कुठेही असलो तरी आपल्या भूमिकेत बदल होणार नाही हे छगन भुजबळ यांनी जाहीर करून टाकले ते एका अर्थी बरेच झाले. ‘रिडल्स’च्या मोर्चानंतर हुतात्मा चौकात गोमूत्र शिंपडणारे भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडल्यावर फुले, आंबेडकर, शाहू महाराजांचा जयजयकार करू लागले. ‘शरद पवार हे आपले एकमेव नेते आहेत’ असे सांगणाऱ्या भुजबळ यांनी राष्ट्रवादीतील बंडात शरद पवारांऐवजी अजित पवारांना साथ दिली. ही साथ कशासाठी दिली हे वेगळे सांगण्याची गरज नाही. संभाजी भिडे यांनी महात्मा फुले यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करताच आपण कोणत्या पक्षाबरोबर आहोत हे विसरून भिडे यांना लक्ष्य केले. भाजपबरोबर गेल्याने भुजबळ मोदी यांचे गुणगान गाणार का, असा प्रश्न साहजिकच उपस्थित झाला. पण अजित पवार यांच्याप्रमाणे भुजबळांनी अद्याप तरी मोदींची भलामण केलेली नाही. भाजप हा शेठजी-भटजींचा पक्ष म्हणून हिणविण्यात भुजबळ मागे नव्हते.  त्यातील भटजींवर भुजबळांनी तोंडसुख घेतले आणि समस्त भाजपची मंडळी नाराज झाली. लगेचच भुजबळांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

फरक पडेल का ?

पक्ष सोडून जाणाऱ्या धनंजय मुंडे यांच्याविरोधात शरद पवार यांच्या दौऱ्यात जोरदार टोलेबाजी होईल, अशी राष्ट्रवादीमधील उपस्थितांची इच्छा. खरे तर औरंगाबादमधील पत्रकार बैठकीत मंत्रीपदाच्या कारकीर्दीमध्ये महिलेने केलेल्या आरोपाची माहिती अजित पवार उत्तरसभेत देतील, असा टोला शरद पवार यांनी लगावल्यानंतर राष्ट्रवादीची सभा टोकदार होईल असे मानले जात होते. ती टोकदार झालीही पण भाजपविरोधात. परळीत गुंडगिरी वाढत असल्याचे वाक्यही सभेत ऐकले प्रत्येकाने. मुंडे विरोधातील एक कार्यकर्ताही राष्ट्रवादीने आपल्या कळपात ओढला. पण बीडचे राजकारण हे व्यक्तिगत टीकेवर बेतलेले. गोपीनाथ मुंडे यांनी त्यात शरद पवार विरोध भरून ठेवला होता. आता तो काहीसा कमी झाला आहे खरा. पण पवारांच्या सभेनंतर एक वाक्य चर्चेत आले आहे ‘ काय फरक पडेल का ’ उत्तरादाखल कोणी हो म्हणते कोणी नाही.

Nana patole on uddhav thackeray
“…तर उद्धव ठाकरेंसाठी मदतीला धावणारा मी पहिला व्यक्ती असेन”; मोदींच्या विधानावर नाना पटोले म्हणाले, “या जगात…”
Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 

अजितदादांना साताऱ्याचे का वावडे ?

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून पक्षाच्या स्थापनेपासून ओळखला जातो. येथे शरद पवार यांचा शब्द जसा प्रमाण मानला जातो. तसा तसाच अजित दादांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही फार मोठी आहे. साताऱ्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था, सातारा जिल्हा बँक, जिल्हा खरेदी विक्री संघ आदी अनेक संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत आणि तिथे अजित पवारांचा शब्द प्रमाण मानला जातो.  शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही गावोगावच्या अनेक कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखतात आणि या सर्वाचा दोघांशी थेट संबंध आहे.

राट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट झाल्याने साताऱ्यातही पक्षाचे दोन गटांत विभाजन झाले आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी दुसऱ्याच दिवशी सातारा जिल्ह्याचा दौरा केला. कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. अजित पवार मात्र बंडानंतर अद्यापही साताऱ्यात फिरकलेले नाहीत. स्वातंत्र्यदिनी अजित पवार कोल्हापूरमध्ये गेले पण साताऱ्याला त्यांचे पाय काही लागले नाहीत. मग कार्यकर्त्यांमध्ये त्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. अजितदादांच्या गटाचा जिल्हाध्यक्ष अद्यापही नेमण्यात आलेला नाही. यामुळेच अजितदादा बहुधा दौरा टाळत असावेत, असा कार्यकर्त्यांचा तर्क आहे.

पाणीदार राजकारण

 अमुक प्रश्न जनहिताचा असल्याने त्यात राजकारण आणू नये; असा सांगावा देताना त्यात राजकारण चोरपावलाने कसे शिरते याचा ताजा अनुभव इचलकरंजी महापालिकेच्या पाणीप्रश्नात आला. इचलकरंजी महापालिकेसाठी कागल तालुक्यातील दूधगंगा नदीतून सुळकुड या गावातून नळपाणी योजना राबवण्याला शासनाने मान्यता दिली आहे. दूधगंगेतून पाणी देणार नाही असा पवित्रा घेत कागल, शिरोळ तालुका तसेच कर्नाटकातील सीमा भागातील गावांनी वज्रमूठ उगारली आहे. तर दूधगंगेतून पाणी आणण्यासाठी इचलकरंजीकरांनी कंबर कसली आहे. त्यासाठी एकेक करीत दोन कृती समित्या कार्यरत झाल्या असून त्यासाठी समन्वयक नियुक्त केले आहेत. या माध्यमातून मांडली जाणारी भूमिका, कागलविरोधात होणारी आक्रमक विधाने यामुळे पाणी योजना राबवण्यात अडथळे येतील असे म्हणणारा एक राजकीय वर्ग आहे. अशा कृती समित्या नसाव्यात अशी त्यांची मानसिकता आहे. अशातच इचलकरंजीत मानवी साखळी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता झाल्यानंतर कृती समितीवर नाराजी व्यक्त करणाऱ्या एका गटाने कृती समितीच्या एका अध्यक्षाचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. याच वेळी समोरून जाणाऱ्या दुसऱ्या कृती समितीच्या अध्यक्षांना थांबवूनही घेतले नाही. यावरून पुढे एक, मागे एक या वृत्तीचे दर्शन आणि पाणी योजनेसाठी चालणारे राजकारण याचे दर्शन भर रस्त्यावर घडले.

(सहभाग : सुहास सरदेशमुख, विश्वास पवार, दयानंद लिपारे)