कोकण, मुंबईसह राज्याच्या काही भागांत मान्सूनचे आगमन झाले. यंदाच्या पावसाविषयी सरकारी खाते आणि खासगी कंपनीचे अंदाज वेगवेगळे आहेत. मात्र पक्ष्यांच्या गमन-आगमनावरून बांधले जाणारे अंदाज हे १०० टक्के खरे ठरतात. म्हणूनच पूर्वीच्या काळात हवामान खातेसुद्धा कोळ्यांना विचारूनच अंदाज बांधत होते.
मे महिन्याची अखेर म्हणजे शेतकऱ्यांपासून तर सर्वाचेच डोळे ‘चातका’सारखे आकाशाकडे लागलेले असतात. नैर्ऋत्येकडून येणाऱ्या मोसमी वाऱ्याची दिशा आणि पावसाचा अंदाज हवामान खाते वर्तविते, पण त्याहीपेक्षा पारंपरिक आडाख्यावरून बांधला जाणारा मान्सूनचा अंदाज अधिक खरा ठरतो. तसं पाहिलं तर या पारंपरिक आडाख्यांना कसलाही ज्ञात शास्त्रीय आधार नाही, पण विज्ञानापेक्षा हे अंदाज भरवशाचे असतात हे नक्की!
पाऊस येणार असल्याची वर्दी आपल्याला निसर्गातल्या ज्यांच्याकडून मिळते, त्यापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे पक्षी. प्रत्यक्ष पावसाळ्यात तर त्याचे किती तरी प्रकार पाहायला मिळतात. अर्थात पावसाळ्यातले हे पक्षीजीवन जेवढे विलोभनीय वाटते तेवढेच ते पक्ष्यांसाठी खडतरही आहे. पावसाच्या सुरुवातीला आणखी एक पक्षीजगतातले वैशिष्टय़ पाहायला मिळते ते म्हणजे पक्ष्यांचे स्थलांतरण! नैर्ऋत्य मोसमी वारे पाऊस घेऊन कोकण किनारपट्टीवर यायला लागले की काही पक्षी या वाऱ्यांबरोबर दक्षिण-उत्तर प्रवास करतात. वाटेत योग्य स्थळ दिसले की तात्पुरता निवारा घेतात आणि पावसाळा संपला की पुन्हा परततात. मान्सूनच्या पहिल्या पावसाचे आगमन जवळ आल्याची सर्वात मोठी खूण म्हणजे पावशा पक्षी. पावशा आणि पाऊस यांचे अतूट नाते आहे. तो येतानाच पावसाची वर्दी घेऊन येतो म्हणून शेतकरीही पावशा पक्ष्याकडे डोळे लावून बसलेले असतात. तो जेव्हा ओरडतो तेव्हा ‘पेरते व्हा, पेरते व्हा’ असा आवाज येतो. त्यामुळे शेतकऱ्याला तो सांगतो की आता पेरणीची वेळ झाली आहे, तेव्हा पेरणीसाठी तुम्ही सज्ज व्हा! काळ बराच बदलला, पण अजूनही ‘पेरते व्हा, पेरते व्हा’ हे ऐकण्यासाठी शेतकऱ्यांचेच नव्हे तर पक्षी अभ्यासकांचे कानसुद्धा टवकारलेले असतात.
पावसाच्या आगमनाची सूचना देणारे चातक पक्षी आफ्रिकेतून स्थलांतर करीत भारतात प्रवेश करतात. ‘पिक पिक’ असा आवाज करत ते पावसाच्या आगमनाची चाहूल देतात. त्यांचे आगमन झाल्याबरोबरच पावसाचेही आगमन होते. कोकीळ, पावशा आणि चातक हे पक्षी कावळे, सातभाई या पक्ष्यांच्या घरटय़ात अंडी घालतात आणि अंडय़ांतून पिले बाहेर आल्यानंतर कावळे व सातभाई पक्षी त्या पिलाची जोपासना करतात. पावसाच्या आगमनापूर्वीच्या आणि पावसाचा अंदाज देणाऱ्या पक्ष्यांच्या या घडामोडी आता पाहायलाच मिळत नाहीत. आता तर शहरातून कावळेच नाहीसे झाले आहेत आणि याला शहरात बंदिस्त फ्लॅटमध्ये राहणारे नागरिकच जबाबदार आहेत. पूर्वी घरे असायची, घरासभोवताल मोकळे अंगण असायचे आणि त्या अंगणात झाडे असायची. विशेषत: एक-दोन तरी कडुनिंबाची झाडे असायची. या झाडांमुळे कावळ्याला भरपूर अन्न मिळत होते आणि त्यामुळे कावळ्याचा निवास या झाडावर असायचा. आता फ्लॅटमुळे त्यांना अन्न मिळेनासे झाले आहे आणि त्यामुळे भुकेले कावळे रस्त्यावर फेकून दिलेल्या विषाने मृत झालेले उंदीर खात असल्यामुळे त्यांची संख्याही कमी झाली. करंज, आंबा, पिंपळ, कडुनिंब या झाडांवर कावळ्यांचा निवास, पण त्यांचे हे निवासस्थानच आता शहरापासून दूर झाले आहे. त्याचाही परिणाम कावळ्याच्या प्रजोत्पादनावर झाला आहे.
विदर्भात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली हे जिल्हे तलावाचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. या जिल्ह्य़ांतील गावात असलेल्या चिंचेच्या झाडावर बगळे, ढोकरी, पाणकावळे हे पक्षी पावसाच्या सुरुवातीला घरटी बांधून त्यात अंडी घालतात आणि त्यातून पिले जन्माला येतात. मात्र, हे पक्षी अंगणात शिरतात, घाण करतात म्हणून अंगणातील या झाडांवर कुऱ्हाडीचे घाव घातले जातात. त्यामुळे घरटी बांधण्यासाठी या पक्ष्यांना झाडेच मिळत नाहीत आणि मग ज्या घरटय़ांच्या विणीवरून पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता, तोही आता करता येत नाही. पर्यावरणाचा समतोल बिघडवला तर त्याचे कसे वाईट परिणाम होतात, याचे हे उदाहरण आहे.
पावसाच्या आगमनापूर्वी रोहित किंवा समुद्री राघू, फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन होऊ लागते. एकेका थव्यात ते हजारोंच्या संख्येत आढळतात. ते जसे सागरकिनारी जातात तसेच गोडय़ा पाण्याच्या काठावरही जमतात. कोल्हापूर जिल्ह्य़ातील उजनी धरण, पुणे जिल्ह्य़ातील जुन्नर येथील पाणथळ जागेत ते येतात. त्यांना एक विशिष्ट पद्धतीचे खाद्य लागते आणि ते खाद्य त्यांना या ठिकाणी भरपूर मिळते. गावागावात नवरंग पक्ष्याचे पावसाळ्यात आगमन होते. ‘व्हीट टय़ू, व्हीट टय़ू’ असा आवाज करत ते येतात. पावसाच्या आगमनाबरोबरच जंगलातील मोरनाचीत शेकडो मोर व लांडोर एकांतात जमा होऊन नृत्य करू लागतात. महाराष्ट्राच्या कोकणकिनाऱ्यावर वादळी पाखरू येऊन पावसाच्या आगमनाची सूचना देतात. या पक्ष्यांचे थवे समुद्रावरून किनाऱ्यावर आले की पावसाची व वादळाची सूचना मिळते. पावसाचे आगमन कधी होईल, तो कधी थांबेल या दोन्ही गोष्टींचा अंदाज हवामानतज्ज्ञ देऊ शकत नाहीत, पण पक्ष्यांच्या गमन-आगमनावरचे अंदाज मात्र तंतोतंत खरे ठरतात. पक्ष्यांच्या शिकारीवर उपजीविका करणारे पारधी आतादेखील पाऊस व हवामानाचा अंदाज पक्ष्यांच्या गमन-आगमनावरून घेतात. धोबी पक्ष्याच्या आगमनाबरोबरच पाऊस थांबल्याची सूचना मिळते. त्यानंतर लावा व तित्तिर पक्ष्याचे आगमन होते. लावा हा पक्षी स्थलांतर करणारा आहे. पाऊस थांबल्यावर हिवाळ्याच्या सुरुवातीला त्याचे आगमन होते त्याला गंगेस्त असे म्हणतात. नंतर काही दिवसांनी तणमोर या पक्ष्याचे आगमन होते व त्याला गंगेस्ती असे म्हणतात. लावा या पक्ष्यापेक्षा तणमोर आकाराने मोठे असतात. पावसाळा संपल्याबरोबर शरद ऋतूच्या आगमनाबरोबरच राजहंस, कलहंस, चक्रवाक, करकोचे यांचे आगमन होते. खरं तर कावळ्याच्या घरटय़ांवरून पावसाचा अचूक अंदाज बांधला जातो. झाडावर पूर्वेला कावळ्याने घरटे बांधले असेल तर पाऊस चांगला पडतो आणि पश्चिमेला बांधले असेल तर पाऊस थोडा कमी पडतो. झाडाच्या टोकावर कावळ्याने घरटे बांधले असेल तर दुष्काळ पडतो. मात्र आता कावळेच दिसेनासे झाल्याने त्यावरून अंदाज बांधणेही दूर झाले आहे. पक्ष्यांच्या गमन-आगमनावरून बांधले जाणारे अंदाज हे १०० टक्के खरे ठरतात. म्हणूनच पूर्वीच्या काळात हवामान खातेसुद्धा कोळ्यांना विचारूनच अंदाज बांधत होते.
– शब्दांकन – राखी चव्हाण
छाया : यादव तरटे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relation between rains birds
First published on: 14-06-2015 at 12:21 IST