scorecardresearch

पुरबुडीत शेतीत शर्कराकंदची लागवड

५६ सभासदांच्या शेतीवर उसाला पर्यायी पीक म्हणून शर्कराकंद पीक बहरात आले आहे.

सततची अतिवृष्टी, पुरामुळे महाराष्ट्राचे हक्काचे पीक असलेली ऊस शेतीदेखील धोक्यात आली आहे. या अशा बिघडलेल्या निसर्गचक्रात उसाला पर्याय म्हणून कोल्हापुरात शर्कराकंद लागवडीचा पर्याय पुढे आला आहे. याच प्रयोगाविषयी..

जुलैमध्ये महापुराने हाहाकार उडवला. यथावकाश पूर ओसरला. पाठोपाठ केंद्र, राज्य शासनाने मदतीच्या घोषणा केल्या. काही ठिकाणी मदत मिळाली; कोठे ही प्रक्रिया प्रगतिपथावर (शासकीय भाषेत!) सुरू आहे. खेरीज दर महिन्याला येणाऱ्या अवकाळी पावसाने शेतीचे अतोनात नुकसान होत आहे; हा आणखी वेगळा विषय. महापुरातील शेतीचे नुकसान सतत होत असल्याने पर्यायी पिकांचा शोध हा शास्त्रज्ञांचा अभ्यास विषय झाला आहे. काहींनी प्रत्यक्ष यावर काम सुरू केले आहे. शिरोळच्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने याबाबत कृतिशील पावले टाकली आहेत. त्यामध्ये शर्कराकंद (शुगर बीट) लागवड हा उल्लेखनीय म्हणावा असा प्रयोग आकाराला आला आहे. संकटाच्या छायेत गोडवा आणणाऱ्या या उपक्रमाचा हा आढावा.

पश्चिम महाराष्ट्रात महापूर ही नित्याची समस्या बनते की काय अशी परिस्थिती झाली आहे. नेमिची येतो पावसाळा ही उक्ती  सर्वश्रुत आहे. पण एका पाठोपाठ उद्भवणाऱ्या महापुराचा दणका शेतकऱ्यांना संत्रस्त करीत आहे. या शतकाचा विचार केला तरी २००५, २००६, २०१९  आणि २०२१ या चार वर्षांत महापुराने थैमान घातले. २००५ आणि २०१९ सालचा महापूर दाणादाण उडवणारा होता. यंदा तीनच दिवसाच्या ढगफुटी सदृश पावसाने याआधीच्या नदीची पूर पातळी ओलांडली. पावसाची अनिश्चितता, तापमानातील बदल असे प्रश्न शेतीसमोर आव्हान उभे करीत आहेत. यात शेती आणि शेतकरी टिकणे हेही महत्त्वाचे आहे. महापुराचे संकट कायमचे राहणार असे शास्त्रज्ञ, अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ इशारा देत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात परिस्थिती आणखीच निराळी. मुळात हा भाग पश्चिम घाटाचा. सह्याद्रीच्या कुशीतील पश्चिमेकडच्या भागात पावसाचे प्रमाण खूपच अधिक असते. पावसाचे, पुराचे हे सारे पाणी येऊन थांबते ते पूर्वेकडील शिरोळ तालुक्यात. कृष्णा, पंचगंगा, वारणा,दुधगंगा नद्यांच्या हा भाग महापुराच्या विळख्यात सापडतो तो याच तालुक्यात. इथे दोन कारखाने आहेत. शिवाय या तालुक्यातील ऊस किमान डझनभर साखर कारखान्यांना गाळपासाठी जातो. तालुक्यातील एकंदरीत जमिनीपैकी ८५ टक्के जमिनीचे क्षेत्र ऊस पिकाखाली आहे. भाजीपाला, अन्य शेतमालाचे महापुराने मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. वारंवार असाच महापूर धक्के देत राहिला तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आणि साखर उद्योगाचे पुढे काय होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. साखर उद्योग हा राज्यातील महत्त्वाचा उद्योग आहे. शेती, शेतकरी, शेतमजूर, वाहतूकदार अशा लक्षावधी लोकांचा उद्योग,उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून आहे. अशा स्थितीत पर्यायी पिकांचा शोध हाच यावरचा उपाय असू शकतो. या दृष्टीने काहीएक शोध घेणे हे राज्यशासन, शेतकरी, शेतकरी संघटना, कृषीपूरक व्यवसाय, व्यावसायिक, कृषी शास्त्रज्ञ यांच्यासमोर एक आव्हान आहे. महापुराची आणि त्यातून उद्भवणाऱ्या संकटाची चर्चा आणखी किती काळ करायची, याला पर्याय उभा करणे गरजेचे आहे हे ओळखून सकारात्मक मार्ग काढण्यासाठी श्री शिरोळच्या दत्त साखर कारखान्याने महापूर ओसरल्यावर म्हणजे नोव्हेंबर २०२१ मध्ये कृषी तज्ज्ञांच्या उपस्थितीत पाऊस, महापूर आणि त्यावरील पर्याय या विषयावर चर्चासत्र घेतले होते. या मंथनातून सतत महापुराचे सावट असणाऱ्या भागात शर्कराकंद लागवडीचा पर्याय पुढे आला. त्यावर केवळ चर्चा झाली नाही, तर हा प्रयोग कृतिशीलपणे राबवण्याचा निर्णय घेतला. दत्त साखर कारखान्याच्या कार्यकारी क्षेत्रातील ४१ गावांमध्ये सुमारे ५० एकरावर प्रत्यक्ष लागवड केली आहे. ५६ सभासदांच्या शेतीवर उसाला पर्यायी पीक म्हणून शर्कराकंद पीक बहरात आले आहे.

अन्य काही पर्याय

पर्यायी पिकांचा शोध काय असू शकतो याचा अंदाज घेतला जात असताना काही उपक्रम राबविण्याचे निश्चित झाले. फळबागांचा पर्याय शोधला जात आहे. काही गावांमध्ये पेरू, आंबा, चिकू आदी फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन दिलेले आहे. महापुरात तग धरणारे उसाचे बियाणे शोधून त्याचे संवर्धन करण्याकडे लक्ष पुरवले आहे. याच्या जोडीला अधिक लक्ष दिले आहे ते शर्कराकंद लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्याचे. केवळ प्रवृत्त करण्याचे नाही तर शेतकऱ्यांना त्याची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. कोठे एक एकर, कोठे अर्धा एकर.. ज्याला जमेल तितके; तशी शर्कराकंदची लागवड केली आहे. जुलै महिन्यातील धुवाधार पाऊस ओसरल्यानंतर ऑगस्टमध्ये शर्कराकंदची लावण करण्यात आली आहे. त्याची शास्त्रशुद्ध निगा केल्यामुळे पीक जोमाने उगवले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट मधील शास्त्रज्ञ, दत्त साखर कारखान्यातील शेती विभाग यांच्या मार्गदर्शनातून शर्कराकंद (शुगरबीट) योग्यरीत्या उगवले आहे. सुरुवात तर उत्तम झाली आहे. याचे पीक साडे चार महिन्याचे असते. त्यामुळे उन्हाळा सुरू होता होता म्हणजे मार्चच्या सुरुवातीला उसासमवेत गाळप केले जाणार आहे. या दृष्टीने शर्कराकंदचे पीक साखर निर्मितीसाठी सिद्ध झाले आहे.

शर्कराकंदच का?

दत्त साखर कारखान्याने महापुराला पर्यायी पीक म्हणून शर्कराकंदची निवड करण्याची विशेष अशी काही कारणे आहेत. मुख्य म्हणजे हे पीक महापुराचा काळ ओसरल्यानंतर घेता येते. ऑगस्टमध्ये त्याची लागवड केली की मार्चमध्ये त्याचे गाळप करता येते. शर्कराकंद हे थंड हवामानात उत्तमरीत्या पिकते. ऑगस्ट ते फेब्रुवारी हा आपल्याकडे थंडीचा कालावधी असतो. परिणामी पिकाची वाढ जोमाने होऊ शकते. शिरोळ तालुक्यातील गावोगावी पिकलेल्या शर्कराकंदची उगवण पाहता याची खात्रीही पटते. अधिक पाण्याची गरज नाही. क्षारपड जमिनीत उत्तम उत्पादन होते. पिकातील साखरेचे प्रमाण सुमारे १८ टक्के असते. अन्य पिकांच्या तुलनेत किडी-रोगांचा प्रादुर्भाव कमी. एकरी ८० हून अधिक िक्वटल उत्पादन. साखर, इथेनॉल, पशुखाद्य याची निर्मिती शक्य होते. दुभत्या जनावरांना खाद्य म्हणून वापर तर होतोच, शिवाय या खाद्याद्वारे जनावरांच्या दुधाच्या गुणवत्तेत वाढ होते. त्याचे अनेक लाभ या बहुगुणी पिकाचे आहेत. शर्कराकंदची लागवड ४० बाय १५ सेमी अंतराने केली जाते. ५० बाय १५ किंवा ४० बाय २० असे पर्यायही आहेत. युरोप, इराण येथील कंपन्यांचे वाण भारतात उत्पादित केलेले आहेत. नत्र,स्फुरद, पालाश ३० किलो वापरावे लागते. गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावी लागतात. पाण्याचा वापर जपून करावा लागतो. अधिक पाण्यामुळे वाढ खुंटते. कंद कुजतात. कीड लागणार नाही याकडे लक्ष द्यावे लागते.

आधीच्या प्रयोगांचे मूल्यमापन 

शर्कराकंद लागवडीचा प्रयोग राज्यात याआधीही काही ठिकाणी झाला आहे. अंकुशराव टोपे साखर कारखाना,बारामती अ‍ॅग्रो, राजारामबापू साखर कारखाना आदी ठिकाणी याचे प्रयोग झाले आहेत. तेथे कमी-अधिक प्रमाणात यश दिसून येते. उत्तरेकडील तसेच पंजाबमधील काही कारखान्यांमध्ये कायमस्वरूपी शर्कराकंदपासून साखर निर्मिती केली जाते. साखर उद्योगातील मान्यवरांनी सांगितले म्हणून शर्कराकंदचे पीक घेतले गेले. त्याचे शास्त्रशुद्ध, तंत्रशुद्ध उत्पादन घेण्याकडे दुर्लक्ष झाल्याचेही दिसून येते. या त्रुटी टाळण्याचा प्रयत्न दत्त साखर कारखान्याने केला आहे. मुख्य म्हणजे शर्कराकंदपासून उत्पन्नाची हमी देण्याचा प्रयत्न या प्रयोगात आहे. फेब्रुवारी -मार्च महिन्यात शर्कराकंद पक्व झाल्यावर त्यापासून साखर निर्मिती केली जाणार आहे. पुढे याच शेतामध्ये उन्हाळी सोयाबीन घेता येईल. एकरी ४०-४५ मे. टन पीक उत्पादित व्हावे असा प्रयत्न आहे. सुरुवातीला उसाप्रमाणे प्रतिटन २९५० रुपये दर दिला जाणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या सल्ल्यानुसार उसाबरोबर त्याचे गाळप केले जाणार आहे. शिरोळच्या अनेक भागात क्षारपड जमीन मोठय़ा प्रमाणात आहे. या जमिनीत शर्कराकंद पिकाचा पर्याय चांगला होऊ शकतो. ते पक्व झाल्यानंतर लगदा होण्यापूर्वीच गाळप केले जाणार आहे. गाळप करण्यासाठी तूर्तास विद्यमान यंत्रसामग्रीमध्ये बदल करावा लागणार नाही आहे. उपलब्ध यंत्रणेमध्ये गाळप करणे शक्य असल्याचा तंत्रज्ञांनी निर्वाळा दिला आहे.

उसाप्रमाणे दर आणि उन्हाळी सोयाबीन पीक अशा दोन्ही माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. चांगले उत्पादन आणि हमखास उत्पन्न मिळते याची खात्री पटली की शेतकरी शर्कराकंदचे पीक घेण्यासाठी अधिक प्रवृत्त होतील. पावसाळय़ात शर्कराकंद, उन्हाळय़ात सोयाबीन आदी पिके घेऊन उत्पन्नाची हमी मिळेल. यातून महापुराचे संकट आले तरी अर्थक्षम होण्याचा चांगला पर्याय उपलब्ध होईल. यादृष्टीने पर्यायाचा हा धांडोळा घेण्याचा प्रयत्न नेटाने सुरू आहे. भविष्यात शर्कराकंद हे औद्योगिक उत्पादन ठरण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवलेली आहे. त्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

उद्यान पंडित गणपतराव पाटील, अध्यक्ष, दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना

पुढील काळात येथे शर्कराकंद पासून इथेनॉल निर्मिती, पशुखाद्य निर्मिती केली जाणार आहे. शर्कराकंदचा पाला शेतात उगवला तर उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत उपलब्ध होते. सध्या सुरू असलेले प्रयोग यशस्वी होणारच  असे ठामपणे म्हणत नाही. मात्र प्रयत्न करणे, त्यातील चुका सुधारणे याआधारे पुढे जाण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जात आहेत. शर्करा कंदाची सद्यस्थिती पाहता पीक समाधानकारक आहे. त्याचे गाळप केल्यानंतर उत्तम उतारा मिळेल. चांगल्या साखरेचे उत्पादन होईल. शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल.

एम. व्ही. पाटील, कार्यकारी संचालक, दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना

शर्कराकंद पीक घ्या असा केवळ सल्ला दिला म्हणून त्याची अंमलबजावणी नेमकेपणाने झालीच असे होत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लावणीपासून ते पीक पक्व होईपर्यंत या प्रत्येक टप्प्यावर बारकाईने पाहणी केली पाहिजे, जी आम्ही काळजीपूर्वक करत आहोत. बियाणे टोकण, सरीचे अंतर, खत -पाणी वापर आदी सर्व गोष्टी शेतकऱ्यांना नीट समजावून सांगितल्या जात आहेत. हे काम दत्त कारखान्याचा कृषी विभाग शेती विभाग अतिशय निष्ठेने, उत्तमपणे करीत आहे. त्यासाठी ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, माती परीक्षण अधिकारी ए. एस. पाटील आदी अधिकारी, कर्मचारी यासाठी गेले चार महिने पिकाची उत्तम निगराणी करीत आहेत. कृषी विभागाला पुरेसे सहकार्य करण्याची भूमिका कारखाना व्यवस्थापनाची आहे. यामुळेच पहिल्यावहिल्या प्रयत्नाला उत्तम प्रकारचे यश मिळेल असा आशावाद आहे.

श्रीशैल हेगाण्णा, मुख्य शेती अधिकारी, दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sweet potato farming in kolhapur sweet potatoes in kolhapur zws

ताज्या बातम्या