भारतीय इंग्रजीत तरुण उच्चशिक्षित लेखकांच्या कादंबऱ्यांची सध्या बरीच चलती आहे आणि त्यातील बहुतेकांच्या कादंबऱ्या या चेतन भगत फॉम्र्युला समोर ठेवूनच लिहिल्या जातात. म्हणजे त्यातील मुख्य कथ्यविषय प्रेम हा असतो. पण त्याची सुरुवात, मध्य आणि शेवट या प्रवासात कमीअधिक उपकथानकांची जोड दिलेली असते. ‘द लॅबीरिंथ’ ही कादंबरीही त्याला अपवाद ठरत नाही.
उदयन मजुमदार यांची ही पहिलीच कादंबरी. बहुतेकांच्या लेखनाची सुरुवात प्रेमकथेनेच होते. कारण लिहायला लागल्यानंतर प्रत्येकाकडे सांगण्यासारखी ही पहिली गोष्ट असते. कारण हा पहिलाच अनुभव बहुतेकांना बदलवून टाकणारा असतो. तर ते असो. उदयन हे काही सॉफ्टवेअर कंपनीत नाहीत की आयआयटी पासआऊट नाहीत. त्यांनी कोलकात्यामध्ये काही काळ पत्रकारिता केली. स्टेट्समन या इंग्रजी दैनिकात त्यांच्या काही लघुकथाही प्रकाशित झाल्या आहेत. सध्या ते क्रेडिट रेटिंग कंपनीमध्ये संपादक म्हणून कार्यरत आहेत.
ही कादंबरी घडते बंगालमध्ये. तेथील एका नितांत रमणीय जंगलात. कादंबरीचा नायक सुदिप्तो त्याच्या आजोबा, दादूकडे जातो. ते एकटेच निसर्गरम्य ठिकाणी राहत असतात. तिथे सुदिप्तो आपली मैत्रीण मृणालिनीला घेऊन जातो. त्या वातावरणात सुदिप्तोला मृणालिनीच्या प्रेमात पडल्याची जाणीव होते. हे या कादंबरीचं रूढ कथानक. पण ते तितके सरळ नाही. आजोबांच्या घराला आग लागून ते भस्मसात होतं. त्यात त्याला एक अर्धवट जळालेली दैनंदिनी सापडते. त्यातून त्याचा भूतकाळ परत येतो. फँटसी, स्मरणरंजन यांचा आधार घेत ही प्रेमकथा काहीशी सरधोपटपणे पुढे जाते. भाषा मात्र साधी, सोपी आहे. कथानकाची गती फार संथ आहे. त्यामुळे एका मर्यादेनंतर केवळ प्रेमकथेमध्ये स्वारस्य नसलेल्या वाचकांसाठी ही कादंबरी कंटाळवाणी होऊ शकते.
द लॅबीरिंथ : उदयन मजुमदार,
रूपा पब्लिकेशन्स, नवी दिल्ली,
पाने : २०२, किंमत : १९५ रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The labyrinth
First published on: 02-11-2013 at 12:06 IST