आनंद पटवर्धन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इतिहास उकरून आता काय होणार, असे कुणी म्हणेल. पण इतिहासाच्या अनेक नोंदी विचारप्रवृत्त करणाऱ्या ठरतात त्या कशा, हे सांगणारे- बाबरी मशीद उद्ध्वस्तीकरणाच्या आधीचा आणि नंतरचाही इतिहास साक्षेपीपणे पाहिलेल्या आणि त्याचे माहितीपटाद्वारे दस्तावेजीकरण केलेल्या दिग्दर्शकाचे हे टिपण..

लालकृष्ण अडवाणी यांनी जी पहिली रथयात्रा काढली, तिचा मार्ग टिपणे हे ‘राम के नाम’ या लघुपटासाठी आमचे एक काम होते. यात्रेसाठी वातानुकूलित टोयोटा ट्रकचे श्रीराम-रथात रूपांतर बॉलीवूडच्या एका सेट-डिझायनरने केले होते. भारतभर फिरलेल्या या यात्रेने बाबरी मशिदीच्या जागीच मंदिर बनवण्याचा अंगार हिंदू मनामनांत पेरला गेला. ‘मंदिर वहीं बनाएंगे’ हा यात्रेचा नारा, पण ठिकठिकाणी अनुयायांनी अन्यही उन्मादी घोषणा दिल्या, काही ठिकाणी दंगेही होऊन कैक जीव गेले. अखेर बिहारमध्ये अडवाणींना अटक झाल्याने यात्रा थांबली; परंतु कारसेवकांनी मार्गक्रमणा सुरू ठेवली आणि ३० ऑक्टोबर १९९० रोजी त्या पहिल्या रथयात्रेतील कारसेवक अयोध्येला पोहोचले.

तेव्हा तिथे मशीद होती. या मशिदीच्या प्रवेशदारीच असलेली शिला, सदर मशीद बाबराचा सेनापती मीर बकी याने सन १५२८ मध्ये बांधली असल्याचे सांगत होती. तुलसीदासांचा जन्म १५११ सालचा. त्यांनी अवधी बोलीत ‘रामचरितमानस’ रचले, तोवर संस्कृतमधले वाल्मीकीरामायण ही संस्कृत शिकण्याची अनुमती असलेल्या जातीचीच मिरास होती. जन्माने ब्राह्मण, परंतु अनाथ असलेल्या तुलसीदासांनी तत्कालीन सनातन्यांचा विरोध असूनही संस्कृतातील राम अवधीमध्ये आणला आणि लोकांपर्यंत नेला. सम्राट अकबराच्या राज्यकाळात (१५५६-१६०५) ‘रामचरितमानस’वर आधारित ‘रामलीला’ सुरू झाली, रामकथा लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर राम मंदिरे ठिकठिकाणी वाढू लागली.

तुलसीदासांचा बहुतेक काळ ज्या अयोध्येत व्यतीत झाला, त्याच अयोध्येत १९९० च्या त्या ऑक्टोबरात आम्ही दोघे (फिल्म बनवण्यासाठी दोघेच होतो), कारसेवकांच्या आधीच पोहोचलो होतो. ‘इथे प्रभुराम जन्मले’ असे सांगत २० हून अधिक मंदिरे आम्हाला दाखवण्यात आली. तुलसीरामायणात कोठेही, राम जेथे जन्मला तेथे मंदिर होते आणि बाबराने ते (तेव्हा नुकतेच) उद्ध्वस्त केले, असा उल्लेख कसा काय नाही, हे शोधून काढणे कठीण आहे; पण तुलसीदासांच्याही नंतर ३०० वर्षांनी हा जन्मभूमी-मशीद वाद कसा उफाळला हे सांगता येते. सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेल्या नोंदींनुसार, ब्रिटिशांनी १८५६-५७ मध्ये (ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात) ही जागा दुभागणारी एक भिंत बांधली आणि हिंदू-मुस्लिमांत पहिल्यांदा झगडा झाला. मशीद या भिंतीच्या आड, तर भिंतीबाहेरचा भाग हिंदूंचा अशी विभागणी झाल्यामुळे मुस्लिमांना हिंदूंच्या ताब्यातील भागातून जावे लागे. लक्षात घ्या.. १८५७ साल! हेच पहिल्या स्वातंत्र्यसमराचे वर्ष (त्याला ब्रिटिशांनी ‘शिपायांचे बंड’ म्हटले), त्याच वर्षी हिंदू आणि मुस्लिमांनी धीरोदात्तपणे एकत्र येऊन ब्रिटिशांना जेरीस आणले होते. ब्रिटिशांची पहिली ‘फोडा व झोडा’ नीती त्याच वर्षी दिसली आणि अयोध्येत त्याच वर्षी भिंत उभारली गेली.

मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही १८५७ सालाची संगती विचारात घेतलेली दिसत नाही. किंवा त्याआधीही कधी या जागेवरून दंगा-झगडा झाला होता काय, या तपशिलांत न्यायालय गेल्याचे दिसत नाही. उपलब्ध नोंदी असे सांगतात की, १८५६-५७ मध्येच बाबा रामचरण दास यांच्या नेतृत्वाखालील हिंदू आणि त्या वेळचे जमीनदार अच्छन खान यांच्या नेतृत्वाखालील मुस्लीम यांनी या जमिनीसाठी समझोता केला. हिंदूंनी भिंतीच्या बाहेरच्या भागात धार्मिक व्यवहार करावेत आणि मुस्लिमांनी आतल्या (मशिदीच्या) भागात, असे ठरले आणि एकाच जागेला मंदिर-मशिदीत विभागणारा हा समझोता २३ डिसेंबर १९४९ पर्यंत टिकला. स्वातंत्र्योत्तर, पण प्रजासत्ताकपूर्व काळातील त्या दिवशी काही हिंदूंनी मशिदीच्या भागात रामाची मूर्ती बसवली. त्या वेळचे कुणी लोक भेटतात का, याचा शोध १९९० च्या ऑक्टोबरात घेतला, तेव्हा आपण स्वत: ती मूर्ती तिथे नेली आहे, असे सांगणारे एक जण भेटले. फिल्ममध्ये त्यांच्या म्हणण्याचे दस्तावेजीकरण आम्ही केले. १९४९ मध्ये के. के. नायर म्हणून जिल्हाधिकारी होते, त्यांनी मूर्ती काढून टाकण्यास ‘कायदा व सुव्यवस्था बिघडेल’ अशा कारणासह नकार दिला. पुढे त्यांनी जनसंघात (भाजपचे पूर्वरूप) प्रवेश केला आणि खासदारही झाले. न्यायालयाने १९४९ सालापासूनच मुस्लिमांना या जागेत प्रवेश नाकारला; पण मूर्तीसाठी पुजाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी मान्य केली. या पुजाऱ्यांपैकी ज्यांचे नाव सर्वतोमुखी झाले होते, अशा महंत लालदास यांच्याही म्हणण्याचे दस्तावेजीकरण आम्ही फिल्ममध्ये केले. मशिदीवर हल्ला होणे चूकच, असे मत ३० ऑक्टोबर १९९० च्या घटनेनंतर त्यांनी नोंदवले होते. ते असेही म्हणाले होते की, विश्व हिंदू परिषद वा भाजपचे लोक भक्तिभावाने येत नसून राजकारण आणि पैसा यांवर त्यांची चळवळ सुरू आहे. लालदास यांनी त्या वेळची काही उदाहरणे देऊन, धर्माच्या नावाखाली भ्रष्टाचारच माजतो तो कसा, हेही सांगितले होते.

या प्रसंगांनंतर, उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता असताना ६ डिसेंबर १९९२ उजाडला. बाबरी मशीद हिंदूंनी उद्ध्वस्त केली. त्या मशिदीत, १९४९ मध्ये अखेरची प्रार्थना करणाऱ्या इमामासह या परिसरातील अनेक जणांनी नंतरच्या हिंसाचारात जीव गमावला. वर्षभराने पुजारी लालदास यांचाही खून करण्यात आला.

इतिहास उकरून आता काय होणार, असे कुणी म्हणेल. पण इतिहासाच्या अनेक नोंदी विचारप्रवृत्त करणाऱ्या ठरतात. उदाहरणार्थ, या जागेवरील भिंतीचा वाद मिटवून समझोता करणारे अच्छन खान आणि बाबा रामचरण दास या दोघांवरही १८५७ मध्येच ब्रिटिशांनी राजद्रोहाचा खटला भरला होता व त्या दोघांनाही फाशी झाली होती.

ज्यांनी ती वास्तू पाडली आणि त्या कृतीच्या परिणामस्वरूप उपखंडात अनेकांना जीव गमवावा लागला, त्यांच्या त्या गुन्ह्य़ामागील उद्देश ९ नोव्हेंबर २०१९ रोजी कायदेशीररीत्या साध्य झाला. सरत्या आठवडय़ात- ५ ऑगस्टला राम मंदिराची पायाभरणी झाली.. या देशाची निधर्मीवादी लोकशाही आता ढिगाऱ्याखाली गाडली जाईल.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the name of ram ram mandir construction zws
First published on: 09-08-2020 at 02:04 IST