विश्वास पवार

हळद पीक म्हटले, की महाराष्ट्रातील कृष्णाकाठचा वाई आणि सांगलीचा परिसर डोळय़ांपुढे येतो. यातील वाई तालुक्यात नुकतीच इस्रायलच्या ‘व्हर्टीकल फार्मिंग’ पद्धतीद्वारे हळद लागवडीच्या प्रयोगास सुरुवात करण्यात आली आहे. याच प्रयोगाविषयी..

mumbai ramabai ambedkar nagar zopu marathi news
रमाबाई आंबेडकर नगर पुर्नविकास : ‘झोपु’चे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात, पुढील आठवड्यात १६८४ रहिवाशांची प्रारूप यादी प्रसिद्ध करणार
impact of us foreign policy on semiconductor industry
चिप-चरित्र : चिप उद्योगाचे ‘पूर्व’रंग
onion, Dindori, loksabha election 2024,
दिंडोरीत कांदा प्रचाराच्या केंद्रस्थानी
Tigress hunt crocodile with her cubs in rajasthan
राजस्थानच्या रणथंबोर उद्यानात शिकारीचा थरार; वाघीण आणि मगरीतील ‘चित्तथरारक लढाई’ VIDEO व्हायरल

महाराष्ट्रातील कृष्णा काठचा वाई आणि सांगलीचा परिसर हळद लागवडीसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. वाई तालुक्यात अनेक गावांत आजही पारंपरिक पद्धतीने हळदीची लागवड केली जाते. या प्रवासात आता वाई येथे नुकतीच इस्रायलच्या ‘व्हर्टीकल फार्मिंग’ पद्धतीद्वारे हळद लागवडीच्या प्रयोगास सुरुवात करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानाद्वारे हळद लागवडीचा हा पहिलाच प्रयोग आहे. यासाठी हिमाचल प्रदेश व उत्तराखंड येथील ‘लॉकेडॉनंग’ या औषधी गुणधर्म व निर्यातक्षम बेण्याचा वापर केला आहे.

हळद हे मसाले वर्गातील एक प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १,२५,८०० हेक्टर असून उत्पादन ५,५०,१८५ टन इतकेआहे. जगातील हळदीच्या एकूण उत्पादनापैकी जवळजवळ ८० टक्के उत्पादन भारतामध्ये होते. परंतु त्यापैकी केवळ १५ ते २० टक्केच हळद निर्यात होते. देशांतर्गत उत्पादनाचा विचार केला तर आंध्रप्रदेश प्रथम क्रमांकावर असून त्याखालोखाल ओरिसा, तामिळनाडू, आसाम, कर्नाटक, महाराष्ट्र, हिमाचलप्रदेश आणि उत्तराखंड असा क्रम लागतो. महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली आठ हजार ५०० हेक्टर क्षेत्र असून उत्पादन ४२ हजार ५०० टन इतके होते. भौगोलिकदृष्टय़ा हळद लागवडीस भारतात अनुकूल वातावरण असल्यामुळे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हळदीची लागवड होऊ  शकते. समुद्र सपाटीपासून १५०० मीटर उंचीपर्यंतच्या सर्व प्रदेशात हळद चांगली येऊ शकते. महाराष्ट्रात साधारणपणे सर्व भागात हळदीचे पीक चांगले येऊ शकते. ज्या भागात उसाचे क्षेत्र जास्त आहे किंवा ओलीताखालील क्षेत्र जास्त आहे त्या भागात हवेतील दमटपणा थोडा वाढतो आणि हा दमटपणा हळद पिकास अनुकूल असा असतो.

हळदीची लागवड साधारणपणे एप्रिल महिन्याच्या मध्यापासून ते जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत करणे चांगले. ठिकठिकाणच्या स्थानिक प्राप्त परिस्थितीनुसार लागवडीचा कालावधी मागेपुढे होतो. यासाठी एकरी १००० किलो बेणे लागते. लागवड मातृकंदापासून करतात. या कंदापासून तयार केलेल्या ३० दिवस वयाच्या रोपापासूनही लागवड करतात. कन्याकंदही लागवडीसाठी वापरतात. हळदीच्या पिकानंतर कांदा, भुईमूग, हरभरा, सोयाबीन, ऊ स यासारखी पिके घ्यावीत. टोमॅटो, वांगी, मिरची, तंबाखू, बटाटा या पिकानंतर हळद लागवड करू नये. कारण या पिकांवर जमिनीतून उद्भवणारे सर्व रोग पुढे हळद पिकावर येतात. आपल्याकडे हळद लागवडीच्या काही पारंपरिक पद्धती आहेत. यामध्ये सरी वरंबा पध्दत, रुंद वरंबा पध्दत, गादीवाफे किंवा बेड पद्धत वापरली जाते. महाराष्ट्रातील वातावरण हळद लागवडीस अतिशय अनुकूल असल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्यास मोठा वाव आहे.

सांगली आणि वाई हे दोन्हीही प्रदेश हळद लागवडीसाठी आजवर प्रसिद्ध राहिलेले आहेत. यातील वाईमध्ये आता या हळद लागवडीचे नवनवे प्रयोग सुरू झाले आहेत. यातच सध्या येथील काही शेतक ऱ्यांनी इस्रायलच्या ‘व्हर्टीकल फार्मिंग’ पद्धतीद्वारे हळद लागवडीच्या प्रयोगास सुरुवात केली आहे. या प्रयोगाकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.

पाच गुंठे जागेत हळद लागवडीचा हा प्रकल्प उभारला आहे. यासाठी हिमाचल प्रदेशमधून हळदीचे बेणे आणले आहे. हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. मात्र याचे प्रमाण किती आहे, हे हळदीतील ‘कुरकूम’ नावाच्या घटकावर ठरते. ‘कुरकूम’ म्हणजे हळदीचा गंडा मोडल्यावर आत दिसणारा लालसर पिवळसर गोलाकार भाग होय. आपल्याकडच्या हळदीमध्ये हे प्रमाण अडीच ते तीन टक्के असते तर हिमाचल प्रदेश व उत्तराखंड येथील हळदीमध्ये हे प्रमाण साडेपाच ते अकरा टक्के एवढे आहे.

या नव्या लागवडीसाठी पाच गुंठे क्षेत्रात ‘पॉलिहाऊस’ उभारले आहे. या हरितगृहाच्या आत साठ फूट लांब आणि दोन फूट उंचीचे सहा कप्प्यांचे एकेक थर उभारले आहे. या दोन थरांमध्ये तीन मीटर अंतर ठेवून असे नऊ  थर उभे केले आहेत. दोन फूट उंचीच्या कप्प्यामध्ये दीड फूट माती भरलेले आहे. या मातीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर केलेला आहे. या प्रकल्पातील लागवडीसाठी साडेपाच क्विं टल बेणे वापरले आहे.

ठाण्यातील एस अ‍ॅग्री अँड अ‍ॅक्वा लिमिटेड कंपनीबरोबर परिसरातील शशिकांत कोरडे, दीपक कोरडे, विजय जमदाडे, बाळासाहेब सपकाळ आणि अमोल कोरडे या पाच शेतकऱ्यांनी भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प उभारला आहे. यामध्ये जमीन, पाणी, वीज, रस्ता शेतकऱ्याने पुरवायचे आहे. तर ‘ग्रीन हाऊस’ अंतर्गत मातीपासून सगळी सामुग्री या कंपनीने पुरवली आहे. यामध्ये माती, रचना, बी बियाणे, सेंद्रिय खते, मजूर हे कंपनी पुरवते. यासाठी शेतकऱ्यांनी कंपनीबरोबर सहा वर्षांचा करार केला आहे. यातून उत्पादित होणारे सर्व उत्पादन कंपनी घेणार असून याद्वारे दरवर्षी पन्नास टक्के परतावा कंपनी शेतकऱ्यांना देणार आहे. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर असून पुढील वर्षी अशापद्धतीचे आणखी बारा प्रकल्प या परिसरात उभारले जाणार आहेत. त्याची तयारी आत्तापासून सुरु करण्यात आल्याचे शशिकांत कोरडे यांनी सांगितले.

हिमाचल प्रदेशातून आणलेल्या ‘लॉकेडॉनंग’ या हळद बेण्याचा औषधांसाठी म्हणून अधिक वापर होतो. या प्रकल्पातून उत्पादित होणारी सर्व हळद निर्यात केली जाणार आहे. या हळदीला परदेशात मोठी मागणी आहे. हळदीत असणाऱ्या ‘कुरकूम’च्या प्रमाणावर तिचा भाव ठरला जातो. या बेण्यात लालसर पिवळसर ‘कुरकूम’चे प्रमाण पाच ते सहा टक्के आहे. या हळदीत औषधी गुणधर्म जास्त आहेत. या हळदीला अमेरिका आणि युरोप खंडातील देशांमध्ये मोठी मागणी आहे. या हळदीपासून तयार केलेली पावडर ‘कॅप्सूल’ स्वरूपात खाण्यासाठी आणि सुगंधी तेल,आयुर्वेदिक औषधे, कीटक नाशकात वापरली जाते.

हळदीच्या दरामध्ये सतत होणारे चढउतार, उन्नत जातीच्या लागवडीखालील अपुरे क्षेत्र, सेंद्रिय खतांची कमतरता, मोठय़ा प्रमाणात करावा लागणारा मशागत खर्च, नियंत्रित बाजारपेठेचा अभाव, यांत्रिक पद्धतीने काढणी करणे इत्यादी बाबींचा विचार करून पारंपरिक हळद लागवडीचा फेरविचार करण्याची वेळ आल्याचे या शतक ऱ्यांचे म्हणणे आहे. जास्तीत जास्त आणि दर्जेदार उत्पादन काढण्याचे प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. या सर्वाचा विचार करत या पिकाबाबत जगभर जे नवे संशोधन, पीक पद्धती चालू आहे, त्याचाच अवलंब वाईतील या शेतक ऱ्यांनी आपल्या या नव्या प्रयोगात केला आहे.

आपल्याकडे नियमित लागवड केली जाणारी हळद ही खाण्यासाठी वा मसाल्यांमध्ये वापरली जाते. त्याच अनुषंगाने आपण या पिकाची आजवर लागवड करत आलो आहोत. मात्र परदेशामध्ये हळदीचा औषधांसाठी मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. मोठमोठय़ा औषधी कंपन्या हळदीवर अनेक प्रयोग करत आहेत. त्यांच्या मागणीप्रमाणे आपल्याकडच्या हळदीच्या वाण, लागवड, पीक पद्धतीत प्रयोग करणे गरजेचे आहे. त्यासाठीच या नव्या प्रकारच्या बेण्याद्वारे आणि नव्या पद्धतीने हळदीची लागवड केली आहे.

शशिकांत कोरडे, प्रगतशील शेतकरी, वाई