वाढता मूलतत्त्ववाद आणि त्याला राजकीय खतपाणी हे दहशतवादाचे मूळ आहे, हे स्पष्ट आहे. आपल्याकडे तसा तो येतोय, पण त्यावर वचक आहे. फ्रान्समधील नाइसमध्ये झालेला अतिरेकी हल्ला हे देशांतर्गत जोपासल्या गेलेल्या दहशतवादाचेच रूप आहे. दहशतवाद्यांच्या डोक्यात भिनलेला टोकाचा मूलतत्त्ववाद काढून टाकणे हे मोठे आव्हान असते, हे अशा हल्ल्यांमधून स्पष्ट झाले आहे, कारण आत्मघाताचे टोकाचे पाऊल उचलून कारवाया करण्यासाठी सिद्ध झालेल्याचे मन बदलणे सोपे नाही. त्यासाठी समाजाच्या तळापर्यंत पोहोचून मानसिक बदलाचे प्रयोग करणे हाच उपाय असतो..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण जेव्हा दहशतवाद  म्हणतो, तेव्हा साहजिकच पाकिस्तानच समोर येतो. दहशतवाद हे छुपे युद्ध असते. समोरासमोर होणारे पारंपरिक युद्ध नव्हे. याचे परिणाम पारंपरिक युद्धाहूनही भयानक असतात. सध्या भारतच नव्हे, तर जगातील अनेक देश याचा अनुभव घेत आहेत. पाकिस्तानात भयानक गरिबी आहे. त्यात टोकाच्या मूलतत्त्ववादाची भर पडली आहे. गरिबी आणि टोकाचा मूलतत्त्ववाद यांचे मिश्रण करून दहशतवाद जोपासला जातो. पाकिस्तानात दरिद्री कुटुंबांची संख्या मोठी असल्याने, काहीही करण्याची तयारी असलेली अशिक्षित मुले अल्पशा आमिषातून सहज हाती लागतात. त्यांच्या डोक्यात धर्माच्या नावाने टोकाचा मूलतत्त्ववाद भिनवणे सोपे असते. दहशतवादी कृत्यात सहभागी होणाऱ्यांना त्यांची ओळख नसते. त्यामुळे अशा टोळक्यांमधील कुणी मारले गेले, कुणाच्या हाती सापडले, तरी त्या कृत्यामागे असलेल्यांना काहीच फरक पडत नसतो. मात्र, हे तरुण कुठेही गेले तरी उपद्रवकारी ठरतील एवढी काळजी घेऊन त्यांना तयार केले जाते. जगात अनेक देशांमध्ये दहशतवादाचा अपारंपरिक युद्धाचा हा प्रकार अलीकडे वापरला जातोय. त्याचे धोकेही आता जगाच्या ध्यानात येऊ लागले आहेत; पण दहशतवाद मुळासकट नष्ट करणे ही आता सोपी गोष्ट नाही. त्याला खतपाणी घातले गेले, तेव्हा त्याचे रूप एवढे भयानक होईल याची कदाचित जाणीव झाली नसावी, पण आज जगाला त्याची फळे भोगावी लागत आहेत. भारताच्या जम्मू-काश्मीरलगतच्या पाकिस्तानाकडील सीमेचा ७००-८०० किमीचा भाग अतिशय दुर्गम आहे. तेथे डोळ्यात तेल घालून पहारा ठेवला, तरी अशा काही जागा आहेत, जेथून ये-जा शक्य असते. शिवाय, अशा कारवायांना छुपी मदत करणारे काही घटकही उभय देशांत असू शकतात. त्यामुळे भारतात दहशतवादी घुसण्याच्या संभाव्य जागांवर खडा पहारा असतो; पण कल्पना करा, एखाद्या मोठय़ा बंगल्यात एक उंदीर फिरतोय, तर त्याला पकडणेही किती कठीण असते. सात-आठशे किलोमीटर लांबीच्या सीमेपलीकडून घुसणारे दोन-चार दहशतवादी तात्काळ शोधून त्यांना ताब्यात घेणेही तेवढेच कठीण आव्हान असते. शिवाय, गणवेशातील जवानांना काही बंधने असतात. त्यांना नियमानुसार काम करावे लागते. दहशतवाद्यांचे तसे नसते. तो सामान्य माणसाचाच चेहरा घेऊन वावरत असतो, त्यामुळे लोकांच्यात सहज मिसळून जातो. त्याला ओळखणे सोपे नसते. ही समस्या आहेच. शिवाय, अशा कारवायांना पाठिंबा देणारे काही घटक उभय देशांतही आहेत.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Faces of global terrorism today and tomorrow
First published on: 17-07-2016 at 03:04 IST