आरती कदम
पहिलवान फक्त पुरुषांनीच असावं, हे स्नेहा कोकणेपाटील हिला कधी पटलंच नाही. पहिलवानी रक्तात होती, पण घरातून तीव्र विरोध. लग्नानंतर मात्र तिच्या स्वप्नांना दिशा मिळाली. कराटेमध्ये तिनं ‘ब्लॅक बेल्ट’ मिळवला, पण एके दिवशी शरीरसौष्ठव स्पर्धेनं तिला मोहात पाडलं. सामाजिक मानसिकतेमुळे या खेळात मुली कमीच होत्या, शिवाय या स्पर्धेत टिकायचं तर प्रचंड मेहनत होती. तिनं ती घेतली आणि आज ती ‘नाशिक -श्री’, ‘महाराष्ट्र -श्री’, ‘भारत -श्री’, आंतरराष्ट्रीय (आशियाई) डायमंड कप स्पर्धेत रौप्यपदक अशा एक एक पायऱ्या चढते आहे. पुरुषी, मर्दानी मानल्या गेलेल्या खेळाची मक्तेदारी मोडून काढत असतानाच स्वसंरक्षणासाठी मुलींना कराटेपटू म्हणून घडवते आहे. ती आहे ‘भारत -श्री’ आजची दुर्गा.
स्नेहा कोकणेपाटील
भारत -श्री, महाराष्ट्र -श्री म्हटलं की पिळदार देहयष्टीचा, कमावलेल्या शरीराचं प्रदर्शन करणारा पुरुषच नजरेसमोर येतो. कारण बाई म्हटलं, की कमनीय बांधा असलेली, नाजूक, आखीव, रेखीव स्त्री असण्याची सामाजिक मानसिकता आजही आहे. तिला हीच मानसिकता मोडीत काढायची होती. पहिलवान पुरुषच असतो, कु स्ती पुरुषांनीच खेळायची असते, हे तिला अगदी लहानपणापासून पटत नव्हतं. घरातलं वातावरण तिच्या या मताला किं मत देणारं नव्हतंच, पण तिनं हार मानली नाही. ती वेगवेगळे खेळ खेळत मनाला आणि शरीराला तयार करत राहिली, थेट लग्न होईपर्यंत. नवऱ्याची मानसिकता मात्र तिच्या विचारांशी जुळणारी होती. तिला फक्त तेच हवं होतं. बाकी सगळं तिच्याच हातात होतं, तिनं उंच भरारी मारायला सुरुवात के ली.. आज ती कराटेमध्ये ‘ब्लॅक बेल्ट’ आहेच, पण बॉडी बिल्डिंग अर्थात शरीरसौष्ठव स्पर्धेत दोनदा
‘नाशिक -श्री’, दोनदा ‘महाराष्ट्र -श्री’,
‘भारत -श्री’, इतकंच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या आशियाई डायमंड कप स्पर्धेत रौप्यपदक मिळवणारी आणि पहिली महाराष्ट्रीय महिला प्रोकार्ड धारक शरीरसौष्ठवपटू ठरली आहे.
ती स्नेहा कोकणेपाटील. नाशिक जिल्ह्य़ातल्या मोहाडी खेडेगावात पहिलवान पवारांच्या घरात जन्माला आलेली. पणजोबा, आजोबा, बाबा यांच्या तीनही पिढय़ा पहिलवान. कु स्ती खेळणाऱ्या. तिच्या रक्तातच पहिलवानी होती. पण ती बाई होती. याचा अर्थ कु स्ती खेळायची नाही, हे मात्र तिला मान्यच नव्हतं. तिनं शाळेत असताना खो-खोमध्ये मैदान गाजवलं आणि महाविद्यालयात असताना वक्तृत्व स्पर्धेमध्ये. पुढे पदवीही मिळवली, पण तिला नोकरी करायची नव्हती. त्याच दरम्यान सचिन कोकणेपाटील त्यांच्या घरी येऊ लागले. एक तरुण म्हणून आकर्षण वाटू लागलंच, पण हळूहळू त्यांच्या कराटे वर्गाविषयी माहिती मिळाली. एक क्रीडापटूच आपल्याला समजून घेऊ शकतो हे तिच्या लक्षात आलं. ओळख वाढली, एकदा ती त्यांच्या कराटे वर्गावर पोहोचली. तिच्या लक्षात आलं, तिला हेच तर हवं आहे. स्वत: खेळाडू असावं आणि अनेकांना शिकवावं. तिनं स्वत:च लग्नाचा प्रस्ताव दिला. त्याला लगेच होकार मिळाला आणि तिच्या स्वप्नांना दिशाही.. लग्नानंतर स्नेहा स्वत: कराटे शिकली. ब्लॅक बेल्टपर्यंत पोहोचली. प्रशिक्षक झाली. स्वत:च्या पायावर उभं राहात खेळाडू घडवायला लागली. पण तिचं मन त्यात रमत नव्हतं. तिला पहिलवान व्हायचं होतं.
बॉल्डी बिल्डिंग एक्स्पो मुंबईत भरलं होतं. ते वर्ष होतं, २०१६. त्या वेळी पहिल्यांदा तिनं शरीरसौष्ठव स्पर्धेत स्त्रियांना पाहिलं. पण बहुतांशी परदेशी. दोघी-तिघी भारतीय होत्या, पण त्याही पंजाब, दिल्लीच्या. अनेक जण त्यांच्याबरोबर सेल्फी काढून घेत होते. स्त्रियांना स्वीकारलं जातंय.. मानसिकता बदलतेय हे तिच्या लक्षात आलं. पण त्या स्पर्धेत मराठी मुलींचं नसणं तिला खटकत होतं. प्रशिक्षकांशी बोलल्यावर तिच्या लक्षात आलं की, तीन गोष्टी या मुलींच्या पुढे जाण्याच्या आड येत आहेत. एक तर बिकिनी घालून स्पर्धेत उतरणं, दुसरं जीभेवर प्रचंड ताबा ठेवण्याबरोबरच भरपूर पौष्टिक पदार्थ खायला लावणारं डाएट करणं आणि कसून मेहनत करणं. तिच्या स्पप्नांपुढे या तीनही गोष्टी सहजसाध्य होत्या. तिनं आव्हान स्वीकारलं. दिवसभरात सात तास कसून मेहनत आणि त्या मेहनतीला साजेसा आहार- रोज ३० अंडी, पाव किलो चिकन, १५० ग्रॅम मासे, भाज्यांचं सॅलॅड आणि सोबतीला गावठी साजूक तूप. चवीसाठी फक्त हळद आणि मीठ. इतर काही खायचा मोह झालाच तर पुढची स्पर्धा दिसायला लागायची.
पहिली स्पर्धा नाशिकमध्येच होती. तिच्याच सासर-माहेरच्या गावी. टू पीस बिकिनी घालून परीक्षकांसमोर उभं राहायचं होतं. लोक काय म्हणतील हा विचार मनाला चाटून गेला, पण तेवढय़ापुरताच. तोपर्यंत तिनं ‘सिक्स पॅक्स’ कमावले होते. स्नायू पिळदार झालेले होते. तिला तेच परीक्षकांना दाखवायचे होते. तिनं स्पर्धा जिंकली. हळूहळू स्नेहानं एके क स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात के ली. तिच्या चालण्याच्या अंदाजावर, रफ-टफ बोलण्यावर, टूपीस बिकिनी घालण्यावरून मारले गेलेले टोमणे भारतासाठी दोनदा खेळल्यावर मात्र विरून गेले. अर्थात अशा टोमण्यांकडे लक्ष दिलं असतं तर मी कधीच
‘भारत -श्री’ बनू शकले नसते, हे भान स्नेहाला नेहमीच होतं. आज तिचे आई-वडीलही तिच्यावर खूष आहेत याचा तिला आनंद आहे.
ती म्हणते, ‘‘खेळ आपल्या शरीराला मजबूत बनवतो. कु ठलाही खेळ खेळा, पण स्वसंरक्षण करण्याइतकं स्वत:ला घडवा. विशेषत: मुलींनी.’’ त्यासाठी ती नाशिक महानगरपालिके च्या शाळेतील आणि विविध पाडय़ांवरच्या मुलींना मोफत कराटेचं प्रशिक्षण देते आहे. ‘भारत -श्री’ झाल्यापासून मात्र तिच्याकडे अनेक जणी या मार्गदर्शनासाठी येत आहेत. मुलींची संख्या याही क्रीडा प्रकारात वाढते आहे.
ती सांगते आता माझं एक स्वप्न आहे, ‘‘भारताचा ध्वज माझ्या खांद्यावर असावा. पार्श्वभूमीला आपलं राष्ट्रगीत वाजत असावं. आणि ‘अरनॉल्ड क्लासिक’ ही जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा मी जिंकावी.’’ स्नेहाचं हे स्वप्न पूर्ण होवो आणि भारतीयांची मान याही क्षेत्रात अधिकच उंचावली जावो हीच सदिच्छा.
ग्रॅव्हिटस फाऊंडेशन प्रस्तुत लोकसत्ता दुर्गा
सहप्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
पॉवर्डबाय : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.
यश कार्स राष्ट्रीय केमिकल्स अॅड फर्टिलाइजर्स लि.
संपर्क : स्नेहा कोकणेपाटील
ईमेल – sachinkokanesir@gmail.com
दूरध्वनी – ८८०६६८४२१८