शिवसेना म्हणजे बाळासाहेब. याचं कारण शिवसेनेमध्ये अंतर्गत लोकशाही नाही. लोकशाही नसल्यामुळे पूर्वी बाळासाहेबांचा शब्द अंतिम असायचा, आता उद्धवजींचा शब्द आमच्याकडे अंतिम आहे. या दोघांनी आपल्या वक्तृत्वाने शिवसेना मोठी केली. मी शिवसेनेत गेली ४८ वर्षे कार्यरत आहे. सुरुवातीपासून पक्षाचा नेता म्हणून पक्षात होतो, आजही नेता म्हणूनच आहे. बाळासाहेबांनी त्यांना शक्य होतील तेवढी पदं मला दिली. नुसती पदं दिली नाहीत, तर ज्या ठिकाणी गेलो, तिथे प्रमुख झालो. म्हणूनच सर्वप्रथम मी शिवसेनाप्रमुखांचे ऋण व्यक्त करतो. १९६७ पासून बाळासाहेब हयात असेपर्यंत मी त्यांच्याबरोबरच होतो. त्यांचं माझ्यावरचं प्रेम अलौकिक होतं. हा नेता जगावेगळा होता आणि त्यांच्या नेतृत्वाचं वर्णन करण्यासाठी मी गूढ हा शब्द वापरेन.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेचा सुरुवातीचा काळ चमत्कार या शब्दाने वर्णन करण्यासारखाच होता. हा चमत्कार घडवणाऱ्या नेत्याने कधी आपला विचार केला नाही. त्यांच्या मनात नेहमी तीनच विषय होते. एक म्हणजे मराठी माणूस, दुसरा हिंदुत्व आणि तिसरा आपल्यानंतर संघटनेचं काय? या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बाळासाहेबांनीच शिवतीर्थावर झालेल्या एका सभेत दिलं होतं. त्या सभेत ते म्हणाले होते की, माझा मुलगा उद्धव मी तुम्हाला देऊन टाकतोय. आत्तापर्यंत तुम्ही मला पाठिंबा दिलात. यापुढे तुमचा पाठिंबा माझा मुलगा आणि त्याच्याही मुलाला द्या! उद्धवजी आता शिवसेनेचे खऱ्या अर्थाने पक्षप्रमुख आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आणि विविध महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचं नेतृत्व उत्तमरीत्या सांभाळून त्यांनी स्वत:ला सिद्ध केलं आहे.

आंदोलनं आणि शिवसेना</strong>

अनेक जण सेनेकडे छोटीमोठी कामं घेऊन येतात आणि शिवसेना ती कामं करते. उद्या या, मग बघू, पाहतो मी; ही अशी वाक्यं सेनेच्या शब्दकोशात नाहीत.  सरकारकडे काम असेल, तर आमदाराने तक्रारदारासह स्वत: मंत्रालयात जायचं आणि तक्रार सोडवून घ्यायची, असा दंडक बाळासाहेबांनीच घालून दिला आहे.  शांततेनं आणि सनदशीर मार्गानं सांगणं, ते ऐकलं नाही तर मोठय़ा आवाजात सांगणं आणि त्यानेही प्रश्न सुटला नाही, तर आंदोलन ही सेनेची कार्यपद्धती आहे.

काळ प्रादेशिक पक्षांचा

ज्या पक्षात आपण काम करतो, त्या पक्षाबद्दल नि:पक्षपातीपणे आपली भूमिका मांडणे खूप कठीण आहे; पण चार पावसाळे पाहिलेल्या माझ्यासारख्या नेत्याने ते करणंही अपेक्षित आहे. शिवसेनेपुढील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, ५० वर्षे पूर्ण होत असतानाही शिवसेनेला राज्यात स्वबळावर एकहाती सत्ता मिळवता आलेली नाही. काही दिवसांपूर्वी देशातील अन्य तीन राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये त्या-त्या राज्यांमधील प्रादेशिक पक्ष सत्तेवर आले. याचाच अर्थ येणारा काळ प्रादेशिक पक्षांचा आहे. त्यामुळेच शिवसेनेला अधिक नियोजनबद्ध आणि जपून पावलं टाकणं गरजेचं आहे. शिवसेना आतापर्यंत सत्तेत आली नाही, त्याला सेनेची संघटनात्मक बांधणी हे कारण नसून राजकारणातील अस्थिरता हे कारण आहे.

तंत्रज्ञानाच्या वाटेने

बाळासाहेबांनी शिवसेनेची जबाबदारी उद्धवजींकडे सोपवल्यानंतर शिवसेनेच्या कार्यपद्धतीत थोडा बदल झाला आहे. सुरुवातीला रस्त्यावर उतरून हक्क मिळवणारी सेना काळानुसार प्रगत आणि व्यापक झाली आहे. उद्धवजींनी प्रगत तंत्रज्ञान आणि जनसंपर्काच्या माध्यमांचा प्रभावी वापर सुरू केला आहे. टीव्ही आणि समाजमाध्यमांवरील जाहिरातींद्वारे पक्ष लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचत आहे. प्रादेशिक पक्ष असूनही शिवसेनेने चांगलीच मुसंडी मारली आहे.

व्यक्ती चुकली, तर पक्ष संकटात

लोकांचे प्रश्न सोडवले नाहीत, तर लोक एका पक्षाला कंटाळतात. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांसाठी आत्मपरीक्षण आवश्यक असते. शिवसेनेसारख्या पक्षासाठी तर ते खूपच जास्त आवश्यक आहे. आत्मपरीक्षण करून वेळीच दोष दूर केले नाहीत, तर पक्षासाठी ते धोकादायक ठरेल. शिवसेना हा एका व्यक्तीभोवती फिरणारा पक्ष आहे. अशा वेळी ती केंद्रस्थानी असलेली व्यक्ती चुकली, तर पक्ष संकटात सापडतो.  केवळ मराठी माणसांचा पक्ष म्हणून बिगरमराठी लोकांना दूर लोटता येत नाही, हेदेखील लक्षात घ्यायला हवं.

बाळासाहेब आणि उद्धव

बाळासाहेबांची पद्धती आम्हा कोणालाच कधीच कळली नाही. आमच्या पक्षात ते सांगतील, ती पूर्व दिशा असायची. बाळासाहेबांनी अनेकदा काँग्रेसला पाठिंबा दिला होता.  त्यांचे हे निर्णय आम्हा कार्यकर्त्यांसाठी आणि नेत्यांसाठी अतक्र्य असायचे; पण त्याबद्दल त्यांना कधी कोणीच विचारलं नाही.  बाळासाहेब उघडपणे सांगायचे की, मी हुकूमशहा आहे, पण उद्धव यांची कार्यपद्धती वेगळी आहे. त्यांनी या कार्यपद्धतीत बदल करून आता नेत्यांची नियमित बैठक घेण्यास सुरुवात केली आहे. यातही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. नेत्यांच्या बैठकीतील विविध विचारांचा परिणाम आपल्या विचारांवर होऊ  न देणं, ही सर्वोच्च नेत्याची कसोटी असते. तसेच जवळच्या लोकांमधून आपला खरा हितचिंतक कोण, हेदेखील ओळखावे लागते. उद्धवजींची ही कार्यपद्धती नक्कीच स्तुत्य आहे.

सत्तेत राहून सत्ताधाऱ्यांविरोधात बोलणं चूकच

सध्या शिवसेना सत्तेतही आहे, पण सध्या सेना-भाजप युतीमध्ये कलगीतुरा रंगल्याचं चित्र आहे. माझ्या मते, दोन्ही पक्षांतील नेत्यांनी अधिक काळजीपूर्वक विधानं करणं आवश्यक आहे. सत्तेत येऊन सत्ताधाऱ्यांविरोधात बोलणं चूक आहे. मी मुख्यमंत्रिपदी असताना गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री होते. आमच्या सत्तेच्या शेवटच्या काळातही सेना-भाजपमध्ये दरी निर्माण झाली होती, पण त्या वेळी त्यांच्या पक्षातर्फे  प्रमोद महाजन आणि शिवसेनेतर्फे मी, आम्ही दोघांनी युती टिकावी म्हणून प्रयत्न केले होते. आता तसे प्रयत्न करणारे दोन्ही पक्षांमध्ये कोणीच दिसत नाही. तरीही दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या जवळ येण्याची गरज आहे.

बाळासाहेबांना हिऱ्याची पारख

उद्धव आणि बाळासाहेब यांच्या बाबतीत आणखी एक जाणवलेली गोष्ट म्हणजे बाळासाहेब माणसं दुरावणार नाहीत, याची खूप काळजी घेत. त्यांनी निवडलेली माणसं त्यांनी शेवटपर्यंत जपली होती. माणसं निवडतानाच त्यांनी एक एक हिरा पारखला होता. त्यांनी पारखून कोंदणात बसवलेले काही हिरे त्या कोंदणातून निसटले आणि शेवटी ते कोळसे ठरले; पण असे क्षुल्लक अपवाद वगळता बाळासाहेबांबरोबर एकनिष्ठ राहिलेल्यांची गणना होऊ शकणार नाही.

 

– (शब्दांकन : रोहन टिल्लू)

– मनोहर जोशी 

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bal thackeray and shiv sena
First published on: 19-06-2016 at 02:50 IST