भन्नाट, सौजन्य –
गिर्यारोहण हा साहसी क्रीडाप्रकार आपल्याकडे तुलनेत उशिरा सुरू झाला असला तरी तो चांगलाच लोकप्रिय आहे. आपली शारीरिक क्षमता अजमावत, निसर्गाची विविध रूपे न्याहाळत एखादा डोंगरमाथा सर करण्याचा आनंद काय असतो, ते तिथे पोहोचल्यावरच समजते.
उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर माणूस पृथ्वीवर अवतरला आणि तेव्हापासूनच माणसाचे आणि साहसाचे नाते जुळत गेले. अज्ञाताच्या शोधाची जिज्ञासा माणसाला कधीच स्वस्थ बसू देत नाही. त्यातूनच त्याने निरनिराळे धाडसी प्रयोग केले. मग कधी ‘किनारा तुला पामराला..’ असे गर्वाने सागराला सांगत कोणी समुद्रमार्गे नव्या प्रदेशाच्या शोधात निघाला, तर कोणी छोटय़ाशा विमानातून जगप्रदक्षिणा केली. यातून मानवाच्या साहसाची हौस भागवली गेलीच, पण त्याचबरोबर त्यातून पुढे अनेक साहसी खेळांचा जन्म झाला. भन्नाट साहसी खेळांच्या मालिकेत आजवर आपण आकाशात, पाण्यात, पाण्याखाली संचार केला आहे, तर आता आपल्याला जायचे आहे ते एका अनोख्या वाटेवर, डोंगरयात्रेवर. चार भिंतींच्या बाहेरच्या या जगात तुम्हाला भरपूर तंगडतोड तर करायची आहेच, पण साहसाला साद घालणारे कडे, सुळकेदेखील सर करायचे आहेत. अर्थात हे सारे करीत असताना तुमचा संचार एका अनोख्या विश्वात होणार आहे. हा सगळा प्रकार भरपूर थकवणारा असला तरी डोंगरमाथ्यावर पोहोचल्यानंतरच्या आनंदाची सर कशाशीच करता येत नाही.    खरे तर सुरुवातीपासूनच डोंगर माणसाचे सखेसोबती राहिले आहेत. त्या शिखराच्या माथ्यावर, त्या डोंगरधारेच्या पलीकडे काय असेल हा विचार माणसाच्या मनात कायम येत राहिला. आपल्या रोजच्या आयुष्यातील कामाच्या निमित्ताने, तर कधी व्यापाराच्या निमित्ताने भरपूर डोंगर भटकंती तो करीत होता. आपली अनेक तीर्थक्षेत्रे तर अशाच उत्तुंग पर्वतांवर विराजमान झालेली. डोंगर भटकंती तर होत असे, पण केवळ जिज्ञासेपोटी अथवा हौस म्हणून असे डोंगर भटकणे हे तसे विरळाच होते. त्याच्या या जिज्ञासेचे रूपांतर साहसी खेळात होण्यासाठी मात्र १५ वे शतक उजाडावे लागले. केवळ एक आनंद म्हणून, हौस म्हणून, साहसी प्रकार म्हणून माणसाने पहिला डोंगर सर केला तो १७८६ मध्ये.

८ ऑगस्ट १७८६ या दिवशी एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली. आल्प्सच्या सर्वोच्च शिखरावर माऊंट ब्लाँकवर जाण्याचा मार्ग गॅब्रिएल पॅकार्ड आणि जाक बाल्मा या दोघांनी शोधून काढला. गिर्यारोहणाच्या क्षेत्रातील पहिली ज्ञात आणि नोंदली गेलेली ही घटना म्हणावी लागेल. त्या दोघांना डोंगरावर जाऊन काही काम करायचे नव्हते तर त्यांना केवळ तो डोंगर चढाई करायची होती. ते तेथे गेले होते ते केवळ परिसराच्या निरीक्षणासाठी. साधनांच्या मदतीने त्या डोंगरावर चढाई-उतराई करणे यामध्ये अंतर्भूत होते. होरेस बेबिडिक्ट द सोस्यूट या शास्त्रज्ञाने उपरोक्त दोघांना यासंदर्भात बक्षीस दिले होते. त्यातून हौसेखातर डोंगर भटकंतीला चालना मिळत गेली. या घटनेमुळे पुढील काळात फक्त शास्त्रीय निरीक्षणे, भूप्रदेशाची माहिती घेणे, सव्‍‌र्हे करणे, व्यापारासाठी प्रवास करणे या उद्देशाबरोबरच केवळ आनंदासाठी गिर्यारोहण हा प्रकार रुजला गेला. पुढे ब्रिटिशांनी आल्प्सच्या पर्वतराजीत १८ व्या शतकात गिर्यारोहण हा क्रीडाप्रकार म्हणून विकसित केला. १८५७ मध्ये लंडन अल्पाइन क्लबची स्थापना करून या खेळाची अतिशय भक्कम अशी पायाभरणी त्यांनी केली. अतिशय पद्धतशीरपणे या खेळाची एक चौकट आखून दिली आहे. आनंदासाठी गिर्यारोहण ही संकल्पना अतिशय प्रभावीपणे जोपासण्यात त्या पिढीचा मोठा वाटा आहे.
आल्प्सबरोबरच जगाच्या कानाकोपऱ्यात डोंगर भटकंतीचा या साहसी खेळाचा प्रसार झाला. पण त्या सर्वाचा प्रवास येऊन थांबला तो नगाधिराज हिमालयापाशी. सर्वोच्च हिमशिखर एव्हरेस्टपाशी. १९३५ ते १९५३ या वीस वर्षांत हे सर्वोच्च हिमशिखर सर करण्यासाठी जगभरातील अनेक गिर्यारोहकांनी कंबर कसली होती. तेव्हा भारतात हा खेळ प्राथमिक अवस्थेतदेखील नव्हता. केवळ हिमालयातील शेर्पा मंडळी सोडली तरी गिर्यारोहण हा प्रकार कोणाच्या गावीदेखील नव्हता. भारतात गिर्यारोहणाने मूळ धरले ते एव्हरेस्टवरील पहिल्या यशस्वी आरोहणानंतर.. म्हणजेच १९५३ नंतर.
त्यानंतर गेल्या ६० वर्षांत भारतात हा साहसी खेळ चांगलाच रुजला, वाढला आहे. आपल्याकडे गिर्यारोहण चांगल्या प्रकारे विकसित झाले असले तरी गिर्यारोहणाची नेमकी व्याख्या काय, असा प्रश्नच बऱ्याच वेळा पडतो. कारण आजदेखील समाजात गिर्यारोहणाबद्दल अनेक गरसमज खोलवर रुजले आहेत. हे लोक कशाला तडमडायला त्या डोंगरात जातात, काय मिळते त्यांना तेथे जाऊन, नेमके हे करतात काय, दोराला धरूनच तर वर जायचे असते ना, रॅप्लिंग तर आम्हीदेखील केले, त्यात काय एवढे मोठे, असे प्रश्न सर्रास विचारले जातात. म्हणूनच ही संकल्पना समजावून घेणे गरजेचे आहे.
ढोबळमानाने पाहिले तर या गिर्यारोहणाचे हाइकिंग, ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग, हाय अल्टिटय़ूड ट्रेकिंग, स्नो अ‍ॅण्ड आइस क्लाइंबिंग असे टप्पे पडतात. महाराष्ट्रातले ज्येष्ठ गिर्यारोहक आणि अभ्यासक आनंद पाळंदे यांनी ‘डोंगरयात्रा’ पुस्तकात या सर्व टप्प्याचे अतिशय मार्मिक असे विश्लेषण केले आहे. ते म्हणतात, डोंगरयात्रा हा एक स्वायत्त असा क्रीडाप्रकार आहे. त्याचबरोबर तो गिर्यारोहण क्रीडा प्रकाराचा पाया आहे. निश्चित झालेल्या मार्गावरून पायी, स्वावलंबनाचा मंत्र जपत गरजेपुरती सामग्री बाळगत डोंगराळ प्रदेशातून केलेली यात्रा अशी डोंगरयात्रेची सोपी व्याख्या ते करतात. गिर्यारोहक होण्यासाठी आधी उत्तम डोंगरयात्री बनणे आवश्यक आहे.
याच पुस्तकात गिर्यारोहणाची संकल्पना विस्तृतपणे पाळंदे सांगतात. साधारणपणे हजार मीटपर्यंत जमिनीच्या वरील उठावास डोंगर म्हटले जाते. यापुढे पर्वत ही संकल्पना आहे. अशा डोंगरावरील एक-दोन दिवसांच्या भटकंती, चढाईला हाइकिंग असे संबोधले जाते. ज्याला आपण पदभ्रमण असे म्हणू शकतो. पण केवळ पदभ्रमण म्हणजे डोंगरयात्रा नव्हे. डोंगररांगातून सलग दोन दिवसांपेक्षा अधिक काळ केल्या जाणाऱ्या भटकंतीला ट्रेकिंग असे संबोधता येईल. ज्याला आपण गिरिभ्रमण असे म्हणू या. अर्थात यामध्ये सारे बिऱ्हाड आपल्या पाठीवर घेऊन भटकंती करणे अपेक्षित आहे. यापुढचा टप्पा म्हणजे कातळारोहण म्हणजेच रॉक क्लाइंिबग. कातळातील निसर्गत:च उपलब्ध असलेले खाचखळगे, कपारी यांचा वापर करीत अंगभूत कौशल्याच्या आधारे कातळकडय़ांवर चढाई करणे म्हणजेच कातळारोहण. हे दोन प्रकारे केले जाते. जर कोणतेही कृत्रिम साधन न वापरात केवळ अंगभूत कौशल्याच्या आधारे आणि नसíगक रचनेच्या बळावर आरोहण केले तर त्यास मुक्त प्रस्तरारोहण म्हटले जाते. पण यामध्येच जर पिटॉन, बोल्ट, एट्रिअर, रोप अशा साधनांचा वापर केला तर त्यालाच कृत्रिम प्रस्तरारोहण म्हटले जाते. अशा आरोहाणात जेथे कोणतीही कपार अथवा खाचखळगा उपलब्ध नसेल अशा वेळेस उपरोक्त साधने वापरून आधार निर्माण केला जातो व पुढील आरोहण केले जाते. अर्थात योग्य मार्गदर्शन, तांत्रिक साहाय्य व सराव याशिवाय प्रस्तरारोहणामध्ये नपुण्य मिळवणे अशक्य आहे.
डोंगरयात्रा व कातळारोहण क्षेत्राशी पुरेशी ओळख झाल्यावर आणि त्यात योग्य ते नपुण्य मिळवल्यावर आपण हिमपर्वत यात्रा म्हणजेच हाय अल्टिटय़ूड ट्रेकिंग प्रकाराकडे वळू शकतो. सर्वसाधारणपणे समुद्रसपाटीपासून तीन ते चार हजार मीटर उंच पर्वतरांगांवर हा क्रीडाप्रकार अनुभवता येऊ शकतो. हा प्रकार साधारण १५ दिवस ते महिनाभर चालू शकतो. या पुढचा टप्पा म्हणजेच हिम-बर्फारोहण. यासाठी मात्र अतिशय तांत्रिक अशा सरावाची, अभ्यासाची, प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता असते. हिमाच्छादित शिखरांवर अंगभूत कौशल्याच्या आधारे आणि विविध साधनांच्या साथीने केलेला हा उपक्रम. गिर्यारोहणातील हा सर्वोच्च असा टप्पा आहे. किंबहुना गिर्यारोहण म्हणजे काय तर गिरी+आरोहण (यामध्ये गिरी म्हणजेच पर्वत आणि अर्थात हिमपर्वत असे अभिप्रेत आहेत). याआधीचे प्रकार हे सर्व याच्या सुरुवातीचे टप्पे आहेत.
पण आजकाल गिर्यारोहणाच्या संकल्पनांबाबत बराच सावळागोंधळ दिसून येतो. हाईकिंगलाच ट्रेकिंग संबोधले जाते. तर काही जण चक्क ट्रॅकिंग असा अप्रस्तुत उच्चार करतात. एखादा प्रस्तर, कातळ आरोहण केल्यानंतर तो जलद उतरण्यासाठी वापरले जाणारे तंत्र म्हणजे रॅपिलग. भव्य कॅम्प करून रॅपिलग म्हणजे खूप काही आहे असा समज सर्वत्र पसरविला जात आहे. त्यामुळे सध्या फक्त रॅपिलग म्हणजेच गिर्यारोहण अशी समजूत गेल्या काही वर्षांत झाली आहे. तसेच डोंगरदऱ्यांतून भटकताना, वाटेतील एखादी नदी पार करताना अथवा खूप मोठा सखल भाग जलद ओलांडण्यासाठी वापरले जाणारे तंत्र म्हणजे रिव्हर क्रॉसिंग अथवा व्हॅली क्रॉसिंग. पण सारे काही आधीच तयार असलेल्या साच्यावर शेकडो फुटांचे रिव्हर अथवा व्हॅली क्रॉसिंग करणे म्हणजे गिर्यारोहणात खूप मोठा तीर मारला असा सर्वसामान्यांचा समज झाल्याचे दिसून येते. खरे तर ही सारी गिर्यारोहणाची उपांगे आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे सारे म्हणजेच गिर्यारोहण असा समज झाला आहे.
महाराष्ट्राला गिर्यारोहणाची ५५ वर्षांची परंपरा आहे. त्यामध्ये गिर्यारोहणाच्या सर्व टप्प्यांचा अगदी पद्धतशीरपणे विकास झाला आहे. किंबहुना या सर्व टप्प्यांवर अतिशय भरीव कामगिरी येथील डोंगरवेडय़ांनी केली आहे. पण तरीही आज बदलत्या काळाबरोबर यातील संकल्पनांना धक्के बसत आहेत.
दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा एक साहसी क्रीडाप्रकार आहे. त्यामुळे त्याला स्वत:चे काही नियम आहेत. वर उल्लेख केलेल्या सर्वच टप्प्यांवर काय करावे, काय करू नये, सोबत काय साधनसामग्री असावी, याबद्दल काटेकोर अशी नियमावली आहे. अगदी पायात कोणते शूज असावेत, कपडे कोणते असावेत, काय खावे, या सर्वाचे नियम आहेत. पण या गिर्यारोहणाला जशी व्यापक प्रसिद्धी मिळत गेली तसेतसे यातील नियम धाब्यावर बसवले जाऊ लागले. कोणीही सोम्या-गोम्या उठावा आणि चार डोकी डोंगरात घेऊन जावीत असा प्रकार घडू लागला.
पदभ्रमण, गिरिभ्रमण, अशा प्राथमिक टप्प्यांवर फार तांत्रिक करामती कराव्या लागत नसल्या तरी त्यांचे ज्ञान असणे अत्यावशक आहे. कारण डोंगरात फिरताना कोणत्या वेळी कोणती परिस्थिती उद्भवणार याची कसलीच पूर्वसूचना देणे शक्य नसते. तर प्रस्तरारोहण व हिम पर्वतारोहण यामध्ये तर तांत्रिक कौशल्य स्वत:ला पूर्णत: अवगत असणे अत्यावश्यक आहे. अर्थात या सर्वासाठी नियमावली उपलब्ध आहे, पण या क्षेत्रातील एकसूत्रीकरणाअभावी त्यांचा योग्य तो प्रसार झालेला नाही. पण गेल्या काही वर्षांतील यातील वाढत्या व्यापारामुळे कसलेही तांत्रिक प्रशिक्षण नसलेल्या व्यक्तीलादेखील थेट एव्हरेस्ट सर करण्याची हमी मिळू लागली आहे. सह्याद्रीत तर पायात उंच टाचांचे सँडल्स  आणि तंग जीन्स घातलेल्यांनादेखील डोंगर भटकायला नेणारी थोर मंडळी अस्तित्वात आहेत. त्यातूनच गिरिपर्यटक ही एक नवीनच संकल्पना अस्तित्वात आली आहे. पण गिरिपर्यटक आणि गिर्यारोहक यात जमीन-अस्मानाचा फरक आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
एक लक्षात ठेवावे लागेल की, गिर्यारोहण हा क्रीडाप्रकार असला तरी त्यामध्ये स्पर्धा नाही. खुल्या निसर्गात तुम्ही थेट निसर्गाच्या अधीन असता. तेथे तुमचे शारीरिक कौशल्य आणि सोबतची साधनसामग्री याधारे तुम्हाला डोंगर चढायचा असतो. शिखर सर करायचे असते, मात्र निसर्गाशी स्पर्धा करून नाही तर त्याचा आदर राखून. गिर्यारोहणात काही बाबी कटाक्षाने लक्षात ठेवायला हव्यात. तुम्ही कोणती आणि किती शिखरे सर केली आहेत, यापेक्षा तुम्ही ते कसे केले आहे हे महत्त्वाचे आहे. शिखर सर करताना तुम्ही काही नवीन तंत्र अवलंबून पाहिले आहे, स्वावलंबन किती होते, की कोणीतरी आखून दिलेल्या वाटेने गेलात, की स्वत: नवीन वाट शोधली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्वात तुमच्या आरोहाणाचा किती कस लागला, यावरच तुमच्या गिर्यारोहणाची उंची ठरते. त्यामुळे शिखर किती उंचीचे, याला महत्त्व नाही. त्यापेक्षा आरोहण किती अवघड आहे, यावर येथील श्रेय ठरते. त्यामुळेच एखादे शिखर सर होणार नाही कदाचित, पण गिर्यारोहणाचा आनंद मात्र हमखास मिळवता येईल आणि हा आनंदच यातील परमोच्च बिंदू आहे; शिखराचा माथा नाही.
अर्थात डोंगरातली ही भटकंती कितीही खडतर असली तरी, एकदा डोंगरात गेलेला पुन्हा पुन्हा तिकडे जातच राहतो. का जातो? त्यातून त्याला नेमके काय मिळते? त्याबद्दल पुढच्या लेखात.