अर्जेटिनात २४ मार्च हा दिवस ‘हुतात्मा दिन’ म्हणून पाळला जातो, कारण १९७६ मध्ये याच दिवशी तेथे लष्करी उठाव झाला आणि तेथील डाव्या पक्षांच्या समर्थकांना चिरडले गेले. या उठावाला अमेरिकेचे पाठबळ होते, हे उघड असतानाही येत्या २४ मार्च रोजी अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा अर्जेटिनात आहेत..
आपल्या माननीय पंतप्रधानांनी आफ्रिका खंडातील अल्जेरिया, अंगोला किंवा दक्षिण अमेरिका खंडातील अर्ज्ेटिना या देशात जाऊन केलेल्या भाषणांच्या बातम्या होत नाहीत. बातम्या अमेरिकेतील भाषणांच्या होतात. हा बाजारपेठीय विशेष फक्त देशोदेशींच्या राष्ट्रप्रमुखांनाच लागू पडतो असेही नाही. सुमारे तीस वर्षांपूर्वीपर्यंत आपला मुलगा/ मुलगी अमेरिकेत गेली आहे, हे भारतीय पालक विशेष कौतुकाने सांगत असत. अमेरिकेची एवढी मातबरी तिच्या अनेक विशेषांमुळे आहे. उदाहरणार्थ, देशाचा सांस्कृतिक दर्जा आणि श्रीमंती या दोन घटकांचा विचार पुरेसा आहे. दरवर्षी रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, मानसशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांतील आणि त्यासोबत अर्थशास्त्रातील योग्य व्यक्तींना नोबेल पारितोषिके दिली जातात. आत्तापर्यंत जगातील ८७४ व्यक्तींना नोबेल पारितोषिके मिळालेली आहेत. त्यापकी तब्बल ३५३ पारितोषिके (सुमारे ४० टक्के) अमेरिकेतील व्यक्तींना मिळाली आहेत. श्रीमंतीचा विचार केला तरी येनकेनप्रकारेण कित्येक शतकोटी डॉलरची माया जमविलेल्या जगातील १८२६ ‘बिल्यनेअर’ (अब्जाधीश) व्यक्तींपकी ५३६ म्हणजे सुमारे २९.५ टक्के व्यक्ती अमेरिकी आहेत. त्यामुळे अमेरिकेत जाऊन आपले महत्त्व सिद्ध करण्याला बाजारपेठीय अति महत्त्व आले आहे. या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेतच राहत असल्याने त्यांना अमेरिकेपेक्षा जास्त मातबर देशांच्या भेटीवर जाताच येत नाही.. पण अध्यक्ष बराक ओबामा यांची सध्या सुरू असलेली क्युबा-भेट चार दशकांनी या देशांची चर्चा होत असल्याने गाजते आहे आणि तेवढय़ाच कालखंडानंतर अमेरिकी अध्यक्ष अर्जेटिनास जात असल्याने याही भेटीकडे जगभरच्या माध्यमांचे लक्ष आहे.
बहुसंख्य भारतीयांना हा अर्जेटिना नामक देश कोठे आहे हे शोधावेच लागणे स्वाभाविक आहे. दक्षिण अमेरिका खंडाचा आकार दक्षिणेला निमुळत्या होत जाणाऱ्या शेपटासारखा आहे. या शेपटाच्या साधारणत: दक्षिण पूर्वेला अर्जेटिना हा सुमारे २७,८०,४०० चौ.कि.मी. क्षेत्रफळ आणि ४.२ कोटी लोकसंख्या असलेला बऱ्यापकी मोठा देश आहे. त्याच्या पश्चिमेला चिली, उत्तरेला बोलिव्हिया आणि पराग्वे, ईशान्येला ब्राझील आणि उरुग्वे या देशांच्या सीमा आहेत. पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे. दियागो मॅरेडोना अर्जेटिनाचाच. फुटबॉल हा येथील लोकप्रिय खेळ, हे निराळे सांगायला नको. स्पेनच्या सम्राटांनी चांदी (लॅटिन भाषेत अर्जेटम) आणि सोन्याच्या आशेने सुरू केलेला भूभागांचा शोध सन १५०० मध्ये अर्जेटिनात थडकला आणि हा भूभाग सन १५३० ते १८१० ही सुमारे ३०० वष्रे स्पेनची वसाहत होता. पुढील ७० वष्रे सीमा बदलत राहिल्या आणि शेवटी अर्जेटिना देश म्हणून अस्तित्वात आला. नंतरच्या काळात अनेकदा लष्करी राजवटी आणि त्या उलथवून टाकणाऱ्या चळवळी या देशाने अनुभवल्या आहेत. अशा या देशाला मातबर अमेरिकेचे अध्यक्ष २४ मार्च रोजी भेट देणार! परंतु भेटीची तारीख बदलायची विनंती अर्ज्ेटिनामध्ये जन्मलेल्या ८५ वर्षांच्या व्यक्तीने पत्राद्वारे केली आणि २४ रोजी ओबामा काय बोलणार याकडे माध्यमांचे लक्ष लागले. त्या पत्राचा मजकूर असा आहे :
‘‘प्रश्न अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या भेटीचा नाही. प्रश्न तारखेचा आहे. चाळीस वर्षांपूर्वी (सन १९७६) २४ मार्च या दिवशी- ओबामा यांचे वय कदाचित १४ वर्षांचे असावे- त्या वर्षी आपल्या स्वातंत्र्याचा द्विशतकी महोत्सवात साजरा करण्यात अमेरिका मश्गूल होती. त्यामुळे त्या तारखेला काय घडले याची कदाचित ओबामा, आपल्याला आठवण नसेल. ते समजण्याजोगे आहे. परंतु याच दिवशी अर्ज्ेटिनामध्ये लष्करी उठाव झाला त्यात तत्कालीन राष्ट्राध्यक्ष इसाबेल पेरॉन पदच्युत झाल्या. तेव्हापासून ते सन १९८३ पर्यंत अर्जेटिनामध्ये सनिकी धुमाकूळ चालला होता; मानवी हक्कांना हरताळ फासला जात होता; ‘देशप्रेम म्हणजे सनिकी सत्तेबद्दल प्रेम किंवा भक्ती (आणि मानवी हक्कांबद्दल द्वेष),’ अशी समीकरणे तयार झाली होती. या सात वर्षांच्या निर्घृण आणि हिडीस अंतर्गत-युद्धात लष्करी सत्तेने हजारो लोकांना तुरुंगात डांबून छळले आहे, बलात्कार करविले आहेत आणि कित्येकांचे खून पाडले आहेत. सध्या सुमारे फक्त ४.२ कोटी लोकसंख्या असणाऱ्या या देशातील लष्करी सत्तेने ‘डाव्या विचारसरणीचे’ ३० हजार नागरिक प्रचंड छळ करून नंतर ठार केले आहेत. मी त्या काळाचा प्रौढ आणि क्रियाशील साक्षीदार आहे. याच आठवणींना उजाळा देण्यासाठी दर वर्षी २४ मार्च हा दिवस अर्जेटिनी जनता हुतात्मा दिन म्हणून साजरा करते; हा दिवस सत्याचा आणि मानवी हक्कांचा विजय दिन असतो. मला आणि संपूर्ण अर्जेटिनाला माहीत आहे की या उत्पातामागे तेव्हाच्या अमेरिकी सरकारचे परराष्ट्रीय धोरण होते. बंडानंतर लगेच तीन महिन्यांनी अमेरिकी परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांनी अर्जेटिनाच्या विदेशमंत्र्यांना (सीझर गुझेटी) मोठय़ा प्रेमाने आश्वस्त केले होते की, अर्जेटिनामधील घटनांवर अमेरिका लक्ष ठेवून आहे, आम्ही नवीन सरकारला यश चिंतितो, परिस्थिती हाताळण्यासाठी जे जे काही करणे आवश्यक आहे ते ते तुम्ही तात्काळ करा. अमेरिकन प्रशासनाने या लष्करी सत्तेला मोठय़ा प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि लढाऊ विमाने पुरविली होती. दक्षिण अमेरिका खंडातील अनेक सत्ता उलथवून टाकण्यात अमेरिकेचा मोठा सहभाग होता, याचे स्मरण या दिवशी होते.’’
अर्जेटिनामध्ये हा सात वर्षांचा कालखंड ‘डर्टी वॉर’ या नावाने प्रसिद्ध आहे. पत्र पुढे म्हणते, ‘‘माननीय ओबामा, आपल्या २४ मार्चच्या भेटीने अर्जेटिनी जनतेच्या या सर्व कटू आणि नकोशा आठवणी जाग्या होतील, जखमेवरील खपल्या काढणारी आपली भेट उद्दाम वाटेल, म्हणून आपण आपल्या भेटीची तारीख बदलणे उचित ठरेल..’’ अशा या सडेतोड पत्राचे लेखक कोण आहेत, याची वाचकांना उत्सुकता लागून राहणे साहजिक आहे. उत्सुकता फार न ताणता त्यांचे नाव जाहीर करणे ही तर मोठी आनंदाची बाब आहे. कारण पत्रलेखक हे १९८० या वर्षीच्या नोबेल शांतता पारितोषिकाचे मानकरी आणि मानवी हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे अडोल्फो पेरेझ इस्क्विवेल हे आहेत. अर्जेटिनातील महत्त्वाचे चित्रकार, शिल्पकार आणि लेखक अशी अडोल्फो यांची ओळख आहे.
अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या विदेश भेटीची २४ मार्च ही तारीख नक्की करताना अमेरिकी प्रशासनाने एवढा निष्काळजीपणा कसा काय केला? ओबामांच्या भेटीच्या दिवशी कदाचित राजधानीत निदर्शने झाली असती. परिणामी एक तर उर्मटपणे अर्जेटिनी लष्कराची मदत घ्यावी लागली असती किंवा ओबामांना अर्ज्ेटिनी जनतेची ४० वर्षांपूर्वीच्या झाल्या घटनेबद्दल माफी मागावी लागली असती. त्यानंतर ओबामांना व्हिएतनाम, चिली, अफगाणिस्तान, इराक अशा अनेक देशांतील जनतेची माफी मागत फिरावे लागले असते. मग यात दुरुस्तीही करण्यात आली आहे.. ओबामा यांनी अर्जेटिना भेटीच्या तारखा अगदीच बदलल्या नसल्या तरी, ते काही तास आधी- २२ मार्च रोजीच अर्जेटिनाच्या राजधानीत पोहोचले आणि २३ तारखेला अर्जेटिनाच्या राष्ट्रप्रमुखांना भेटतील. त्यानंतर २४ तारखेलाही ओबामा अर्जेटिनात असतील खरे; पण ते अर्जेटिनाची राजधानी ब्युनॉस आयर्सपासून येथून दक्षिणेकडे एक हजार मलावरील बारिलोश येथे गोल्फ खेळायला जातील! अर्जेटिनी जनतेची माफी मागण्यापेक्षा गोल्फ खेळणे केव्हाही चांगलेच, असे ओबामा मनात नक्कीच म्हणाले असतील.
परंतु अर्जेटिनाच्या भेटीबाबत अमेरिकी प्रशासनाने निव्वळ निष्काळजीपणा केला की, २४ मार्च याच तारखेला अमेरिकी अध्यक्षांनी त्याच देशात गोल्फ खेळावे हे योजनापूर्वक झाले, याबाबतचे गूढ कायम राहील. जर हा निष्काळजीपणा असेल, तर तसा जर्मन, ब्रिटन, जपान अशा देशांच्या भेटीबाबत केला असता काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
ओबामांनी माफी मागितली, तर ती अमेरिकेची मानहानी ठरेल! दुसऱ्या महायुद्धानंतर महासत्ता बनलेल्या अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाने नेहमीच समाजवादी विचारांची धास्ती घेतली आहे. जमेल तेथे अशा विचारांचा क्रूर बीमोड करण्याची कट-कारस्थाने केली आहेत. जोडीला अमेरिकी अर्थव्यवस्था शस्त्रास्त्र उत्पादन आणि मार्केटिंग या आधाराशिवाय न टिकणारी आहे. त्याबद्दल माफी मागणे कोणत्याही अमेरिकी राष्ट्राध्यक्षाला मानहानीचे वाटेल, कारण महासत्तेचा काटेरी राजमुकुट प्रत्येक अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या डोक्यावर होता, आहे आणि भविष्यातही असणार आहे. त्या काटेरी मुकुटापायी अमेरिकी शासनाला अनेक देशांत टगेगिरी करावी लागली आहे. त्यातून अर्जेटिना आणि इतरही अनेक देशांवर अमेरिकी शासनाने अतोनात अन्याय केले आहेत. स्वत:कडे हजारो अण्वस्त्रे असताना इराककडे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन असल्याचा कांगावा करीत जॉर्ज बुश यांच्या शासनाने इराकी जनतेचे केलेले हाल अलीकडचे आहेत. आपले शासन महासत्ता बनण्याची स्वप्ने तर पाहत नाही ना, त्यासाठी इतर कुठल्या देशाच्या जनतेवर अर्जेटिनाप्रमाणे अन्याय तर करीत नाही ना आणि महासत्तेचा ‘राजमुकुट’ प्राणप्रिय मानत नाही ना, याकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष देण्याची जबाबदारी जनतेची असते.. ती पार पाडली गेली नसेल, तर जगाविषयीच्या मानवी कर्तव्यात कसूर होते. महासत्तेचा मुकुट काटेरीच राहतो. काटे इतर देशांना सलत राहतात.
लेखक पर्यावरणनिष्ठ व सामाजिक चळवळींचे आलोचक आहेत.
ईमेल : prakashburte123@gmail.com