‘सत्य हा निरीश्वरवादाचा कणा’ हे सांगणारा माधव गवाणकर यांचा लेख व्यक्तिगतरीत्या अंतर्मुख होऊन निरीश्वरवादी भूमिकांची तपासणी करणारा होता, तर त्यावरील हा पत्र-लेख निरीश्वरवादाची सामाजिक आणि वैश्विक बाजू मांडणारा ठरावा..
‘सत्य हा निरीश्वरवादाचा कणा’ या माधव गवाणकर यांच्या लेखानंतर (लोकसत्ता- २३ मार्च २०१४) पुरेशी चर्चा झाली असती, तर योग्य मुद्दे पुढे आले असते. तसे न झाल्याने पुढील मुद्दे शब्दांकित करीत आहे..
प्रथम नास्तिकतेचे विविध अर्थ काय आहेत, याची उजळणी करणे इष्ट होईल. नास्तिकता हा शब्द भारतीय तत्त्वज्ञानात विविध अर्थानी प्रचलित आहे. एक याचा शास्त्रीय अर्थ म्हणजे ‘नास्तिको वेद िनदका:’ असा आहे. हा अर्थ भारतीय दर्शनांची आस्तिक दर्शने व नास्तिक दर्शने अशी विभागणी करणारा आहे. जी दर्शने वेदाला (श्रुतीला) प्राधान्य देतात ती आस्तिक व वेद प्रामाण्य नाकारणारी ती नास्तिक दर्शने, असा प्रचलित अर्थ या शब्दाचा आहे. दुसरा रूढ अर्थ हा की, देव किंवा कुठलेही ईश्वरी अस्तित्व न मानणे. या शब्दाचा व्यावहारिक अर्थ जो दिला जातो, तो म्हणजे भौतिक विश्वाच्या पलीकडे गृहीत धरलेले जीवन नाकारणे; तर या शब्दाचा अलीकडे दिला जाणारा अर्थ म्हणजे बुद्धिप्रधान विचारसरणी हा होय.
अर्थाच्या या विविध छटा जरी असल्या, तरी या सर्वाच्यामधून एक मध्य विचार असा आहे की, बौद्धिक अधिष्ठान हेच केवळ ज्ञानप्रक्रियेचे प्रमाण, त्यामुळे श्रुतिस्मृती पुराणोक्त हे प्रमाण टिकत नाही, तसेच ईश्वरी अस्तित्व बुद्धीच्या कक्षेत न येणारी बाब असल्यामुळे ज्ञान मीमांसेच्या प्रक्रियेत ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय यातील ‘ज्ञेय’ म्हणून ईश्वरास वस्तुनिष्ठ सत्यता (ऑब्जेक्टिव्ह रिअॅलिटी) नसल्यामुळे पंचज्ञानेद्रियांद्वारे येणाऱ्या ज्ञानाच्या पलीकडे अलौकिक किंवा दिव्य असे काहीच नसते, असा क्रमाने येणारा हा विचार आहे.
नास्तिक विचाराचा उदय
समाजात काही माणसे प्रामाणिकपणे नास्तिक का असतात, याचा शोध घेतला असता जाणवते की, ईश्वर हाच सबंध विश्वाचा आधार आहे, नियंता आहे, या प्रकारचा विचार संस्काराने दृढ केलेला असतो, पण प्रत्यक्षात मानवी व्यवहार, मानवी प्रवृत्ती व ईश्वरी नियंत्रण याचा कुठेच संबंध दिसत नाही. असेही म्हणता येईल की ईश्वराच्या गृहीतकामुळे समाजातील कुठलीही अनतिकता, कमी झालेली दिसत नाही. उलट चित्र असे दिसते की, सर्व प्रकारच्या गरव्यवहारासाठी फार मोठा आधार धर्माचा, धर्म संस्थेचा व धर्माचार्याचा घेतला जातो. ही एक अंतर्मुख करणारी बाब आहे. तसेच दयाघन म्हणून गृहीत धरलेला, संकटात हाकेला ‘ओ’ देणारा हा प्रभू कधीच कुणाचेच प्रश्न सोडवण्यास अवतरेल, ही ईश्वरासंबंधीची उगीचच करून घेतलेली समजूत, हे एक कारण आहे. मानवाचे प्रश्न सुटले व पुढे सुटणार हे केवळ त्याच्या आपापसातल्या प्रामाणिक भावनेतूनच एकमेकाच्या सहकार्यातूनच, हे उघड आहे. साहजिकच समाजातील हे वास्तव, विचाराला नास्तिकतेकडे नेणारेच आहे.
मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीचा अभ्यास केला असता असे दिसते की, मानवी अस्तित्व हे प्रथम व त्यानंतर विकासाच्या टप्प्यात निर्माण झालेली ईश्वर कल्पना होय. अगदी प्राथमिक अवस्थेतील मनाला जाणवलेल्या पंचमहाभूतांच्या भयग्रस्त स्वरूपापासून प्रारंभ झालेला हा ईश्वरी शोधाचा प्रवास स्वत:च्या विकासाबरोबर ओंकार स्वरूपाच्या किंवा विश्वचतन्याच्या कल्पनेपाशी येऊन थांबतो. अर्थात ईश्वराची स्वीकारलेली ही विश्वरूप कल्पना समाजातल्या एका विशिष्ट चिंतनशील स्तरासाठी उपयोगी असते. जनसामान्यांचा ईश्वर हा नवसाला, भक्तीला पावणारा असाच असतो. अशा ईश्वराचे स्वरूप गृहीत धरल्यावर सर्वच देवता सुंदर असतात, पराक्रमी असतात. या सौदर्याच्या कल्पना किंवा मानवी सद्गुणाच्या कल्पना याचा शोध मानवाने आधी स्वत:च्या ठिकाणी घेतला व नंतर त्याने ईश्वराच्या ठिकाणी गृहीत धरल्या.
नास्तिकता या वृत्तीकडे दुर्गुण म्हणून, पाखंडी म्हणून पाहिले जाते, असे लेखकाने नमूद केलेले आहे. वास्तविक पाहता नास्तिकता ही बुद्धिप्रामाण्यावर आधारलेली असल्यामुळे ते एक जीवनमूल्य आहे. प्रचलित धर्माचा, धर्मग्रंथाचा, तत्त्वज्ञानाचा, त्याला जोडून इतिहासाचा, तर्कशास्त्राचा, सामाजिकशास्त्रांचा साकल्याने व केवळ बुद्धीलाच प्रमाण मानून केलेल्या व्यासंगातून, चिंतनातून व त्याद्वारे स्वीकारलेल्या वैचारिक निष्ठेतून स्वीकारलेली असते. या प्रकारे अंगीकारलेला हा नास्तिकतेचा विचार, जो विवेकनिष्ठ असतो, हे एक मूल्यच आहे. लेखकानेदेखील नास्तिक व सद्गुण किंवा उच्च नैतिकता या दोन्हींचे अस्तित्व असलेल्या महापुरुषांची उदाहरणे दिलेली आहेत. ही नास्तिकता उतरत्या वयामुळे कमी होणारी निश्चितच नसते, कारण जीवनातील अपेक्षित सुखदु:खाचे, घडणाऱ्या घटनांचे पृथ:करण करून त्यामागील कार्यकारण भावांचा शोध घेतलेला असतो.
कुठल्याही समाजाचा भौतिक विकास व पुढे आध्यात्मिक विकास मूलत: श्रमातून होत असतो. हा विकास मनुष्याने अस्तित्वासाठी केलेल्या झगडय़ातून होत असतो. या ठिकाणी कुठल्याही अलौकिक शक्तीचे योगदान नसते, तर जीवनकलहासाठी स्वीकारलेल्या श्रमातून तो भौतिक विश्वाला आकार देत असतो व स्वत: संस्कारित होत असतो. पुन्हा या संस्कारित व विकसित प्रज्ञेतून भोवतालच्या विश्वाला आकार देत असतो. हा सगळाच विकास सामान्यपणे जीवनाच्या प्रक्रियेतून होत असतो. डी. पी. चटोपाध्याय- Indian Atheism या ग्रंथात म्हणतात, The interaction takes place in other animals and nature, is on their part, passive and merely adaptive. Even when they react with nature and change it, they are no more conscious of it than the rivers that curve out the valleys in their courses (p. 306) तेव्हा या ठिकाणी सृष्टीचा कर्ता, त्राता कुठल्याही प्रकारचा ईश्वर नाही व त्याची निसर्गाला आवश्यकता नाही. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व पी. टी. राजू यांनी संपादित केलेल्या Concept of Man या ग्रंथातील आपल्या The concept of man in Marxist thoughts या लेखात श्रमाचे मानवी उत्क्रांतीतील महत्त्व सांगताना मार्क मोरीन म्हणतात, It is only thanks to labour, thanks to the working process that man gradually became transformed in to human being in real sense of the world. Labour developed his body enriched his mind, perfected his intellect. It is the only thanks to labour, that mans hands, as though rough magic, attained the perfection.
थोडक्यात नास्तिकता हा व्यासंगातून ठामपणे स्वीकारलेला एक दृष्टिकोन आहे. या भूमिकेमुळे समाजातील विवेकाचा विकास तसेच ‘धर्म’-निरपेक्ष नतिक मूल्यांचा प्रसार होण्यास नक्कीच मदत मिळेल. एका विवेकाधिष्ठित समाजाची निर्मिती होईल. शेवटी समाजाचे हे एक आदर्श-चित्र आहे. कदाचित वास्तवतेत येणे दुरापास्त असेल. परंतु किमान आज धर्माच्या नावाखाली जे अस्मितावादी अध:पतन दिसते, ते कमी होण्यास या विचाराची मदत होईल.
उच्च शिक्षण घेतलेली तरुण पिढी ‘मन:शांती’साठी किंवा लौकिक गोष्टींच्या पूर्ततेसाठी विविध मठांच्या आहारी गेलेली दिसते. उपजीविकेसाठी तंत्रज्ञानाचा व विज्ञानाचा उत्तम अभ्यास करणाऱ्या या मंडळींनी वैज्ञानिक दृष्टी मात्र स्वीकारलेली नसते. तेव्हा अशा वेळेस बुिद्धवादी विचारांची कुठे तरी यांना सवय लागावी, तसेच प्रत्येक घडणाऱ्या घटनेकडे पाहण्याचा चिकित्सक दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी निरीश्वरवादाचा अभ्यासपूर्ण प्रसार समाजात व्हावा असे प्रामाणिकपणे वाटते. संपूर्ण समाज निरीश्वरवादी झाला तर आनंदच आहे परंतु हे शक्य नाही. पण केव्हा तरी या दिशेला सामाजिक मानसिकता वळावी असे नक्कीच वाटते. लेखक माधव गवाणकर यांनाही ही भूमिका कदाचित अपेक्षित असेल.
संग्रहित लेख, दिनांक 30th May 2014 रोजी प्रकाशित
निरीश्वरवादाची गरज आहे..
‘सत्य हा निरीश्वरवादाचा कणा’ हे सांगणारा माधव गवाणकर यांचा लेख व्यक्तिगतरीत्या अंतर्मुख होऊन निरीश्वरवादी भूमिकांची तपासणी करणारा होता

First published on: 30-05-2014 at 01:09 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Necessity of atheism