वरिष्ठ सहकाऱ्यांनी जातीच्या मुद्दय़ावरून अपमानास्पद वागणूक आणि छळवणूक केल्याकारणास्तव नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील निवासी डॉक्टर पायल तडवी हिने २२ मे रोजी वसतिगृहाच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर एकूणच वैद्यकीय क्षेत्रात केला जाणारा जातीय भेदभाव, शारीरिक आणि मानसिक स्तरावर वरिष्ठांकडून होणारे शोषण, निवासी डॉक्टरांवरील कामाचा ताण, यातून येणारे नैराश्य हे प्रश्न नव्याने अधोरेखित केले गेले. विशेष म्हणजे केवळ महाविद्यालयीन वर्गातूनच नव्हे देशभरात सर्वच क्षेत्रातून याविरोधात निषेध नोंदविला गेला. डॉ. पायल तडवी प्रकरणामुळे जागे झालेल्या व्यवस्थेने नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन, २४ तास हेल्पलाइन, कामाचा ताण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना यासह महाविद्यालयातील मरगळलेल्या अवस्थेत असलेल्या रॅगिंगविरोधी समित्याही कार्यरत झाल्या आहेत.
बॉलीवूडमध्ये ‘राजकीय’ दुफळी
सत्तेशी जवळीक न साधता लोकशाही वृत्तीने आणि मुद्दय़ांसाठी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा कलाकारांनी घेतलेला पवित्रा यंदा बॉलीवूडमध्ये दुफळी निर्माण करणारा ठरला. कलेचे पाईक म्हणवणारी ही मंडळी एकमेकांच्या विरोधात उभी ठाकलेली पाहायला मिळाली. अपर्णा सेन, शुभा मुद्गल, अनुराग कश्यप, श्याम बेनेगल, कोंकणा सेन-शर्मा अशा बुद्धिजीवी म्हणून ओळख असलेल्या कलाकारांनी झुंडशाहीविरोधात भूमिका घेतली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही झुंडशाही त्वरित थांबवण्याची मागणी केली होती. धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही मूल्ये बाळगणाऱ्या आपल्या देशात प्रत्येक धर्माच्या नागरिकाला समान हक्क असल्याचे नमूद करत- ‘दंगे करणाऱ्यांविरोधात नुसते बोलून उपयोगाचे नाही, तर त्यांना कडक शिक्षा केली पाहिजे,’ असे या पत्रात म्हटले होते. मात्र ही भूमिका मांडणाऱ्या या ४९ कलाकारांना देशद्रोही ठरवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. हे सगळे इथवरच थांबले नाही, तर बॉलीवूडमधून त्यांना पाठिंबा देण्यासाठी कोणीही पुढे आले नाहीच; पण स्वत:ला बुद्धिजीवी म्हणवणाऱ्या या कलाकारांच्या गटाने राजकीय हेतूने हे पत्र लिहिले आहे, असा आरोप करत कंगना राणावत, प्रसून जोशी, मधुर भांडारकर अशा अन्य चित्रपटकर्मीची फळी त्यांच्याविरोधात उभी ठाकली. दुफळी निर्माण करणारे नामानिराळेच राहिले.
संकलन : महेश सरलष्कर, संतोष प्रधान, निशांत सरवणकर,प्राजक्ता कदम, सौरभ कुलश्रेष्ठ, जयेश शिरसाट, रेश्मा राईकवार, शफी पठाण, रविंद्र जुनारकर, राखी चव्हाण, मंगेश राऊत, रसिका मुळ्ये, शैलजा तिवले, सुहास जोशी, सुशांत मोरे, प्रथमेश गोडबोले, दिगंबर शिंदे