हर्षद कशाळकर harshad.kashalkar@expressindia.com

कोकण म्हटले, की आंबा, काजूसोबत सुपारीच्या बागा डोळय़ांपुढे उभ्या राहतात. परंतु गेल्या तीन वर्षांत कोकणाला बसलेल्या दोन चक्रीवादळांनी यातील सुपारी पिकाच्या अस्तित्वावरच घाला घातला आहे. कोकणातील विशेषत: रायगड जिल्ह्यातील सुपारी बागा या चक्रीवादळांमुळे उद्ध्वस्त  झाल्या आहेत. यामुळे यंदा या पिकाच्या एकूण उत्पादनावरही मोठा परिणाम झालेला दिसत आहे.

11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

गेल्या तीन वर्षांत कोकणाला दोन चक्रीवादळांचा तडाखा बसला. या आपत्तीत सर्वाधिक हानी झाली ती कोकणातील सुपारी पिकाची. आधी निसर्ग आणि नंतर आलेल्या तौक्ते वादळाने सुपारी बागांचे मोठे नुकसान झाले. जवळपास साठ टक्के बागा या वादळांनी नष्ट केल्या. याचे घातक परिणाम आता दिसून यायला लागले आहेत. रायगड जिल्ह्यातील सुपारी उत्पादन निम्म्याहूनही कमी झाले आहे. एखाद्या आपत्तीतून एखादे पीकच धोक्यात येण्याचा हा प्रकार, प्रादेशिक शेती व्यवस्थेपुढे नवे प्रश्न निर्माण करणारा आहे.

आपत्ती येतात आणि जातात. मात्र त्याचे परिणाम दीर्घकाळ भोगावे लागतात. याचा प्रत्यय रायगड जिल्ह्यातील सुपारी उत्पादकांना सध्या येत आहे. पाठोपाठ आलेल्या या दोन्ही चक्रीवादळांनी सुपारी उत्पादकांचे कंबरडेच मोडले आहे. ही वादळे येऊन गेल्यानंतर गेल्या तीन वर्षांत सुपारी उत्पादन निम्म्याहून कमी झाल्याचे दिसून येत आहे. यातून सावरण्यासाठी बागायतदारांना आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यात सुपारी लागवडीखालील क्षेत्र पाच हजार हेक्टरवर आहे. यातून दरवर्षी साधारणपणे ३५ ते ४० कोटींची उलाढाल होत असते. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील किनारपट्टीवरील भागात प्रामुख्याने या सुपारीच्या बागा आहेत. भौगोलिकदृष्टय़ा हा परिसर सुपारीसाठी अत्यंत पोषक वातावरण असलेला आहे, त्यामुळे येथे सुपारी लागवडीकडे बागायतदारांचा विशेष कल असतो. नगदी पिक म्हणूनही सुपारी पिकाकडे पाह्यले जाते.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनची रोटा सुपारी ही प्रसिध्द आहे. या सुपारीत पांढरा भाग जास्त असतो. सुपारीत आरसेक्लोनीन या रसायनाचे प्रमाण कमी असते. इतर सुपाऱ्यांच्या तुलनेत ती चवीला जास्त चांगली असते. सुगंधी सुपारी आणि पान मसाला उत्पादनासाठी या सुपारीला जास्त मागणी असते. आखाती देश आणि अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशात निर्यात केली जाते. श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्राने या सुपारीवर संशोधन करून नवीन प्रजाती विकसित केल्या आहेत. आज चौदा प्रकारच्या सुपारीच्या प्रजातींची कोकणात लागवड केली जाते. आंबा, काजू आणि नारळाच्या तुलनेत सुपारीची लागवड आणि संगोपन खर्च कमी आहे. यातून मिळणारे उत्पन्नही चांगले असते. त्यामुळे फायदेशीर फळपीक म्हणून याकडे बघितले जात आहे.

मात्र गेल्या २०२० च्या वर्षी जून महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने, तर २०२१ मधील तौक्ते वादळाने सुपारीचे पीक धोक्यात आणले आहे. श्रीवर्धन, मुरुड आणि अलिबाग येथील ६० टक्के सुपारीच्या बागा या चक्री वादळाच्या तडाख्याने भुईसपाट झाल्या. सुपारीची लाखो झाडे वादळात उन्मळून पडली. याचे गंभीर परिणाम पुढे भविष्यात आता सुपारी उत्पादनावर झाल्याचे दिसून येत आहेत.

सुपारी उत्पादक संघांच्या आकडेवारीनुसार श्रीवर्धन तालुक्यातील सुपारीचे वार्षिक उत्पादन १ लाख ३० हजार किलोवरून, ५० हजार किलोवर आले आहे. अलिबाग तालुक्यातील वार्षिक उत्पादन ४४ हजार किलोवरून ३३ हजार किलोवर आले आहे. तर मुरुड तालुक्यातील सुपारीचे वार्षिक उत्पादन १ लाख १६ हजार किलोवरून ४४ हजार ४८० किलोवर आले आहे. यावरून वादळामुळे जिल्ह्यातील सुपारी उत्पादनावर झालेल्या परिणामांची तीव्रता लक्षात येऊ शकते.

वादळाचा फटका हा तात्कालिक नव्हता. तो दूरगामी असल्याचे बागायतदार सांगतात. उद्ध्वस्त झालेल्या बागा नव्याने उभे करणे आव्हानात्मक आहे. रोपांची अनुपलब्धता ही त्यांच्या समोरील सर्वात मोठी समस्या आहे. सुपारीचे एक झाड उत्पादनक्षम होण्यासाठी किमान आठ ते दहा वर्षांचा कालावधी लागतो, त्यानंतर ते झाड वर्षांकाठी एक ते दीड हजाराचे उत्पन्न देण्यास सुरुवात करते. त्यामुळे वादळग्रस्त बागायतदारांनी आता जरी सुपारीची लागवड सुरू केली तरी, त्यांना प्रत्यक्ष उत्पादन सुरू होण्यासाठी किमान दहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सुपारी उत्पादन पूर्ववत होण्यासाठी बराच कालावधी जाणार असल्याचे दिवेआगर येथील सुपारी उत्पादक संघाचे सचिव सिध्देश शिलकर सांगतात.

निसर्ग वादळानंतर सुपारीची रोपे उपलब्ध करून दिली जातील, असे राज्यसरकारने जाहीर केले होते. मात्र ती अद्यापही आवश्यक तितक्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. रोपांची अनुपलब्धता ही बागायतदारांसमोरील सध्याची सर्वात मोठी समस्या असून, सुपारीची रोपे मिळावीत यासाठी कृषी विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे मुरुड सुपारी उत्पादक संघाचे अध्यक्ष महेश भगत यांचे म्हणणे आहे.

श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्रात वर्षभर रोप निर्मितीचे काम सुरू असते.

मात्र या संशोधन केंद्रालाही वादळाचा तडाखा बसला. त्यामुळे सुपारी रोपांची कमतरता जाणवत आहे. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात भूधारणेचे प्रमाण खूपच कमी आहे. येथील बहुतांश शेतकरी हा अत्यल्प आणि अल्प भूधारक आहे. अशावेळी कमीत कमी जागेत जादा उत्पादन देणारे पीक म्हणून बागायतदार सुपारीकडे वळला होता. पण वादळामुळे सुपारीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

उत्पादन घटले पण भाव वाढला..

वादळामुळे सुपारीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे उत्पादन घटले आहे. पण आंतराराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारात श्रीवर्धनच्या रोटा सुपारीला असलेली मागणी कायम आहे. पण मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने सुपारीचा भाव वाढला आहे. गेल्या वर्षी सुपारीला प्रती मण ६४०० रुपये इतका विक्रमी दर मिळाल्याचे मुरुड सुपारी संघाचे संचालक जगदीश पाटील यांनी सांगितले. यावर्षीही सुपारीला चांगला दर मिळण्याची आशा बागायतदारांना आहे.

वादळानंतर राज्यसरकारने फळबाग लागवड आणि पुनरुज्जीवन लागवड योजना लागू केली आहे. जवळपास आठ हजार हेक्टरवर जिल्ह्यात ही योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक पूर्वतयारी कृषी विभागाने सुरू केली आहे. मात्र या योजनेसाठी अद्याप शासनाकडून निधी उपलब्ध झालेला नाही. तो प्राप्त झाल्यावर लाभार्थी बागायतदारांना निधी वितरण सुरू केले जाणार आहे. जिल्ह्यात सुपारीच्या रोपांची कमतरता लक्षात घेऊन अलिबाग येथील आवास येथील रोपवाटिकेत ८० हजार रोपे तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मुरुड आणि अलिबाग येथील ८ बागायदारांना सुपारीची रोपं तयार करण्यास सांगण्यात आले आहे. जवळपास आठ लाख रोपे तयार करण्याचे उद्दिष्ट त्यांना देण्यात आले आहे. नंतर कृषी विभाग ही रोप खरेदी करून बागायम्तदारांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सुपारी उत्पादनाची स्थिती..

मुरुड तालुका

वर्ष             उत्पादन

२०१८         १ लाख १६ हजार किलो   

२०१९         ६० हजार किलो

२०२०         ४४ हजार ४८० किलो

श्रीवर्धन तालुका

वर्ष              उत्पादन

२०१९         १ लाख ३० हजार किलो

२०२०         ५१ हजार किलो

२०२१         ५० हजार किलो

अलिबाग तालुका

वर्ष           उत्पादन

२०१९         ४१ हजार ७४५ किलो

२०२०         ३३ हजार ०३० किलो