भारतीयांची भावनात्मक नाडी..

८१ टक्के हिंदूंबरोबरच एकतृतीयांश ख्रिस्ती ‘गंगेच्या पाण्यात सर्वाना पवित्र करण्याची शक्ती आहे

|| बापू राऊत

जगभरातील धार्मिक, सामाजिक आणि राजकीय बदलांचा जनमानसावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या ‘प्यू रिसर्च सेंटर’ने अलीकडेच भारताविषयीचा सर्वेक्षणआधारित अहवाल प्रसिद्ध केला. भारतीय जनमानसाचा कानोसा घेणाऱ्या या अहवालातून अधोरेखित होणाऱ्या मुद्दय़ांविषयीचे हे टिपण..

अलीकडेच ‘प्यू रिसर्च सेंटर’चा संशोधन अहवाल प्रकाशित झाला. ‘प्यू रिसर्च सेंटर’द्वारे जगभरातील धार्मिक, सामाजिक आणि राजकीय बदलांचा जनमानसावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास व त्याचे विश्लेषण करून निष्कर्ष काढण्यात येतात. भारतात ‘प्यू रिसर्च सेंटर’द्वारे १७ नोव्हेंबर २०१९ ते २३ मार्च २०२० या काळात राष्ट्रीय स्तरावर १७ भाषांमध्ये एकूण ३० हजार भारतीयांकडे जाऊन प्रत्यक्ष समोरासमोर बसून प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात सर्वेक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे अशा नमुना सर्वेक्षणाच्या मर्यादा व कमी-अधिक त्रुटी लक्षात घेतल्या तरी, असे सर्वेक्षण विश्वासार्ह असते असे मानायला हरकत नाही. तरीही ‘प्यू रिसर्च सेंटर’ने केलेले सर्वेक्षण आणि त्याद्वारे काढलेले निष्कर्ष यांची सावधगिरी बाळगून विश्लेषण व मूल्यमापन केले पाहिजे. ‘प्यू’च्या सर्वेक्षणातून एक प्रकारे भारतीयांच्या मनात असलेल्या भावना समोर आल्या आहेत. भारतीयांमध्ये असलेली धार्मिकता, एकमेकांबद्दल असलेला भाव, भारतीय स्त्री व जातीभावना यांबरोबर राजकारणातील जटिलता यांवर त्यातून प्रकाश पडतो.

या सर्वेक्षणानुसार, प्रत्येक भारतीयाला त्याच्या देशाने नागरिकांच्या स्वातंत्र्योत्तर आदर्शाचे पालन केले असल्याचे वाटते. देशात विभिन्न धर्म असले, तरी प्रत्येक धर्मातील लोक आपापल्या धर्माचे स्वेच्छेने आचरण करू शकतात. ‘प्यू’च्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात धर्मपरायण आहे. त्यामुळे यातून एक अनोखा व आजपर्यंतच्या मान्यतेला छेद देणारा निष्कर्ष निघतो; तो म्हणजे- भारत हा एक धार्मिक वा धर्मपरायण देश म्हणून उदयास येणे होय. असे असले तरी, असंख्य भारतीय लोक धार्मिक सहिष्णुतेला त्यांच्या राष्ट्राच्या अस्तित्वाचा मुख्य गाभा मानतात. बहुतेक लोक खरेखुरे भारतीय असण्यासाठी सर्व धर्माचा आदर करणे अतिशय महत्त्वाचे आहे असे मानतात.

सर्वेक्षणानुसार, अनेक समुदायांत अनेक समजुती प्रचलित आहेत. कर्मावर विश्वास ठेवणे ही त्यांपैकीच एक. भारतात ७७ टक्के हिंदू हे कर्मावर विश्वास ठेवतात, त्याच प्रकारे मुस्लीमदेखील त्याच टक्केवारीच्या प्रमाणात कर्मावर विश्वास ठेवतात. ८१ टक्के हिंदूंबरोबरच एकतृतीयांश ख्रिस्ती ‘गंगेच्या पाण्यात सर्वाना पवित्र करण्याची शक्ती आहे’ या संकल्पनेला मानतात, तर उत्तर भारतात १२ टक्के हिंदू, १० टक्के शीख आणि त्याचबरोबर ३७ टक्के मुस्लीम इस्लामशी सबंधित असलेल्या सुफीवादाच्या गूढ परंपरेशी नाते जोडतात. धार्मिक पार्श्वभूमी असलेले व बहुसंख्य भारतीय हे आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या व्यक्तीचा मान राखणे हा त्यांच्या श्रद्धेच्या दृष्टिकोनाचा भाग आहे असे मानतात. असे असले तरी, काही विशिष्ट समान मूल्ये, धार्मिक निष्ठा आणि एकाच संविधानाच्या छत्रछायेखाली राहत असतानाही त्यांना आपल्यात भिन्नता आहे असे वाटते. ६६ टक्के हिंदू स्वत:ला मुस्लिमांपेक्षा अत्यंत भिन्न समजतात, तर मुस्लिमांमध्येसुद्धा (६४ टक्के) आपण हिंदूंपेक्षा वेगळे असल्याची भावना आहे. सर्वसाधारणपणे ख्रिस्ती, जैन, बौद्ध धर्माच्या समुदायांतसुद्धा स्वत:ला इतरांपासून भिन्न समजण्याची वृत्ती आहे.

सामाजिक विज्ञानाचा एक सिद्धान्त आहे : जसजसा एखादा देश आर्थिक विकासात पुढे पुढे जातो, तसतसा त्या देशातील जनता अधार्मिक व आधुनिक विचाराची बनत जाते. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपीय देश, जपान व चीनमध्ये हे बघायला मिळते. परंतु भारत हा त्यास अपवाद असल्याचे अनुभवास येते. ‘प्यू’च्या सर्वेक्षणातील निरीक्षणानुसार, जवळपास अधिक भारतीय (९७ टक्के) ईश्वरावर विश्वास असल्याचे कबूल करून ८० टक्के लोक ईश्वर अस्तित्वात असल्याचे मान्य करतात. देवावर व त्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवण्यामध्ये शिक्षित, अशिक्षित, शहरी व ग्रामीण भागांतील लोकांचे सारखेच प्रमाण आहे. मात्र, बहुतांश बौद्ध धर्मीय ईश्वराचे अस्तित्व नाकारून त्यावर अविश्वास व्यक्त करतात. बहुतांश हिंदूंचा देवावर विश्वास असला तरी, कोणता देव तुमच्या अधिक जवळचा असे विचारण्यात आले तेव्हा त्यांनी एकापेक्षा अनेक व व्यक्तिगत देव निवडले. सामान्यपणे सर्वात प्रिय म्हणून शंकर (४४ टक्के) अधिक जवळचा वाटतो, त्यानंतर हनुमान (३५ टक्के) आणि गणपती (३२ टक्के) यांचा क्रमांक लागतो.

स्त्रियांबाबत भारतीयांचा वैचारिक खुजेपणा दिसून येतो. अनेक भारतीय स्त्री-पुरुषांत होणारे धर्मबाह्य़ विवाह रोखले पाहिजेत या मताचे आहेत. ६४ टक्के भारतीयांना त्यांच्या समाजातील स्त्रियांना आंतरजातीय विवाह करण्यापासून रोखले पाहिजे असे वाटते, तर ६२ टक्के लोकांना त्यांच्यातील पुरुषांनी आंतरजातीय लग्न करू नये असे वाटते. धर्माचा विचार केल्यास हिंदू (६७ टक्के) आणि (८० टक्के) मुस्लीम हे आपल्या स्त्रियांनी इतर धर्मातील व्यक्तीशी विवाह करू नये या मताचे आहेत.

सर्वेक्षणानुसार, भारतीय समाज हा ठिगळ जोडलेल्या कापडासारखा आहे. भारतीयांना (८६ टक्के) त्यांच्या स्वत:च्या समुदायातील लोकांमध्येच उत्कटतेने मैत्री करावीशी वाटते. ही प्रवृत्ती हिंदू (८६ टक्के), मुस्लीम (८८ टक्के), शीख (८० टक्के) समुदायात जवळपास सारखीच असल्याचे बघायला मिळते. यावरून भारतीयांच्या आंतरिक मनातील भिन्नताभाव व प्रेमभावना ही ज्याच्या-त्याच्या जाती व धर्म समुदायाशीच अधिक निगडित असते, हे स्पष्ट होते.

भारतातील बहुतांश हिंदू भारतीयत्वाचा मक्ता स्वत:कडेच ठेवताना दिसतात. ‘खरेखुरे’ भारतीय होण्यासाठी ६४ टक्के हिंदूंना हिंदू असणे गरजेचे वाटते, तर ५९ टक्के हिंदू भारतीयत्वासाठी हिंदी भाषेच्या आवश्यकतेवर जोर देतात. याच विचारांच्या हिंदूंनी (६० टक्के) २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मत दिल्याचे मान्य केले आहे. म्हणूनच भाजपने सत्तेचे स्थान मिळविण्यासाठी हिंदू, हिंदी आणि धर्मपरायणतेला आपल्या प्रचाराचे केंद्रबिंदू बनवलेले आहे. भाजपला मतदान करणाऱ्या ८० टक्के हिंदूंना आपल्या स्त्रियांनी धर्मबाह्य़ विवाह करण्यास रोखले पाहिजे असे वाटते.

भारतातील ९५ टक्के मुस्लीम जनतेला आपण भारतीय असण्याचा अभिमान वाटत असून त्यांना भारतीय संस्कृतीविषयी कमालीची आस्था आहे. भारतात सामुदायिकपणे होणाऱ्या हिंसेला देशातील फार मोठी आपत्ती मानणाऱ्या गटात शीख (७८ टक्के) वगळता सर्व धर्मीयांचे सारखेच प्रमाण (६५ टक्के) आहे. सर्व भारतीयांच्या जीवनात धर्माला महत्त्वाचे स्थान आहे. ८१ टक्के बौद्ध धर्मीय स्वत:च्या धर्माचे चांगले ज्ञान असल्याचा दावा करतात, परंतु इतरांच्या तुलनेत ते रोजच्या प्रार्थनेला अधिक महत्त्व देत नाहीत.

सर्वेक्षणात समोर आलेली तथ्ये निराशाजनक आहेत. आपल्या देशात जातीच्या आधारावर भेदभाव होतो याची बऱ्याच भारतीयांना जाणीवच नाही. अनुक्रमे २० टक्के, १९ टक्के आणि १३ टक्के भारतीयांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींवर सामाजिक भेदभाव होत असल्याची जाणीव आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, अनुसूचित जातींतील केवळ २७ टक्के लोकांनाच त्यांच्या समुदायावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव आहे. अनुसूचित जमातींच्या २६ टक्के आणि ओबीसींच्या १३ टक्के समुदायांनाच आपल्या जातीवर अन्याय होतो असे वाटते. तर २४ टक्केच मुस्लीम जनतेला मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचे वाटते.

सध्याच्या काळात धार्मिकता सामाजिक व्यवहारात अधिक सक्रिय झाली असून त्याचा उपयोग राजकारणाच्या फोडणीत होऊ लागला आहे. राष्ट्रवादाचे संगोपक अधिकाधिक लोकांना धर्मभावनेत अडकवू पाहताहेत. याचा सारासार विचार केला, तर लोकही त्यात सहज अडकू लागले आहेत असे दिसते. उपाशी व बेरोजगार अवस्थेत मेलो तरी चालेल, पण माझ्या धर्मभावनेला आच यायला नको असे भारतीयांस वाटते. भारतीय जनता पक्षाला मिळत असलेल्या यशाला याच धर्मभावनेचा मोठा आधार आहे. याअगोदर भारतीय राजकारणात राजकीय सत्तेत उलथापालथी झाल्या आहेत, परंतु तेव्हा धर्मभावनेचा व मुस्लीमद्वेषाचा एवढा आगडोंब नव्हता. त्यामुळे भारतीय भावी राजकारणासाठी हा एक नवा अध्यायच म्हणायला हवा.

‘प्यू रिसर्च सेंटर’च्या सर्वेक्षणावरून, एकीकडे एकत्र जगण्याविषयीच्या मतभिन्नतेतूनही भारतीय एकात्मतेची गढी मजबूत दिसत असताना, दुसरीकडे भारत ‘धर्मदेशा’च्या प्रस्थापनेकडे वाटचाल करीत असून हिंदुत्व, हिंदू आणि हिंदी भाषा हे त्याचे निदर्शक आहेत. माध्यमतंत्र, उत्कृष्ट भाषणशैली, आस्था आणि संस्था या मुख्य साधनांचा वापर सत्ता निरंकुशपणे आपल्या हातात ठेवण्यासाठी होणे, हे लोकशाहीच्या अंताचेच लक्षण आहे. भारतीय लोकांची भावनात्मक नाडी बघण्यासाठी प्रत्येकाने ‘प्यू रिसर्च सेंटर’चा अहवाल वाचला पाहिजे.

(लेखक ‘मानव विकास संस्थे’चे अध्यक्ष आहेत.)

bapumraut@gmail.com

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Study of the effects of religious social and political change in the world pew research center akp

Next Story
देणगीदारांची नावे
ताज्या बातम्या