शुभ दिन, शुभ वेळ पाहताना पंचांगातील तिथी, वार, नक्षत्र पाहिले जात असल्याने समाजजीवनात पंचांगाचे महत्त्व आजही खूप आहे. पं. लक्ष्मणशास्त्री दाते (नाना) यांनी सोलापूर येथे  नव्याण्णव वर्षांपूर्वी ‘दाते पंचांगा’ची मुहूर्तमेढ रोवली. दाते पंचांगकर्त्यांच्या  अतुलनीय कामगिरीचा हा वेध, शतक महोत्सवाच्या निमित्ताने..
कोणत्याही भाषेचा उगम ही काही अचानक घडणारी गोष्ट नव्हे, मराठी भाषेचा उगम व विकास हीसुद्धा एक दीर्घकालीन प्रक्रिया होती. काळ हा त्याच्या गतीने पुढे-पुढे जात असतो. त्या त्या काळात काही घटना घडतच असतात व त्या घडलेल्या घटना पुढे इतिहासाचा पाया ठरतात. अशीच एक घटना नव्याण्णव वर्षांपूर्वी घडली ती म्हणजे कै. पं. लक्ष्मणशास्त्री दाते (नाना) यांनी सोलापूर येथे एकहाती ‘दाते पंचांगा’ची मुहूर्तमेढ रोवली. त्या वेळी त्यांनी कल्पनादेखील केली नसेल की, त्यांनी रोवलेल्या बीजाचा आज एवढा वटवृक्ष होईल.
शतक महोत्सव म्हणजे शंभरी! शंभर वर्षे एखादी संस्था किंवा घराणे  पिढय़ान्पिढय़ा एखादे कार्य अखंडपणे अव्याहत करू शकते हेच मुळी अकल्पनीय आहे आणि तेही उत्तरोत्तर प्रगती करत, म्हणजे आणखीच अतुलनीय! असेच अतुलनीय काम केले आहे दाते पंचांगकर्त्यांनी! इंग्रजीत दाते लिहिताना ऊं३ी (डेट) असे लिहिले जाते आणि ऊं३ी म्हणजे तारखा! अशा तारखांचा वेळेशी मेळ घालून, तिथी, नक्षत्र, वार यांची मांडणी करण्याची महनीय कामगिरी गेली शतकभर दाते पंचांग करत आहे.vv05आजही समाजात रोजच्या जीवनात कोणतेही कार्य करताना किंवा घटना घडल्यावर काळ, वेळ व दिवस पाहिला जातो; मग ते घरात होणारे जन्म वा मृत्यू असो, वास्तुप्रवेश असो की नूतन व्यवसायारंभ असो, यासाठी शुभ दिन, शुभ वेळ पाहताना पंचांगातील तिथी, वार, नक्षत्र पाहिले जात असल्याने समाजजीवनात पंचांगाचे महत्त्व आजही खूप आहे. पंचांग हे धर्म, श्रद्धा व भक्ती यावर आधारित नसून ते आकाशातील खगोलीय गणितावर आधारित आहे. त्यामुळे खगोलप्रेमी, आकाश निरीक्षण करणारे विद्यार्थी यांनादेखील पंचांग मार्गदर्शक ठरते. पंचांगाचा समाजाच्या जडणघडणीत फार मोठा सहभाग आहे. भारतीय संस्कृतीत रामायण-महाभारतासारख्या मोठय़ा पुराण ग्रंथातही पंचांगाचा संदर्भ असल्याचे दिसते. आपल्याकडे पंचांगाची एक फार मोठी परंपरा आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात कर्नाटक, मुंबई व इतर काही भागांतून पंचांग प्रसिद्ध होत होती, पण ती प्रांतिक व ठरावीक पंथीय लोकांसाठीच उपलब्ध होती व त्यातही एकवाक्यता नव्हती. खगोलीय गणिताचे पंचांगात फार महत्त्वाचे स्थान आहे. कै. नानांचा विचार पडायचा की, जर सर्व पंचांग खगोलीय गणितावरच आधारित आहेत तर प्रत्येक पंचांग वेगळे कसे! अभ्यास करता त्यांच्या लक्षात आले की, ही पंचांग दोन सिद्धांतावर आधारित आहेत. ‘सूर्य सिद्धांत’ आणि ‘ग्रहलाघव’! ग्रहलाघव सिद्धांत हा सुमारे ६०० वर्षांपूर्वी मांडला गेला होता, तर सूर्य सिद्धांत हा त्याच्याही पूर्वी. त्यामुळे ते विसाव्या शतकांपर्यंत कालबाह्य़ झालेले होते. या सिद्धांतापासून केलेली गणितीय मांडणी त्यामुळेच अचूक होत नव्हती, पण इतर पंचांगकर्ते ही गोष्ट मानायला तयार नव्हते. त्यांचे म्हणणे होते की, ग्रहलाघव सिद्धांत हा धर्मशास्त्रावर आधारित आहे आणि त्याच वेळेला पंचांग म्हणजे आकाशाचा आरसा असावा, पंचांगात जे लिहिले आहे ते आकाशात प्रत्यक्ष दिसले पाहिजे. म्हणून पंचांग गणित हे (दृक्तुल्य) पाहिजे, असे मत लोकमान्य टिळकांनी व्यक्त केले. त्याकरिता त्यांनी १९०६ मध्ये एक ज्योतिष परिषद भरविली होती. त्यात खूप मतभिन्नता आढळली. पण त्या वेळेला नानांनी हे ताडले की, टिळक म्हणत आहेत ते खरंच आहे. ग्रहांचा आणि धर्मशास्त्राचा काही संबंध नाही आणि त्यांनी शके १८३८ ला आपले पहिले पंचांग प्रसिद्ध केले. या पंचांगातील गणित मांडण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्या काळी आजच्यासारखे कॉम्प्युटर्स किंवा कॅलक्युलेटर्स नव्हते तर सगळी आकडेमोड स्वत: करायला लागायची. गणिते मांडण्यासाठी नाना हे भिंतीचा वापर करीत आणि पंचांगात सूक्ष्म गणित वापरण्याची प्रथा सुरू झाली, जी पुढे इतर पंचांगकर्त्यांनीदेखील अवलंबली.
कै. नानांचे सुपुत्र पं. धुंडिराज (अण्णा) यांनी वयाच्या दहाव्या वर्षांपासून खगोल गणित, धर्मशास्त्र व मुहूर्तशास्त्राचे आपल्या वडील व आजोबांच्या हाताखाली शिक्षण घ्यायला सुरुवात केली व त्यात विद्वत्ता संपादन केली. ती. अण्णांनी आपल्या विद्वत्तेने अनेकांना पटवून दिले की, गणित व धर्मशास्त्र या दोन स्वतंत्र शाखा आहेत. नाना स्वत: पंचांगासाठी लागणाऱ्या खगोल गणित, धर्मशास्त्र व मुहूर्तशास्त्र यात पारंगत होते पण पंचांगाचे गणित कसे असावे, हे धर्मशास्त्र सांगत नाही, ही गोष्ट पंचांगकर्त्यांना पटविण्यात अण्णांचा फार मोठा वाटा होता. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातसह संपूर्ण भारतातील ९० टक्के पंचांगकर्त्यांनी दृक्प्रत्ययी गणिताचा वापर करायला सुरुवात केली. हा पंचांग क्षेत्रासाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा ‘माइलस्टोन’ ठरला.
 १९५४ मध्ये त्या वेळचे पंतप्रधान पं. नेहरू यांनी ‘कॅलेंडर रिफॉर्म कमिटी’ची स्थापना केली. महाराष्ट्रामधून त्या समितीने अण्णांना आमंत्रित केले व पुढे २० वर्षे हे काम ‘दाते पंचांग’ करत होते.
पुढे अण्णांचे धाकटे बंधू श्रीधरपंत यांनी पंचांगकार्यात मदत करण्यास सुरुवात केली. ते खगोलीय गणिताचे गाढे अभ्यासक होते. पंचांग वापरणाऱ्यांच्या सोयीसाठी त्यांनी अनेक कोष्टके व रचना केल्या, ज्या पुढे जाऊन दाते पंचांगाची वैशिष्टय़े ठरल्या. १९५५ पासून दाते पंचांगाने घटीपळाबरोबरच घडय़ाळातील वेळा देण्यास सुरुवात करून दाते पंचांग सुलभ केले. क्षयमास हा १४१ वर्षांनी आणि त्यानंतर १९ वर्षांनी येतो. अण्णांच्या काळात १४१ वर्षांनी येणारा क्षयमास आला. त्या वेळेस अहमदाबाद येथील वेधशाळेने पंचांगकर्त्यांचे संमेलन बोलावले. त्यात अनेक मत-मतांतरे होती, अण्णांचे वाक्य प्रमाण मानून अध्यक्षांनी अण्णांचाच निर्णय योग्य मानला व त्यामुळे भारत सरकारला वर्षभरातील आधी जाहीर केलेल्या सुट्टय़ादेखील बदलायला लागल्या!
कै. धुंडिराजशास्त्री दाते व कै. श्रीधरपंत दाते यांनी जवळजवळ ५० वर्षे दाते पंचांगाचे काम समर्थपणे सांभाळले. दाते पंचांगाच्या संगणकीकरणाची मुहूर्तमेढ कै. श्रीधरपंत दाते यांनीच रोवली. देशभरातील विद्वान हे अण्णांशी सल्लामसलत करण्यासाठी, त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी सोलापूरला येत असत. ‘सोलापूर व दाते पंचांग’ असे समीकरण असल्याने सोलापूरचे व पर्यायाने महाराष्ट्राचेही नाव मोठे झाले, याबाबत शंकाच नाही. १९७७ पासून अण्णांचे चिरंजीव श्री. मोहनराव ही धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. धर्मशास्त्र, मुहूर्तशास्त्र, पत्रिका यांचा अभ्यास त्यांनी आपले वडील व काका यांच्याकडेच केला असल्यामुळे ते त्यात पारंगत झाले आहेत. पंचांगातील गणिताची जबाबदारी श्रीधरपंतांचे चिरंजीव विनय सांभाळत आहेत.
महाराष्ट्र, गुजरात पंचांगकर्त्यांत मतभिन्नता होती हे ओळखून मोहनरावांनी पुढाकार घेतला व सर्वानी एकत्र येऊन निर्णय घेण्याची गरज इतर पंचांगकर्त्यांच्या लक्षात आणून दिली की, ज्यामुळे समाजात सण-उत्सव याबाबत गोंधळ होणार नाही. आता वर्षांतून एकदा सर्व पंचांगकर्ते जमून शास्त्रचर्चा करून निर्णय घेतला जातो. ज्यामुळे मधली दरी नाहीशी झाली आहे.
आता दाते पंचांगाची चौथी पिढी, चिरंजीव ओंकार कार्यरत झाली आहे. दाते पंचांग दिनदर्शिका आता कन्नड व हिंदी भाषेतही प्रकाशित होते. नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारतीय सांस्कृतिक परंपरेची जगाला नव्याने ओळख करून ग्लोबल होणारे व पोथीच्या पानावरून वेबसाइटच्या जगात झेप घेणारे ‘दाते पंचांग’ असेच मोठे होवो. शतक महोत्सवाकडे वाटचाल करणारे दाते पंचांग आता मोबाइल क्षेत्रात प्रवेश करून ‘स्मार्ट’ही होत आहे.
पंचवीस वर्षांपूर्वी, पंचाहत्तरावे दाते पंचांग माझे वडील दिवंगत ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर यांच्या हस्ते प्रकाशित झाले होते. त्या वेळी भाषण करताना त्यांनी सांगितले होते, ‘‘दाते पंचांगाची शंभरी साजरी होईल तेव्हा मी या जगात नसेन, परंतु माझा उत्तराधिकारी इथे असेल.’’ आज तसेच घडत आहे, मी ‘दाते पंचांग शतक महोत्सव समिती’चा अध्यक्ष या नात्याने शंभरीच्या सोहळ्यात सहभागी झालोय. हे भाग्य मला मी साळगावकर कुटुंबात जन्माला आलो म्हणूनच लाभू शकले. या शतक महोत्सवाला आणि दाते पंचांगाच्या भावी वाटचालीला कालनिर्णय परिवारातर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो.
(लेखक ‘कालनिर्णय’चे संचालक आहेत.)