लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये जनतेच्यावतीने राज्य कारभार चालविण्यासाठी मतदारच आपला लोकप्रतिनिधी मोठय़ा विश्वासाने निवडून देतात. पाच वर्षे झाली की, लोकप्रतिनिधी आहे तोच ठेवायचा की दुसऱ्याला संधी द्यायची याचा निर्णय मतदाराच्या हाती असतो. मात्र, एकदा सत्तेची खुर्ची मिळाली की, त्यावर आजन्म आपलाच हक्क आहे असे काही लोकप्रतिनिधींचे वागणे असते. मंत्रीपद आणि तेही जिल्ह्याच्या पालकत्वासह मिळाले असेल तर आनंदीआनंदच म्हणावा लागेल. चिरस्थायी स्वरूपात पद आपणाकडेच राहणार असे समजून मंत्रीमहोदयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयालगत असलेल्या प्रशासकीय इमारतीमध्ये सुसज्ज कार्यालयाचे नूतनीकरण सध्या सुरू आहे. या कार्यालयात आल्यानंतर मतदारालाही राजदरबारात गेल्याची अनुभूती मिळावी यासाठी अत्याधुनिक फर्निचर, पंखा तर बसविला आहेच, पण मंत्रीमहोदयांसाठी आलिशान सिंहासनाची व्यवस्था करण्यात आली आहे. राजेपदाला साजेसे सिंहासन आणि नूतनीकरणावर तब्बल ३५ लाखांचा निधी आणि तोही जिल्हा नियोजन मंडळाच्या कोटय़ातून खर्च केला जात आहे. लोकशाहीतील राजा जर अशा सिंहासनावर बसणार असेल तर रस्त्यावर धक्के आहेत याची जाणीवच कशाला हवी?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुजींना धडा
कोल्हापुरातील एका शाळेतील शिक्षकांवर युवकांनी हल्ला केल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. शिक्षकास मारहाण झाली म्हटल्यावर सहानुभूती उमटणेही स्वाभाविक होते. प्राथमिक प्रतिक्रियाही तशाच होत्या. अशी घटना घडली म्हटल्यावर शिक्षक संघटनाही सतर्क झाल्या. लगेचच संघटनेची बैठक होऊन संशयित आरोपींवर कारवाई करण्यात यावी; अन्यथा आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देऊन झाले. हल्लेखोराविरुद्ध वातावरण असे तापत राहिले. संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी सांगितलेली माहिती प्रकरणाला कलाटणी देणारी होती. संबंधित शिक्षक संशयितांच्या आईला मोबाइलवरून त्रास देत होता. यामुळे शिक्षकाविषयी मनात प्रचंड रोष निर्माण झाल्याने त्याला मारण्यासाठीच हल्ला करण्यात आल्याची कबुली संशयितांनी दिली. संस्काराची शिकवण देणाऱ्या शिक्षकाचे हे असे वागणे गुरुजींच्या प्रतिमेला धक्का देणारे होते. परिणामी आक्रमक राहिलेल्या शिक्षक वृंदांनी नमते घेतले. एखाद्या प्रकरणाचा नीट अभ्यास केल्याशिवाय निष्कर्ष काढणे कसे चुकीचे आहे हेही त्यांच्या लक्षात आले. गुरुजींना मिळालेला हा धडाच होता.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Democratic system of government state administration voter people representatives amy
First published on: 03-01-2023 at 04:12 IST