गेली अनेक वर्षे नायजेरियन भामटय़ांकडून लोकांची फसवणूक सुरू आहे. पण पुढच्यास ठेच लागलेली पाहूनही मागचे शहाणे होतातच असे नाही. म्हणूनच या भामटय़ांचे फावते आहे..
तुमचे नशीब उघडले आहे, घसघशीत लॉटरी लागली आहे, असा निरोप दररोज तुम्हाला येऊ लागला, तर?.. रोजच हर्षवायू होईल! पण अलीकडे मात्र, अशा निरोपांवरचा विश्वासच उडत चाललाय.. ई-मेल उघडल्यानंतर एक तरी मेल असा असतोच. एखाद्या मृत व्यक्तीच्या काही कोटींच्या संपत्तीचे वारस म्हणूनही तुमची निवड करणारा एखादा ईमेल येतो, तर बनावट लेटरहेड बनवून मोठय़ा नोकरीचे थेट नियुक्तीपत्र देणारे मेलही दृष्टिपथास पडतात. अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु काहीजण असे फसत जातात की, त्यातून बाहेर पडताना दमछआक होते. खात्यातील काही लाखांची रक्कम वळती झाल्यानंतरच या फसवणुकीचे चटके जाणवू लागतात.  
अशा ई-मेलकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून वारंवार केले जाते. परंतु तरीही अशा प्रकारच्या फसवणुकींच्या तक्रारी वेळोवेळी येतच असतात. गेल्या काही वर्षांत तर या घटना अधिकच वाढल्या आहेत. अशा फसवणुकीच्या अनेक प्रकरणांमागे प्रामुख्याने नायजेरियन, केनियन वा दक्षिण आफ्रिकन मंडळी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र त्यामध्ये नायजेरियन नागरिकांचा प्रामुख्याने समावेश आहे. नायजेरियन नागरिकांच्या फसवणुकीच्या घटना १९९५ पासून उघडकीस आल्या. ‘नायजेरियन अ‍ॅडव्हान्स फी स्कीम’ अशा नावाने ही फसवणूक त्यावेळी परिचित होती. या फसवणुकीला पोलीस दलात ४-१-० असेही संबोधले जात होते. अशा पद्धतीने फसवणूक झाल्याच्या १०० तक्रारी दररोज यायच्या, असे तेव्हा म्हटले जात होते. पैशाच्या हव्यासापोटी अनेकजण त्यांत गुरफटले. फक्त भारतच नव्हे तर जगभरातून अनेकजणांची या फसवणुकीत फसगत झाली. काही वेळा पीडिताला थेट नायजेरियात बोलाविले जायचे. व्हिसाची गरज नाही, असे सांगितले जायचे. संबंधित म्होरके नायजेरियाच्या सीमेवरील अधिकाऱ्यांना पैसे चारून अशा पीडितांना ताब्यात घ्यायचे. परंतु व्हिसा न घेता नायजेरियात राहणे हा महाभयंकर गुन्हा आहे, याची जाणीव होईपर्यंत तो पीडित पुरता लुटला गेलेला असायचा. काही परदेशी नागरिकांच्या हत्या झाल्याच्या वा काही बेपत्ता झाल्याच्याही घटना तेव्हा घडल्या होत्या.
मुंबई पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात वा क्राफर्ड मार्केट येथील सायबर सेल विभागातील नोंदीमध्ये, या गुन्ह्य़ांमागे नायजेरियन नागरिकांचाच हात असल्याच्या नोंदी सर्वाधिक आढळतात. किंबहुना सायबर सेलमध्ये ‘नायजेरियन फ्रॉड’ हाताळणारा स्वतंत्र विभागच आहे. पोलीस ठाण्याच्या पातळीवरही नायजेरियन नागरिकांच्या फसवणुकीची अनेक प्रकरणे नोंदली जातात. या नायजेरियन नागरिकांना अटक होते. परंतु त्यांच्याकडून फसवणूक झालेल्या रकमेची वसुली मात्र क्वचितच होते. याचे कारण, गुन्हा सिद्ध होईपर्यंत ही रक्कम मात्र परदेशात वळती झालेली असते. दक्षिण आफ्रिका, केनिया, मलेशिया, सिंगापूर आदी ठिकाणी त्यांचे म्होरके बसलेले असतात, असे तपासात आढळून आले आहे. आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या नावे आठ बनावट मेल आयडी बनविणारा भामटाही नायजेरियनच होता.
गोव्यात एका नायजेरियन नागरिकाच्या हत्येचे प्रकरण सध्या चांगलेच गाजते आहे. या निमित्ताने गोव्यात २०० हून नायजेरियन नागरिक एकत्र आले. यापैकी अनेकजणांचे बनावट व्हिसाद्वारे वास्तव्य असल्याचे स्पष्ट होत आहे. गोव्यातील अमली पदार्थाच्या तस्करीत प्रामुख्याने या नायजेरियनांचा सहभाग असल्याचा आरोप असला तरी इटरनेटवरील घोटाळ्यांमध्येही ते सहभागी असल्याचे अधूनमधून उघड होत आहे. मुंबईतील सायबर पोलिसांना याचा पदोपदी अनुभव येत आहे.
शिक्षणाच्या निमित्ताने भारतात यायचे. विविध शहरात बस्तान बसवायचे. मग पासपोर्ट हरविल्याच्या नावाखाली बनावट पासपोर्ट आणि व्हिसा तयार करून वास्तव्य करण्याची त्यांची पद्धती सध्या सर्वज्ञात झाली आहे. गोवा सरकारने आता अशा परकीय नागरिकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या देशात परत पाठविण्याचे ठरविले आहे. मुंबई, ठाण्यातही अशा नायजेरियन नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. परंतु व्हिसा संपला की, काही दिवस अन्य शहरात जायचे आणि तेथून मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकता, बंगळुरू आदी शहरातील नागरिकांना लक्ष्य करण्याची त्यांची गुन्ह्य़ाची पद्धती आहे.
सुरुवातीला या नायजेरियन नागरिकांनी एटीएम केंद्रांवर क्लोनर बसवून ग्राहकांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये यश आल्यानंतर त्यांनी इंटरनेट फसवणुकीकडे मोर्चा वळविला, असे पोलिस सांगतात. इंटरनेट हॅकिंगमध्ये ही मंडळी माहीर असल्याचे सांगितले जाते. एखादी वेबसाईट ते लीलया हॅक करतात. याशिवाय शब्दांचे खेळ करून बडय़ा कंपन्यांची अगदी हुबेहूब वेबसाईट बनविण्यातही हे वाकबगार आहेत.
मध्यंतरी रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया वा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटद्वारे येणाऱ्या मेलमागेही हीच टोळी असल्याचे त्यावेळी तपासात बाहेर आले होते. एखादा शब्द चुकीचा टाकून अगदी हुबेहुब वेबसाईट बनविली जात असल्यामुळे अनेकजण फसत असत आणि त्यांच्या जाळ्यात अडकत असत. अगदी अमेरिका, लंडनमधील बँका वा बडय़ा कंपन्यांच्या हुबेहूब साईट बनवून बडय़ा पगाराच्या नोकरीची थेट नियुक्तीपत्रे पाठवून अनेकांचा ‘पोपट’ करणाऱ्या या भआमटय़ा नायजेरियनांचा शोधच पोलिसांना लागला नाही. वेळोवेळी हे प्रकार उघड उघड होऊनही बळी पडणारे सावध झाले नाहीत.
एटीएमद्वारे होणारी फसवणूक रोखण्यासाठी आता विविध बँकांनी विशिष्ट चीप असलेली एटीएम कार्डे आपल्या ग्राहकांना देऊ केली आहेत. त्यामुळे या कार्डावर क्लोनिंगचा कुठलाही परिणाम होण्याची शक्यता नाही. इंटरनेटद्वारे होणाऱ्या फसवणुकीबाबत प्रत्येकाने सावधान होण्याची गरज आहे, असे मेल आले की, ते डिलिट करणेच योग्यच. या मेलना बळी पडू नका. म्हणजे आपसूकच नायजेरियन नागरिकांच्या फसवणुकीला आळा बसेल, असेही असे मत गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी व्यक्त केले आहे.  गेली अनेक वर्षे अशा पद्धतीने फसवणूक सुरू आहे. प्रत्येकवेळी कानावर अशा फसवणुकीच्या घटना पडत असतात. पण पुढच्यास ठेच लागलेली पाहूनही मागचे शहाणे होतातच असे नाही. म्हणूनच नायजेरियन भामटय़ांचे फावते.
भारतीयांचा हात आणि साथ
नायजेरियन भामटेगिरीची नक्कल करण्यासाठी त्यांच्या हाताखाली काम करून त्यांच्या क्लृप्त्या शिकण्याचे उपद्व्याप काही भारतीयांनी केले आहेत. मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडेच झालेल्या एक कोटी रुपयांच्या ऑनलाईन फसवणुकीप्रकरणी भारतीयांना अटक झाली. त्यांनी या फसवणुकीचे प्रशिक्षण म्हणे एका नायजेरियन टोळीकडून घेतले होते. अनेक घटनांमध्ये नायजेरियन नागरिकांसोबत काही भारतीयांनाही अटक होत आहे. किंबहुना या भारतीयांचा वापर करून नायजेरियन नागरिक मोठय़ा प्रमाणात फसवणूक करीत आहेत. एखाद्या गुन्ह्य़ात अटक झाल्यानंतर या नायजेरियन नागरिकांना जामिनावर सोडण्यासाठी काही स्थानिक मंडळी पुढे येतात, असेही काही घटनांमधून उघडकीस आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

More Stories onगोवाGoa
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nigerian fraud in goa cheats people in several cases
First published on: 17-11-2013 at 02:14 IST