खरेच पाऊस येतो तो मोरपिसांप्रमाणे भुलवत, त्याच्या त्या हिरव्या, निळ्या, जांभळ्या रंगांची उधळण करत. त्याचे हे रंगच भुलवतात. ओला स्पर्श मन आतूर करतो आणि मग पाऊस पाहायला नव्हेतर तो अनुभवायला हे मन बाहेर पडते. कुठे कुठे हा पाऊस अनुभवता येतो ? गावाबाहेर, डोंगरावर, दरीत, गडकिल्ल्यांवर, खळाळत्या नदीच्या काठाशी आणि धबधब्यांच्या पायाशी. फुलांच्या पठारावर अन् भाताच्या शेतावर. डोंगररानी- वाडीवस्ती- रानवाटा अशा प्रत्येक ठिकाणी. जिथे पावसाला तुम्ही आणि तुम्हाला पाऊस हवाहवासा वाटतो.

पाऊस आल्यावर खऱ्या भटक्यांची पावले घाटवाटांकडे वळतात. पाऊस शोधू – अनुभवू पाहतात. सह्याद्रीच्या रूपाने साऱ्या महाराष्ट्रालाच असा घाटमाथा मिळाला आहे. त्यावर विसावलेल्या या घाटवाटा तर जणू पावसाचे घरच बनलेल्या आहेत. यातीलच एक वरंध !

पुण्याहून भोरमार्गे महाडकडे गेलेल्या राज्यमार्गावर हा वरंध घाट. पुण्याहून हे अंतर १०५ तर महाडहून २५ किलोमीटर. या घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत, गर्द झाडीत समर्थांची शिवथरघळ दडली आहे. या शिवथरघळीत येऊ लागलो, की आपले पाय पहिल्यांदा या घाटात अडकतात. यातच ढग-पावसाचा खेळ सुरू असेल, तर अडकणारे पाय काही काळ घट्ट होतात.

खरेतर या पावसाचा स्पर्श भोर शहर सोडतानाच होऊ लागलेला असतो. भोवतीच्या निळ्या – जांभळ्या डोंगररांगा, भुरभुरणारा पाऊस, भातखाचरांमधील लगबग ही सारी दृश्ये या वर्षाऋतूत भिजवून टाकत असतात. डाव्या हाताचे दुर्गाडी शिखर, नीरा देवघर धरण पाहता-अनुभवता हा पाऊस अधिक घट्ट होतो. घाटात पोहोचेपर्यंत सारे वातावरणच कुंद होऊन गेलेले असते.

घाटाच्या ऐन मध्यात वाघजाई मंदिर! या मंदिरासमोर येऊनच आपण थांबतो. इथूनच हा घाट आणि त्या भोवतीचा परिसर निरखायचा. वीस किलोमीटर लांबीचा हा घाट सह्याद्रीच्या उभ्या धारेला छेदणारा. यामुळे इथून त्याचे रूप अक्राळविक्राळ होत आपल्यापुढे उभे ठाकते. यातही वाघजाई समोरचे पर्वत तर मनात धडकी भरवतात. पण हेच राकट कातळकडे पाऊस कोसळू लागला, की पाणी पिऊन हिरवेगार होतात. मग त्यांच्या या हिरवाईवरून पांढरेशुभ्र धबधबे फेसाळत चारी दिशांना कोसळू लागतात. वाघजाई समोरचा एक भलामोठा डोंगर तर एखाद्या अजस्रा शिवलिंगाच्या आकाराचा आहे. धो-धो पाऊस कोसळू लागला, की त्याच्या चहुअंगावरून असंख्य धबधबे कोसळत असतात. जणू एखादा महारुद्राभिषेक. हिरवे डोंगर आणि त्याच्याशी झटणारे ढगांचे पुंजके आणि कोसळणाऱ्या असंख्य जलधारा… काय पाहू आणि किती साठवू असे होते.

या घाटवाटा एरवी देश कोकणात ये-जा करण्यासाठी, पण तेच पाऊस कोसळू लागला, की त्या येत्या-जात्याला थांबवणाऱ्या होतात. या वाटेवर येताना त्यांचे हे ओलेचिंब दृश्य पाहून आधी मन आणि मग शरीर भिजते. पाऊस, ढग, हिरवी गिरिशिखरे आणि त्यावरून वाहणाऱ्या त्या जागोजागीच्या जलधारा! जणू साऱ्यांनाच इथे अधिरता आलेली असते. त्या उत्तुंग नभाला जणू भूमीच्या भेटीची ओढ लागलेली असते. ही भेट घडते आणि त्यातूनच वर्षाऋतूचे हे चैतन्य उमलते.

‘ या नभाने या भुईला दान द्यावे,

आणि या मातीतून चैतन्य गावे। ’

असे म्हणणाऱ्या कविवर्य ना. धों. महानोरांचे ‘नभाचे दान’ आणि ‘मातीतले चैतन्य’ हे अशा एखाद्या पावसाळी घाटवाटेवर अडकलो, की उमगून जाते.

ऐन घाटात कड्याच्या आधाराने एक छोटेसे टपरीवजा हॉटेल आहे. तिथे मिळणारा तो भन्नाट वाफाळता चहा हातात घेत समोरचे हे दृश्य समाधी लावत पाहात राहावे. निसर्गाच्या नवलाईचे हे अप्रूप घोट घ्यावेत आणि वाघजाईचे दर्शन घेत घाट उतरू लागावे. पुढे लगेच एका खिंडीतून घाट डावीकडे वळतो. या खिंडीच्या दोन्ही अंगांचे डोंगर म्हणजे एक दुर्गच आहे. कावळ्या ऊर्फ मनमोहनगड असे त्याचे नाव. या गडाच्या वाघजाईकडील बाजूच्या डोंगरामध्ये नऊ खोदीव टाक्या आहेत. तर दुसऱ्या बाजूस अशाच काही टाक्या, शिबंदीच्या घरट्यांचे अवशेष दिसतात. इतिहासात फारसा परिचित नसलेल्या या गडावर प्राचीन काळापासून वाहत्या असलेल्या या घाटवाटेवर लक्ष ठेवण्याचे काम होते. अशी ही घाटवाट पुढे ब्रिटिशांनी १८५७ मध्ये सव्वा लाख रुपये खर्चून पक्की केली. घाटातल्या या खिंडीजवळ आलो, की या लांबी, रुंदी आणि उंचीबरोबरच मग घाटवाटेचा हा प्रदीर्घ प्रवासही आठवतो. कोकणातून देशावर येण्याचा दरवाजा म्हणून याचा कुणीतरी फार पूर्वी ‘द्वारमंडप’ असा उल्लेख करून ठेवला आहे. शब्दांचे हे तोरण सगळ्या वरंधालाच व्यक्तिमत्त्व बहाल करते!

हे सारे पाहता – अनुभवताना मधेच ढगांचा पदर या साऱ्या दृश्यावर आच्छादला जातो. त्या अदृश्यतेतही तो घाट आपल्याशी बोलू पाहतो. समोरच्या दरीत कोंडलेला पाऊस आपल्याला काही सांगू लागतो. त्याचे आतले मन रिकामे करू पाहतो. …ही लिपी स्पर्शाची असते, ही भाषा गंधाची असते. इथे डोळ्यांचे भरून घेणे असते आणि हृदयाचा ठोका चुकवणेही ! …घाटातला हा पाऊस मन चिंब करून टाकत असतो!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

abhijit.belhekar@expressindia.com