साने गुरुजी यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने आणि प्रवचनांमधून ‘भारतीय संस्कृती’ या विषयावर आपले विचार मांडले होते. त्यातील ‘मृत्यूचे काव्य’ या विषयावरील त्यांच्या भाषणाचा संपादित भाग.
भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड व भव्य आहेत. मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ. गीतेने मरण म्हणजे वस्त्र फेकणे, असे म्हटले आहे. काम करता करता हे वस्त्र जीर्ण झाले, फाटले की त्रिभुवनमाउली नवीन वस्त्रे देण्यासाठी आपणांस बोलाविते. पुन्हा नवीन आंगडे-टोपडे लेववून या जगाच्या अंगणात खेळावयास आपणास ती ठेवते व दुरून गंमत बघते. कधी कधी जीव जन्मला नाही, तोच जातो. कोणी बालपणी मरतो, कोणी तरुणपणी. आई अंगरखा देऊन पाठवते. परंतु जगात पाठवले नाही तोच तिला दुरून तो अंगरखा चांगला वाटत नाही. पटकन ती बाळाला मागे नेते व नवीन अंगरखा घालते. आईच्या हौसेला मोल नाही. माझी माता काही भिकारी नाही. अनंत वस्त्रांनी तिचे भांडार भरलेले आहे. परंतु मातेचे भांडार भरलेले आहे म्हणून दिलेले कपडे मी वाटेल तसे फाडून टाकता कामा नयेत, शक्य तो काळजीपूर्वक हा कपडा वापरला पाहिजे. तो स्वच्छ, पवित्र राखला पाहिजे आणि सेवा करता करता तो फाटला पाहिजे.
मृत्यू म्हणजे महायात्रा. मृत्यू म्हणजे महाप्रस्थान, मृत्यू म्हणजे महानिद्रा. दररोजच्या धडपडीनंतर आपण झोपतो. झोप म्हणजे लघू मरण. सर्व जीवनाच्या, अनेक वर्षांच्या धडपडीनंतरही आपण असेच झोपतो. रोजची झोप आठ तासांची. परंतु ही झोप मोठी असते, एवढाच फरक.
मृत्यू म्हणजे आईच्या कुशीत जाऊन झोपणे. लहान मूल दिवसभर खेळते, खिदळते, रडते, पडते. रात्र पडताच आई हळूच त्याला उचलून घेते. त्याची खेळणी वगैरे तेथेच पडतात. आई त्याला कुशीत घेऊन झोपते. ती आईची ऊब घेऊन बाळ ताजेतवाने होऊन सकाळी पुन्हा दुप्पट उत्साहाने चेष्टा करू लागते. तसेच जीवाचे. जगात दमलेल्या, श्रमलेल्या जीवाला ती माता उचलून घेते. बाळाची इच्छा नसतनाही उचलून घेते. आपल्या सोबत्यांकडे, आपल्या सांसारिक खेळण्यांकडे बाळ आशाळभूत दृष्टीने बघत असतो. परंतु आईला बाळाचे हित ठावे. त्या रडणाऱ्या बाळाला ती घेत. कुशीत निजविते. जीवनरस पाजून पुन्हा पाठवते.
मृत्यू म्हणजे माहेरी जाऊन येणे. सासरी गेलेली लेक दोन दिवस माहेरी जाऊन येते. पुन्हा प्रेम, उत्साह, आनंद, मोकळेपणा घेऊन येते. त्याप्रमाणे त्या जगन्माउलीजवळ जाऊन येणे म्हणजेच मृत्यू. मरण म्हणजे एक प्रकारे विस्मरण. जगात स्मरणाइतकेच विस्मरणाला महत्त्व आहे. जन्मल्यापासून ज्या ज्या गोष्टी आपण केल्या, जे जे ऐकिले, जे जे पाहिले, जे जे मनात आले, त्या सर्वाचे जर सारखे आपणास स्मरण राहिले तर तो केवढा भार होईल. त्या प्रचंड पर्वताखाली आपण चिरडले जाऊ. हे जीवन असह्य़ होईल.
व्यापारी ज्याप्रमाणे हजारो घडमोडी करतो, परंतु शेवटी एवढा फायदा किंवा एवढा तोटा, एवढी सुटसुटीत गोष्ट ध्यानात धरतो, तसेच जीवांचे आहे. मरण म्हणजे जीवनाच्या व्यापारातील नफा-तोटा पाहण्याचा क्षण. साठ-सत्तर वर्षे दुकान चालविले, त्याचा आढावा घेण्याची वेळ म्हणजे मरण. मरणाची फारच आवश्यकता असते. कधी कधी जगातून या सद्य:कालीन नामरूपाने नाहीसे होणे हे इष्ट व आवश्यक असते. एखादा मनुष्य, समजा, वाईट रीतीने वागत होता. त्या माणसास पश्चात्ताप होऊन पुढे तो जरी चांगल्या रीतीने वागू लागला, तरी जनतेला त्याच्या काळ्या भूतकाळाचे विस्मरण होत नाही. लोक म्हणतात, तो अमूक मनुष्य ना? माहीत आहे त्याचे सारे. करून करून भागले आणि देवपूजेला लागले. उगीच सोंग करतो झाले. लोकांचे हे उद्गार स्वत:त सुधारणा करू पाहणाऱ्या त्या अनुतप्त जीवाच्या मर्मी लागतात. स्वत:चा भूतकाळ तो विसरू पाहतो. परंतु जग तो विसरू इच्छित नाही. अशा वेळेस पडद्याआड जाऊन नवीन रंग व नवीन नामरूप घेऊन लोकांसमोर पुन्हा येण्यातच मौज असते.
मरण उपकारक आहे. जीवनाने जे काम होत नाही, ते कधी कधी मरणाने होते. संभाजी महाराजांच्या जीवनाने मराठय़ांत फूट पडली, परंतु त्यांच्या महान मरणाने मराठे जोडले गेले. ते मरण म्हणजे अमृत ठरले. जीवन कसे जगलो, याची परीक्षा म्हणजे मरण. तुमच्या मरणावरून तुमच्या जीवनाची किंमत करण्यात येईल. जो मरताना रडेल, त्याचे जीवन रडके ठरले. जो मरताना हसेल, त्याचे जीवन कृतार्थ समजण्यात येईल. थोरांचे मरण म्हणजे एक दिव्य वस्तू आहे, ते अनंताचे दर्शन आहे. किती शांती, किती समाधान.
ज्या संस्कृतीने मरणाचे जीवन बनविले, त्या संस्कृतीच्या उपासकांत आज मरणाचा अपरंपार डर भरून राहिला आहे. मरण हा शब्दही त्यांना सहन होत नाही. केवळ शरीराला कुरवाळणारे सारे झाले आहेत. महान ध्येयासाठी ही देहाची मडकी हसत हसत फोडावयास जे निघतील, तेच भारतीय संस्कृतीचे खरे उपासक. कातडी सांभाळणारे भारतीय संस्कृतीचे पुत्र शोभत नाहीत. भारतातील सर्व प्रकारचे दैन्य, दास्य, सर्व प्रकारचे विषयम वैषम्य, सर्व प्रकारचा अंधार दूर करण्यासाठी देहाची बलिदाने करावयास लाखो कन्या-पुत्र उठतील, त्या वेळेसच भारतीय संस्कृतीचा सुगंध दिगंत जाईल व भारत नवतेजाने फुलेल.
(कॉन्टिनेन्टल प्रकाशन प्रकाशित आणि साने गुरुजी लिखित ‘भारती संस्कृती’ या पुस्तकावरून साभार.)
संकलन – शेखर जोशी
नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्विमा मंडळ यांच्या सहकार्याने आणि जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड व तन्वी हर्बल्स यांच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धा होत आहे.