‘घरवापसी’ हे खऱ्या अर्थाने धर्मातर ठरत नाही, अशी बाजू मांडणारे आणि मध्ययुगीन धर्मातरांसंदर्भात स्वा. सावरकर तसेच त्यांचे टीकाकार यांची निरीक्षणे पुन्हा सांगणारे टिपण..
जगातील बहुतेक लोकांचा धर्म त्यांना जन्मासोबत, म्हणजे अपघातानेच प्राप्त झालेला असतो. स्वेच्छेशी त्याचा संबंध नसतो. कोणत्या माता-पित्याच्या पोटी जन्म घ्यावा, हे कोणाच्याही अखत्यारीत नसते आणि म्हणूनच कोणी कोणत्या धर्माचे असावे हेसुद्धा या बहुतेकांनी स्वेच्छेने ठरविलेले नसते. काही लोक नक्कीच पुढे आपापल्या धर्माचा सखोल अभ्याससुद्धा करतात, अभ्यासान्ती आपल्या धर्माचा विचार पटल्यास, त्या धर्माचा मनाने अंगीकार करतात आणि विचार न पटल्यास त्याच धर्मात राहिले तरी निष्क्रिय होऊन, नावापुरते त्या धर्माचे सदस्य राहतात. आजच्या समाजात अशा धर्मनिष्क्रिय लोकांची संख्या अधिक असते. असे लोक निधर्मी किंवा अश्रद्ध म्हणवून घेणे पसंत करीत नाहीत; परंतु काही लोक खरोखर अश्रद्ध बनून राहतात. याखेरीज ज्यांना असे वाटते की, मानवजातीसाठी धर्म ही अत्यावश्यक बाब आहे, असे लोक सर्वच धर्माचा सखोल आणि तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर जो धर्म त्यांना मानवाच्या आध्यात्मिक, नैतिक आणि सामाजिक जगण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याची खात्री विचारान्ती देतो, असा धर्म स्वीकारतात. यालाच खऱ्या अर्थाने ‘धर्मातर’ म्हणता येईल.
याउलट, समूहाने घडणारे धर्मातर हे या खऱ्या अर्थाने धर्मातर नसते. त्यात बहुतेकदा आध्यात्मिक वा नैतिक उन्नतीपेक्षा सामाजिक आणि राजकीय हेतूच जास्त प्रभावी असतात. ज्या ज्या ठिकाणी अशी समूहाने धर्मातरे घडली असतील, तेथे सामाजिक आणि राजकीय हेतूच त्यांचे मूळ कारण असावे, असे मानण्यास जागा आहे. मात्र ‘दबावाने’ किंवा तलवारीच्या धाकाने, पैशाच्या प्रलोभनाने आणि राजकीय पदाच्या आमिषाने घडणारी धर्मातरे ही अपवादात्मक असतात. ‘गरीब, नादार आणि उपेक्षित लोक पैशांच्या प्रलोभनाने आणि शस्त्रांच्या धाकाने धर्म बदलतात’ अशी जी धारणा आहे, ती सर्वस्वी चुकीची ठरावी. कारण श्रीमंत लोकांपेक्षा आणि वरिष्ठ जातींच्या लोकांपेक्षा गरीब, निष्कांचन लोकच धर्माच्या बाबतीत जास्त चिवट असतात. त्याउलट जे लोक वरिष्ठ जातींचे मानले जातात, तेच सत्तापदांच्या अभिलाषेला लवकर बळी पडतात.
भारतीय संदर्भात, तथाकथित उच्च जातींचे धर्मातर नेहमीच दोन उद्दिष्टांनी झाले आहे. क्षत्रिय जातींची (राजपूत, ठाकूर वगैरे) धर्मातरे सत्तापदासाठी झाली आणि तत्कालीन ब्राह्मणांची धर्मातरे होण्यामागे सत्तापद मिळवून समाजावर असलेली पकड कायम ठेवण्याचा हेतू असावा, असे इतिहास सांगतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वैदिक आणि सनातनी धर्मातील वर्णव्यवस्थेला कंटाळून आणि जातव्यवस्थेच्या शोषणातून मुक्त होण्याच्या हेतूने ज्या निम्न (तसे समजल्या जाणाऱ्या) जातींच्या लोकांनी धर्मातर केले त्यांना त्या दुसऱ्या धर्मातदेखील सुख लाभू नये व तेथेदेखील त्यांना नीच ठरवून त्यांचे शोषण करता यावे, असे प्रयत्न अनेकदा झालेले दिसतात. म्हणूनच महाराष्ट्रातही आपण सवर्ण ख्रिश्चन आणि दलित ख्रिश्चन अशा संज्ञा ऐकतो. मुसलमानांची जातीव्यवस्थादेखील त्याच दुराग्रहांमुळे निर्माण झाली आहे. परंतु इस्लाम वा ख्रिस्ती धर्मात उपासनागृहांतील प्रवेशबंदी आणि एकत्र रोटीव्यवहार भेद हे अडथळे निर्माण करण्यात त्या धर्मातील कथित उच्चवर्णीयांना फारसे यश मिळाले नाही. भारतातील कनिष्ठ जातींना हेच सुख फार मोठे होते. त्यांच्या आत्मसन्मानासाठी हेसुद्धा पुरेसे होते. सर्वच बाबतींत पाळली जाणारी अस्पृश्यता हीच त्यांना सर्वाधिक अपमानित करणारी गोष्ट होती. म्हणूनच भारतातील दलित शोषितांचे धर्मातर बळजबरीने किंवा आमिषाने केले गेले म्हणणे हा शुद्ध कांगावा ठरतो. अर्थात हेही खरे की, कोणत्याही धर्मात, तथाकथित नीच-जातींच्या लोकांना अन्य जातींशी (मग त्या उच्च समजल्या जाणाऱ्या असल्या तरी) बेटीव्यवहार करणे आजही सहज शक्य होत नाही.
डॉ. रावसाहेब कसबे यांच्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास- ‘‘इस्लामी आक्रमकांचे क्रौर्य आणि त्यांच्या अत्याचारांच्या कथा सांगून, तरुण मनांना भूतकाळात नेऊन त्यांच्या डोळय़ांत पाणी आणणे आणि अंत:करणात स्वाभिमानाच्या भावना पेटविणे तुलनेने सोपे आहे. मध्ययुगीन वास्तव समजावून सांगणे फार अवघड आहे.’’ (हिंदू-मुस्लीम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद- पृष्ठ १०३).
‘मध्ययुगीन वास्तव’देखील आपण कसबे यांच्याच शब्दांत पाहू. ‘‘इस्लाम आक्रमक आहे. त्याचे मूळ रूपच तसे आहे. त्यामुळे कोणत्याही देशात जे कष्टकरी आणि शेतकरी वर्ग तिथल्या सत्ताधाऱ्यांनी दाबून ठेवलेले असतात, त्या दबलेल्यांचा इस्लाम ‘आवाज’ होतो. त्यासाठी इस्लामी राज्यकर्त्यांना फारशी बळजबरीही करावी लागत नाही आणि धर्मातराचे ‘आवतण’ही द्यावे लागत नाही. .. अमेरिकेतील निग्रोंच्या चळवळीत इस्लामचा जो प्रभाव जाणवतो, त्यासही ही उपेक्षाच कारणीभूत आहे. आणि इस्लाम आज निग्रोंचाच नव्हे तर जगातील सर्व उपेक्षितांचा आवाज बनत आहे.’’ (तत्रव- पृ. १०४)
याच पुस्तकात रावसाहेब कसबे म्हणतात- ‘‘हिंदूंना आपल्या दोषांची जाणीव सांस्कृतिक अहंकारामुळे होणे शक्यच नव्हते. बंगालमध्ये तर कहार ही एक अस्पृश्य जात आहे, ते लोक नावाडी म्हणून काम करतात. अस्पृश्याच्या नावेत बसल्याने वरिष्ठ जातीय हिंदूंना विटाळ होतो म्हणून या उच्चजातीय हिंदूंनी, कहारांनी मुसलमान व्हावे यासाठी पुढाकार घेतलेला होता, तर दक्षिणेतील नाडर समाजाच्या मुलींना चोळी घालण्याची परवानगी नव्हती. .. .. या हिंदूंच्या जाचाला कंटाळून, शिकू लागलेल्या मुलींनी केवळ चोळय़ा घालण्यासाठी ख्रिस्ती मिशनरी ननशी संबंध वाढविले आणि मग कृपाळू परमेश्वराचा दयाळू पुत्र येशूच्या नावाने त्यांना चोळय़ा घालता आल्या.’’ (तत्रव- पृ. १०५ व अधिक संदर्भ- द नाडर्स ऑफ तमिळनाडू, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (बर्कले, १९७९)
आता जी मुसलमानांची आणि ख्रिश्चनांची धर्मातरे घडवून आणली जात आहेत, त्याला रा. स्व. संघ परिवारातील लोक धर्मातर न म्हणता ‘घरवापसी’ म्हणत आहेत. आणि ते वास्तवात तसेच आहे. कारण धर्मातर ही एक सखोल अभ्यासानंतर केलेली अतिशय विवेकपूर्ण कृती असते. नुसत्या गोल टोप्या घालून वा अग्नीत तूप आणि काही काही समीधा टाकून ते घडत नसते. ज्या लोकांनी घरातील जाचाला कंटाळून घरातून पलायन केले आणि शोषणमुक्त जीवन जगण्याचे मार्ग शोधले, त्यांना पकडून घरात ‘वापस’ आणून परत त्यांना वर्णव्यवस्थेच्या नावाने शोषणाच्या घाण्याला जुंपण्याचा हा कार्यक्रम असल्याचे मानण्यास जागा आहे. त्यांचे धर्मातरच घडवायचे असते तर सर्वप्रथम त्यांच्या गोल टोप्या काढण्यात आल्या असत्या, दाढीसह त्यांच्या डोक्याचे मुंडन करून शेंडय़ा ठेवता आल्या असत्या. त्यांना आंघोळ घालून सोवळे नेसवून जानवे घालण्यात आले असते आणि मग त्यांच्या हस्ते होमहवन करविले गेले असते. परंतु ‘घरवापसी’ घडविणाऱ्यांनी स्पष्टच म्हटले आहे की, जे ज्या जातीतून पळाले होते त्यांना परत त्याच जातीत समाविष्ट केले जाईल. वाल्मीकींना वाल्मीकी, चर्मकारांना चर्मकार, राजपूतांना राजपूत आणि ब्राह्मणांना ब्राह्मण जातीत गणले जाईल. सरसकट सर्वानाच ब्राह्मण किंवा राजपूत केले जाईल असे म्हटले असते, तर अशा धर्मातराला ब्राह्मण आणि/ किंवा राजपूतांकडूनच प्रखर विरोध झाला असता.
आता हेदेखील सिद्ध झाले आहे की, त्या घर-वापस येणाऱ्यांमध्ये अनेक जण बांगलादेशी होते. म्हणूनच रेशनकार्ड आणि आधारकार्ड मिळवून देण्याचे आमिष अत्यंत प्रभावी ठरले आहे. कारण या कार्डाच्या माध्यमातून त्यांना भारतीय नागरिकत्व मिळेल आणि आता ते ‘घुसखोर’ न राहता ‘निर्वासित’ ठरविण्यात येतील. ते पूर्वी जितक्या प्रमाणात मुसलमान होते तितक्याच प्रमाणात हिंदू राहतील. तिकडेही त्यांच्या मतांच्या संख्येलाच महत्त्व होते; इकडेही मतांच्या संख्येलाच महत्त्व राहील. त्यांच्या शिक्षण- प्रशिक्षण आणि प्रबोधनाची चिंता ना मुस्लीम मौलवींना होती ना हिंदू पुरोहित-पंडितांना असेल. आग्रा येथील घरवापसी कार्यक्रमासंदर्भात उत्तर प्रदेशातील सत्ताधाऱ्यांच्या लबाडीचा भाग असा की, ‘सक्तीच्या धर्मातरा’च्या ‘गुन्ह्या’साठी नंदकिशोर वाल्मीकी या महादलिताला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश धर्मातर कार्यक्रमाचे प्रमुख राजेश्वर सिंह आणि कार्यक्रमात हिरिरीने भाग घेणारे सर्व उच्चवर्णीय भाजप खासदार साफ विसरले आहेत आणि दलितच बळीचा बकरा ठरला आहे.
इस्लामचा प्रसार जगभर तलवारीच्या बळावरच झाला हा प्रचार असत्य असल्याचे एच. जी. वेल्स, थॉमस कार्लाइल, मायकेल एस. हार्ट आदी पाश्चात्त्य आणि महात्मा गांधी, प्रा. ग्यानेंद्रदेव शर्मा शास्त्री, आदी एतद्देशीय विद्वान/ विचारवंतांनी दाखवून दिले आहे; परंतु त्यापेक्षाही आजघडीला, हिंदुत्ववादय़ांना प्रात:स्मरणीय असणारे विनायक दामोदर सावरकर या संदर्भात काय म्हणतात ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. ‘‘आजच्या प्रगतिशील परिस्थितीत अरब संस्कृती कितीही मागासलेली दिसली तरी हे विसरता कामा नये की, यापूर्वी एकदा जगाच्या फार मोठय़ा भागातील मरणासन्न समाजात त्या संस्कृतीने नवचैतन्याचे वारे संचारविले होते. मानवी प्रगतीत एके काळी नवतत्त्वे, नवधर्म, नवशिल्प यांची बहुमोल भर तिनेच घातलेली होती. तिचा उगम मुहम्मद पैगंबरांनी मुस्लीम धर्माची मुहूर्तमेढ हजार-बाराशे वर्षांपूर्वी जेव्हा रोवली तेव्हा झाला. ज्या दिवशी मुहम्मद पैगंबरांनी कुरआन शरिफचे पहिले आयत- पहिला मंत्र उचारला आणि तलवार अशी पहिल्यानेच उपसली त्या दिवसापासून एका शंभर-दीडशे वर्षांच्या आत, तिकडे स्पेन नि इकडे सिंधूपर्यंत त्या संस्कृतीतील अंतर्गत आवेशाने व शक्तीने अध्र्या जगाचे रूप बदलून टाकले. जिच्या विजयाच्या अप्रतिहत वेगास स्पेनची सामुद्रधुनी, इराणचा अग्नी, सिंधूची अटक, चीनची भिंत वा हिमालयाची शिखरे अडवू शकली नाहीत. जिने आपल्या धर्माची, भाषेची, लिपीची, शिल्पांची, शास्त्रांची राजमुद्रा ठोकून खंडेच्या खंडे अंकित करून टाकली. त्या अरब संस्कृतीत तिच्याशी टक्कर देत आलेल्या त्या त्या काळाच्या अनेक जीर्णशीर्ण संस्कृतींपेक्षा जे एकंदरीत या काळच्या जगतात नुसते जगण्यास नव्हे तर या जगास जिंकण्यासही समर्थतर आणि योग्यतर ठरेल असे काही तरी असामान्य श्रेष्ठत्व, काही तरी नवे जीवनतत्त्व होतेच हे निर्विवाद आहे.
६ लेखक धर्माभ्यासक असून मुस्लीम ओबीसी चळवळीत कार्यरत आहेत.
त्यांचा ई-मेल  drbasharatahmed@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Religion conversion and ghar wapsi
First published on: 24-12-2014 at 01:02 IST