या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बलुच नेते ब्रहमदाग बुगती यांची खास मुलाखत..

जम्मू-काश्मीरमधील पाकिस्तानी कारवायांना प्रत्युत्तर म्हणून बलुचिस्तानमधील दमनशाही जागतिक स्तरावर उघड करण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातून दिला. तत्पूर्वी काश्मीरविषयक सर्वपक्षीय बैठकीतही त्यांनी हा मुद्दा मांडला. या पाश्र्वभूमीवर बलुच रिपब्लिकन पार्टी या पक्षाचे संस्थापक आणि प्रमुख, तसेच बलुच लढय़ाचे जनक आणि राष्ट्रपिता मानले जाणारे दिवंगत नेते नवाब अकबर खान बुगती यांचे नातू नबाब ब्रहमदाग बुगती यांनी लोकसत्ताचे प्रतिनिधी सचिन दिवाण यांना दिलेल्या खास मुलाखतीचा हा संपादित भाग. पाकिस्तानच्या जाचामुळे बुगती यांना मायभूमीतून परागंदा व्हावे लागले असून, सध्या त्यांनी स्वित्र्झलडमधील जीनिव्हा येथे राजकीय आश्रय घेतला आहे. तेथून त्यांनी ई-मेलच्या माध्यमातून लोकसत्ताने पाठवलेल्या प्रश्नांची उत्तरे देत आपली भूमिका विशद केली..

  • बलुच नागरिकांचे न्याय्य हक्क डावलून, त्यांच्या आशा-आकांक्षांकडे दुर्लक्ष करून, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करून पाकिस्तान या प्रदेशातील नैसर्गिक साधनसंपत्तीची मात्र यथेच्छ लूट करत आहे. त्या पाश्र्वभूमीवर आपल्या लढय़ाचा आजवरचा प्रवास कसा होता? पुढील दिशा काय असेल?

ब्रिटिश निघून गेल्यानंतर लगेचच पाकिस्तानने बलुचिस्तानचा जबरदस्तीने ताबा घेतला आणि पहिल्या दिवसापासून ते बलुच नागरिकांचे दमन करत आहेत. पाकिस्तानने कायमच बलुच भूमी आणि तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा बळाने उपभोग  घेतला आहे; मात्र तेथील नागरिकांना मूलभूत मानवी हक्कही नाकारले आहेत. बलुच नागरिकांचा लढा हा पाकिस्तानी अत्याचारांइतकाच जुना आहे आणि तो अद्याप सुरूच आहे. पाकिस्तानच्या आक्रमणानंतर लगेचच बलुच स्वातंत्र्याची मागणी होऊ लागली. मात्र शहीद नवाब अकबर बुगती यांच्या हत्येनंतर त्या मागणीने जोर धरला. बलुच जनतेने पाकिस्तानच्या चतु:सीमांमध्ये राहून जुळवून घेण्याचा आणि पाकिस्तानी व्यवस्थेत राहून मूलभूत अधिकार मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाकिस्तानने कायमच त्याविरुद्ध बळाचा आणि अत्याचारांचा अवलंब केला आहे.

आता स्वातंत्र्य ही बलुच नागरिकांची एकमेव मागणी आहे. पाकिस्तानी अत्याचारांत वाढ होऊनही दिवसेंदिवस बलुच नागरिकांची स्वातंत्र्याकांक्षा बलशाली बनत आहे. नि:संशय, आपल्या लढय़ात बलुचांनी अपरिमित हालअपेष्टा सोसल्या. पण त्याने त्यांचा अधिकार आणि स्वातंत्र्य मिळवण्याचा निर्धार ढिला पडलेला नाही.

  • पाकिस्तान सरकारी धोरण म्हणून भारताविरुद्धही दहशतवादाचा वापर करत आहे आणि जम्मू-काश्मीरमध्ये अस्थैर्य निर्माण करत आहे हे जगजाहीर आहे. याबाबत तुम्ही काय म्हणाल?

पाकिस्तान भारतासह अफगाणिस्तान, बांगलादेश आणि जगात अन्यत्रही होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या गुंतलेला आहे हे उघड सत्य आहे.

  • पण भारताची ‘रिसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंग’ (रॉ) ही गुप्तचर संघटना बलुचिस्तानमध्ये अस्थैर्य निर्माण करण्याचे प्रयत्न करत असल्याचा दावा पाकिस्तान करत आहे..

बलुचिस्तान आणि भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर मलिन करण्यासाठी पाकिस्तान करत असलेला हा दुष्प्रचार आहे. मी त्यांना (पाकिस्तानला) विचारू इच्छितो, की बलुच नागरिकांचा पद्धतशीर वंशविच्छेद करण्यात, त्यांचे मृतदेह फेकून देण्यात, त्यांना घाऊकपणे पुरण्यातही ‘रॉ’चाच हात आहे का? पाकिस्तानी लष्कराच्या मगरमिठीत दररोज हालअपेष्टा सहन करणाऱ्या बलुच नागरिकांच्या मदतीसाठी भारताने मध्यस्थी केली तर आम्ही त्याचे स्वागतच करतो.

  • भारताकडून आणि जागतिक समुदायाकडून तुम्हांला नेमकी कोणत्या स्वरूपाच्या मदतीची अपेक्षा आहे?

भारताने बलुच नागरिकांवर होणारे अत्याचार आणि त्यांचा वंशविच्छेद रोखण्यासाठी एक जबाबदार शेजारी आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून हस्तक्षेप करावा, अशी आमची अपेक्षा आहे. भारताने तत्कालीन पूर्व पाकिस्तानमध्ये (आजचा बांगलादेश) निभावलेल्या भूमिकेकडे आम्ही आदराने पाहतो आणि बलुचिस्तानसाठीही तशीच भूमिका वठवावी अशी अपेक्षा करतो.

जगातील सर्वच देशांकडून आम्ही मदतीची अपेक्षा करतो, मात्र भारताच्या खांद्यावर केवळ बलुचांची गाऱ्हाणी ऐकून घेण्याचीच नव्हे, तर जागतिक समुदायात त्यांचा आवाज बनण्याची आणि तो बुलंद करण्याची, त्यांच्या स्वातंत्र्यलढय़ाला पाठिंबा मिळवून देण्याची अधिक जबाबदारी आहे.

  • भारत केवळ पाकिस्तानवर कुरघोडी करण्यासाठी बलुचिस्तानच्या प्रश्नाचा वापर करत आहे, अशी टीका केली जाते..

भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि एक जबाबदार राष्ट्र आहे आणि बांगलादेशप्रमाणे तो आमचीही सुटका करेल अशी आशा आहे. माझ्या मते भारताने बलुचिस्तानविषयी नुकतीच घेतलेली भूमिका ही खूप सकारात्मक बाब आहे आणि अन्य देशांचाही पाठिंबा मिळत जाईल अशी आशा आहे. तो महत्त्वाचा असून त्यासाठी आम्ही जगभर प्रचार करून प्रयत्न करत आहोत.

  • नजीकच्या भविष्यकाळात तुमचे स्वतंत्र बलुचिस्तानचे स्वप्न साकार झाले तर नव्या देशासाठी तुमची दृष्टी किंवा आराखडा काय असेल? नवा देश तग धरून कसा प्रगती करेल?

जागतिक नियमांवर आधारित धर्मनिरपेक्ष, सार्वभौम आणि लोकशाही देश स्थापन करण्याचे आमचे स्वप्न आहे. देश म्हणून तग धरण्याबद्दल आणि प्रगती करण्याबद्दल विचाराल तर बलुचिस्तान खनिज तेल, नैसर्गिक वायू, अनेक प्रकारची खनिजे, मोठा समुद्रकिनारा अशा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. परदेशी मदतीवर विसंबून असलेल्या आणि जगात दहशतवाद निर्यात करणाऱ्या पाकिस्तानच्या तुलनेत बलुचिस्तान स्वयंपूर्ण आणि शांतताप्रिय देश असेल.

  • पाकिस्तानप्रमाणेच शेजारच्या अफगाणिस्तान आणि इराणमध्येही बलुच नागरिक राहतात आणि त्यांच्या भूभागासह एकत्र आणि स्वतंत्र बलुचिस्तान स्थापन करण्याचे तुमचे स्वप्न आहे. अशा बलुचिस्तानच्या निर्मितीमुळे या प्रदेशातील भू-राजकीय समीकरणे नक्कीच बदलतील..

बलुच भूमीच्या ब्रिटिशांनी केलेल्या फाळणीमुळे शेजारच्या अफगाणिस्तान आणि इराणमध्येही मोठय़ा प्रमाणात बलुच नागरिक आहेत हे खरे आहे. पाकिस्तानी नियंत्रणाखालील बलुच भूभागाला स्वातंत्र्य मिळाल्याचा इराण आणि अफगाणिस्तानमधील बलुच भूभागांच्या भवितव्यावर काही परिणाम होईल का,ते तेथील बलुच नागरिकांना ते देश कशी वागणूक देतात त्यावर अवलंबून असेल. उदाहरणादाखल सांगायचे, तर भारतातही बंगालींची मोठी लोकसंख्या आहे. पण बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनीही स्वातंत्र्याची मागणी केली का? या प्रदेशाच्या भू-राजकीय स्थितीवर काय परिणाम होईल हे पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळण्यापेक्षा या देशांतील बलुच नागरिकांच्या आकांक्षांवर अधिक अवलंबून असेल.

  • आता एक वेगळा प्रश्न. धार्मिक कट्टरता, तिचे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या रूपाने होणारे प्रकटीकरण याबाबत तुमचे काय मत आहे?

धार्मिक कट्टरतेसह सर्व प्रकारच्या दहशतवादाचा आम्ही धिक्कार करतो. तो जागतिक शांततेसाठी वाढता धोका बनत आहे. फ्रान्स आणि जगात अन्यत्र झालेल्या हल्ल्यांनंतर आपण जग कसे असेल याची झलक पाहिली आहे. पाकिस्तानकडे पाहिल्यास असे दिसेल, की तो देश पाश्चिमात्य देशांकडून अब्जावधी डॉलरची आर्थिक आणि लष्करी मदत मिळवतो आणि बदल्यात जगाला दहशतवाद निर्यात करतो. अशा परिस्थितीत दहशतवादाचा पराभव करण्यासाठी सर्व शांतताप्रिय शक्तींची एकजूट करणे ही सर्व सुसंस्कृत देशांची जबाबदारी आहे. बलुचींना पाठिंबा दिल्याने केवळ शांतताप्रिय लोकांचा वंशविच्छेद थांबणार नाही, तर या प्रदेशात वाढत्या धार्मिक कट्टरतावादाला पायबंद घालण्यासाठी ते महत्त्वाचे ठरेल. याचा जागतिक शांततेवर सकारात्मक परिणाम होईल.

बलुचींना पाठिंबा दिल्याने केवळ शांतताप्रिय लोकांचा वंशविच्छेद थांबणार नाही, तर या प्रदेशात वाढत्या धार्मिक कट्टरतावादाला पायबंद घालण्यासाठी ते महत्त्वाचे ठरेल.

 

 

 

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta interview with brahumdagh bugti over balochistan crisis
First published on: 21-08-2016 at 03:04 IST