‘‘रहस्यकथा म्हणून मी सत्तर साली पहिले पाऊल टाकले आणि आयुष्यातील पहिलीवहिली शिलेदार कथाच लिहिली. कारण त्या वेळी १९६५चे युद्ध जुने झाले, तरी आठवणी ताज्या होत्या. त्यातून आमची ‘आर्मी फॅमिली’ म्हणून फौजी जीवनाचा अभिमान. शिवाय राष्ट्रीय एकात्मतेचे वेड डोक्यात असल्यामुळे कॅप्टन दीप, लेफ्टनंट शेख आणि कॅप्टन मारिया लोबो हे तीन हिरो जन्माला आले. त्यात कॅप्टन दीप उजवा होता. रहस्यकथांना मी सुरुवात केली तेव्हा त्या साहसकथाच असाव्यात हेच लक्ष्य ठेवले; परंतु माझ्यावर साहस कथाकाराऐवजी रहस्यकथाकार हाच शिक्का बसला. बाबूराव अर्नाळकरांची कारकीर्द संपुष्टात आलेली. त्या वेळी शृंगारिक रहस्यकथांनी उच्छाद मांडलेला. त्यातून त्या अकल्पनीय अशा घटनांनी भरलेल्या. तेव्हा शृंगारिक कादंबऱ्या लिहायच्या नाहीत, ही खूणगाठ बांधली,’’ असे नाईकांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

नाईक यांनी कॅप्टन दीप म्हणजेच संदीप राणे या नायकाची उभारणी केली, तेव्हा मराठी रहस्यकथेतच काय, मराठी साहित्यातही थेट इतकी लष्करी पाश्र्वभूमी आली नव्हती. लष्करी जीवनाचे अगदीच खरेखुरे वाटावे असे वातावरण त्यांनी कादंबरीतून आणले. अर्नाळकरांच्या चतुर, चपळ, हुशार, कुशाग्र बुद्धीचा आणि कर्तव्याशी प्रामाणिक असलेल्या नायकांची सद्दी या कॅप्टन दीपच्या आगमनानंतर पूर्णपणे संपली. धाडसी, अत्यंत साहसी असलेला कॅप्टन दीप आणि त्याचे सहकारी कॅप्टन शेख, जमादार कदम यांनी चीन आणि पाकिस्तानी सैन्याची धूळधाण उडविण्याच्या प्रसंगांनी या कादंबऱ्या सजल्या आहेत. सहा फुटांचा भक्कमदेही कॅप्टन दीप केवळ भारतीय भाषाच बोलत नाही, तर चिनी आणि उर्दूवरही त्याचे प्रभुत्व असल्याचे मांडण्यात आले. तो उत्तम मुष्टियोद्धा आणि शत्रूवर चाल करून जाण्याची त्याची पद्धत चित्तथरारक रंगविण्यात आली. त्याचे चमत्कारी बूट वेळप्रसंगी बंदुकीसारखेही काम करतात. तहान-भूक विसरून शत्रूच्या ताब्यात असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांची सुटका, त्यांच्या हाती लागलेला भारतासाठी महत्त्वाचा दस्तावेज, गुप्त रिपोर्ट उडवून आणण्याचे काम हा कॅप्टन दीप वारंवार करताना दिसतो. प्रसंगी वेशांतर, अल्पकाळाचे धर्मांतर आणि देशांतरही करून हा आपल्यावर दिलेली जबाबदारी पार पाडतो. जालंधर ते श्रीनगर त्याचा (मुंबई-पुण्यात जात असल्यासारखा) सतत वावर होतो. अलिबाबा आणि कॅप्टन दीप यांच्या लढाया अनेक कादंबऱ्यांमध्ये आले आहे. शिलेदार कथांमधील हा प्रमुख सुपरव्हिलन आहे. ‘कानफाट्याची काळी कफनी’ या कादंबरीतून तो अवतरला. काश्मीरचा स्वयंघोषित राजा असलेला, चिनी हस्तकांची मदत घेणारा हा अलिबाबा संमोहनशास्त्रासारख्याच, पण एका अघोरी विद्येत पारंगत असतो. आपल्या शत्रूच्या मनावर या शक्तीचा प्रयोग करून तो कुणालाही आपल्या हातचे बाहुले बनवू शकतो. या पहिल्याच कादंबरीत तो अत्यंत घातकी आणि क्रूर म्हणून समोर येतो. मेजर कुमार यावर आपल्या काळ्या जादूचे प्रयोग करून तो सैन्यातील अधिकाऱ्यांना मारण्याचे हुकूम सोडतो. कॅप्टन दीप त्याचा छडाच लावतो. या अलिबाबाचा पाठलाग करतो. अलिबाबाची शक्ती कॅप्टन दीपला गुलाम करू शकत नाही; पण अलिबाबा कायम त्याच्या हातातून निसटत राहतो. देशातील विविध भागांत या अलिबाबाला पकडून ठार करण्याची संधी कॅप्टन दीपला येते; पण त्या संधी चुकवत अलिबाबा नवा पवित्रा घेऊन कॅप्टन दीपचा सूड घ्यायला हजर होतो. अलिबाबा, अलिबाबाचा शिष्य, झपाटलेला अलिबाबा, खदिरांगार, मृत्यूची चाहूल या दीप आणि अलिबाबा यांच्या संघर्षाची परिसीमा दाखविणाऱ्या कादंबऱ्या आहेत.