अशोक लवासा
प्रामाणिकपणा, त्यातील अडथळे वा धोके, त्यातून येणारे प्रश्न आणि भोग, एकाकीपणा, न मिळणारी साथ.. याविषयीचे हे चिंतन.. धैर्याचे मोल सांगणारे!
‘प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण’ किंवा इंग्रजीत ‘ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी’ असा एक विषय शालेय पातळीवरच्या वादविवाद स्पर्धामध्ये नेहमी असायचा. गंमत म्हणजे या विषयाच्या बाजूने आणि विरुद्ध बोलणारे असे दोन्ही पक्ष प्रामाणिकपणा हवाच, अशा मताचे असायचे- मग वादाचा मुद्दा एवढाच असे की ‘प्रामाणिकपणाची किंमत मोजावी लागते, सुख हरपते’ असे विरोधी बाजू म्हणे, तर ‘प्रामाणिकपणाचे सुख सर्वोच्च’ असे सकारात्मक बाजू म्हणायची. अशासारख्या उक्तींमधले शहाणपण काय होते, असा प्रश्न आजही अनेकांना पडत असेल. ‘धोरण’ याचा अर्थच मुळी, जे पूर्ण विचारान्ती- बऱ्या परिणामांची शहानिशा आणि उपलब्ध पर्यायांमधून योग्य निवड करून जे ठरवले जाते ते! धोरण म्हणजे ‘उचित आणि कार्यक्षम वर्तन किंवा कृती’विषयीचे पूर्व-निर्णयन; किंवा ‘त्या त्या प्रसंगी कोणत्या प्रकारे वागणे तुम्हास सर्वोत्तम वाटते’ हे तुमच्या धोरणामधून ठरत असते. मुद्दा असा की, ‘धोरण’ हे नेहमी ‘ठरवलेलेच’ असते आणि ते निव्वळ मूल्यसंस्कारांमुळे ‘आतून आलेले’ नसते.
इथे प्रामाणिकपणाबाबतचा प्रश्न येतो : विविध प्रसंगांतून, परिस्थितींतून वाट काढण्यासाठी प्रामाणिकपणाचा मार्ग बुद्धय़ा ‘अंगीकृत’ केलेला असतो, की प्रामाणिकपणा हेच मुळात एक मूल्य आहे आणि ते व्यक्तीच्या चारित्र्याचा अविभाज्य भाग म्हणून ‘अंगभूत’ असते? विविध प्रसंगांत वागायचे कसे, परिस्थितीतून वाट कशी काढायची, समस्येवर उत्तर कसे शोधायचे यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात आणि अशा वेळी ‘निर्णय’ होतो तो एकतर मनोमन, झटकन होतो किंवा सारासार विचार केल्यावर निर्णय घेतला जातो. उदाहरणार्थ, रिक्षाचालकाला कुणा प्रवाशाचे पैशाचे पाकीट रिक्षातच पडलेले सापडते- तेव्हा चालक त्या प्रवाशाला शोधून काढण्याचा प्रयत्न करील, किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात पाकीट नेऊन देईल किंवा हा चालक त्याच्या रिक्षामालकाला (‘धनी’ला) पाकिटाबद्दल कल्पना देईल. यापैकी कोणताही निर्णय घेऊन त्याने कृती केली, तरीही- जोवर पैसे स्वत:च्या खिशात घालत नाही तोवर- तो प्रामाणिकच ठरणार. त्याला त्याच्या या प्रामाणिकपणाचे फळ (किंवा बक्षीस) देखील मिळेल.. पण त्यासाठी त्याने, मिळालेल्या पाकिटातील पैसा स्वत:च्या खिशात घालण्याच्या आनंदाचा त्याग केलेला आहे आणि हा त्याग करताना त्याने त्याची ‘सदसद्विवेकबुद्धी’ वापरून काहीएक निर्णय केलेला आहे.
हे उदाहरण फारच सरळसोपे वाटले असेल. पण प्रामाणिकपणाच्या ‘धोरणा’ची किंमत नेहमीच मोजावी लागते. किंवा असे म्हणू की, परताव्याची कोणतीही शक्यता दृष्टिपथात नसूनही केलेली ती गुंतवणूक असते. प्रामाणिकपणाचा मार्ग हा धर्माच्या मार्गाप्रमाणेच नेहमी ‘सरळ’ असतो, पण ‘सोपा’ मात्र क्वचितच असतो. उलट तो अनेकदा त्रासदायक ठरतो, त्यात आपली अधिक शक्ती खर्च होते, कधी कधी तर निव्वळ ‘रस्ता खराब म्हणून वाहनाचे नुकसान’ अशीही गत या मार्गाची होत असते. या कशाचीही तमा न बाळगता प्रामाणिक माणसे आपला मार्ग सोडत नाहीत, याचे कारण त्यांच्या जबरी मनोबळातच शोधावे लागते. अर्थात, हे असे ‘जबरी मनोबळ’ म्हणजे वेडेपणाच्या आदली पायरी असेही समजले जाते. कोण समजते? समाज! पण समाज जितके अडथळे उभे करील, जितकी बाधा आणेल, तितकी प्रामाणिक माणसे ही आपण निवडलेल्या मार्गाबद्दल निग्रही, कृतनिश्चयी होत असतात.
‘असते कुणाकुणाला वेड प्रामाणिकपणाचे’ असे याबद्दल म्हणावे काय? प्रामाणिकपणा इतका संहारक, की बाकी साऱ्या सुखासमाधानांची राखरांगोळी करून तो एकटाच उरावा? कार्यकारणभावाची आणि संभाव्य परिणामांची काहीच पत्रास न बाळगणारे हे ‘प्रामाणिकपणाचे वेड’ एक तत्त्व म्हणून अगदी पवित्रसुद्धा ठरेल; पण कोणत्याही व्यवस्थेला त्याचा उपयोग शून्यच असतो. त्यामुळेच, प्रामाणिकपणाविषयी इतक्या संकुचित, इतक्या एककल्ली कल्पनाच खऱ्या मानून चालणारा समाज हा कधीच एक उत्पादक व्यवस्था होऊ शकत नाही. या संकुचित कल्पनांचा परिणाम असा होतो की, माणसे ‘चारित्र्यपट्टा’ घालून वावरतात पण त्यांच्याकडे ते असतेच असे नाही.
मग माझ्या मते प्रामाणिक माणसे म्हणजे, आपापले काम करताना त्यातून अपेक्षित परिणाम साध्य व्हावेत यासाठी प्रामाणिक साधने वापरणारी आणि अशा प्रकारे काम करताना ‘वाटेल ते झाले तरी करून दाखवायचेच’ या व्यावहारिक दबावापुढे तसेच कार्यप्रवणतेला बाधकच ठरणाऱ्या नैतिक दबावापुढे न झुकणारी माणसे. उदाहरणार्थ एखाद्या सनदी अधिकाऱ्याच्या बाबतीत, लोकभावनांची कदर करणे ही अप्रामाणिक कृती ठरत नाही, पण केवळ ‘विद्यमान’ दबावांपुढे मान तुकवणे हा अप्रामाणिकपणा ठरतो.
किंबहुना एखाद्या सनदी अधिकाऱ्याने (लोकसेवकाने), एखाद्या व्यक्तीची खरीखुरी अडचण समजून घेऊन लोकहिताशी तडजोड न करता ती सोडवण्याचा केलेला प्रयत्न, ही अप्रामाणिक कृती ठरू शकत नाही. अशा प्रकारच्या (खरोखरच्या) व्यक्तिगत अडचणी सोडविण्यासाठी लोकहितास बाधा न आणता केलेला हस्तक्षेप, हा ‘मेहेरनजर’ म्हटला जाऊ शकत नाही. व्यवस्थांतर्गत नियमजंजाळामुळे एखाद्या व्यक्तीच्या अडचणी समजून घेतल्या जाण्यास वावच मिळत नाही, अशी परिस्थिती जेव्हाजेव्हा उद्भवते तेव्हा तेव्हा औचित्यपूर्ण मार्ग काढता यावा, यासाठीच तर वरिष्ठ पातळीवर तारतम्याधिकार आवश्यक असतो. फक्त नियम-पालनच करण्याचा अत्याग्रह बाळगल्यास गतिहीन नोकरशाही, समोर दिसणाऱ्या प्रश्नांवर उत्तर शोधण्याचे काम करण्याऐवजी निव्वळ नियमानुसार काम करण्यात धन्यता मानेल.
तारतम्याधिकाराचा वापर अयोग्य वा अनुचित हेतूसाठी होऊ नये, यासाठी ‘भ्रष्टाचार विरोधी कायदा’ आहेच. मात्र हाच कायदा, एखाद्याने योग्य हेतूने दाखविलेले तारतम्यही कात्रीत पकडण्याचा सापळा म्हणून वापरला जाऊ लागला तर नोकरशाहीचा कणा मोडेल.. जनसेवेची ‘सनद’ विसरलेले केवळ ‘सेवक’ अशाने उरतील. योद्धय़ाचे चिलखतच शरीरास टोचू लागले किंवा योद्धय़ाच्या हालचालींवरच मर्यादा आणू लागले, तर असल्या योद्धय़ांचा पराभवच ठरलेला असणार.
‘सत्यप्रियता’ हा प्रामाणिक व्यक्तीचा अत्यावश्यक गुण असतो. अशा व्यक्ती, काय चुकीचे आणि काय योग्य हे आपल्या आतल्या आवाजास विचारतात आणि हा अंतरात्म्याचा आवाज सहसा कायदे, बंधन-मोकळीक यांविषयीची उमज आणि नैतिकता यांमधून घडत गेलेला असतो. आतला आवाज ऐकताना परिणाम- जोखीम यांचे जाणीवपूर्वक विश्लेषण क्वचितच होत असते, हे खरे. किंबहुना चांगले असण्याचा धोका तो हाच. मग अशा व्यक्तीला मूर्ख ठरविले जाते, त्या व्यक्तीला हौतात्म्याची हौस आली आहे अशी हेटाळणी होते आणि त्या व्यक्तीकडे व्यवहारचातुर्याचा अभाव आहे असे म्हटले जाते.. यापैकी ‘व्यवहारचातुर्य’ हे तर यशस्वी सनदी अधिकाऱ्यांचे ‘कवच’च एक प्रकारचे.
प्रामाणिकपणाची जशी किंमत मोजावी लागते, तशी ती आयुष्यातील बहुतेक साऱ्या गोष्टींचीही मोजावी लागतेच. ही किंमत – प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे- मोजण्याची तयारी असणे, हा प्रामाणिकपणाचाच भाग असतो. मात्र प्रामाणिकपणाचा त्रास कोणास सहन करावा लागतो, यावर ही किंमत अवलंबून असते. ‘प्रामाणिकपणा व्यक्तीची किंमत वाढवतो!’ किंवा ‘दीर्घकालीन विचार करता, प्रामाणिकपणाच वाखाणला जातो’ वगैरे सुविचार हे सु-विचारच आहेत पण प्रत्यक्षात, ‘दीर्घकालीन’मधला काळ हा खरोखरच फार, फार दीर्घ असू शकतो. वर्षांनुवर्षे रखडावे, तेव्हा कुठे अंमळ कौतुकाचा थोडाफार शिडकावा होऊ शकतो. शिवाय, प्रामाणिकपणापायीच एरवीची सहिष्णुता बाजूला ठेवून तुम्ही ज्यांना विरोध केलात, ते मात्र तुमच्याबद्दल सहिष्णू असतील ही अपेक्षा चुकीचीच ठरते. ते कधी तरी उलटा तडाखा देतातच आणि मग ‘प्रामाणिकपणाची किंमत’ ही एकटय़ानेच लढावे लागण्याच्या, कधी कधी तर थेट एकाकी पाडले जाण्याच्या पातळीवर येते. प्रामाणिक माणसाला केवळ स्पर्धकांकडूनच नव्हे तर तथाकथित मित्रांकडूनही धक्के बसू शकतात. ‘भयहीन चित्त जेथ’ असलेल्या प्रामाणिक व्यक्तीला धमकावणारे हे प्रत्यक्षात डरपोक, शेपूटघालू आहेत हे प्रामाणिक व्यक्तीचे मत असू शकेलही, पण वेळ अशी असते की भयहीनाला भयभीतांकडून भय दाखविले जाते.
अर्थात, प्रामाणिक व्यक्तीला साथ न देणारे एकजात सारे ‘अप्रामाणिक’ असतात, असे म्हणणे हा भोळसट भावनातिरेक ठरेल. लोक सर्वसाधारणपणे चांगलेच असतात, पण बहुतेकदा ते शेपूटघालू असतात इतकेच. भीती म्हणजे दुर्भावना नव्हे, तसेच भयहीनता म्हणजे नेहमी सद्भावनाच असेही नव्हे. भयहीनतेमुळे धैर्य नक्की येते. आणि धैर्यहीन प्रामाणिकपणा, हा फारच दयनीय गुण म्हणायला हवा.
प्रामाणिक व्यक्ती शरीराने समर्थ नसतील, शक्तिमान नसतील; पण त्यांच्याकडे धैर्य असते आणि हे धैर्यच त्यांची शक्ती असते. प्रामाणिक व्यक्तीला एकाकी पाडले जाते आहे हे दिसूनसुद्धा जे काहीच करीत नाहीत, त्यांच्याकडे धैर्य नसू शकते. मग ते नाटकाच्या प्रेक्षकाप्रमाणे शांत बसून बघत राहतील.. पण कदाचित भरतवाक्याच्या वेळी टाळ्यांचा गजर करतील. मुख्य पात्राबद्दल त्यांना सहानुभूती असेलही, पण या पात्राचे भोग संपावेत म्हणून हे ‘प्रेक्षक’ रंगमंचावर जाऊन काही करणार नाहीत. सुखान्त दिसला तर बघे सुखावतात, शोकान्त दिसल्यावर बघेसुद्धा हळहळतात. भोवताली बघे नसतील तर खेळ रंगणार कसा? अशा बघ्यांसमोर खरे तर असतो तो, खेळात असावं की नसावं हा एकच सवाल.. ‘टु बी ऑर नॉट टु बी’सारखा! आणि ‘मुख्य पात्र’ मात्र एकटय़ाने, ‘अंगीकृत’ किंवा ‘अंगभूत’ भूमिका वठवत राहते.. प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण हे पटल्यानंतर, ती भूमिका कधी संपणारच नसते.
लेखक भारताच्या निवडणूक आयोगाचे सदस्य असून या लेखातील मते वैयक्तिक आहेत.