संपदा सोवनी

 ‘ओडिसी’ हा भारतीय शास्त्रीय नृत्याचा प्रकार कथक वा भरतनाटय़म्इतका सुपरिचित नाही. नृत्यगुरू झेलम परांजपे यांनी महाराष्ट्रात अपरिचित असलेल्या या नृत्यशैलीत उत्तम नृत्यांगना होण्याबरोबरच ३२ वर्षांपूर्वी मुंबईत ‘स्मितालय’ ही राज्यातील पहिली ओडिसी नृत्यशाळा सुरू के ली. प्रामुख्याने समाजाच्या वरच्या स्तरातच राहिलेले हे शास्त्रीय नृत्य गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलामुलींनाही शिकायला मिळावे, यासाठी झेलम यांनी केलेले प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहेत. के वळ पारंपरिक नृत्यप्रस्तुती न करता गणित, स्त्री शिक्षण, सामाजिक लढे असे विषय त्यांनी ओडिसी नृत्यातून मांडले. सर्व स्तरांत जवळपास ६०० नर्तक घडवणाऱ्या आणि ओडिसी नृत्यशैली हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या झेलम परांजपे म्हणूनच आहेत ‘लोकसत्ता दुर्गा.’

AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान
100 Ghungaru Nagin Chappal Price Will Shock You Watch Video
७ नागाचे फणे, सहा किलो वजन, पंढरपूरच्या दानवेंची ‘नागीण चप्पल’ दिसते कशी? किंमत ऐकून थक्कच व्हाल
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”

नृत्य आपल्याला आवडते हे त्यांच्या   लहानपणीच लक्षात आले होते, त्यांनी विविध नृत्य प्रकार करूनही पाहिले, मात्र त्यांचे मन रमले ते ओडिसी नृत्यप्रकारात. त्यासाठी त्या थेट कटकला जाऊन गुरूंकडून नृत्य शिकू न आल्या. उडिया भाषा शिकल्या आणि त्याचा प्रसार व्हावा म्हणून नृत्यालयाची स्थापनाही के ली. गरीब मुलांना ५ रुपये शुल्कात शिकवायला सुरुवात के ली. त्यात विषयांचे वेगवेगळे प्रयोगही के ले. आणि वंचित मुलांना तर त्यांच्यापर्यंत जाऊन शिकवले. त्या प्रसिद्ध नृत्यांगना आणि नृत्यगुरू झेलम परांजपे यांचा ‘नृत्यांगना ते नृत्यप्रशिक्षक’ हा प्रवास भारतीय ओडिसी नृत्य प्रकाराला सर्वदूर नेणारा ठरला.

झेलम परांजपे यांच्या या नृत्याच्या आवडीची बीजं पेरली गेली होती ती लहानपणीच झालेल्या संस्कारांमध्ये. त्यांचे आई-वडील, म्हणजे सदानंद व सुधा वर्दे ही सामाजिक चळवळीत अग्रणी असलेली नावे. ‘राष्ट्र सेवा दला’च्या पार्श्वभूमीमुळे झेलम यांना कलापथकाच्या माध्यमातून वयाच्या सहाव्या वर्षांपासून लोकनृत्यावर आधारित कार्यक्रमांत सहभागी होण्याची संधी मिळाली होती. आपल्यात नृत्याला आवश्यक ती लय आणि समज आहे, हे यादरम्यानच त्यांच्या लक्षात आले आणि नृत्य शिकण्याची ओढही निर्माण झाली.  प्रथम त्यांना आईने भरतनाटय़म् नृत्य शिकण्यास पाठवले, परंतु झेलम यांना ती नृत्यशैली भावली नाही. पुढे त्यांनी कथकचेही धडे घेतले. पण मोठय़ा नंबरचा चष्मा असल्यामुळे कथकच्या चकरा घेताना त्यांना त्रास होऊ लागला आणि अल्पावधीतच ते शिक्षण थांबले. सेवादल कलापथकाच्या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांना एकदा ओडिशाला जाण्याची संधी मिळाली. या वेळी कटक येथे ज्येष्ठ ओडिसी नृत्यगुरू के लुचरण महापात्रा यांना त्यांनी नृत्य शिकवताना पाहिले. ही सौम्य नृत्यशैली त्यांना भावली. मुंबईत प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना संजुक्ता पाणिग्रही यांचे नृत्य पाहून झेलम खूपच प्रभावित झाल्या. नंतर त्यांनी मुंबईतच नृत्यगुरू शंकर बेहरा यांच्याकडे ओडिसी नृत्य शिकायला सुरुवात  केली.

गणित हा झेलम यांचा अतिशय आवडता विषय. दरम्यानच्या काळात सांख्यिकी विषयात पदव्युत्तर पदवी घेऊन त्यांनी प्राध्यापिका म्हणून नोकरी सुरू के ली होती. एकदा नृत्यांगना

प्रोतिमा बेदी यांनी केलुचरण महापात्रा यांच्या ओडिसी नृत्यशिबिराचे मुंबईत आयोजन केले होते. झेलम यांनी एक महिन्याचे हे नृत्यशिबिर पूर्ण केले आणि त्यानंतर त्या कटकला गुरूंच्या घरी जाऊनही नृत्य शिकल्या. आपल्याला ही नृत्यशैली खूप आवडते आणि यातच नृत्यांगना म्हणून कारकीर्द घडवायची,  हा त्यांचा विचार पक्का झाला. संवाद सोपा व्हावा म्हणून त्या उडिया भाषाही शिकल्या.

ओडिसी नृत्यशैलीवर त्यांची अल्पावधीत पकड बसली. देशापरदेशात ओडिसी नृत्याचे एकल कार्यक्रम त्या करू लागल्या. त्याच वेळी त्यांची पाठ प्रचंड दुखायला लागली आणि चालणेही मुश्कील झाले. डॉक्टरांनी ‘स्लिप डिस्क’चे निदान केले. डॉक्टरांच्या मते शस्त्रक्रिया टाळायची असेल तर एक महिना बिछान्यावर झोपून राहून पूर्ण विश्रांती घेण्यास पर्याय नव्हता. हा सल्ला झेलम यांनी काटेकोरपणे पाळला आणि त्याने खरोखरच दुखण्यात फरक पडला. मात्र त्यानंतर नृत्य प्रशिक्षणाकडे वळण्याचा त्यांनी निर्णय घेतला. याच सुमारास १९८७ मध्ये अभिनेत्री स्मिता पाटील यांचे निधन झाले. स्मिता पाटील आणि झेलम या कलापथकातील अगदी जवळच्या मैत्रिणी. १९८८ मध्ये मुंबईत सांताक्रूझमधील ‘साने गुरुजी आरोग्य मंदिर’ येथे झेलम यांनी ‘स्मितालय’ ही महाराष्ट्रातील पहिली ओडिसी नृत्यशाळा सुरू के ली.

नृत्यशाळा म्हटली की अनेकदा त्याचे शुल्क खूप जास्त असते आणि मोठी फी परवडत नसल्यामुळे इच्छा असूनही आर्थिकदृष्टय़ा दुर्बल गटातील मुलामुलींना ही आवड पूर्ण करता येत नाही. पण झेलम यांच्या नृत्यशाळेचे वैशिष्टय़ असे, की ‘शुल्क भरता येत नाही’ या कारणास्तव या ठिकाणी प्रवेश नाकारला जात नाही. वंचित समूहांमधील मुलींना केवळ ५ रुपये शुल्क आकारून ओडिसी नृत्य शिकवायला त्यांनी सुरुवात के ली होती आणि आता ३२ वर्षांनंतरही वंचित गटासाठीचे हे शुल्क प्रतिमहा के वळ १०० रुपये आहे.

यानंतरचा टप्पा होता, तो नृत्य शिकणाऱ्या मुलींचा गट करून नृत्यप्रस्तुतीचे कार्यक्रम करणे. वंचित गटातील विद्यार्थिनींकडे ओडिसी नृत्याच्या विशिष्ट पेहरावासाठी पैसे नसणार हे लक्षात घेत त्यावरही झेलम यांनी कल्पक उपाय शोधले. ओडिशाहून साडय़ांना लावण्याचे कापडी काठ आणून ते साध्या कापडाला लावले आणि इथल्याच शिंप्याकडून पोशाख शिवून घेतला, तर तो स्वस्तात पडत होता. गरीब वस्तीतील उत्सवांपासून पंचतारांकित हॉटेलमधील कार्यक्रमांपर्यंत त्यांच्या गटाला नृत्यप्रस्तुतीसाठी बोलावणे येऊ लागले. या त्यांच्या प्रयत्नात एक गोष्ट घडली, ती म्हणजे झोपडपट्टीत राहणाऱ्या मुली आणि आर्थिक विवंचना नसणाऱ्या मुली एकाच नृत्यशाळेत शिकू  लागल्या आणि एकमेकींना समजून घेत त्यांच्यात मैत्री होऊ लागली. झेलम यांच्या आईवडिलांच्या प्रयत्नांतून सुरू झालेल्या वंचित मुलांसाठीच्या ‘आपलं घर’ या निवासी प्रकल्पात जाऊनही झेलम नियमितपणे लोकनृत्याची शिबिरे घेत आहेत.

नृत्यातील पारंपरिक रचनांबरोबरच काहीतरी वेगळे करून पाहणे हा त्यांचा स्वभाव. याची सुरुवात झाली ती मराठी गीतांवर ओडिसी नृत्य सादर करण्यापासून. हुंडाबळी, मुलीचा जन्म, नर्मदा धरणग्रस्त आदिवासींचा लढा यांसारख्या विविध सामाजिक विषयांवर नृत्यनाटिका, सावित्रीबाई फुले यांच्या कवितांवर आधारित स्त्रीशिक्षणाचे महत्त्व सांगणारा नृत्य कार्यक्रम, भास्कराचार्य लिखित ‘लीलावती’ या गणिती ग्रंथावर, जनाबाईंच्या अभंगांवर नृत्यप्रस्तुती, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतावर, तसेच ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या चिजांवर ओडिसी नृत्य, सर्वसामान्यांपर्यंत ही नृत्यशैली पोहोचवण्यासाठी हिंदी चित्रपटगीतांवर ओडिसी नृत्य, हे त्यांचे वेगळे प्रयोग.

प्रत्येकाने आपापल्या क्षेत्राच्या माध्यमातून समाजाला काय देता येईल याचा विचार करायला हवा, हा विचार झेलम यांनी आपलासा के ला. सर्व सामाजिक स्तरांमध्ये त्यांनी महाराष्ट्रात आतापर्यंत जवळपास ६०० नर्तक तयार के ले आहेत.

एकेका गटात ठरावीकच विद्यार्थिनींना शिकवत ओडिसी नृत्य तळापर्यंत झिरपावे, नर्तकांबरोबरच प्रेक्षकही घडावेत यासाठीचे प्रामाणिक प्रयत्न हेच झेलम यांचे मोठे योगदान.

संपर्क

झेलम परांजपे

पत्ता : ‘स्मितालय’, साने गुरुजी आरोग्य मंदिर, साने गुरुजी रस्ता, सांताक्रूझ पश्चिम, मुंबई-४०००५४

संपर्क  क्रमांक : ०२२-२६६१५४६३/ २६६१६३९८

ईमेल – chingooo@gmail.com                       

dance.smitalay@gmail.com

मुख्य प्रायोजक   :     

* ग्रॅव्हीटस फाऊंडेशन

सह प्रायोजक : 

* महाराष्ट्र औद्योगिक  विकास महामंडळ, 

* व्ही. पी. बेडेकर अ‍ॅँड सन्स प्रा. लि. 

*  सनटेक रिअल्टी लि.

*  बुलडाणा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि.

पॉवर्ड बाय :

* प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, शिवाजीनगर, पुणे, * राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलाइजर्स लि.