‘त्यांची’ भारतविद्या : अजिंठा प्रकटे पुन्हा…

आनंदाच्या भरात त्याने नको तो मूर्ख उन्माद केला. तिथल्या भित्तिचित्रावर आपले नाव कोरून टाकले!

अजिंठ्याच्या गुंफा आणि वाघुर नदी दाखवणारे हल्लीचे छायाचित्र; भूशास्त्र-अध्यापक आणि प्रस्तरतज्ज्ञ मनोज ना. बागडे यांनी अजिंठा प्रस्तरांना असलेल्या धोक्याबाबत लिहिलेल्या विद्वन्मान्य अभ्यासनिबंधातून Geotech Geol Eng 39, 3101–3114 (2021))

|| प्रदीप आपटे

अजिंठ्याच्या गुंफा ‘दिसल्या’, त्या निजामी आणि मराठी मुलखावर कंपनीचा पूर्ण अंमल आल्यानंतर वर्षभरात! मग पुढली सुमारे ३५ वर्षे या अद्भुत लेण्यांचा अभ्यासच ब्रिटिशांकडून- अधूनमधून सुरू होता. लेण्यांचे जतन व्हावे, ही भावना मूळ धरू लागली होती…

सन १८१९. जेम्स स्मिथ, निजामशाही भागातला मद्रास रेजिमेंटचा एक ब्रिटिश सैन्याधिकारी. वाघुर नदीकाठाने वाघाचा शिकारी पाठलाग करीत चालला होता. वाघ हुलकावणी देत दिसेनासा झाला. नीट नजरेस पडत नव्हता. त्याच्या कानावर एका स्थानिक पोऱ्याचा आवाज आला. तो पोरगा त्याला वाघ कुठे असेल याची चाहूल सांगत होता. तेवढेच साहेबाकडून बक्षिसी मिळेल या आशेने! पोरगा खुणावत होता त्या दिशेने स्मिथने नजर टाकली. नदीकाठाला लगटून उंचीवर अर्धगोल डोंगर पसरला होता. स्मिथने नीट न्याहाळलं. तर त्याच्या नजरेस सोनेरी पिवळसर आणि लाल डाग दिसला तोही खांबाच्या आड आणि मधोमध! स्मिथच्या लक्षात आले इथे काही तरी प्राचीन वास्तू आहे. त्याचे डोळे लकाकले. त्याने दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांतले लोक हाताशी घेतले. झाडझाडोरा, काटेकुटे निवारत त्या कड्याच्या दिशेने वाट धरली. नदीच्या वरच्या बाजूला घोड्याच्या नालासारखा अर्धगोल कडा होता. आणि त्या कड्याची रांग धरून काही गुंफा होत्या. एका गुंफेत त्याने पाऊल टाकले. आणि पलित्याच्या प्रकाशात पाहिले. समोर काय नजरेस पडणार असे काहीच स्मिथच्या ध्यानीमनी नव्हते. नजरेस पडला भिंतीवरचा सात्त्विक तेजाचा एक चेहरा… या अचानक बुद्धदर्शनाने स्मिथ भांबावला. या एकाएकी लाभलेल्या साक्षात्कारी लाभाने तो हुरळून गेला. आनंदाच्या भरात त्याने नको तो मूर्ख उन्माद केला. तिथल्या भित्तिचित्रावर आपले नाव कोरून टाकले!

स्मिथला जे गवसले त्याचा पुरेसा बोलबाला झालाच. त्यानंतर १८२४ साली स्कॉटलंडमधील सर जेम्स अलेक्झांडर हा लष्करी अधिकारी या गुंफा बघण्यासाठी अजिंठ्याला भेट द्यायला आला. या गुंफांबद्दल अधिक सविस्तर वर्णन त्याने लिहिले. (ट्रान्झॅक्शन्स ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट बिटन अँड आयर्लंड (१८२९) मध्ये हे प्रसिद्ध झाले आहे.) त्याने सर्वच्या सर्व गुंफा पूर्णतया निरखलेल्या नव्हत्या. जे जे डोळा भरून पाहिले आणि रेखाटून घेता आले त्यावरचे हे छोटेखानी, नऊ-दहा पानांचे टिपण आहे. तिथले कडुनिंब, मोह आणि बाभळी वृक्ष, विस्कट माजलेली गवते आणि झुडपांनी बुजबुजले रान, त्या खोऱ्यात जमेल तशी क्रूर वाटमारी करणारे भिल्ल, श्वापदांचे भय आणि या सगळ्याला न जुमानता अलेक्झांडरने जोडीला घेतलेली गावकरी फौज… शिकारकथा वाटावे असे वर्णन त्याने लिहिलेल्या टिपणात सुरुवातीला आहे. त्याला त्या काळात ठाऊक असलेल्या बुद्ध, जैन आणि वैदिक परंपरांचे तुलनात्मक वर्णन आहे. सयाम, ब्रह्मदेशातील बुद्ध उपासनांचे वर्णन आहे. तेथील चित्रांची त्या चित्रांतल्या मनुष्याकृती, त्यांच्या हालचाली आणि हावभाव, आसनाची ढब, अलंकार आणि त्यावरली त्याची संक्षिप्त टिप्पणी अशा सगळ्या तपशिलांनी हे टिपणात भरले आहे. उदा. चित्रांमधल्या स्त्री-पुरुषांचे कुरळे वर्तुळवृत्ती केस, त्यांच्या केशभूषा, तुलनेने ठसठशीत जाडसर ओठ यामुळे त्याला ते आफ्रिकन ठेवणीचे वाटले! प्रवेशद्वार कमानींची ठेवण कार्ले आणि कान्हेरी लेण्यांशी मिळतीजुळती आहे. नीटसे रेखाटलेले हत्ती, घोडे, त्यावरचे स्वार, टक्कर जुंपलेले मेंढे आणि कोंबड्या यांची रेखाटने. त्याला विशेष वाटले ते म्हणजे त्रिशुळी भाले! त्याने विशेष वाद्यासंबंधी निरीक्षण नोंदले आहे. ‘हे एक गाण्याच्या साथीचे वाद्य आहे आणि त्याला तीन तारा आहेत’ असे तो नोंदतो! तीनतारी वाद्य म्हणजे ‘सेह तार’! (फारसीतले सेह म्हणजे तीन! सेह अधिक तार हा सितार/ सतारचा मूळ शब्द आहे. किन्नरांच्या हातातील वाद्य आकाराने प्रचलित सरोदशी मिळतेजुळते आहे.) भित्तिचित्रांमधल्या प्रमुख रंगछटा, त्यामधील लाल रंगाचा बलवत्तरपणा असे किती तरी तपशील त्याने अधोरेखिलेले आहेत. तेथील चतुष्स्तंभी रचना, त्यावरील उभे कंगोरे, त्यांचे ग्रीक व रोमन शैलींशी असलेले साधम्र्य आणि वैधम्र्य याकडेही त्याने लक्ष वेधले आहे.

त्याने आत शिरल्यावर जे काही भव्यदिव्य पाहिले त्याने तो भारावून गेला होता. त्याने जवळचे वेरुळदेखील पाहिले होते. पण त्याला अजिंठामधील कला अधिक उच्चतर, कल्पक आणि पाहणाऱ्याला निराळी मनोवस्था प्राप्त करून देणारी वाटली. आपण बघितले ते फार निराळे उच्च दर्जाचे प्राचीन स्मारक आहे. ते आणखी नीट बघितले पाहिजे याची त्याला जाणीव होती. तो खेदाने लिहितो, ‘हाती असलेल्या वेळेमध्ये जेवढे जमेल तेवढे मी बघितले. माझी रजा जवळजवळ संपत आली आहे. येथून निघणे क्रमप्राप्त आहे, पण मला इथे पुन्हा यायलाच पाहिजे आणि मी येईनच.’

या भारावलेल्या वर्णनांबरोबरीने त्याच्या कथनामध्ये लेण्यांची विदारक अवस्थासुद्धा तितकीच ठाशीव वर्णिलेली आहे. गुंफांमध्ये वाटमारी करणाऱ्यांच्या वर्दळीच्या खुणा दिसत होत्या. या गुंफा त्यांच्या लपून दबा धरण्याच्या, तात्पुरत्या वस्तीच्या अशा जागा बनल्या होत्या. त्यांच्या विझलेल्या शेकोट्या, छताला धरलेली मधमाश्या आणि गांधीलमाश्यांची पोळी, धुळीत आणि वाळक्या चिखलात उमटलेले श्वापदांच्या पायांचे ठसे तिथे जागोजागी होते. एवढेच काय एका माणसाचा अवघा अतूट सांगाडा होता! त्यावर विशेष म्हणजे त्याचा पोर्तुगीजांवरील शेरा! तो म्हणतो, ‘पोर्तुगीजांच्या तावडीत आलेल्या अन्य धर्मीयांच्या वास्तूंची जशी वाट लागते तसे इथे अजून झालेले नाही. सुदैवाने इथल्या चित्रांवर पोर्तुगीजांचा भ्रष्ट विद्रूप करणारा हात चाललेला नाही!’ हे लिहिताना बहुधा त्याच्या मनांत घारापुरी लेण्यात पोर्तुगीज सैनिकांनी केलेला विच्छेदी पराक्रम असावा. त्यांनी आपले नावे कोरली होतीच. शिवाय नेम धरून गोळीबाराचा सराव करायला ते तिथल्या मूर्तींचा वापर करीत.

अर्थात, असे नतद्रष्टपण पोर्तुगीजांनी बुद्ध्याच केले. ख्रिस्तेतर धर्मांची प्रार्थनास्थळे, मानचिन्हे, खुणा, संस्कार पाळामुळांसह उपटून टाकण्याचे धर्मवेड हे त्यांच्या साम्राज्याचे एक अधिष्ठान होते. (शतकानुशतके आपसांत धर्मयुद्ध लढणाऱ्या कर्मठ ख्रिस्ती आणि इस्लामचा हा गुण मात्र अगदी समान होता!) पण धर्मवेड नसले तरी पुरातन वारशाच्या जपणुकीची आस्था नसणारे नतद्रष्ट काही ब्रिटिशदेखील होते. पुरातन स्थळांचा वारसा जपण्याबद्दल आपली राजवट जागरूक आहे असा कंपनी सरकारचा पवित्रा असला तरी काही अधिकारी त्याला लीलया हरताळ फासत! सर जॉन माल्कम यांच्या आज्ञेवरून सातारा गादीवरच्या रेसिडेन्टचा शल्यवैद्य डॉ. बर्ड अजिंठ्याला पाहणीसाठी गेला होता. त्याने तेथील चार चित्रांचे पापुद्रे काढून पाहिले आणि चित्रे विद्रूप झाली. त्यावर कडी म्हणजे हे लोण नंतर भेट देणाऱ्या प्रेक्षकांनीदेखील जारी ठेवले! भेट दिलेल्या या स्थळाचे स्मरणचिन्ह म्हणून घेऊन जायला ते असे तुकडे खुडायचे! पुरेशी बक्षिसी दिली की तिथे नेमलेला ‘राखणदार’च त्यांना मदत करे! काही काळानंतर राल्फ नावाच्या ब्रिटिशाने अजिंठ्याला भेट दिली तेव्हा हे विद्रूपीकरण उघडकीला आले. याबद्दलची राल्फची तक्रार आणि टिपण जेम्स प्रिन्सेपने थेट ‘जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटी’मध्ये प्रसिद्ध केले. जेम्स फग्र्युसननेसुद्धा याबद्दल जोरदार आवाज उठविला. १८३९ मध्ये मद्रास लष्करामधला लेफ्टनंट ब्लेक याने अजिंठ्यावर अधिक विस्तृत वर्णन करणारा मोठा लेख ‘बॉम्बे कुरिअर’मध्ये प्रकाशित केला. १८४३ साली जेम्स फग्र्युसनने या सर्व लेण्यांची बारकाईने पाहणी केली. त्यातले वास्तुशास्त्र तपशिलाने रेखाटले. ही माहिती लिहिण्यासाठी, संकलित करून सादर करण्यासाठी त्याला सर्व लेण्यांचे नकाशे आणि क्रम नोंदणे गरजेचे होते. त्यांचा चंद्रकोरीसारखा काठावरचा क्रम धरून त्याने रस्त्यांवरच्या घरांना द्यावे तसे लेण्यांना क्रमांक देऊन टाकले (असे त्याने स्वत:च लिहिले आहे!) आणि तेच आजतागायत रूढ झाले.

अशा प्राचीन काळाच्या वारसा-स्मारकांचे जतन, संरक्षण, जपणूक ही जुनाट चिरकाळी दुखण्यासारखी समस्या आहे. काही ना काही काळाने ती डोके वर काढतेच! अगदी चार-पाच वर्षांपूर्वी धाराशिव (उस्मानाबाद) इथल्या लेण्यांची पावसाने खचून होणारी पडझड, स्थानिक गुंड आणि हौशी पर्यटक यामुळे होणारी दुर्दशा यांच्या बातम्या येतच होत्या! त्यालाही इतिहास आहेच, पण अजिंठ्याबाबत एक भलता वेगळा पर्याय वापरून पाहिला गेला. त्याची सविस्तर कथा पुढच्या वेळी.

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Caves at ajanta british james smith a british army officer of the nizamshahi madras regiment akp

Next Story
भिंद्रनवाले स्मृतिभवन : ४ महिन्यांपूर्वी!
ताज्या बातम्या