घुमान. बाबा नामदेवजींचे गाव. मराठीशी असलेला या गावाचा संबंध बस एवढाच. नाही म्हणायला या गावातील काही लोक मराठवाडय़ात नरसीबामणीला नामदेवांच्या दर्शनासाठी येतात. पण ते तेवढेच. तेव्हा त्यांना मराठी साहित्याशी परिचय असण्याचे काहीच कारण नाही. आपल्या मराठी मातीतल्या अनेकांना त्याचा गंध नसतो म्हटल्यावर पंजाबातल्या शिखांकडून तशी अपेक्षा करणेही चूकच. तेव्हा या संमेलनात ग्रंथविक्रीचे काय होणार हा मोठाच औत्सुक्याचा आणि प्रकाशक, ग्रंथविक्रेते यांच्या काळजीचा प्रश्न होता. त्यामुळेच मराठी प्रकाशक संघटनेने अगोदर घुमान साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. नंतर तो मागे घेण्यात आला. पण फारसे प्रकाशक काही इकडे फिरकलेच नाहीत. एरवी महाराष्ट्रात होणाऱ्या साहित्य संमेलनांमध्ये पुस्तकांची विक्री काही कोटी रुपयांच्या घरात जाते. तेथे प्रकाशकांची संख्याही २५०-३०० एवढी असते. या संमेलनात पुस्तकांची अवघी ४० दालने आहेत.
साहित्य संमेलनांस जाणाऱ्या हौशा-नवशांना तसा एरवीही मुख्य मंडपांतील साहित्यिक परिसंवादांमध्ये तसा रस नसतो. जरा बडी नावे असतील, त्यात कुठे करमणूक होणार असेल तर मंडळी मंडपात थांबतात. नाही तर मग सरळ ग्रंथ प्रदर्शनास जातात. घुमानमध्येही काहीसे असेच वातावरण होते. बरेचसे लोक दुसऱ्या दिवशीचे कार्यक्रम टाळून अमृतसर, वाघा सीमा अशा ठिकाणी दर्शनास गेले होते. त्यामुळे ग्रंथ प्रदर्शनात गर्दी तशी कमीच होती. पण त्या गर्दीचे एक वैशिष्टय़ होते. त्यात मोठय़ा प्रमाणावर घुमान पंचक्रोशीतले शीख बांधव दिसत होते. त्यांच्यासाठी हा नामदेव महाराज का मेला आहे. तेव्हा घुमान में नामदेव महाराज का मेला लगा है, चलो चलते है, देखते है, असे म्हणत विद्यार्थी आणि युवक मोठय़ा संख्येने येथे आल्याचे दिसते आहे.
आता या शिखांना मराठी साहित्यातले काय कळणार असा प्रश्न कोणासही पडेल. पण ते पुस्तके चाळत होते, हाताळत होते. वध्र्यातल्या सेवाग्राम आश्रमाच्या सर्वसेवा संघ प्रकाशनचे शक्तीचरण सिंह यदू हे त्या प्रकाशनाच्या दालनात भेटले. ते म्हणाले, आम्ही संत नामदेव यांचे चरित्र, भजने, गुरूग्रंथसाहेबमधील पदे अशा विषयांवरची िहदी पुस्तकं घेऊन आलो आहोत. शीख वाचकांकडून त्यांना चांगली मागणी आहे. माशेल-गोव्याहून नार्वेकर एजन्सीचे नारायण नार्वेकर यांनीही येथे स्टॉल लावला आहे. ते म्हणाले,  संत नामदेव, भगतसिंह, गुरू नानकदेव, संत मीराबाई ही मंडळी शिखांच्या परिचयाची. त्यामुळे आम्ही मुद्दाम त्यांच्यावरील िहदी आणि इंग्रजी पुस्तकं घेऊन आलो आहोत. शीख वाचकांकडून ही पुस्तके आवर्जून विकत घेतली जात आहेत. सत्संग प्रकाशन हे रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्यावरील पुस्तके मराठी, िहदी, इंग्रजी भाषेत प्रकाशित करते. त्यांचाही असाच अनुभव आहे. संस्थेचे भालचंद्र राव म्हणाले, आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर पहिल्यांदाच आमचं ग्रंथप्रदर्शन लावलं आहे. िहदी, इंग्रजी पुस्तकांची चांगली विक्री होत आहे.
पण मराठीतील पुस्तकांचे काय?
नार्वेकर सांगतात, शिख वाचकांमध्ये त्याबाबत उत्सुकता दिसते. स्टॉलवर येऊन ते मराठी पुस्तके हाताळून, उघडून व चाळून पाहात आहेत. चपराक प्रकाशनचे घनश्याम पाटील येथे भेटले. ते सांगत होते, आम्ही आमच्या प्रकाशनाची दोन मराठी पुस्तकं आणली आहेत. त्यांची चांगली विक्री होतेय. आधी लोकांच्या मनात शंका होती, की इथं कोण येणार, मराठी पुस्तकांची विक्री कशी होणाऱ? पण आमचा अनुभव चांगला आहे. ठाण्याच्या विद्याधर ठाणेकर प्रतिष्ठानचे विद्याधर ठाणेकर यांचा अनुभव मात्र नेमका याच्या उलट होता. प्रतिसाद उत्साहवर्धक नाही, असे ते म्हणत होते. तसा हा प्रतिसाद स्वाभाविकच म्हणावयास हवा. पण या निमित्ताने मराठी साहित्य या लोकांच्या नजरेस पडले हेही काही कमी नाही. याबाबतचे एक उदाहरण उत्साहवर्धक म्हणावे असेच आहे. या ग्रंथप्रदर्शनात फिरताना एक शीख गृहस्थ दिसले. अगदी मन लावून मराठी पुस्तके चाळत होते. तेव्हा त्यांच्याशी बोलणे काढले. त्यांचे नाव इंद्रजीतसिंग. ते मूळचे चंदिगढचे. लिहितात वगैरे. शिवाय शिखांचा इतिहास हा त्यांचा अभ्यासाचा विषय. त्यांना विचारले, की तुम्ही इकडं कसे आलात? तर ते म्हणाले, मला साहित्य संमेलनाविषयी तशी काहीही माहिती नव्हती. पण उत्सुकतेने आलो. येथे फिरलो. मराठी पुस्तकं चाळली, पाहिली. हे सगळं साहित्याचं वातावरण पाहून मला आता मराठी शिकावंसं वाटू लागलं आहे. मराठी शिकवणारं पुस्तक मिळालं, तर तुम्हांला सांगतो ,काही दिवसांतच मी मराठी शिकेन.
या संमेलनाच्या निमित्ताने घुमान मराठी साहित्याच्या रंगात रंगले आहे हे मात्र खरे. ग्रंथ प्रदर्शनात पंजाब राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक आणि प्रकाशन विभागानेही एक दालन लावले आहे. या विभागाचे उपसंचालक बलराज सिंह यांचीही अगदी  अशीच भावना होती. संमेलनस्थळी झालेली गर्दी पाहून ते म्हणत होते, आम्हाला आम्ही पंजाबमध्ये आहोत असं वाटतंच नाही. वाटतंय, महाराष्ट्रातच आहोत.
इंद्रजीत यांच्यासारख्या पंजाबी लेखकालाही या वातावरणाने मोहून टाकल्याचे दिसत होते.
जाता जाता ते म्हणाले, यापुढच्या मराठी साहित्य संमेलनालाही उपस्थित राहण्याचा मी विचार करतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य संमेलनात शनिवारी पंजाबच्या लोककलावंतांनी रसिकांची दाद मिळवली. ग्रंथ विक्रीच्या दालनांवर बऱ्यापैकी गर्दी दिसत होती. सर्व माजी संमेलनाध्यक्षांच्या अर्कचित्रांच्या प्रदर्शनास पंजाबी तरुणांनीही हजेरी लावून कलाकाराचे कौतुक केले.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi sant namdev mela in punjab
First published on: 05-04-2015 at 04:19 IST