निश्चलनीकरण आणि नंतर आलेल्या जीएसटीमुळे देशातील जनता हवालदिल असतानाच सरकारने आता फायनान्शियल रिझोल्यूशन अ‍ॅण्ड डिपॉझिट इन्शुरन्स (एफआरडीआय) हे विधेयक आणल्याने लोकांचे धाबेच दणाणले आहेत. या नव्या विधेयकाद्वारे सरकारी बँकांना असे अधिकार मिळणार आहेत की, त्यामुळे बँका त्यांच्या ठेवीदारांस आम्ही तुमचे काही देणे लागत नाही, असे सांगू शकतील. एखाद्या बुडीत गेलेल्या उद्योगामुळे बँकांना विशिष्ट रकमेचा खड्डा पडला तर बँका तो भरून काढण्यासाठी त्या बँकेतील खातेदारांच्या ठेवी सहज वळत्या करून घेऊ शकतील. या भीतीमुळे अनेकांनी आपल्या ठेवी आतापासूनच बँकांतून काढून घेण्यास सुरुवात केली आहे.  काही सहकारी बँका बुडाल्याने लोकांचा विश्वास सरकारी बँकांवरच आहे. तेथेही जनतेच्या ठेवी सुरक्षित नसतील तर लोक तिथे आपली पुंजी ठेवणार नाहीत.. अशा प्रकारे या विधेयकाची सर्वत्र चर्चा सुरू झाल्याने सरकारने असे काही घडणार नाही अशी सारवासारव केली असली तरी त्यावर जनता भरवसा ठेवण्यास तयार नाही. भारतीय अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करू शकणाऱ्या या विधेयकाचा दोन्ही बाजूंनी आढावा घेणारे हे लेख..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामान्यत: कुठल्याही उद्योगात थकबाकीचे प्रमाण भरमसाट वाढले तर त्याचा परिणाम त्या उद्योगाच्या नफ्यावर तर होतोच होतो. शिवाय भांडवल, गंगाजळी संपून उद्योग पुढे चालू ठेवणे कठीण होऊन बसते. अशा स्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्या उद्योगापुढे नव्याने निधी उभारणे, देणेदारांची देणी देणे, प्रलंबित ठेवणे वा अगदीच वेळ आली तर देण्याचे नाकारून दिवाळे काढणे हे मार्ग असतात. गैर आर्थिक क्षेत्रातील उद्योग डबघाईला आला तर त्याचा परिणाम मर्यादित घटकांवर होतो, पण आर्थिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बँका, विमा कंपन्या, रोखे बाजार कंपन्या, निवृत्तिवेतन कंपन्या आदींमध्ये लाखो लोकांनी पैसा गुंतवलेला असतो. अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी अशा संस्थासुद्धा सुरळीतपणे चालणे अत्यावश्यक आहे. वित्तीय स्थैर्य बोर्डाच्या ऑगस्ट २०१६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पियर अहवालानुसार भारतीय लोकांच्या एकूण गुंतवणुकीच्या ६३% गुंतवणूक बँकांमध्ये असते. त्यातही बँकांमधील एकूण गुंतवणुकीच्या ६३% गुंतवणूक सरकारी मालकीच्या बँकांमध्ये होती, तर १८% गुंतवणूक खासगी बँकांमध्ये होती. याचे कारण बँका या पैसा ठेवण्यासाठी सुरक्षित, विश्वसनीय असून त्यांच्याशी व्यवहार करणे सामान्य माणसाला सोयीचे पडते. पण जर या बँका दिवाळखोरीच्या वाटेने प्रवास करू लागल्या व आपल्या ठेवीचा कालावधी, स्वरूप, परताव्याचा दर आपल्या मर्जीने बदलू लागल्या तर? अशी काहीशी काळजी आपल्याकडील ठेवीदारांच्या मनात अलीकडे घर करायला लागल्याचे दिसून येते. त्याला एक कारण बँकांची वाढत जाणारी थकबाकी हे आहे.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Financial resolution and deposit insurance bill
First published on: 17-12-2017 at 01:10 IST