‘हेरिटेज की हॅरॅसमेंट’ हा लेख (रविवार विशेष, ८ डिसेंबर) व त्यातील नागरिकांच्या समस्या वाचून मन सुन्न झाले. कारण नेमकी अशीच किंबहुना यापेक्षा भयंकर स्थिती पुण्याची आहे.
पुण्यातील शनिवारवाडा हा ‘ए’ ग्रेड हेरिटेजमध्ये समाविष्ट आहे. शनिवारवाडय़ाच्या १०० मीटर परिसरात चारही बाजूंना कोणत्याही बांधकामाला परवानगी नाही. या भागात जुने ४०० ते ५०० वाडे आहेत. अंदाजे ४० हजार लोक यामुळे बेघर होत आहेत, परंतु कोणालाही याच्याशी देणे-घेणे नाही. या परिसरातील लोकांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रणब मुखर्जी, पंतप्रधान यांना अनेक वेळा निवेदने दिली व नियमात शिथिलता आणावी अशी विनंती केली, पण याचे साधे उत्तर दिले गेले नाही. शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांना या दु:खाचा कळवळा आला पण त्यांनीही उत्तर दिले नाही.  कारण या परिसरात शिवाजी पार्कसारखे कोणी मोठे नेते राहत नाहीत. एसीत बसून लोकांची घरे हेरिटेजमध्ये टाकली तर त्यांचे काय जाते? इतर राज्यांतील खासदारांनी विरोध करून काही बांधकामांना परवानगी मिळवली, पण महाराष्ट्रात काहीही झाले नाही.‘दादांच्या’ भेटीसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले पण पालकमंत्री म्हणून आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचल्याच नाहीत. राजकारणी असंवेदनशील असल्यावर जनतेची अशी फरफट होणारच. आपण मॉडेल कॉलनीत राहायचे व हेरिटेजची यादी तयार करून समाजसेवेचा भास निर्माण करायचा, हा उद्योग करणाऱ्यांनी निदान या परिसरातील लोकांचे म्हणणे तरी ऐकून घ्यायचे.
या परिसरातील आम्ही लोक मध्यमवर्गीयआहोत. कशी पुण्यात घरे घेणार? आता शनिवारवाडय़ाच्या परिसरात चारही बाजूंना ४ ते ५ मजली इमारती आहेत. फक्त छोटय़ा गल्लीत काही पडके वाडे व घरे आहेत. त्यांना परवानगी द्या, त्याने या ऐतिहासिक वास्तूस धोका पोहोचत नाही. कृपा करून, इतिहास जपण्यासाठी लोकांचे भविष्य उद्ध्वस्त करू नका.