‘लोकसत्ता लोकांकिका’.. राज्यातील आठ केंद्रांमध्ये होणारी एकांकिका स्पर्धा. अनेक महाविद्यालये, त्यातील तरुण कलाकार, लेखक, दिग्दर्शक, एवढेच नव्हे तर पडद्यामागील कलाकार, तंत्रज्ञ अशा शेकडो – ग्रामीण आणि शहरी – विद्यार्थ्यांचा सहभाग. त्यांनी सादर केलेल्या विविध विषयांच्या आणि आशयाच्या एकांकिका. या सगळ्यातून महाराष्ट्रातील नाटय़जाणिवांचे वेगळे रूप पुन्हा एकदा अधोरेखित झाले. सध्याच्या तंत्रप्रधान युगामध्ये, माहिती संप्रेषणाची विविध माध्यमे हातात असताना, घराघरात दूरचित्रवाणीच्या पडद्यावरून मनोरंजनाचा नळ धोधो वाहत असताना, त्याचा या नाटय़प्रेमी मुलांच्या मनोभूमिकांवर नेमका काय परिणाम झाला? त्यांच्या सादरीकरणाच्या पद्धतीत काय बदल झाला? महानगरांमधील पोषक वातावरणातील नाटय़जाणिवा आणि खेडय़ा-पाडय़ांतील अभिजनवादी सांस्कृतिक अभावग्रस्त वातावरणातून येणाऱ्या मुलांच्या जाणिवा यात काही फरक होता का, याचा परीक्षकांच्या प्रतिक्रियेतून घेतलेला धांडोळा..

निमशहरी भागांतील निरागसपणा

ग्रामीण किंवा निमशहरी भागांत नाटक, एकांकिका स्पर्धा या पूर्वीपासून आहेतच. ग्रामीण भागांतील एकांकिकांमध्ये निरागसपणा जाणवतो. ही मुले खूप कष्ट करतात. ते मेहनत घेत असल्याचेही जाणवते. नगरमधील एका एकांकिकेत पाऊस दाखवण्यात आला. विशिष्ट कालावधी दाखवण्यासाठी झाडाचा वापर करण्यात आला. हे वाईट किंवा चुकीचे म्हणता येणार नाही. मात्र रंगमंचावरील सादरीकरणात काही गोष्टी मांडताना आपण स्वातंत्र्य घेऊ शकतो, काही गोष्टी या वेगळ्या पद्धतीने दाखवता येतात. याबाबतची समज थोडी कमी दिसून येते. नाटकाच्या सादरीकरणातील काही गोष्टींबाबत प्रगल्भता थोडी कमी दिसत असली, तरीही ही मुले प्रभावीपणे आशय पोहोचवत असल्याचे जाणवते. याउलट पुण्यातील किंवा शहरी भागांतील मुलांचे प्रयोग हे अधिक चकचकीत, व्यावसायिक, तांत्रिकदृष्टय़ा अधिक सरस असतात. काही वेळा या सादरीकरणांमध्ये ‘गिमिक्स’ असल्याचेही जाणवते. स्पर्धेचे असे एक तंत्र असते. प्रेक्षकांवर पडणारा प्रभाव, भावणाऱ्या विषयांची निवड किंवा एखाद्या खूप वेगळ्याच विषयाची निवड करणे याची जाण शहरी मुलांमध्ये अधिक दिसून येते. या मुलांना माहिती मिळवण्याची, तंत्र शिकण्याची साधनेही मोठय़ा प्रमाणावर आहेत. शहरांमध्ये कार्यशाळा असतात, नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एखादी गोष्ट मांडण्यासाठी आवश्यक सामग्रीची सहज उपलब्धी असते. आर्थिक पाठबळही असते. नव्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून नाटक सादर करण्यात चूक किंवा बरोबर असे ठरवता येणार नाही. सादरीकरणाच्या दोन्ही पद्धती योग्यच आहेत. तांत्रिक गोष्टींच्या प्रभावाखाली, चकचकीतपणाखाली प्रयोगातील सहजताही थोडी हरवते का याचाही विचार व्हायला हवा. नव्या माध्यमांचा प्रभाव या मुलांवर अधिक दिसून येतो. विषयांमध्येही फरक जाणवतो. पुण्यात विषयांचे वैविध्य होते. मात्र हे विषय सध्याचे शहरी जीवन, नातेसंबंध, त्यातील दुरावा अशा वळणावर जाणारे होते. त्याच वेळी निमशहरी भागांतील विषय हे घर, सामाजिक प्रश्न, नव्या जगाकडे पाहण्याची दृष्टी याच्याशी संबंधित होते. विषय आणि सादरीकरणाच्या पलीकडे जाऊन शहरी असो किंवा ग्रामीण भाग, मुलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.

अश्विनी गिरी, अभिनेत्री

 

रोजच्या जगण्याहून वेगळे काहीतरी..

पुण्या-मुंबईतील विद्यार्थ्यांना अनेक सुविधा मिळत असतात. त्यातूनही मुलांचे सादरीकरण अधिक सफाईदार होत असते. त्यासाठी तांत्रिक गोष्टींचा आधार मुले घेतात. यातून काही वेळा या मुलांमधील आत्मविश्वास हा अतिआत्मविश्वासाकडे झुकलेलाही दिसतो. ग्रामीण भागांतील मुलांच्या सादरीकरणात तांत्रिक सफाईदारपणा कमी असला, तरी ही मुले विषयांच्या मांडणीत किंवा अभिनयात जराही कमी नाहीत. त्यांना तांत्रिक बाबींचे थोडे मार्गदर्शन मिळाले तर त्यांचा प्रयोग हा पुण्या-मुंबईतील महाविद्यालयांच्या तोडीस तोड होईल. या मुलांची क्षमता ही खरेच डोळे दिपवणारी आहे. हावभाव, वाचिक अभिनय याची क्षमता मुलांमध्ये उत्तम आहे. तेच त्यांचे बलस्थान आहे. त्याचा वापर करून घेण्याचे कौशल्यही त्यांच्याकडे आहे. त्याला प्रयोग रंगवण्यासाठी लागणाऱ्या इतर घटकांची थोडी जोड आवश्यक आहे. त्यांच्या प्रयोगात प्रामाणिकपणा आणि साधेपणा आहे.

याचा अर्थ शहरी महाविद्यालयांमधील मुले अभिनय किंवा सादरीकरणात कमी नक्कीच नाहीत. ग्रामीण भागांतील मुले जे जीवन जगतात त्याचे प्रतिबिंब त्यांच्या विषयनिवडीतून, सादरीकरणातून दिसते. आपल्या आसपासच्या समस्यांवर ही मुले भाष्य करतात. पुण्यातील मुलांनीही वेगळे विषय निवडले होते. त्यांच्या जगण्यापेक्षाही वेगळे काहीतरी सादर करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना खूप उपयोग होईल, याची खात्री वाटते.

दिलीप जोगळेकर, ज्येष्ठ रंगकर्मी

 

विदर्भात नाटय़व्यासपीठांची गरज

लोकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत नागपूरमधील एकांकिका पाहायला मिळाल्या. यानिमित्ताने मुंबई-पुणे-नाशिक या त्रिकोणापलीकडील नाटय़जाणिवा अनुभवण्याची संधी मिळाली. या महानगरी त्रिकोणाच्या बाहेरील नाटकांचा विचार करताना एक बाब ध्यानात घ्यायला हवी, की मुंबई, पुणे किंवा नाशिकमध्ये जशी नाटय़कर्मीच्या सृजनाला चालना देणारी व्यासपीठे आहेत, तशी ती इथे फारच कमी आहेत. नागपूरचाच विचार करायचा झाल्यास तिथे झाडीपट्टी रंगभूमी आहे. तिथून जवळच अचलपूर आहे. मराठी रंगभूमीच्या प्रारंभाचा एक धागा अचलपूरशी जोडलेला आहे. इथल्या तरुण रंगकर्मीना या परंपरांची माहिती करून द्यायला हवी. इतर महानगरांप्रमाणे इथे प्रायोगिकच नव्हे तर व्यावसायिक नाटकांचे प्रयोग फारच कमी प्रमाणात होतात. त्यामुळे नव्या नाटय़तंत्रांपासून इथले होतकरू रंगकर्मी अनभिज्ञच राहतात, असे वाटते.

नागपूर केंद्रावर झालेल्या एकांकिकांच्या विषयांमध्ये वैविध्य होते. विद्यार्थीदशेत त्यांना जे प्रश्न महत्त्वाचे वाटतात, त्याचे प्रतिबिंब या एकांकिकांमधून उमटले. त्या प्रदेशांमधल्या सामाजिक प्रश्नांशी तरुण पिढी भिडताना दिसली. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नक्षलवाद यांसारखे सामाजिक-राजकीय संदर्भ एकांकिकांमध्ये येतायत. हे तात्कालिक स्वरूपाचे किंवा विषयांकडे प्रदेशनिहाय पाहणे हे या वयोगटातल्या रंगकर्मीकडून होणारच. त्यात कधीकधी प्रचारकीपणाही येऊ शकतो. परंतु नाटय़जाणिवा जशा पक्व होत जातील तसे व्यापक विषयांनाही हात घातला जाईल, हेही तितकेच खरे. येथे एक गरज प्रकर्षांने जाणवते, ती म्हणजे रंगभूमीच्या विविध अंगांची ओळख करून देणाऱ्या कार्यशाळांची. लोकांकिका हा उपक्रम उत्तमच आहे, पंरतु तो आणखी सशक्त करण्यासाठी त्याला नाटय़कार्यशाळांची जोड द्यायला हवी. नाटक ही कला वरवर सोपी वाटत असली तरी मुळात ती फार गुंतागुंतीची आहे. अनेक कलांच्या मिश्रणातून नाटक आकार घेत असते. त्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. या सर्वाची जाणीवही या तरुण रंगकर्मीना करून द्यायला हवी. मुंबई-पुण्यासारखी नाटय़व्यासपीठे इथेही उपलब्ध झाल्यास, व्यावसायिक नाटकांचे प्रयोग सातत्याने होत राहिल्यास येथून खूप वेगळ्या प्रकारची नाटके येतील.

गिरीश पतके, दिग्दर्शक

 

तरुण पिढीचे प्रश्न मांडले जाताहेत

लोकसत्ता आयोजित ‘लोकांकिका’ ही स्पर्धा अतिशय यशस्वी उपक्रम आहे, हे आधीच नमूद करायला हवे. यंदाच्या लोकांकिकेसाठीच्या मुंबई, ठाणे, रत्नागिरी व नाशिक या विभागांतील प्राथमिक फेरीत मी परीक्षक म्हणून काम पाहिले. अनुभवविश्व समृद्ध करणाऱ्या एकांकिका या केंद्रांवर पाहायला मिळाल्या. इथे एक बाब सांगावीशी वाटते, ती म्हणजे जसजसे मुंबई-पुण्यासारख्या महानगरांच्या बाहेर आपण जाऊ लागतो, तसे तिथल्या एकांकिकांमधील आशयाचा बाजही बदलत जाताना पाहायला मिळतो. हा बदल वरपांगी कदाचित दिसणारही नाही, पण खोलात जाऊन पाहिले तर विषय निवडीपासून ते आशयमांडणीपर्यंत नक्कीच काही निराळेपण दिसून आल्याशिवाय राहत नाही. असा बदल या केंद्रांवरील एकांकिकांमधूनही जाणवला. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विषयांबरोबरच कौटुंबिक नात्यांचा अर्थ शोधू पाहणाऱ्या एकांकिका इथल्या तरुण रंगकर्मीनी सादर केल्या. रत्नागिरी केंद्रावर सादर झालेल्या एकांकिका चमूंशी मी संवाद साधला. ही मुले रत्नागिरीच्या अवतीभवतीच्या परिसरातून आलेली होती. सांदोशी, रायगडवाडी यांसारखी रायगड किल्ल्याच्या परिसरातली ती गावे होती. हा तसा दुर्गम भाग. अशा परिसरात मुळं असणाऱ्या या मुलांमधील नाटय़ऊर्जा थक्क करायला लावणारी होती. महानगरांच्या तुलनेत साधनांचा अभाव असतानाही या तरुणांमध्ये नाटय़ऊर्मी मात्र प्रचंड होती. त्याच ऊर्मी आणि ऊर्जेच्या जोरावर या मुलांनी आपल्या एकांकिका सादर केल्या. काही एकांकिकांच्या प्रयोगासाठी आधुनिक तंत्राचा वापरही करण्यात आला. तर काहींकडे तशी तंत्रसुविधा नव्हती. मात्र तरीही सारेच प्रयोग सफाईदारपणे झाले.

सादरीकरणातील या बांधेसूदपणाबरोबरच आशयाच्या अंगानेही या एकांकिका काही सांगू, मांडू पाहणाऱ्या आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास, चिपळूणच्या डीबीजे महाविद्यालयाची ‘तात्यांची कृपा’ ही एकांकिका घेता येईल. आग्री समाजाची पाश्र्वभूमी असणाऱ्या कुटुंबातील वडील-मुलगी नात्याचा शोध या एकांकिकेत घेतला गेला. महानगरीय माणसाचे तुटक तुटक जगणे, कुटुंबसंस्थेसमोर निर्माण झालेले पेच, नात्यांची अर्थपूर्णता यांवर या एकांकिकेने एकप्रकारे आपली प्रतिक्रियाच दिली. कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली ‘हंगर आर्टिस्ट’ ही एकांकिका तर जर्मन लेखक फ्रान्झ काफ्काच्या कथेवर आधारलेली होती. या विद्यार्थ्यांना काफ्कासारख्या लेखकाच्या लेखनाशी स्वत:ला जोडून घ्यावेसे वाटले ही बाब सुखावणारी आहे. महानगरांपासून नजीकच्या प्रदेशांत वास्तव्य करणाऱ्या या मुलांचे वाचन त्यांच्या एकांकिकांमधून डोकावत होते. ती वाचताहेत आणि चांगलं वाचताहेत. इतकेच नव्हे तर त्यावर विचारही करतायत. त्यामुळे एक बाब प्रकर्षांने जाणवली, की या एकांकिकांचे विषय त्यांनी जाणीवपूर्वक निवडलेले आहेत. आर्थिक व सांस्कृतिक विषमतेच्या वास्तवाशी सामना कराणारी ही मुलं जाणीवपूर्वक इथल्या प्रश्नांशी भिडतायत. ती त्यांच्या पिढीचे प्रश्न मांडतायत. त्यांच्या एकांकिकांना इथल्या मातीचा सुवास येतोय. नेमाडेंनी मांडलेला देशीवाद एकांकिका या वाङ्मयप्रकारातही या निमित्ताने दिसू लागला आहे. सध्या शहरीकरणाच्या प्रक्रियेचा झपाटा सुरू आहे. या प्रक्रियेच्या कचाटय़ात येत्या काळात अपरिहार्यपणे सापडणारे हे प्रदेश आहेत. तिथून येणारे हे रंगकर्मी. त्यांनी हाताळलेले विषय पाहता त्यांच्या लेखनाबद्दल आशादायक स्थिती नक्कीच आहे. हेच लेखक येत्या काळात आपल्याला काहीतरी भरीव देतील. फक्त त्यांच्या नाटय़जाणिवांना अधिक परिपक्व व प्रगल्भ करण्याची संधी त्यांना मिळायला हवी. त्यासाठी जाणीवपूर्वक काही प्रयत्न करावे लागतील. ते केल्यास इथल्या मातीशी प्रामाणिक राहणाऱ्या आणि तरीही कालातीत ठरू शकणाऱ्या नाटय़जाणिवा इथे जोम धरल्याशिवाय राहणार नाहीत.

नीळकंठ कदम, कवी आणि समीक्षक