गणेशोत्सवानिमित्त दरवर्षीच मुंबईतून हजारो भाविक कोकणातल्या आपल्या गावी जाण्यासाठी आतुर असतात. यंदाही मुंबईतून भाविकांचा ओघ कोकणाकडे निघणार आहे.. राज्य परिवहन महामंडळ, रेल्वे यांनी तर यंदा गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी केली आहेच, पण खासगी वाहतूकदारही उत्सव काळात आपली पोळी भाजून घेण्यासाठी तयार आहेत. मुंबईतून कोकणात निघणारा चाकरमानी प्रवास सुरू होण्याआधी ‘गणपती बाप्पा.. मोरयाऽऽ’चा गजर करून प्रवासादरम्यानची संकटे निवारण्यासाठी मनोभावे हात जोडेलच.. पण नेहमीप्रमाणेच त्यांच्या वाटेत खड्डे, वाहतूक कोंडी, खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून होणारी लूटमार अशी विघ्ने उभी राहतीलच..
नेहमीप्रमाणे, नेहमीच्याच उत्साहात यंदाही हजारो मुंबईकर गौरी-गणपतीसाठी कोकणात जातील.. आणि नेहमीप्रमाणेच त्यांच्या वाटेत खड्डे, वाहतूक कोंडी, खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून होणारी लूटमार अशी नाना विघ्ने उभी राहतील. विघ्नहर्त्यांच्या उत्सवासाठी निघालेल्या या गणेशभक्तांना नेहमीच हा त्रास का सहन करावा लागतो? मुंबई-गोवा महामार्गाची दुरुस्ती वेळेत पूर्ण होऊन यंदा तरी त्यांची या विघ्नातून सुटका होईल, अशी आशा होती, पण तीही फोल ठरली आहे. या महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील कामाला २०११ मध्ये मंजुरी देण्यात आली. ८४ किलोमीटर लांबीच्या बीओटी तत्त्वावर विकसित केल्या जाणाऱ्या महामार्गावर ६ मोठे पूल, २४ छोटे पूल, २ उड्डाणपूल, सात भुयारी मार्गाचा समावेश आहे. या कामासाठी ९५० कोटी खर्च अपेक्षित होता. एप्रिल २०१४ अखेर हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. पण महामार्गाचे ५० टक्के कामही दिलेल्या मुदतीत पूर्ण होऊ शकलेले नाही.
अधिकारी सांगतात, की २० ऑगस्टपूर्वी या महामार्गाची दुरुस्ती व्हावी, अशी मुदत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला घालून देण्यात आली होती. त्या संदर्भात २ ऑगस्टला अलिबाग येथे बैठक झाली. बैठकीला रायगडचे पालकमंत्री सचिन अहीर उपस्थित होते. महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि महामार्ग रुंदीकरणाचे काम करणाऱ्या सुप्रीम आणि महावीर इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांचे प्रतिनिधी हजर होते. सर्वानी त्या वेळी माना डोलावल्या. अशीच एक बैठक सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनीही मुंबईत घेतली. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनीही बैठक घेतली, पण पुढे झाले काय, तर शून्य. मुदत उलटून गेली. खड्डे कायम आहेत. महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे पळस्पे ते इंदापूर या पट्टय़ात ठिकठिकाणी महामार्गाला मोठ मोठे खड्डे पडले आहेत. याशिवाय महामार्गात अनेक ठिकाणी वळणे घालण्यात आली आहेत. ठिकठिकाणी पूल आणि भुयारी मार्गाची कामे चालू आहेत. एकंदर वडखळ परिसरातील खड्डे वगळता सगळीकडच्या खड्डय़ांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते आहे. अखेर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी साकडे घालण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर ओढवली. कंत्राटदाराने करायचे ते काम आता सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे आणि त्याचे पैसे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चुकते करणार आहे.
या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम काही आजचे नाही. गेली तीन वर्षे ते सुरू आहे, पण त्याची गंमत अशी, की त्यात बांधण्यात आलेल्या नवीन रस्त्यांची पुरती दुर्दशा झाली आहे. त्या तुलनेत इंदापूर ते महाड पट्टय़ातील जुन्या रस्त्याची परिस्थिती कितीतरी चांगली आहे. तेव्हा प्रश्न असा निर्माण होतो, की काम रस्ते बांधण्याचे होते की खड्डे करण्याचे? या कामाच्या दर्जाविषयीच आता प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. कोलाड ते इंदापूर, खांब ते कोलाड, सुकेळी िखड ते वाकण फाटा, गडब ते वडखळ आणि वडखळ ते खोपोली बायपास या पट्टय़ात महामार्गाची अक्षरश चाळण झाली आहे. हे अवघे ८४ किलोमीटरचे अंतर, पण ते पार करण्यासाठी पाच ते सहा तासांचा अवधी लागतो आहे. वेळ तर वाया जातोच, पण वाहने आणि प्रवासी दोघांच्याही आरोग्याची जी वाट लागते त्याचे काय? गणेशोत्सवाच्या आधीच्या तीन दिवसांत या महामार्गावरून जवळपास ७० हजार छोटी वाहने, तर २० हजार खासगी आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाडय़ा धावत असतात. खराब रस्ते आणि गाडय़ांचे हे प्रमाण यामुळे हा महामार्ग आता गतिमंद महामार्ग बनला आहे. एकंदर, गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्यांची प्रवासी पावावे, निर्वाणी रक्षावे..अशीच भावना असेल.येथे नित्याची वाहतूक कोंडी
*पळस्पे ते माणगावदरम्यान अशी काही ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी एरवीही वाहतुकीची कोंडी होत असते. गणेशोत्सवाच्या काळात तेथे मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोडी होण्याची शक्यता आाहे. यात प्रामुख्याने पळस्पे नाका, शिरढोण येथील कंटेनर यार्ड, तारा, हमारापूर फाटा, भोगावती नदीवरील पूल, रामवाडी, वडखळ, सुकेळी िखड, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे या ठिकाणांचा समावेश आहे.
*याशिवाय खोपोली बायपास ते पेण आणि पेण ते वडखळदरम्यान भुयारी मार्गाची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. साधारणपणे शनिवार- रविवार या सुट्टीच्या दिवशी आठ ते दहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल दीड ते दोन तासांचा अवधी लागतो. तेथेही प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. वडखळ, माणगाव, कोलाड, इंदापूर यासारख्या शहरांमध्ये रस्ता अरुंद आहे. रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळेही वाहतुकीला अडसर होत आहे.
.. अन् सुटकेचे मार्ग
*गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्य़ात वाहतुकीची कोंडी झाल्यास पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविण्यात येणार आहे. खारपाडा ते वडखळदरम्यान कोंडी झाल्यास आपटा फाटा – रसायनी – दांडफाटा – खालापूर – पाली फाटा – पाली – वाकण फाटय़ावरून पुढे महामार्ग क्र. ६६ वरून माणगाव – महाडकडे वाहतूक वळवण्यात येणार आहे.
*वडखळ ते नागोठणेदरम्यान वाहतूक कोंडी झाल्यास वडखळ नाका ते पेझारी, पेझारी ते शिहू बेणसे, पुढे आयपीसीएल बेलशेत फाटा चौक येथून मुंबई गोवा महामार्गावरून वाकण फाटा माणगाव – महाडकडे वाहतूक वळवली जाणार.
*वाकण फाटा ते कोलाड पूलदरम्यान कोंडी झाल्यास कोलाड – रोहा – दमखाडी नाका – डबीर कॉम्प्लेक्स – भिसे िखड – आमडोशी फाटा – वाकण फाटामाग्रे वाहतूक पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गला कोलाड येथे जोडली जाणार आहे.
*पोलादपूर ते कशेडी दरम्यान वाहतूक कोंडी झाल्यास एमआयडीसी टोलनाका – शिरगाव – फाळकेवाडी – नातू नगर – खेड माग्रे रत्नागिरी किंवा गोरेगांव – टोळ – आंबेत -मंडणगड – खेड माग्रे महामार्ग क्र. ६६ वर वाहतूक वळविण्यात येणार आहे.
*हलक्या वाहनांसाठी वाशी पूल – पामबीच रोड – किल्ला गावठाण – उरण फाटा – गव्हाण फाटा – चिरनेर – खारपाडामाग्रे महामार्ग क्र. ६६ वर किंवा मुंबई – पुणे खालापूर टोलनाका-पाली-पाटणोस-वेळे-निजामपूर- माणगावमाग्रे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर असा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Aug 2014 रोजी प्रकाशित
प्रवासी पावावे, निर्वाणी रक्षावे..
गणेशोत्सवानिमित्त दरवर्षीच मुंबईतून हजारो भाविक कोकणातल्या आपल्या गावी जाण्यासाठी आतुर असतात. यंदाही मुंबईतून भाविकांचा ओघ कोकणाकडे निघणार आहे..
First published on: 24-08-2014 at 02:15 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farce of special train extra buses for ganesh festival