अभिजीत ताम्हणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ललित-लेखकांनी केलेली ही नेतृत्वाची चिकित्सा कधी वेगळे मुद्दे मांडते, तर कधी तपशिलांत गुरफटते..

संकलित, संपादित पुस्तकांना अनेकदा पूर्णत: चांगलं- किंवा वाचनीय / अ-वाचनीय ठरवता येत नाही. या पुस्तकांतले काही लेख वाचनीय, तर काही फसलेले असतात. पुस्तकाच्या संपादकांची भूमिका किंवा त्यांची प्रस्तावनाही फार पटणारी, विषयाला संपूर्ण न्याय देणारी असतेच असं नाही. मात्र एकदोन लेख अत्यंत वाचनीय असल्यानं त्या पुस्तकाची शिफारस केली जाते.. ‘स्ट्राँग मेन’ या पुस्तकाची गत अशीच झाली आहे.

पुस्तकाचा विषय हा अनेकांच्या चर्चेतला. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प, भारतात नरेंद्र मोदी, तुर्कस्तानात रिसिप तयीप एदरेगन अशा नेत्यांचा उदय झाल्यानंतर ‘हुकूमशाहीचे पुनरागमन’ अशी टीका त्या-त्या देशातल्या विरोधकांनी सुरू केलेली आहेच, त्या टीकेत वाहावत न जाता हाताळलेला. या तिघा नेत्यांबरोबरच फिलिपाइन्सचे रॉड्रिगो डय़ुटेर्टे यांनाही या पुस्तकात स्थान देण्यात आलेलं आहे. पुस्तकाचं वैशिष्टय़ म्हणजे, या नेत्यांबद्दल लिखाण करणारे सारेजण, त्या-त्या देशांतले नाटककार किंवा कादंबरीकार आहेत. इव्हा एन्सलर (अमेरिका) आणि दानिश हुसेन (भारत) यांनी नाटककार म्हणून, तर बुऱ्हान सोन्मेझ (टर्की) आणि निनोच्का रोस्का (फिलिपाइन्स) यांनी कादंबरीकार म्हणून ओळख प्रस्थापित केलेली आहे. ‘साहित्यिकांनी राजकारणात पडू नये’ वगैरे भूमिकांना आपसूक छेद देण्याची संपादकांची कल्पना एकवेळ मान्य, पण या ललित-साहित्यकारांकडून त्यांना अपेक्षित असलेलं, तितक्या ताकदीचं  लिखाण या पुस्तकात झालेलं आहे का?

‘होय- शंभर टक्के झालंय’ अशी दाद पहिलाच लेख- इव्हा एन्सलर यांनी ट्रम्प यांचं नावही न घेता लिहिलेला गोष्टवजा लेख- वाचून बहुतेकजण देतील. ‘अ फेबल’ शीर्षकाच्या या मजकुरात जणू आपण कल्पितकथाच सांगत आहोत, अशा थाटात आणि ते सूत्र कुठेही न सोडता, इव्हा यांनी वाचनानंद दिला आहे.. ट्रम्प यांच्या पिंगट नारिंगी केसांचं फार कौतुक होत असतं, हे लक्षात ठेवून इथं या नेत्याचा उल्लेख ‘आँरेंज ईडियट’ असाही झालेला आहे. पण या विशेषणबाजीच्या पलीकडे जाऊन, ट्रम्प यांच्या उदयासाठी कोणाकोणाला जबाबदार धरणार, भांडवलशाहीनं स्वत:चं अस्तित्व बळकट करण्यासाठी वर्षांनुवर्ष ज्या युक्त्याप्रयुक्त्या योजल्या, त्यांचंच हे कटू फळ नव्हे का, याची जाणीव वाचकाला दिली आहे.. हे आता थांबणार नाही, असा इव्हा यांचा होरा दिसतो. परंतु त्यात निराशावाद नाही, उलट वाचकाला ‘हे असं चालवू देणार का तुम्ही?’ असा थेट प्रश्न विचारण्याऐवजी त्यांनी हा सूर शेवटी लावणं पसंत केलं असावं, असं लक्षात येतं- कारण आधीचा अख्खा मजकूर संघर्षशील संवेदनांची ग्वाही देत असतो! ‘संघर्षशील संवेदना’ या शब्दापाशी काही वाचक अडखळतील.. अर्थ कदाचित प्रतीत होणार नाही. त्यांनी या प्रतीतीसाठी, इव्हा यांनीच लिहिलेलं आणि मराठीत ‘योनीमनीच्या गोष्टी’ या नावानं सादर झालेलं ‘व्हजायना मोनोलॉग्ज’ हे नाटक अवश्य पाहावं.

पुढला, दानिश हुसेन यांचा मोदींबद्दलचा लेख मात्र, माहितीच्या भडिमारात गुरफटलेला वाटतो. मोदी यांची राजकीय कारकीर्द नीटसपणे रेखाटणं, त्याआधी ‘हिंदुत्वा’चा विचार मांडणारे सावरकर, रा. स्व. संघाची स्थापना, स्वातंत्र्याच्या उष:कालात घडलेले जातीय दंगे, राजेन्द्रप्रसाद व सरदार पटेल यांचा पत्रव्यवहार हे इतिहासातले, तर इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी, राजीव गांधी यांनी शहाबानो आणि बाबरी मशीद प्रकरणी घेतलेली बोटचेपी भूमिका,  आदी गेल्या चार दशकांतले संदर्भ लेखकानं दिले आहेत. अभारतीय वाचकांना ते उपयोगी पडतीलही, पण बाकीचा लेख जितक्या रसरशीतपणे उलगडावा अशी अपेक्षा दानिश हुसैन यांना गोष्ट सांगताना पाहिलेल्या वाचकांची असेल, तितक्या प्रमाणात ती पूर्ण होत नाही एवढं नक्की.

एदरेगन यांच्याविषयीच्या प्रकरणाची सुरुवात अपेक्षावर्धक आहे.. बोटामधली विवाहाची अंगठी काढून दाखवत एदरेगन जाहीर करतात: ‘ही माझ्याकडची सारी संपत्ती’- १९९९ सालच्या या प्रसंगाचं वर्णन आहे इथं!  नंतरच्या दोन दशकांत एदरेगन यांच्या संपत्तीत कैकपटींनी वाढ झालीच, पण लेखाचा भर त्यावर नसून, ‘मीही फाटका, निर्धन आहे’ अशा प्रतिमेपासून पुढे ‘माझ्यावर अन्याय झाला आहे’.. ‘धर्म आणि राष्ट्र यांचा अभिमान हाच माझा एकमेव गुन्हा’ अशी प्रतिमा रचणं, यावर आहे. ‘अतातुर्क’ केमाल पाशाचा सूचक उल्लेख ‘दारूडय़ा’ असा एदरेगन करतात आणि त्यांनी तुर्कस्तानला सेक्युलर राष्ट्र ठरवलं म्हणून आपण आजही ते मान्य करायचं का, असा सवालही करतात. लेखक बुऱ्हान सोन्मेझ हे मूळ तुर्कीच असूनही, जणू पूर्व-युरोपीय कादंबरीकाराला  साजेशा संथपणानं, बिनमहत्त्वाच्या वाटणाऱ्या तपशिलांतून महत्त्वाचे मुद्दे मांडत राहातात.

फिलिपाइन्सचे रॉड्रिगो डय़ुटेर्टे हे त्या देशातील माकरेस यांच्या मनमानीचा अनुभव लोकांनी घेतल्यानंतर सत्तारूढ झाले आहेत. कामगार संघटनांसारखी मूठ हे प्रतीक वापरताना डय़ुटेर्टे यांनी या मुठीचा ‘ठोसा’च केला, तरुण- आश्वासक- सशक्त नेतृत्व अशी स्वत:ची प्रतिमा निर्माण करताना ‘मर्दपणा’च्या लैंगिक कल्पनांचाही आधार ते घेतात, असं स्त्रीवादी कादंबरीकार निनोच्का रोस्का यांनी सूचित केलं आहे.  म्हणजे ते लैंगिक अत्याचार करीत नाहीत, पण आक्रमकता, व्यवस्थांविषयी असलेला अनादर यांतून हा कथित ‘मर्दपणा’ दिसून येतो. फिलिपाइन्समध्ये न्यायपीठ आणि आपल्या महालेखापरीक्षकांसारखी व्यवस्था या दोहोंच्या प्रमुखपदी असलेल्या स्त्रियांचा विरोध डय़ुटेर्टे यांनी कसा गुंडाळला, याचे दाखले या लेखात आहेत.

‘ललित साहित्यकार’ म्हणून एरवी ज्यांना ओळख आहे, त्यांनी आपापल्या देशांतल्या राजकीय नेत्यांविषयी लिहावं, या कल्पनेचा पाठपुरावा करून, पुस्तकाचं संपादन केलं आहे विजय प्रशाद यांनी. त्यांनी प्रस्तावनाही ललित अंगानंच लिहिली असल्यानं, या चौघा नेत्यांकडे आज उच्चपदं असल्याच्या वस्तुस्थितीचा नेमका अर्थ काय लावायचा, किंवा या नेत्यांचा उदय लेखक-कवी- नाटककारांना का अस्वस्थ करतो, याचं दिग्दर्शन होत नाही.  डावे पक्ष उरले नाहीत, कामगार  संघटना नाहीत, हे नमूद करणारी प्रशाद यांची प्रस्तावना, जणू याबद्दल ज्यांना खेद वाटतो त्यांच्याचसाठी त्यांनी लिहिलेली आहे आणि बाकीच्यांसाठी नाही!

तरीही, केवळ ट्रम्पवरल्या उत्तम लेखासाठी हे पुस्तक वाचावंच, असं आहे.

स्ट्राँग मेन

संपादक : विजय प्रशाद

प्रकाशक : लेफ्टवर्ड बुक्स पृष्ठे : १०२,

किंमत : १५०  रुपये

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strong maine book vijay prashad
First published on: 23-02-2019 at 00:16 IST