

लोकमान्य टिळक केवळ भारतीय संस्कृतीविषयीच बोलत नसत, तर भारतीय अध्यात्मशास्त्र आणि सांस्कृतिक विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. जेव्हा ब्रिटिश सरकारने त्यांच्याविरोधात खटला चालवून त्यांना ब्रह्मदेशात मंडालेच्या तुरुंगात पाठवले, तेव्हाही त्यांचे सांस्कृतिक अध्ययन आणि चेतना जागृतच होती. किंबहुना, तुरुंगात मिळालेल्या मोकळ्या वेळेत, त्यांच्यातला विद्वान जागा झाला आणि त्यातूनच आपल्याला भगवद्गीतेतील रहस्यांचा शोध घेणाऱ्या ‘गीतारहस्य’ या अद्वितीय ग्रंथाची अमूल्य भेट मिळाली. याबद्दल राष्ट्रकवी दिनकर यांनी म्हटले आहे -‘श्रीभगवद्गीता एकदा कर्मयोगी श्रीकृष्णाच्या मुखातून आपण ऐकली, आणि दुसऱ्यांदा त्याचे खरे निरूपण लोकमान्य टिळकांनी केले.’

सामाजिक सुधारणांबाबतही टिळकांचे स्पष्ट मत होते की, या सुधारणा केवळ सुधारकांच्या भाषणांमधून होणार नाहीत. त्या तेव्हाच होतील, जेव्हा आपण आपल्या आयुष्यात त्यांचा अंगीकार करू. ते केवळ हे बोलत नव्हते, तर त्यांनी आपल्या दोन्ही कन्यांचा विवाह त्या १६ वर्षांच्या झाल्यावर केला आणि ज्या सुधारणांविषयी ते बोलत त्यांचे प्रत्यक्षात पालन केले. अस्पृश्यता आणि भेदभावासारख्या कुप्रथांचा त्यांनी कठोर विरोध केला. २५ मार्च १९१८ रोजी मुंबईत झालेल्या दलित समाजाच्या संमेलनात बोलताना ते म्हणाले होते की, ‘‘देव जर अस्पृश्यता मानत असेल, तर अशा देवाला मी मानत नाही.’’ सुमारे १०० वर्षांपूर्वी हे बोलणे अत्यंत धाडसाचे काम होते. विविध प्रसंगी वेगवेगळ्या जातींच्या संमेलनांत सहभागी होत, त्यांच्यासोबत भोजन करत लोकमान्यांनी आपले अस्पृश्यताविरोधी विचार सिद्धदेखील केले होते.

टिळक केवळ राज्यशास्त्राचे विद्वान नव्हते, तर मुत्सद्देगिरीतही निपुण होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १९५६ साली लोकमान्य टिळकांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात दिलेल्या भाषणात, त्यांच्यो कार्यशैलीचे वर्णन करताना जे शब्द वापरले होते, ते मला इथे आठवत आहेत : ‘‘निर्बंधांची जी अत्यंत कमाल कक्षा असेल तिथपर्यंत लढाई द्यायची; त्यांचा निर्बंध जसा आत आला, आपण थोडं आत यायचं, आणि बाहेर जाताना त्यांना बाहेर ढकलून द्यायचं.’’

आज आपण ‘आत्मनिर्भर भारत’ निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. तेव्हा हे सांगणे उल्लेखनीय ठरेल की, लोकमान्य टिळकांनीदेखील त्यांच्या काळात स्वदेशी आणि स्वावलंबनावर भर दिला होता. त्यांनी शिक्षण, माध्यमे, लघुउद्योग, कापड गिरणी असे अनेक प्रकारचे उद्योग सुरू केले आणि त्यांचे संचालनदेखील केले. एवढेच नाही, तर स्वदेशी उद्योगांना निधी मिळावा यासाठी त्यांनी ‘पैसा फंड’ नावाने एक गुंतवणूक फंड सुरू केला. या सर्व उपक्रमांतून त्यांनी दिलेला संदेश स्पष्ट होता की, इतर देशांवर भारताने अवलंबून राहू नये. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने अग्रेसर होत आहे. मातृभाषेतून शिक्षण दिले जावे असा टिळकांचा कायम आग्रह असायचा. आज जेव्हा ३४ वर्षांनी मोदी सरकारने नवे शैक्षणिक धोरण आणले आहे, त्यात मातृभाषेतून शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

शेवटी मी एवढेच सांगू इच्छितो की, ‘मरण’ आणि ‘स्मरण’ या शब्दांमध्ये केवळ अर्ध्या ‘स’चा फरक आहे. मात्र, या अर्ध्या ‘स’साठी तुम्हाला आयुष्यभर आपल्या सिद्धांतांनुसार, आदर्शानुसार वाटचाल करावी लागते, तेव्हाच मरणानंतर १०० वर्षांनीदेखील लोक आपले ‘स्मरण’ करतात. लोकमान्य टिळकांचे व्यक्तिमत्त्व असेच होते, की १०० वर्षांनंतरही लोकांच्या मन-मस्तिष्कावर त्यांच्या विचारांची छाप कायम आहे आणि येणारी कित्येक वर्षे त्यांचा हा प्रभाव कायम राहणार आहे.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on occasion of the centenary of lokmanya tilaks thought work by union home minister amit shah abn
First published on: 08-08-2020 at 00:06 IST