दयानंद लिपारे

भारतात शेतीखालोखाल दुग्ध व्यवसायात सर्वाधिक शेतकरी गुंतलेले असून त्याद्वारे ते आपला उदरनिर्वाह चालवतात. मात्र हा व्यवसाय करताना आजही पारंपरिक पद्धतीने केला जात असल्याने त्यात उत्पादन आणि उत्पन्न या दोन्हीतही फारशी वाढ झाल्याचे दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील एका तरुण शेतकऱ्याने घरचा पारंपरिक दुग्ध व्यवसाय आधुनिक पद्धतीने करत आज त्याचे उद्याोगात रुपांतर केले आहे. दुग्ध व्यवसायातील याच रजत यशाची ही कहाणी!

priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
devendra fadnavis and manoj jarange patil (1)
मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट, “देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला आणि..”
conservation of land component important in agriculture business
क्षारपड जमिनीचे पुनरुज्जीवन
article on lyricist poet gulzar
मैं नज्मे ओढ कर बैठा हुआ हूँ!

तरुणाई व्यवसायात उतरली की ती त्यांचा आधुनिक दृष्टिकोन घेऊन उतरते. स्वाभाविकपणे त्याचे फायदेही दिसू लागतात. शिरोळ तालुक्यातील जांभळी गावात पशुपालन करणारे आकाश मोटके पाटील या तरुणाची वाटचाल खचितच मार्गदर्शक ठरणारी आहे. मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या आकाश यांनी पशुपालनाचा व्यवसाय वाढवतानाच आरोग्य नियंत्रण प्रणाली सारखे नवीन प्रगत तंत्रज्ञान देशात प्रथमच वापरात आणले. यामुळे गाईंच्या एकूणच पालनपोषणाचा सविस्तर अहवाल हाती मोबाइलवर उपलब्ध होऊ लागला. जनावरांचे आरोग्य आणि दुधाची प्रत सुधारण्यास मोलाची मदत झाली. यामुळे ३०० गायींचा मोटके डेअरी फार्म हे दुग्ध व्यवसायातील रजत यशाचे प्रतीक ठरले आहे.

आण्णासाहेब मोटके पाटील हे जयसिंगपूरमध्ये स्थायिक झालेले. हरहुन्नरी, प्रयोगशील शेतकरी. त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांनी अनेक प्रकारचे उद्याोग केले. २५ वर्षापूर्वी जांभळीच्या माळावर त्यांनी गोपालनाला सुरुवात केली. आदर्श गोठा व्यवस्थापन कसे करावे, हे त्यांच्याकडून शिकावे इतके उत्तम काम. त्यांचे सुपुत्र आकाश यांनी वडिलांचा हाच कित्ता पुढे चालवला.

आकाश यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी २०१३ मध्ये प्राप्त केली. तो काळ औद्याोगिक मंदीचा होता. त्यामुळे त्यांनी नोकरीच्या फंदात न पडता घराच्या, वडिलांनी सुरू केलेल्या पशुपालनात लक्ष घालण्याचे ठरवले. आधीचाच स्थिरस्थावर पशुपालन व्यवसाय आधुनिक पद्धतीने पुढे नेण्याचा दृष्टिकोन सुरुवातीपासूनच बाळगलेला. आपल्या अभियांत्रिकी ज्ञानाचा फायदा गोपालनात करण्याचे ठरवले. नियोजन केले. दिशा ठरवली. पावले टाकली आणि यशाने साथ दिली. असे मोटके डेअरी फार्म आणि त्याला नवतेची दिशा देणाऱ्या आकाश मोटके यांच्याबाबत म्हणता येईल.

सध्या त्यांच्याकडे ३०० गायी आहेत. त्यापैकी दुधावरची १२५. याद्वारे इथे रोज सरासरी २३०० लिटर दूध संकलन होते. यापैकी १५०० ते १८०० लिटर दूध हे दुग्धजन्य पदार्थांसाठी पाठवले जाते. तर उरलेले वारणा दूध संघाला पाठविले जाते. एवढ्या जनावरांच्या गोठ्याचे संपूर्ण व्यवस्थापन यंत्राद्वारे करणे आणि त्यापासून दुग्धजन्य पदार्थ निर्मितीत वेगळा ठसा उमटवणारा डिजिटल गोसंगोपनाचा आदर्श मोटके डेअरी फार्ममध्ये पाहायला मिळतो. या गोठ्यावरील प्रत्येक गोष्ट ही अत्याधुनिक यंत्राद्वारे केली जाते.

आरोग्य नियंत्रण प्रणाली

आपल्याकडे ‘डॉक्युमेंटशन’ला फार महत्त्व कोणी देत नाही. इथे मात्र गोठ्यावरच्या प्रत्येक गायीचा, म्हशींचा, कालवडींचा इतिहास नीट नोंद करून ठेवला आहे. त्याची संगणकावर नीट मांडणी केली. वैरण असू दे नाहीतर पशुखाद्या प्रत्येक गोष्ट अगदी मोजून मापून दिली जाते, त्याच्या नोंदी ठेवल्या जातात. यासाठी आरोग्य नियंत्रण प्रणाली (हेल्थ मॉनिटिरिंग सिस्टीम) देशात प्रथमच इथे अवलंबली गेली. त्यासाठी जनावरांच्या कानात टॅग (आता गळ्यात) लावला जातो. जनावराचा रोजचा आहार कोणता, किती खाद्या खाल्ले, आजारी पडणार असेल तर त्याची पूर्वकल्पना, जनावर माजावर कधी येणार, ते कधी भरवायला हवे अशा साऱ्या बाबी या तंत्रज्ञानाने वेळेवर समजतात. यासाठी पूर्वी प्रति जनावर ६ हजार रुपये तीन वर्षासाठी आणि आता गळ्यातील १४ हजार रुपये सात वर्षांसाठी असा टॅग लावण्यात आला आहे.

संतुलित पशुआहार

पशुआहार हाच दुग्ध व्यवसायाचा आत्मा आहे. तो नीट साधला तरच या व्यवसायामध्ये यश साध्य होते. येथे प्रति गाय, प्रतिदिनी मुरघास २२ ते २५ किलो, हरभरा भुसकट – ४ ते ५ किलो, गोळी पेंड – ४०० ग्रॅम याशिवाय स्वत:ची मिनरल मिक्स १५० ग्रॅम प्रति गाय, प्रति दिनी दिली जातात. अत्याधुनिक मशीनद्वारे शेतातील गवत कापणे, वैरण बारीक करणे, पिण्याच्या पाण्याची सोय, गाईचे दूध काढणे या प्रक्रियेतून गाईच्या शेणापासून वीज व खतनिर्मिती प्रकल्प यशस्वी केला. सध्या ३०० संकरित गाईचा मुक्त गोठा आहे. या गोठ्यामध्ये गाईच्या दूध देण्याच्या क्षमतेनुसार त्यांचे वर्गीकरण करून वेगवेगळ्या जागी त्यांना ठेवण्यात येते. वर्गीकरणाच्या जागेत गाईच्या गरजेएवढे संतुलित खाद्या पुरविण्यात येते. २४ तास सायफन पद्धतीने पिण्याचे शुद्ध व थंड पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पाण्याच्या फायर सिस्टिमद्वारे संपूर्ण गोठ्यामध्ये शीतलता निर्माण करण्यात आली आहे. कापलेला चारा अत्याधुनिक चापकटर (कडबाकुट्टी) यंत्राद्वारे बारीक करण्यात येतो. बारीक केलेल्या चाऱ्यामुळे गाईंची चर्वण क्रियेसाठी ताकद वाया जात नाही. पचनक्रिया चांगली राहते. जादा गुणवत्ता व दूध देण्याचे प्रमाण वाढते. हिरव्या चाऱ्यामध्ये बऱ्याचशा पोषक द्रव्यांची कमतरता असते. यामुळे मिनरल मिक्चर म्हणून व्हिटॅमिन व इतर पोषक द्रव्ये चाऱ्यांबरोबर देण्यात येतात.

स्वत:ची मुरघास शैली

मुरघाससाठी स्वत:च्या शेतातील मका, तसेच बाहेरून वैरण विकत घेतली जाते. असे दोनशे टनाचे दोन बंकर आमच्या गोठ्यावर आहेत. त्यामध्ये संपूर्ण गोठ्याला पुरेल असे पुढच्या सहा महिन्याचे मुरघास भरून ठेवलेले असते. वर्षातून दोनदा ती भरली जातात आणि गरजेनुसार त्याचा वापर केला जातो. यासाठी भरताना किंवा काढताना जेसीबीचा वापर केला जातो. ते दबण्यासाठी आणि त्यातील हवा बाहेर काढण्यासाठीसुद्धा जेसीबीचा वापर केला जातो. जेसीबीच्या सहाय्यानेच बंकरमधील संपूर्ण हवा बाहेर काढली जाते. त्यानंतर ६० दिवसांनंतर किण्वन (फरमेंटशन) साठी ठेवून ६० दिवसांनंतर जनावरांना खाण्यास दिले जाते. एका वेळी पुढील सहा महिन्याचे मुरघास आमच्याकडे तयार असते. यामुळे खर्चातही मोठी बचत होते.

दूध आणि दुग्धोत्पादने

टोटल मिक्स रेशन (टी.एम.आर) मशीनव्दारा मुरघास, सुकाचारा, पशुखाद्या, मिनरल मिक्चर आदी पोषकद्रव्ये एकत्र करून वर्गीकरण केलेल्या गाईच्या ठिकाणी ट्रॅक्टरद्वारे खाण्यासाठी पुरविण्यात येतो. यामुळे वैरणीची सकसता टिकते. वैरणीच्या सर्वात लहान भागाचाही उपयोग होत असल्याने ती वाया जात नाही. गाईचे दूध काढण्यासाठी बकेट मिल्किंग मशीनचा वापर करण्यात येतो. यामुळे गाईला त्रास न होता दूध काढण्याची प्रक्रिया होते. दूध येताना पारदर्शी क्लस्टरमधून दिसते. दूध काढण्यास कमी वेळ व मनुष्यबळही कमी लागते. सध्या २३०० लिटर दूध निघते. ते दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी वापरले जाते. मोटके डेअरी या ब्रॅण्डने परिसरामध्ये श्रीखंड, बासुंदी, आम्रखंड, ताक, लस्सी, दही, खवा, पनीर, तूप, फ्रुटखंड व अनेक प्रकारच्या रबड्या तयार केल्या जातात. आमच्याकडे दररोज शेणापासून १५० युनिट वीज तयार होते. त्यामुळे हा गोठा व परिसर विजेबाबतीत स्वयंपूर्ण आहे.

आधुनिक उपाययोजना

अशा अत्याधुनिक पद्धतीने शेतीपूरक गोपालन, संगोपन, दूध उत्पादन, बायोगॅस निर्मिती यातून शेणखत निर्मितीचा हा अनोखा प्रकल्प आम्ही उभारला आहे. ३ कोटी रुपयांचे भांडवल गोठ्यावर उभे आहे. १७० दुभत्या गाई आहेत. त्यामध्ये ११० आयात कालवडी आहेत. यातील सर्व गायी स्वत:च्या गोठ्यावर तयार झालेल्या आहेत. पशुखाद्यामध्ये गोळी पेंड ५० टक्के ब्रॅण्डेड कंपनीचे व ५० टक्के स्वत: तयार केलेले जास्त प्रथिने वापरतो. ४० किंवा त्याहून जास्त दूध देणाऱ्या गायींसाठी अधिक पोषक घटक असलेले मॅश वापरतो. जोपर्यंत वैरण पुरेशी असते, तोपर्यंतच दूध उत्पादन चांगले होते. गोठा व्यवस्थापनात ६० टक्के वैरण आणि ४० टक्के पशुखाद्या हवे. हे चांगल्या गोठ्याचे लक्षण समजले जाते. मुक्त गोठा असल्याने गाईच्या ठिकाणी जाऊन दूध काढणे या करिता लागणारा वेळ, मनुष्यबळ, वाहतूक व वातावरणाशी आलेल्या संपर्कामुळे दुधाचा दर्जा राखणे कष्टदायक ठरते. या सर्व प्रक्रियेतून गेल्यानंतर मिल्किंग पार्लरची सोय केली आहे. दूध काढण्याची वेळ झाली की गाई आपोआप त्यांच्या-त्यांच्या जागी येऊन उभ्या राहतात. त्यांचे मशीनव्दारे दूध काढणे व त्याचा विनास्पर्श व हवेशी संपर्क होणार नसल्याने दुधातील बॅक्टेरिया वाढत नाहीत. लवकरच मिल्किंग पार्लर सिस्टिम सुरू होत आहे.

आपल्याकडे शेतीसोबत दुग्ध व्यवसायात मोठ्या प्रमाणात शेतकरी गुंतलेले आहेत. परंतु हा व्यवसाय करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न केल्याने दूध उत्पादन आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम होत असतो. या साऱ्याचा अगदी मुळापासून विचार केल्याने यश मिळाले. आकाश मोटके पाटील

dayanandlipare@gmail. com