सुमारे तीन अब्ज लोकांनी सताड उघडय़ा डोळ्यांनी पाहिलेला यंदाचा ग्रॅमी सोहळा छोटय़ा पडद्यावरील आजवरच्या कुठल्याही कार्यक्रमापेक्षा सर्वात मोठा दर्शकवर्ग निर्माण करणारा निघाला. खरेतर दरवर्षी वृत्तांमध्ये या सोहळ्याचा सादर होणारा सचित्र त्रोटक तपशील आपल्या भारतीय संगीतोत्सुकांच्याही फारसा खिसगणतीतही नसतो. आपल्या देशातील महान संगीत परंपरांच्या ओझ्याखाली अथवा चित्रपट संगीताच्या छोटुकल्या आविष्कारांना ‘मंत्रमुग्ध’, ‘अवीटगोड’ विशेषणांच्या समुद्रात न्हाऊमाखू घालत आपण ‘नॉस्टॅल्जिक’ रोगाने पछाडणे पसंत करतो. दरवर्षी संगीतातील सर्वोच्च सन्मान प्रदान केल्या जाणाऱ्या या पुरस्कारांची ५६ आवर्तने झाली असली, तरी आपला (तथाकथित) संगीतश्रीमंत देश मात्र या सोहळ्यात टिकलीएवढेही अस्तित्व दाखवू शकला नाही. दर्दभऱ्या गझला, समृद्ध शास्त्रीय संगीत घराणी आणि मर्यादित संगीत चौकोटीत रमून आंतरराष्ट्रीय प्रवाहाविरुद्ध ‘राग’ आवळण्यात बुडालेली दरएक श्रावकांची पिढी ‘ग्रॅमी’तल्या संगीताकडे, जागतिक ठसा उमटविणाऱ्या संगीताकडे पाठ फिरवण्यात समाधान मानते. आपल्या देशाच्या श्रवणभक्तीवर ‘ग्रॅमा’यणाच्या निमित्ताने टाकलेली छोटीशी नजर.
ग्रॅमी किंवा ग्रामोफोन पारितोषिक हा संगीतातील सर्वोच्च सन्मान मानला जात असला तरी त्याची मोहोर म्हणजेच अंतिम श्रेष्ठत्व नाही. कानांना सुखावणारे आणि हृदयाच्या तारा छेडण्याची शक्ती असणारे कुठलेही संगीत सर्वश्रेष्ठ गटातच मोडले जाऊ शकते. अमेरिकेच्या नॅशनल अॅकेडमी ऑफ रेकॉर्डिग आर्ट्स अॅण्ड सायन्स या संस्थेतर्फे निवडली जाणारी प्रक्रिया मात्र अक्राळविक्राळ आणि पारदर्शक असते. त्यातून निवडली जाणारी संगीतरत्ने ही हजारो तावूनसुलाखून निघालेल्या संगीतज्ञांच्या मतांनी तयार केलेली असतात. त्यामुळे दरवर्षी मिळणारे पुरस्कार नुसत्या ‘फॅशनेबली करेक्ट’ असामींना नाही, तर गोळीबंद गुणवत्ता असलेल्या संगीत उपासकांनाच मिळतात. गुणवत्तायुक्त पुरस्कार विजेत्यांमध्ये ‘फॅशनेबली करेक्ट’ तगडय़ा कलाकारांचीही अनेकदा वर्णी असल्यामुळे मात्र त्याविषयी अपग्रह करून घेणाऱ्यांची मते आणखी काळवंडू लागतात आणि भारताची दोन अंगुळे नामांकने बाद झाल्याने या पुरस्काराला ‘अमेरिकी’ शिवी उच्चारून मोकळे होतात. गंमत म्हणजे या पुरस्कार विजेत्यांमध्ये युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदींचे वर्चस्व असले, तरी त्या विजेत्यांना अमेरिकी संबोधण्यात आपल्या ज्ञानकमतरतेला काहीच वाटत नाही. वाढत्या माध्यमांमुळे, तंत्रज्ञान प्रगतीमुळे आणि जगाच्या सपाटीकरणामुळे सर्वच बाबतींत एकाच वेळी आपण लोकल आणि ग्लोबलतेच्या चरकात पिळत आहोत. ग्लोबल झालेल्या श्रवणशक्तीला आवडीनिवडी ठरविण्याआधीच नवनव्या संगीतप्रवाहाच्या लोंढय़ाला सामोरे जावे लागत आहे. संगीताबाबत छिन्नमनस्क अवस्थेपर्यंत पोहोचलेल्या या पिढीला कुठले संगीत वाचवेल, हे सांगणे कठीण आहे.
श्रवणभक्तांची गटबाजी!
आज संगीत ऐकणाऱ्यांची वेगवेगळ्या अगणित पण दोन टोकांच्या गटांत विभागणी करता येऊ शकेल. त्यातील काही नमुन्यांची येथे उदाहरणे पाहूयात. संगीत ऐकणाऱ्यांचा एक गट सेहगल, पंकज मलिक यांच्यापासून किशोर-मुकेश-रफी ते कुमार शानूपर्यंतच्या संगीतप्रवाहाशी अडकलेला आहे. हा गट ‘नवे ते वाईट’ या भूमिकेशी प्रामाणिक असून संगीताबद्दल पोटतिडकीने बोलताना आपापल्या दैवतांचे मनातील देव्हारे सजविण्यामध्ये रमतो.
दुसरा गट ए. आर. रेहमानपासून सुरू होऊन अमित त्रिवेदीपर्यंत विसावतो. पहिल्या गटातील संगीत या गटाला वांतीकारी वाटते आणि ते ऐकत असलेले संगीत त्यांना क्रांतिकारी वाटत असल्याचा त्यांचा दावा असतो. त्यापुढील गट एमटीव्ही-व्हीएचवन, व्ही चॅनल, पूर्वीच्या ९२.५, ९२.३ एफएमने पुरता आंतरराष्ट्रीय संगीताने अद्ययावत असतो. या गटाचा कान तयार झालेला असतो, मात्र या गटाचाही आपण ऐकत असलेल्या संगीतापलीकडील संगीतविश्वावर विश्वास नसतो. उदारीकरणपर्वात श्रवणभक्तांचा एक सुमार परंतु मोठा वर्ग तयार झाला. हा संगीतदर्दीचा गट चलतीत असणाऱ्या कुठल्याही वैचित्र्याला तत्काळ कवटाळण्याची क्षमता बाळगून आहे. त्याला सूर वा शब्दांशी सूतराम संबंध ठेवायचा नसतो. मात्र आकर्षक ठेका, विचित्र शब्द आणि ‘फॅशन’ ओझे यांच्या परिणामाने तो त्या संगीताकडे वळतो. खलिदच्या ‘दी दी’ या गाण्यानंतर या वर्गाचा जन्म झाला. यू टय़ूबमुळे लोकप्रिय झालेल्या कोलावरी डी आणि ‘गन्नम स्टाइल’सारख्या गाण्यांचे विक्रम बनविण्यात या वर्गाचा मोठा वाटा आहे. या वर्गाच्या लोकल टेस्ट म्हणजे ‘नाखवा बोटीने फिरवाल का?’, ‘भाजीवाली’, ‘लाल नेकलेस’ आणि ग्लोबल टेस्ट अॅकॉन आणि गन्नम स्टाइलवाल्या ‘साय’ याची अजिबात न कळणारी गाणी असतात. यापुढचा श्रवणभक्तांचा एक गट देशाच्या कानाकोपऱ्यांत टीव्ही पोहोचेल तेथे तयार होत आहे. हा कानसेनांचा गट संगीत शिकून विविध ‘टॅलेंट हंट’मध्ये चमकण्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी संगीताभ्यासात रमतो. जुन्या, अवघड शास्त्रीय गाण्यांना आकर्षकपणे सादर करून बक्षिसार्थी बनण्याचा या वर्गाचा अट्टहास असतो. गंमत म्हणजे असे आणखीही गट काढता येऊ शकतील. या गटांमध्येही उपविभाग पाडता येतील. मात्र यांचे सर्वात मोठे वैशिष्टय़ कुठले असेल तर यातला प्रत्येक गट एकमेकांच्या संगीताला अभिरुचिशून्य पातळीपर्यंत हिणवण्यात समाधान मानतो.
जनसंगीताची अन् श्रावकांची स्थिती
शास्त्रीय संगीत हे मुख्य संगीत मानले, तरी जनसंगीत हे चित्रपट, म्युझिक अल्बम्स यांमध्येच तयार झाले. आजच्या बहुतांशी उडत्या चालींची अन् हीन शब्दांची गाणी अल्पकाळ ‘हिट’ राहतात. ती वाईट आहेत असे म्हणता येणार नाही. ग्लोबल संगीतात सध्या ज्या प्रवाहांची चलती आहे, त्यांचा वापर त्यामध्ये होतो. गेल्या दशकभरातील संगीत वेगळे आहे, कारण एकाच वेळी ते भारतीय पारंपरिक संगीत विसरले नाही आणि नवे भल्याबुऱ्या मार्गानी त्याने आत्मसात केले. हीप-हॉप, ब्लूज आदी संगीतप्रवाह आपल्या चित्रपट संगीतात नकळत समाविष्ट झाला. त्यातून तयार झालेल्या फ्युजन संगीताला कुणी डोक्यावर घेतले, तर कुणी पायदळी तुडविले. दर पिढीगणिक श्रावकांची आणि कलाकारांची घट्ट मैत्री जमली होती. ती आता नाहीशी झाली आहे. टॅलेंट हंटमुळे एकाच गायक-गायिकेची मक्तेदारी-पर्व बाद झाले. रोजच नवनव्या कानसुखद गायकांचा उदय-अस्त होत आहे. छोटय़ा पडद्यावरील संगीतस्पर्धामुळे जुन्या विसरलेल्या गीतांचे स्मरण होते ही चांगली गोष्ट असली, तरी चॅनलगणिक कार्यक्रमांच्या संख्येमुळे आणि त्यांच्या न थांबत्या पर्वामुळे ही गाणी नको इतक्या अतिरेकी पद्धतीने अंगावर येऊन विस्मरणात जावीत असे वाटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय म्युझिक फेस्टिवल भारतात प्राथमिक पातळीवर भरू लागले आहेत. भारतीय संगीत उद्योगाची आणि इथे असलेल्या मोठय़ा बाजाराची जाणीव असल्यामुळे हरएक ख्यातीच्या गायकाला भारतात कला सादर करणे महत्त्वाचे वाटू लागले आहे. मात्र या कलाकारांना, म्युझिक फेस्टिवल्सना निवडक शहरांत तरुणाईच्या विशिष्ट वर्गानेच गर्दी केलेली आढळते. जनसंगीतोपासक या संगीतजलशांपासून अद्याप दूरच दिसतो. सीडी- डीव्हीडी- पेन ड्राइव्हपासून डाऊनलोडिंगच्या विविध मार्गानी संगीत एका क्लिकने गुलाम होण्याच्या आजच्या काळामुळे त्या संगीताची किंमत काहीशी कमी झाली आहे. संगणकाचा संगीत फोल्डर भरण्यासाठी लोकांकडे वेळ आहे, मात्र आवाढव्य ‘कलेक्शन’मधील थोडय़ा संगीताचा आस्वाद घेण्याची वृत्ती हरवत चालली आहे. अनेक संगीतप्रेमी संगीताच्या आवाढव्य लोंढय़ामुळे नवआक्रमणामुळे श्रवणनिवृत्तीकडे वळू लागला आहे.
थोडे ‘ग्रॅमी’विषयी!
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संगीतकार, गायक यांच्याबाबत आपल्या मनामधील भल्या-बुऱ्या ग्रहांची संख्या अगणित असू शकते. आपल्याकडे त्यावर पुरेशी समीक्षा वृत्तपत्रांच्या प्रादेशिक विभागात सोडा, पण इंग्रजीतही होत नाही. अन् येणाऱ्या समीक्षेत ‘अवीट गोडी’पासून सरधोपट विशेषणांपलीकडे एखादे संगीत का ऐकावे याची माहिती देण्याचा प्रयत्न होत नाही. यंदा ग्रॅमी पुरस्कारावर ‘डाफ्ट पंक’ या बँडने बाजी मारली. न्यूझीलंडच्या सतरावर्षीय ‘लॉर्ड’ या गायिकेने मानाचे दोन पुरस्कार मिळविले. ‘डाफ्ट पंक’ किंवा ‘लॉर्ड’ यांची गाणी यूटय़ूब-नेटच्या आजच्या उपभोक्त्यांसाठी सहज उपलब्ध होणारी आहेत. एखाद्या संगीताला का पुरस्कार मिळतो, उपलब्ध प्रचलित संगीतापेक्षा ते कसे श्रेष्ठ ठरते, कलाकारांनी किती मेहनत या संगीतनिर्मितीसाठी घेतली, याचे ज्ञान या संगीताशी अद्ययावत राहिल्यास मिळू शकते. एका रात्रीत स्टार होणे, प्रसिद्धी तंत्राने लोकप्रियता विकत घेणे आदी घटक इथेही आहेत, मात्र यापलीकडे जिद्द, मेहनत आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटीपणातून येणाऱ्या अनंत अंतर्बाह्य़ अडचणीही आहेत. निव्वळ दिखाऊ आणि विकाऊपणापलीकडचे जग पाहायचे असेल तर देशी श्रवणभक्तीसोबत या इतर संगीताबाबतही स्वागतवृत्ती बाळगायला हवी.
विश्वसंगीतातील भारतीय दुवा
आंतरराष्ट्रीय संगीतविश्वावर छाप पाडणाऱ्या भारतीयांमध्ये विश्वमोहन भट्ट, ए.आर. रेहमान आदी आपल्या ग्रॅमी विजेत्यांचीच नावे ओठांवर तातडीने येत असली तरी भरपूर जागतिक लोकप्रिय कलाकारांचे भारतीय संगीत आणि भारताशी नाते हे त्यांना ग्रॅमीपर्यंत घेऊन जाणारे ठरले आहे. तर काही भारतीय संगीतकारांच्या भारतीयत्वाऐवजी त्यांची छबी आंतरराष्ट्रीय म्हणून अधिक ठसली आहे. यात सर्वात पहिले नाव येते फ्रेडी मक्र्युरी या ब्रिटिश बँड ‘क्वीन्स’मधील प्रमुख गायकाचे. फाहरुख बलसारा या मुंबईत राहणाऱ्या तरुणाने जगाला नव्वदीच्या दशकात ‘रॉक’ संगीताची दीक्षा दिली. पंडित रविशंकर यांची विदेशी कन्या नोरा जोन्स हिने पदार्पणातच ९ ग्रॅमी पुरस्कारांवर नाव कोरले. अॅलेनिस मॉरेसेट या गायिकेने संगीतामध्ये फारसे यश मिळत नव्हते, तेव्हा भारताचा एक दौरा केला. या दौऱ्यामध्ये भारतातील वास्तव्यावर लिहिलेले गाणे ग्रॅमी पुरस्कार पटकावून गेले. ब्रिटिश गायक बॅण्ड बीटल्स असो किंवा ऑस्ट्रेलियन व्हायोलीन वादक महिलांचा ‘बॉण्ड’ नामक बॅण्ड, त्यांनी आपल्या संगीतामध्ये भारत आणि भारतीय संगीताला मुरविल्याचे दिसून येते.
ग्राफिनवर आधारित सौर ऊर्जा प्रकल्प स्वस्त व अधिक कार्यक्षम
ग्राफिनवर आधारित सौर घट तयार करण्याची प्रक्रिया शोधून काढल्याचा दावा येथील संशोधकांनी केला असून ही प्रक्रिया सोपी व स्वस्त आहे. त्यामुळे आगामी काळात सौर ऊर्जा उपकरणे स्वस्तात उपलब्ध होऊ शकतील. गुजरात एनर्जी अॅण्ड रिसर्च मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटचे (जर्मी) संचालक टी. हरिनारायण यांनी सांगितले की, ग्राफिनाच्या मदतीने स्वस्तात व सोप्या पद्धतीने सौर घट (सोलर सेल) तयार करता येतात. त्यांनी शोधनिबंधात म्हटले आहे की, ग्राफिन हा कार्बन अणूंचा एक थर असतो व तो षटकोनी जालकाच्या रूपात असतो. त्याचे अनेक गुणधर्म असून जगातील संशोधकांचे डोळे आता त्याचा उपयोग कसा करता येईल याकडे लागले आहेत. या ग्राफिनची विद्युत वहनक्षमता खूप जास्त म्हणजे ९० टक्के असते व ती तांब्याच्या तारेपेक्षा जास्त असते. त्यामुळे सौर घटात सध्या जे पसरट इलेक्ट्रोड वापरले जातात ते अधिक आटोपशीर करता येतील. त्यांच्यासमवेत ‘जर्मी’चे संशोधक संजय बेहुरा, सस्मिता नायक, ओंकार जानी, गांधीनगरच्या पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठाचे इंद्रजित मुखर्जी हे सहभागी होते. त्यांचा शोधनिबंध फेब्रुवारीत ‘कार्बन’ या नियतकालिकात प्रसिद्ध होणार आहे. संशोधकांनी म्हटले आहे की, ग्राफिनचा वापर हा सौर घटात करता येईल त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च १०-१५ टक्केकमी करता येईल, सध्या त्यासाठी सिलिकॉनचा वापर केला जातो. फोटोव्होल्टॅइक म्हणजेच सौर घटात ऊर्जा कार्यक्षमता फार महत्त्वाची असते. सिलिकॉन एकतर महाग असते व त्याचा वापर करून सौर घटाची कार्यक्षमता वाढवणे हे आव्हानात्मक आहे. त्यात ०.०२ टक्के इतकी क्षमता असते ती ग्राफिन वापरल्यास वाढू शकते. ग्राफिनवर आधारित सौर घटांचे प्रकल्प तयार करण्यास कमी खर्च येतो. सध्या सौर घटांचा संच उभारणे हे खर्चीक असले तरी स्वच्छ व पर्यावरणस्नेही ऊर्जानिर्मितीसाठी सौर ऊर्जा हाच एक पर्याय आहे. सौर घटात सूर्याच्या उष्णतेचे रूपांतर थेट विजेत केले जात असते.
संग्रहित लेख, दिनांक 1st Feb 2014 रोजी प्रकाशित
ग्रॅमायण आणि देशी श्रवणसेनांची सद्यस्थिती!
सुमारे तीन अब्ज लोकांनी सताड उघडय़ा डोळ्यांनी पाहिलेला यंदाचा ग्रॅमी सोहळा छोटय़ा पडद्यावरील आजवरच्या कुठल्याही कार्यक्रमापेक्षा सर्वात मोठा दर्शकवर्ग निर्माण करणारा निघाला.
First published on: 01-02-2014 at 03:05 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gramophone and native music listeners contemporary condition