‘महाराष्ट्रातील चेरापुंजी’  म्हणून शहापूर हा आदिवासी तालुका  प्रसिद्ध आहे. या तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांबरोबरच सामान्य विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी येथील छोटय़ा छोटय़ा गावांमधील जाणते गावकरीच प्रयत्न करत आहेत. शहापूरपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या टेंभुर्ली गावातील सह्य़ाद्री विद्यालय ही शाळा म्हणजे याच प्रयत्नांना लागलेलं फळ आहे..

मुंबईला पाणी पाजणारा तालुका, म्हणून शहापूरची ओळख इयत्ता चौथीच्या भूगोलाच्या पुस्तकात झाली होती. तानसा, वैतरणा, भातसा आणि नव्याने होणाऱ्या शाई अशा धरणांचा तालुका असलेल्या शहापूरची एक वेगळी ओळख तीन वर्षांपूर्वी झाली. या तालुक्यातील बेलवली नावाच्या छोटय़ाशा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्य शिक्षक असलेल्या धीरज डोंगरे या मित्रामुळे! या भागातील विविध दुर्गम गावांमधील आदिवासी, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी जिवाचे रान करणाऱ्या आणि त्यांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी झटणाऱ्या या मित्राबरोबर दोन वर्षांमध्ये या भागातील अनेक शाळा बघितल्या. अशाच एका भेटीत टेंभुर्ली गावातील सह्य़ाद्री विद्यालय नजरेला पडले.

टेंभुर्ली गावात जिल्हा परिषदेचीच किंवा शासनाचीच एक शाळा आहे. ही शाळा, तेथील शिक्षक यांच्याशी आधी ओळख झाली होतीच. पण ही सह्यद्री विद्यालय खासगी अनुदानित शाळा असल्याचे कळले. गावाच्या थोडी बाहेर असलेली ही शाळा काहीशी माळरानावर किंवा शेतजमिनींच्या वेढय़ात आहे. आठवी, नववी आणि दहावी अशा तीन वर्गासाठी तीन खोल्या, बाजूलाच असलेली सुसज्ज प्रयोगशाळा, विद्यार्थी आणि विद्याíथनींसाठी असलेली स्वच्छ आणि प्रशस्त स्वच्छतागृहे आणि शिक्षक व शाळेच्या प्रशासनासाठी एक मोठी खोली एवढाच शाळेचा पसारा. गोष्टींच्या पुस्तकात खेडेगावातील शाळेचे वर्णन असते किंवा ‘शाळा’ कादंबरीतील शाळेसारखी ही शाळा पाहून पाहताच क्षणी या शाळेत शिकणाऱ्या मुलांचा हेवा वाटला.

द्रष्टय़ा गावकऱ्यांचा पुढाकार

शाळेची स्थापना १९९९ मध्ये झाली. त्या वेळी शाळेत फक्त आठवीचा वर्ग होता आणि ४० विद्यार्थी होते. सुरुवातीला ही शाळा लोकांच्या घराच्या अंगणात भरत होती. मग गरजेनुसार संस्थेने पुढाकार घेऊन एक छोटीशी खोली बांधली. ही शाळा सुरू झाल्यापासून सात-आठ किलोमीटर परिसरातील विद्यार्थाच्या आठवी ते दहावीच्या शिक्षणाची चांगलीच सोय झाली. आदिवासी, मराठा, इतर मागास अशा वर्गामधील मुले या शाळेतील विद्यार्थी आहेत. हळूहळू विद्यार्थी संख्या वाढायला लागल्यावर शाळेला पक्क्या इमारतीची गरज भासू लागली. त्या कामीही गावातील शिक्षण प्रसारक मंडळ आणि आणखी एक संस्था पुढे आल्या. गावातीलच सखाराम चौधरी आणि मोरेश्वर चौधरी या द्रष्टय़ा शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आपली एक एकर जमीन शाळेसाठी विनाशुल्क देऊ केली. या जमिनीवर गेल्या वर्षी जूनमध्ये सुसज्ज इमारत उभी राहिली आणि भर पावसाळ्यात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न सुटला.

शाळेच्या समोरच मोकळे पटांगण, त्या पटांगणात कबड्डी, व्हॉलिबॉल, खोखो यांच्यासाठी आखलेली जागा यांमुळे या शाळेत शारीरिक शिक्षणाचा तास नक्कीच मजेचा असणार हे लक्षात येते. तीन शिक्षकांच्या साथीने सुरू झालेल्या शाळेत सध्या पाच शिक्षक तीन वर्गाचे काम सांभाळतात. सध्या तीन वर्ग मिळून या शाळेत १६० विद्यार्थी आठवी-नववी आणि दहावीचे शिक्षण घेत आहेत. ग्रामस्थांच्या सहकार्याशिवाय शाळेतील विद्यार्थ्यांना गेली दहा वष्रे कळवा येथील मुकंद कंपनीतर्फे वह्य़ा आणि पुस्तकांचे वाटप केले जाते.

खुली प्रयोगशाळा

या शाळेच्या अभिमानाची बाब म्हणजे शाळेतील प्रयोगशाळा आणि नव्याने स्थापन झालेले वाचनालय! यासाठीही ग्रामस्थांबरोबरच दोन संस्थांनी पुढाकार घेतला. एसएस अँड सी या कंपनीने सेवा सहयोग या संस्थेच्या पुढाकाराने गेल्या वर्षीच शाळेला नव्या इमारतीच्या बाजूलाच सुसज्ज प्रयोगशाळा बनवून दिली.  ‘एखाद्या गावातील अंधश्रद्धा दूर करायच्या असतील, तर त्या गावात एक ग्रहताऱ्यांचा अभ्यास करणारी दुर्बीण बसवावी’, हे अ‍ॅडॉल्फ हिटलरचे वाक्य या शाळेने प्रयोगशाळेच्या माध्यमातून खरे करून दाखवले आहे. या प्रयोगशाळेतील विज्ञान साहित्यही या संस्थेने उपलब्ध करून दिले आहे. या प्रयोगशाळेचे वैशिष्टय़ म्हणजे अगदी पाचवीतल्या मुलांनाही समजेल अशा भाषेत हे सगळे प्रयोग समजावून देण्यासाठी प्रयोगांचे प्रारूप उभारले आहे. यात पुलीचा प्रयोग, चुंबकाचा प्रयोग, गुणसूत्र तपासण्यासाठीचे यंत्र कसे काम करते, पायथागोरसचा सिद्धांत समजावून देणारा खेळ व प्रयोग अशा विविध प्रयोगांचा समावेश आहे. हे प्रयोग अधिक समजावून देण्यासाठी एक पूर्ण वेळ विज्ञान शिक्षकही येथे उपलब्ध असतो. तसेच हे प्रयोग विद्यार्थी स्वत: हाताळू शकत असल्याने त्यांचा विज्ञानातील रस वाढवण्यास मदत होते. या प्रयोगशाळेचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ही प्रयोगशाळा फक्त याच शाळेतील विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर आसपासच्या अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी खुली असते. जवळच्या गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी अगदी मोकळेपणाने या प्रयोगशाळेत येतात आणि तेथील प्रयोग समजावून घेतात.

वाचनालयाचा विस्तार

प्रयोगशाळेप्रमाणे वाचनालयही या शाळेच्या अभिमानाची गोष्ट आहे. शहापूर तालुक्यातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी झटणाऱ्या िवग्ज फॉर ड्रीम या संस्थेच्या सहकार्यानेच हे वाचनालय सुरू झाले आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धीरज डोंगरे यांनी कपाट आणि सुरुवातीला पाचशे पुस्तके शाळेला देऊन या वाचनालयाचा पाया रोवल्याचे शाळेचे मुख्याध्यापक नंदलाल देशमुख यांनी सांगितले. आता या वाचनालयाचा विस्तार करण्याची मनीषा असून त्यासाठी शाळेचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात शाळेत स्पर्धा परीक्षांचे वातावरण निर्माण करण्यासाठी त्या विषयांवरील पुस्तके, विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी आवश्यक पुस्तके वाचनालयासाठी घेण्यात येतील. त्याशिवाय या शाळेतील विद्यार्थ्यांना शारीरिकदृष्टय़ा सुदृढ करण्यासाठी एक जिमखानाही सुरू होणार आहे.

गेल्या शैक्षणिक वर्षांत या शाळेतून दहावीला ४२ मुले बसली होती आणि यंदा या शाळेचा निकाल १०० टक्के लागला. विशेष म्हणजे या ४२ पकी आठ मुलांना ८० टक्क्यांपेक्षा जास्त, २२ मुलांना प्रथम श्रेणी असे गुण मिळाले आहेत. त्यामुळे येथील शिक्षकांचाही हुरूप वाढला असून पुढील वर्षांत विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र १०० टक्के निकाल हेच यश नसून या शाळेतून बाहेर पडणारा विद्यार्थी पुढील आयुष्यात यशस्वी झाला पाहिजे, हे उद्दिष्ट ठेवून शाळेची वाटचाल सुरू आहे.

शहापूर तालुक्यातील टेंभुर्लीसारख्या छोटय़ाशा खेडय़ात विद्यार्थ्यांच्या र्सवकष विकासाचा विकास करून काम करणाऱ्या सह्य़ाद्री विद्यालयाचे काम खरोखरच सह्य़ाद्रीइतकेच उत्तुंग आहे.

 

रोहन टिल्लू
rohan.tillu@expressindia.com

 

संकलन – रेश्मा शिवडेकर
reshma.murkar@expressindia.com