सत्यजित रेंची दोन लग्नं

जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक म्हणून मान्यता मिळालेले सत्यजित राय व त्यांच्या पत्नी विजयाबाई ही या कहाणीतील प्रमुख पात्रे.

सत्यजित त्यांच्या मामाच्या घरी राहत असताना त्या घरी विजया नावाची एक मुलगी राहावयास आली. तिची कहाणी जवळजवळ सत्यजितसारखीच होती.

विजय पाडळकर

या गोष्टीची सुरुवात तशी खूप आधीपासून झाली होती, पण घटनांना खरी दिशा व गती मिळण्यास १९४० साल उजाडावे लागले. पण या साली जी कहाणी सुरू झाली तिचा अन्वय समजण्यासाठी थोडे मागे जावेच लागेल.

पुढे चालून जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक म्हणून मान्यता मिळालेले सत्यजित राय व त्यांच्या पत्नी विजयाबाई ही या कहाणीतील प्रमुख पात्रे. सत्यजित यांचा जन्म २ मे १९२१ साली झाला. त्यांचे वडील सुकुमार राय हे बंगालमधील नावाजलेले लेखक व चित्रकार होते. मुलांसाठी त्यांनी लिहिलेली पुस्तके आजही लोकप्रिय आहेत. दुर्दैवाने सत्यजित तीन वर्षांचे असतानाच त्यांचे वडील वारले. सत्यजितच्या आईला चार भाऊ होते. त्यापकी एक फार पूर्वी मरण पावला होता. दोघे वकील होते व त्यापकी एक जण पाटणा, तर एक जण लखनौला राही. शोनामामा नावाचा तिसरा मामा कोलकात्यात एका विमा कंपनीत काम करीत असे. त्याच्याकडे ही दोघे मायलेकरे येऊन राहिली. लहानपणापासून सत्यजितना चित्रकला व संगीत यांची प्रचंड आवड होती. हायस्कूलमध्ये शिकत असताना त्यांची पाश्चात्त्य संगीताशी ओळख झाली व ते त्या संगीताच्या प्रेमातच पडले.

सत्यजित त्यांच्या मामाच्या घरी राहत असताना त्या घरी विजया नावाची एक मुलगी राहावयास आली. तिची कहाणी जवळजवळ सत्यजितसारखीच होती. चारुचंद्र दास या बॅरिस्टर महोदयांची ती मुलगी. हे चारुचंद्र दास सत्यजितच्या आईचे सावत्रभाऊ होते. ते पाटणा येथे राहत. त्यांना चार मुली होत्या. विजया ही त्यांच्यापकी सर्वात लहान. विजयाचा जन्म २७ ऑक्टोबर १९१७ रोजी झाला. ती सत्यजितपेक्षा सुमारे तीन वर्षांनी मोठी होती. तिचा आवाज खूप सुरेख होता व िहदुस्थानी शास्त्रीय संगीताचे तिने थोडेफार शिक्षणदेखील घेतले होते. मात्र, २९ डिसेंबर १९३१ रोजी वडिलांचे अचानक निधन झाल्यामुळे विजयाचे सारे भविष्य बदलून गेले. वडील जरी बॅरिस्टर असले तरी ते कधीच काटकसरीने राहत नसत व त्यांचा स्वभाव थोडा खर्चीकच होता. त्यांच्या घरात वापरल्या जाणाऱ्या बहुतेक वस्तू परदेशी व महागडय़ा असत. ते वारल्यानंतर विजयाच्या आईला समजले की, त्यांच्या माघारी फारच थोडी शिल्लक घरात उरली आहे. अशा वेळी वडिलांचा कोलकात्याचा भाऊ तिच्या मदतीला धावला. नव्या वर्षांच्या सुरुवातीला विजया आपल्या आईसोबत कोलकात्याला तिच्या काकाकडे (म्हणजेच सत्यजितच्या मामाकडे!) राहण्यास आली. यावेळी ती सुमारे चौदा वर्षांची, तर सत्यजित अकरा वर्षांचे होते. लहानपणी सत्यजितचा स्वभाव खूपच लाजाळू होता. ते दोघे एकत्र जसजसे वाढू लागले तसतसे त्यांच्या ध्यानात आले की, त्यांच्यात समान अशा अनेक आवडीनिवडी आहेत. शब्द बनविण्याचा खेळ किंवा लुडो आणि कॅरम हे दोघांचेही आवडते खेळ होते. विशेषत: दोघांनाही पाश्चात्त्य संगीताची विलक्षण आवड होती. शाळेव्यतिरिक्तचा बराच वेळ ते एकत्र संगीत ऐकण्यात घालवीत.

सत्यजितला शालेय अभ्यासात कधीच फारसा रस नव्हता. त्यामुळे १९३९ साली प्रेसिडेन्सी कॉलेजमधून बी. ए. इकॉनॉमिक्सची डिग्री घेतल्यानंतर त्यांनी यापुढे कॉलेजशिक्षण न घेण्याचा व कुठेतरी नोकरी पत्करण्याचा विचार केला. जेव्हा त्यांनी आपला हा निर्णय आईला सांगितला तेव्हा तिने कॉलेज सोडण्याला विरोध दर्शविला नाही; पण सत्यजित आता केवळ अठरा वर्षांचाच झाला होता हे ध्यानात घेता आत्ताच त्याने नोकरीच्या चक्रात गुंतावे अशी तिची मुळीच इच्छा नव्हती. तिने सुचविले की, सत्यजितने शांतिनिकेतनमध्ये जाऊन चित्रकलेचे शिक्षण घ्यावे. रवींद्रनाथ आणि राय कुटुंबाचे जवळचे संबंध होतेच. चित्रकार होण्याची सत्यजितची इच्छा नव्हती. त्यांना आपले वडील आणि आजोबा यांच्याप्रमाणे illustrator व्हायचे होते. परंतु एक तर चित्रकलेचा अभ्यास आपल्याला आपल्या क्षेत्रात अधिक उत्तम व भक्कम पाया मिळवून देईल असे त्यांना वाटले आणि दुसरे म्हणजे आईच्या प्रस्तावाला विरोध करण्याचे धर्य त्यांच्यात नव्हते.

आईने हा प्रस्ताव मांडला त्यावेळी सुरुवातीला चार कारणांसाठी सत्यजितची कोलकाता सोडून जाण्याची इच्छा नव्हती. एक म्हणजे ते या वातावरणात एवढे रुळले होते की, जणू ते कोलकात्याच्या प्रेमातच पडले होते. महानगरीय जीवनाची एकदा सवय झाली की ते सोडून जाणे माणसाच्या जीवावर येते. दुसरे म्हणजे बंगालच्या ग्रामीण भागामध्ये राहण्याचा त्यांना मुळीच अनुभव नव्हता. आणि शहरी माणसाच्या मनात सहसा असतात तसे खेडय़ातल्या जीवनाबद्दलचे अनेक गरसमज त्यांच्याही मनात होते. तिसरे म्हणजे शांतिनिकेतनमधून शिकून आलेले अनेक तरुण त्यांच्या ओळखीचे होते व ते भावुक आणि वैचारिकदृष्टय़ा दुय्यम पातळीवरचे आहेत असे त्यांचे मत (बहुसंख्य कोलकातावासीयांप्रमाणे!) बनले होते.

मात्र, चौथे कारण सर्वाधिक महत्त्वाचे होते आणि अत्यंत व्यक्तिगतदेखील होते. कोलकाता सोडून जाणे म्हणजे विजयापासून दूर जाणे होते. सुमारे सात-आठ वष्रे ते दोघेजण एकमेकांच्या सहवासात राहत होते. एवढय़ा वर्षांच्या सहवासानंतर त्यांना एकमेकांच्या स्वभावाची चांगलीच ओळख झाली होती. चित्रपट आणि पाश्चात्त्य अभिजात संगीत यांची विजयालाही अत्यंत आवड होती. तिने तर संगीताचे रीतसर शिक्षण घेतले होते व ती गायचीही उत्तम. तिच्या गायनाच्या काही रेकॉर्ड्सही निघाल्या होत्या. ती सत्यजितपेक्षा तीनेक वर्षांनी मोठी असल्यामुळे ती आधीच ग्रॅज्युएट झाली होती. वडील वारल्यानंतर काकाकडे राहत असल्यामुळे तिलाही कुठेतरी नोकरी करून आपल्या आईला मदत करावी असे वाटत होते. त्याप्रमाणे तिने एका शाळेत शिक्षिकेची नोकरी धरली होती. दररोज संध्याकाळी रेडियोवर पाश्चिमात्य संगीत ऐकणे हा दोघांचा अत्यंत आवडता छंद बनला होता. संगीत ऐकताना दोघांनाही अपार आनंद होई. या एकत्रित घालविलेल्या संध्याकाळच्या क्षणांनी ते मनाने अधिक जवळ आले व त्यांच्या हृदयात प्रेमाचा उदय झाला.

प्रथमदर्शनी प्रेमाचे अनेक किस्से प्रचलित असले तरी दोन व्यक्ती एकमेकांच्या कधी प्रेमात पडल्या हे सहसा त्यांनाही सांगता येत नाही. सत्यजित आणि विजया यांच्याबाबतीत असेच घडले. लोकप्रिय चित्रपटाच्या कहाण्यांसारखीच त्यांच्या प्रेमाची कहाणीही अनेक वळणंवाकणांनी भरलेली आहे. कहाणीत आपण पुन्हा दोन वष्रे फ्लॅशबॅकमध्ये जाऊ. १९३६-३७ सालची गोष्ट. विजयाची इंटरमिजीएट परीक्षा झाल्यानंतर ती सुटय़ांत लाहोरला गेली होती. या ठिकाणी तिची व एका काश्मिरी तरुणाची भेट झाली. हा तरुण अतिशय देखणा तर होताच; पण वागण्यातही अत्यंत सज्जन होता. तो टेनिस व बॅडिमटन उत्तम खेळायचा. तो विजयाच्या प्रेमात पडला. तिलादेखील त्याच्याविषयी आकर्षण वाटू लागले. पण ते प्रेम आहे की नाही, तिला सांगता येईना. आपल्या मनातही तिला ते ठरविता येईना. तो मात्र उत्कटपणे तिच्यावर प्रेम करू लागला. सुटय़ा संपता संपता त्याने आपले प्रेम तिच्यापाशी प्रकट केले व नोकरी लागल्यावर आपण तिला मागणी घालण्यास कोलकात्याला येऊ, असे सांगितले. तिने मात्र यावर आपला होकार किंवा नकार काहीच दिला नाही; पण अधूनमधून त्याला पत्र लिहिण्याचे तिने कबूल केले.

त्यांचा पत्रव्यवहार सुमारे दोन वष्रे चालला. १९३९ मध्ये विजया ज्या वेळी बी. ए.च्या परीक्षेची तयारी करीत होती त्यावेळी तो काश्मिरी तरुण कोलकात्याला आला. त्याला आता सन्यात नोकरी लागली होती. त्याने विजयाला मागणी घातली. विजयाच्या घरच्या सर्वाना तो पसंत होता. त्यांनी या नात्याला संमती दिली, त्यांचा साखरपुडाही झाला व नंतर त्याची पोिस्टग मुंबईला झाल्यामुळे तो तिकडे निघून गेला.

मात्र, तो निघून गेल्यानंतर एक विलक्षण गोष्ट घडली. आता विजयाला त्याच्या साऱ्या लहानसहान गोष्टी आठवू लागल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील बहुतेक गोष्टी तिला न रुचणाऱ्या होत्या. विशेषत: त्याला नोकरी लागल्यानंतर त्याच्यात जो बदल झाला होता तो चकित करणारा होता. वाचन, संगीत, चित्रपट वगरे कलांत त्याला फारसा रस नाही व त्यांच्याविषयी चर्चा करण्यात तर नाहीच नाही, हे अलीकडे तिच्या ध्यानात आले होते. आजकाल तो दारूही पिऊ लागला होता. विजया ही काही जुनाट विचारांची नव्हती, पण तिच्या कुटुंबात कुणी कधी दारूला स्पर्श केलेला नाही, हे तिला ठाऊक होते. तो तरुण त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक आकर्षक तरुणीशी अधिकच लाडीगोडीने बोलतो की काय अशी शंकाही तिला अधूनमधून येई. त्याच्या बोलण्यातले विनोद हेही थोडे अश्लीलतेकडे झुकणारे आहेत असेही तिला जाणवू लागले. न राहवून विजयाने आपल्या लाहोरच्या चुलतबहिणीला त्याच्याबद्दल पत्र लिहिले. तिचे जे पत्र आले ते वाचून विजयाला धक्काच बसला. तिने लिहिले होते की, लाहोरच्या वर्तुळात त्या तरुणाविषयी चांगले मत नाही आणि त्याचे एका नर्सशी प्रेम प्रकरण असल्याच्या बातम्याही आहेत.

आता मात्र फक्त देखणेपणाला व बाह्य़ भपक्याला भाळून आपण या लग्नास होकार देऊन चूक केली याची विजयाला खात्री पटली. विचारांती तिने त्याला एक दीर्घ पत्र लिहिले व आपण त्याच्याशी लग्न करू शकत नाही असे कळविले. हे पत्र मिळताच त्याला प्रचंड आश्चर्य वाटले व तो तातडीने कोलकात्याला आला. तो ज्या दिवशी येणार होता त्या दिवशी विजयाने हे सारे सत्यजितना तपशीलवार सांगितले. त्यांना थोडीफार कल्पना आली होतीच. त्यांनी विचारले,

‘‘आता तू काय करणार आहेस?’’

विजया म्हणाली, ‘‘तू काही काळजी करू नकोस.’’

तो तरुण घरी आल्यावर रागावून म्हणाला, ‘‘तू असे का केलेस?’’

विजयाने अतिशय शांतपणे त्याच्याविषयी आपल्याला काय वाटते हे सांगितले व ती म्हणाली, ‘‘या लग्नापासून आपल्या दोघांनाही सुख मिळणार नाही. आपण आपले वेगवेगळे मार्ग धरलेले बरे.’’

तो तरुण म्हणाला, ‘‘तू माझे हृदय विदीर्ण केले आहेस.’’ पण त्याचे हे बोलणे नाटकीपणाचे आहे व या बोलण्यात काही भावना नाहीत असे विजयाला जाणवले. त्यांचे हे बोलणे चालू असताना बाहेरच्या व्हरांडय़ात सत्यजित फेऱ्या मारीत होते. त्यांचे सारे लक्ष आतल्या संभाषणाकडे लागले होते. जणू येथे आज विजयाच्या नव्हे, तर त्यांच्याच जीवनाचा फैसला होणार होता.

बराच वेळ वाद घातल्यावर व विजयाकडून ठाम नकार आल्यावर त्या काश्मिरी तरुणाच्या ध्यानात आले की, वाद घातल्याने काही साध्य होणार नाही. तो उठून निघून गेला. यानंतर त्याने दोन-तीन वेळा विजयाला पत्रेही पाठविली, पण तिने त्यांची उत्तरे दिली नाहीत. तिच्या दृष्टीने तो अध्याय समाप्त झाला होता.

या काळातील विजया व सत्यजितच्या मन:स्थितीची थोडीफार कल्पना करता येऊ शकते. तो काश्मिरी तरुण मनातून निघून गेल्यामुळे एक पोकळी निर्माण झाल्यासारखी विजयाला जाणवली असावी. ही पोकळी भरून काढण्यासाठी सत्यजितपेक्षा अन्य योग्य व्यक्ती कोण होती! सत्यजितच्या बाजूने विचार केला तर, विजयाचा साखरपुडा झालेला आहे, तेव्हा तिच्याविषयी प्रेमाचे विचार मनात आणू नयेत असेही तत्पूर्वी त्यांना वाटत असावे. आता तो अध्यायच संपल्यामुळे त्यांचे मन तिच्याकडे अधिकच ओढ घेऊ लागले असावे. अर्थात दोन मनांतील उत्कट प्रणयभावना इतरांना समजणे जवळजवळ अशक्यच. त्यामुळे त्याचे फार विश्लेषण करण्यात अर्थ नाही. प्रेमाचे मार्ग हे फार गुंतागुंतीचे असतात, हेच खरे!

मात्र, यासंदर्भात एक फार मोठी अडचण होती. विजया ही सत्यजितच्या मामाची मुलगी. मामाच्या मुलीशी लग्न करणे हे आपल्याकडे महाराष्ट्रात रूढीला मान्य असले तरी बंगालमध्ये तसे नव्हते. ते ज्यांच्या घरी राहत होते ते विजयाचे काका (सत्यजितचे मामा) या प्रेमाला आणि विवाहाला मान्यता देणार नाहीत अशी भीती या दोघांना वाटत होती. नव्हे, त्यांची तशी खात्रीच होती. सत्यजितच्या आई तर अधिकच रूढिप्रिय होत्या. आपल्या नव्या नात्याचा विचारदेखील कुणासमोर मांडण्याची या दोघांत हिंमत नव्हती. तरुण वय होते, भावनाशील वृत्ती होती. त्यांनी ठरविले की, आयुष्यभर एकमेकांचे सच्चे मित्र म्हणून जगायचे.. अविवाहित राहायचे.

कोलकात्याला असताना एकमेकांचा सहवास तरी होता, बोलता येत होते. विचारांची, भावनांची देवाणघेवाण करता येत होती. आता शांतिनिकेतनला गेल्यावर या भेटीही कमी होणार होत्या. या कल्पनेचे दोघांच्याही मनावर दडपण आले होते. पण नाइलाज होता. दोघांनी जड अंत:करणाने एकमेकांचा निरोप घेतला. मात्र, त्यांनी एकमेकांना रोज पत्रे पाठविण्याचे वचन दिले. (सत्यजित राय यांच्याजवळची विजयाची पत्रे काय झाली याची कुणालाच कल्पना नाही. मात्र, विजयाला त्यांनी पाठविलेली पत्रे ती वाचून फाडून टाकीत असे. विजयाबाईंनी यासंदर्भात आत्मचरित्रात लिहिले आहे.. ‘मी माणिकने (सत्यजित यांचे घरातील नाव) पाठविलेली सर्व पत्रे नष्ट करून टाकली याचे आज मला खूप वाईट वाटते. पण ती कोणाच्या हाती लागतील याची मला भीती होती. आणि ती फाडून टाकण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता.’

शांतिनिकेतनमधील अभ्यासक्रम पाच वर्षांचा होता व तो पूर्ण केल्यानंतर जो डिप्लोमा मिळे त्याच्या बळावर कलाशिक्षकाची नोकरी सहज मिळत असे. परंतु सत्यजितना अशा नोकरीत रस नव्हता. त्यांना असे क्षेत्र हवे होते, जेथे त्यांच्या आंतरिक कलागुणांना वाव मिळेल. त्यामुळे १९४२ सालीच त्यांनी शांतिनिकेतनचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला.

कोलकात्याला परत आल्यावर सत्यजितनी  D. J. Keymer & Co. या जाहिरात एजन्सीमध्ये शिकाऊ कलाकार म्हणून नोकरी पत्करली. गुणवत्ता आणि कष्ट घेण्याची तयारी या गुणांच्या बळावर ते लवकरच एजन्सीत मोठय़ा पदावर पोहोचले. या सुमारासच त्यांनी काही मित्रमंडळींच्या सोबतीने कोलकात्याला भारतातील पहिल्या फिल्म सोसायटीची स्थापना केली. आता हळूहळू चित्रपट या विषयात त्यांचा रस वाढू लागला होता.

आपल्या प्रेमाला आणि विवाहाला घरून मान्यता मिळणार नाही याची खात्री असल्यामुळे सत्यजित व विजया यांनी हे गुपित सर्वापासून लपवूनच ठेवले होते. मात्र, घरात विजयाच्या लग्नाचा विषय आजकाल सारखा चíचला जायचा. विजया ग्रॅज्युएट झाल्यानंतर तिने एम. ए. करावे अशी तिच्या काकांची इच्छा होती. तिला आता शिक्षण पुरे झाले असे वाटत होते; पण काकांच्या इच्छेला मान देऊन तिने एम. ए.- इंग्लिशसाठी युनिव्हर्सिटीत नाव दाखल केले. युनिव्हर्सिटी घरापासून खूप दूर होती व तेथे ट्राम करून जावे लागे. विजयाचा अस्थम्याचा आजार मधूनच बळावे. रोजचे ट्रामने जाणे-येणे तिच्या प्रकृतीस सहन होईना. ती वरचेवर आजारी पडू लागली. डॉक्टरांनी बऱ्याच तपासण्या केल्यानंतर हा प्रवास हेच तिचे दुखणे वाढण्याचे कारण आहे असे निदान केले. त्यामुळे सात-आठ महिन्यांनी तिने शिक्षणाला रामराम ठोकला.

मात्र, त्यामुळे घरात तिच्या लग्नाची चर्चा जोरात सुरू झाली. तिच्यासाठी काही स्थळेही येऊ लागली. काही इच्छुक तरुणांना तिला भेटावेही लागले. कारण भेटण्यास नकार तरी कसा देणार? पण येणाऱ्या प्रत्येक स्थळात ती काहीतरी उणीव दाखवून नकार देई. तीन-चार वेळा तिची अशी कारणे ऐकल्यावर काका म्हणाले, ‘‘तुला जोडीदार हवा तरी कसा? अगदी तुझ्या मनातल्यासारखा जोडीदार मिळणे मला तरी अशक्य वाटते आहे.’’

तसा जोडीदार आपल्याला मिळाला आहे, हे मात्र ती काकांना सांगू शकत नव्हती.

शिक्षण संपल्यामुळे विजयाने नोकरी शोधण्यास सुरुवात केली. तशी तिला नोकरी मिळालीही; परंतु त्यात तिचे मन लागेना. अचानक तिच्या मनात आपण चित्रपटात जावे अशी कल्पना आली आणि त्या कल्पनेने तिचा ताबा घेतला. आपण आकर्षक आहोत, सुशिक्षित आहोत, आपल्याला अभिनय करता येतो व गाताही येते; मग आपल्याला सिनेमात काम का मिळणार नाही? इतरांना बोलण्याआधी तिने मनातला हा विचार सत्यजितना बोलून दाखविला. पण तिने सिनेमात जावे या गोष्टीला त्यांचा ठाम विरोध होता. बंगाली चित्रपटसृष्टीबद्दल त्यांचे मत चांगले नव्हते. विजयाने जेव्हा हा विचार काका-काकूंना सांगितला तेव्हा त्यांनाही तो पटला नाही. पण विजया आपल्या विचारावर ठाम होती. तिने हट्ट धरल्यामुळे शेवटी त्यांनी या गोष्टीला होकार दिला. योगायोगाने अशी संधी लवकरच आली. पशुपति चौधरी हे निर्माते टागोरांच्या ‘शेषरक्षा’ या कादंबरीवर चित्रपट निर्माण करण्याच्या विचारात होते. ते एका नव्या नायिकेच्या शोधात होते. एके दिवशी ते विजयाच्या घरी आले व तिला भेटले. त्यांना ती नायिका म्हणून योग्य वाटली. तिच्यासारख्या तरुणीने सिनेमात यायला पाहिजे, बंगाली सिनेमाला त्याचा खूप लाभ होईल, असे ते म्हणाले. हे पशुपतिबाबू विजयाच्या काकांच्या ओळखीचे असल्यामुळे त्यांनीही फारसे आढेवेढे घेतले नाहीत आणि विजयाच्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली.

या चित्रपटाचे चित्रीकरण चालू असतानाच मणी घोष यांनी त्यांच्या ‘संध्या’ या संकल्पित नव्या चित्रपटात विजयाला भूमिका दिली. झाले असे की, ‘शेषरक्षा’पूर्वीच ‘संध्या’चे शूटिंग संपले व तो प्रदíशत झाला. तो एक अत्यंत सामान्य चित्रपट बनला होता व तो दणकून आपटला. विजयावर अपयशी नायिकेचा शिक्का बसला. नंतर ‘शेषरक्षा’ प्रदíशत झाल्यावर त्याच्याकडेही कुणाचे लक्ष गेले नाही. एकामागोमाग दोन चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे विजया खूप नाराज झाली. पण सत्यजित म्हणाले, ‘‘बरे झाले. असल्या चित्रपटांत काम करून वेळ वाया घालविण्यात काय अर्थ आहे?’’

पण विजयाला आता मागे वळायचे नव्हते. योगायोगाने त्याच सुमारास मुंबईहून तिच्या बहिणीचे एक पत्र आले. ती उदय शंकर यांच्या कलापथकात संगीत शिक्षिका म्हणून काम करीत होती. काही दिवसांनी तिला पृथ्वीराज कपूर यांच्या ‘पृथ्वी थिएटर’मध्ये काम मिळाले. मुंबईत तिच्या चांगल्या ओळखी झाल्या होत्या. विजयालाही येथे काम मिळेल असे वाटून तिने विजयाला आपल्याकडे बोलावून घेतले. आता विजयासमोर एक नवाच प्रश्न निर्माण झाला. मुंबईला जायचे तर सत्यजितपासून दूर राहावे लागणार होते. येथे राहावे तर पुढे काहीच भविष्य दिसत नव्हते. सत्यजितदेखील तिने मुंबईला जाण्याच्या कल्पनेच्या विरोधात होते. दोघांच्यात खूप वादविवाद, चर्चा झाल्या. शेवटी सत्यजितना माघार घ्यावी लागली. असे ठरले की, दोघांनी एकमेकांना रोज पत्र लिहायचे. शक्य तितक्या लवकर आणि नंतर नियमितपणे सत्यजितनी मुंबईला विजयाला भेटायला जायचे आणि मुंबईत ज्या वेळी काम नसेल त्या वेळी विजयाने कोलकात्याला यायचे.

मुंबईच्या सिनेमात काम मिळवायचे म्हणजे िहदी व उर्दू चांगले आले पाहिजे. त्यासाठी येथे आल्यावर विजयाने एका मुस्लीम गृहस्थाकडे िहदी-उर्दूची शिकवणी लावली. जरी सत्यजितनी रोज पत्र पाठविण्याचे कबूल केलेले असले तरी एक अडचण अशी होती की, त्यांची इतकी पत्रे पाहून विजयाच्या बहिणीला संशय येऊ शकत होता. तिला अर्थातच याबद्दल काही माहीत नव्हते. या अडचणीवरही एक तोडगा निघाला. बोलाई चटर्जी नावाचा विजयाच्या बहिणीच्या कुटुंबाचा एक परिचित जवळच राहत होता. त्याची व विजयाची चांगलीच मत्री झाली. विजयाने त्याला विश्वासात घेऊन आपली अडचण सांगितली. सत्यजितनी त्याच्या ऑफिसच्या पत्त्यावर पत्रे पाठवावीत असे ठरले. त्याप्रमाणे दोघांचा पत्रव्यवहार सुरळीत चालू राहिला. दरम्यान, वेळ मिळाल्यावर सत्यजित अधूनमधून मुंबईत येऊन तिला भेटत असत.

मुंबईत आल्यावर विजयाने ‘जनता’ आणि ‘रेणुका’ या दोन चित्रपटांत भूमिका केल्या; पण त्या चित्रपटांची वा भूमिकांचीदेखील कुणीच दखल घेतली नाही. पुन्हा बरेच दिवस तिच्याजवळ काही काम नव्हते. या दोन चित्रपटांचेही फारसे पसे तिला मिळाले नाहीत. पशांची खूपच चणचण भासू लागली. एके दिवशी अचानक विजयाला श्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्याकडून बोलावणे आले. या मोठय़ा दिग्दर्शकाने आपल्याला बोलावले हे पाहून विजयाला खूप आनंद झाला. योगायोगाने सत्यजित यावेळी तिला भेटायला आले होते. ते तिला शांताराम यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. शांताराम यांनी विजयाची मुलाखत घेतली त्यावेळी ते बाहेर बसून होते. विजया बाहेर आल्यावर त्यांनी आतुरतेने विचारले, ‘‘कसा झाला इंटरव्ह्य़ू?’’

‘‘चांगला झाला.’’ तिने उत्तर दिले.

काही दिवसांनी शांतारामबापूंकडून उत्तर आले. त्यांनी तिची निवड केली होती. पण त्यांनी भूमिकेसाठी देऊ केलेले पसे फारच कमी होते. विजयाला तर पशांची खूपच आवश्यकता होती. शिवाय त्यांनी तिला नायिकेची नव्हे, तर एक दुय्यम भूमिका देऊ केली होती. सत्यजित आणि विजयाने या गोष्टीवर बराच विचार केला. शेवटी त्यांनी शांताराम यांना नकार कळविला.

अशाच एका भेटीत मुंबईला आल्यावर सत्यजितना दिसले की, विजयाची आर्थिक परिस्थिती फार खालावली आहे. ते आता जाहिरात कंपनीत आर्ट डायरेक्टर बनले होते. शिवाय पुस्तकांची मुखपृष्ठे, चित्रे काढण्याचे पसेही चांगले मिळू लागले होते. त्यांनी विजयाला सांगितले की, आता ते दरमहा तिला काही रक्कम सहज पाठवू शकतील. यावर विजया म्हणाली,

‘‘मी? आणि तुझ्याकडून पसे घेणार?’’

‘‘का? काय अडचण आहे?’’

‘‘आहे. तुला कळणार नाही.’’

‘‘सांग तरी.’’

‘‘आपण एकमेकांशी कधीच लग्न करू शकणार नाही. मला माझा चरितार्थ तरी स्वतंत्रपणे चालविता आला पाहिजे. आणि उद्या तू दुसऱ्या कुणाशी लग्न केलेस म्हणजे?’’

तिचे बोलणे पूर्ण होण्याच्या आधीच सत्यजित म्हणाले, ‘‘तुला चांगलेच ठाऊक आहे, की मी इतर कुणाशीही लग्न करणार नाही.’’

‘‘तू तुझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहेस. तू लग्न केले नाहीस तर तिला किती दु:ख होईल!’’

‘‘होय. म्हणूनच मला वाटते की, आपण तिला या लग्नाबद्दल राजी करायला हवे.’’

‘‘पण हे काम कोण करणार? तिला हे सांगण्याचे धर्य तुझ्याजवळ आहे का?’’

सत्यजित थोडा वेळ विचार करीत गप्प राहिले. आपल्याजवळ ते धर्य नाही, हे त्यांना माहीत होते. काही वेळाने ते म्हणाले, ‘‘काहीतरी होईल. आणि जे होईल ते चांगलेच होईल.’’

ही त्यांची नेहमीची सवय होती. भविष्यात चांगलेच होणार यावर त्यांचा ठाम विश्वास होता. पण आता विजयाला अशा शब्दांवर विश्वास राहिला नव्हता. सत्यजितच्या मनात अचानक काय आले कुणास ठाऊक, ते उठले आणि विजयाचा हात हातात घेत म्हणाले, ‘‘चल. आज मी तुझ्यासाठी साखरपुडय़ाची अंगठी खरेदी करतो, म्हणजे तरी तुझा माझ्यावर विश्वास बसेल.’’

‘‘साखरपुडय़ाची अंगठी! ती किती महाग असते हे तरी माहीत आहे का?’’

सत्यजितना ते खरेच माहीत नव्हते. पण त्यांचा हट्ट कायम होता. ते आणि विजया अंगठी शोधण्यासाठी बाजारात गेले. दिवसभर ते अंगठीचा शोध घेण्यासाठी इकडेतिकडे िहडत होते; पण मनाजोगी अंगठी मिळत नव्हती. शेवटी एका दुकानात विजयाला सोन्याचा मुलामा दिलेली एक चांदीची अंगठी दिसली. तिच्यावर एक गाय आणि शेजारी बासरी वाजवीत असलेला श्रीकृष्ण असे चित्र कोरले होते. पाहताक्षणीच विजयाला ती आवडली. मात्र, सत्यजित म्हणाले, ‘‘एवढय़ा हिऱ्यामोत्यांच्या अंगठय़ा येथे दिसताहेत आणि तुला सोन्याचा मुलामा दिलेली चांदीची अंगठी घ्यायची आहे?’’

‘‘मला हीच आवडली.’’ विजया म्हणाली.

तिच्या बोलण्यातील ठामपणा पाहून सत्यजितनी ती अंगठी लगेच विकत घेतली व तिथेच तिच्या बोटात घातली. मग ते म्हणाले, ‘‘आता मी दिलेले पसे तुला स्वीकारायला काही अडचण नाही!’’

‘‘तू पुन्हा त्याच मुद्दय़ावर आलास ना? हे पहा, सध्या माझ्या हातात एका फिल्मची ऑफर आहे. ते जमले नाही तर मी नक्कीच तुझ्याकडून पसे घेईन.’’

किमान ती एवढे तरी म्हणाली याचा सत्यजितना आनंद झाला. आता अंगठी बोटात घातल्यावर मुंबईच्या घरी तरी सर्वाना त्या दोघांतले गुपित सांगणे भाग होते. विजयाच्या बहिणीला ही बातमी ऐकून आनंद झाला. या सुमारास विजयाची आईही तिथे आलेली होती. तिने नापसंती दाखविली नाही, पण सत्यजितच्या आई काय म्हणतील याची तिला भीती वाटू लागली. सत्यजितची आई अत्यंत कडक स्वभावाची, शिस्तशीर होती. जुन्या संस्कारांत वाढलेली व ते मानणारी होती.

या सुमारास नितीन बोस या नामवंत दिग्दर्शकांनी ‘रजनी’ नावाचा एक चित्रपट बंगाली आणि िहदी भाषांत काढण्याची तयारी सुरू केली होती. त्यातील एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी त्यांनी विजयाला विचारले. ती आनंदाने तयार झाली. मात्र, काही दिवसांनी विजया खूप आजारी पडली. सत्यजितच्या घरी टेलिफोन नव्हता. त्यामुळे ते रोज ट्रंककॉल करून विजयाच्या प्रकृतीबद्दल विचारणा करीत असत. एके दिवशी न राहवून ते मुंबईला आले. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहताच विजयाच्या ध्यानात आले की, त्यांनी मनोमन काही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आणि ते खरेच होते. नोषु बसू हे सत्यजितच्या कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर होते. त्यांच्यावर सत्यजितची आई पुत्रवत प्रेम करीत असे. घरात सारे जण तिला बोलण्यासही घाबरत; पण बसू तिच्याशी कुठल्याही गोष्टीवर चर्चा करू शकत. एके दिवशी सत्यजितनी आपला प्रश्न त्यांच्यासमोर मांडला आणि आता यातून काहीतरी मार्ग काढण्याची विनंती केली. त्यांनीही यासंदर्भात शक्य ते करण्याचे कबूल केले. हे सांगून सत्यजित म्हणाले की, आता मला या प्रकरणातून मार्ग निघेल अशी आशा वाटू लागली आहे. मात्र, ते पुढे जे म्हणाले त्यामुळे विजया हादरलीच. सत्यजित म्हणाले, ‘‘मी ठरवले आहे- आपण लगेच लग्न करायचे.’’

कसे कुणास ठाऊक, आपण एकदा लग्न केले म्हणजे आई विरोध करू शकणार नाही अशी कल्पना सत्यजितच्या मनात निर्माण झाली होती. विजया म्हणाली, ‘‘हे कसे शक्य आहे?’’

‘‘त्यात काय! येथे सर्वाची आपल्या लग्नाला संमती आहे. आपण रजिस्टर लग्न करू व मग पुढे पाहता येईल, काय करायचे ते! दुसरे म्हणजे यापुढे मी तुझे काही ऐकणार नाही. मी दरमहा जे पसे पाठवीत जाईन ते तू मुकाटय़ाने घ्यायचे!’’

सत्यजित यांनी आपल्या मनातील कल्पना जेव्हा मांडली तेव्हा मुंबईच्या घरातील सारे जण या प्रस्तावाला तयार झाले. विजयाची आई मात्र कुरकुर करीत होती. सत्यजितच्या आई अतिशय कडक होत्या व त्यांना सारे घाबरत. त्यांना जेव्हा आपल्या मुलाने आपल्या माघारी लग्न केले हे समजेल तेव्हा काय होईल याची तिला भीती वाटत होती. पण सर्वानी तिला समजावले. मुलीच्या इच्छेविरुद्ध जाण्याची तिची तयारी नव्हती. शेवटी नाइलाजाने का होईना, तिने या विवाहास संमती दिली.

२० ऑक्टोबर १९४८ रोजी सत्यजित आणि विजया यांनी रजिस्टर लग्न केले. सुरेंद्र, हितेन चौधरी व बोलाई हे तिघे साक्षीदार म्हणून लग्नाला हजर होते. या लग्नानंतर जी मेजवानी देण्यात आली तिला पृथ्वीराज कपूर व त्यांची पत्नी आवर्जून उपस्थित होते.

दीर्घ भावनिक चढउतारांनंतर शेवटी दोन प्रेमी जीव एकमेकांचे झाले होते. मात्र, त्यांचा हा आनंद निभ्रेळ नव्हता. आनंदाबरोबर आपण हे लग्न सत्यजितच्या आईंना चोरून करीत आहोत ही अपराधी भावना आणि त्याबद्दल खंत त्यांच्या मनात होती.

सत्यजित कोलकात्याला परत गेल्यावर त्यांनी पुन्हा हा विषय नोशु बसू यांच्याकडे काढला. आता तो लग्न करूनही आला आहे म्हटल्यावर बसू यांना काहीतरी तातडीने करणे आवश्यक होते. ते सत्यजितच्या आईला भेटले. त्यांनी तिला सांगितले की सत्यजित विजयावर मनापासून प्रेम करतो व त्या दोघांची लग्न करण्याची इच्छा आहे. आईने प्रथम या गोष्टीला विरोध केला, पण बसूंनी तिला समजावून सांगितले की, सत्यजितने विजयाला वचन दिले आहे, की तो तिच्याशीच लग्न करील. शिवाय जर आईने परवानगी दिली नाही तर तो हे लग्न करणार नाही, पण दुसऱ्या कुणाही मुलीशी लग्नाचा विचारसुद्धा करणार नाही. शेवटी सत्यजितच्या आईने या लग्नाला संमती दिली. मात्र, या दोघांनी आधीच रजिस्टर लग्न केले आहे, ही गोष्ट त्यांनी तिला सांगितली नाही. ही गोष्ट कायम तिच्यापासून लपविलेलीच राहिली.

सत्यजितनी लगेच फेब्रुवारी १९४९ मध्ये विजयाला पत्र लिहून ही आनंदाची बातमी सांगितली व तिला ताबडतोब कोलकात्याला निघून येण्यास सांगितले. मुंबईच्या घरात सर्वाना अतिशय आनंद झाला. विजयाच्या आईला खरे म्हणजे या दोघांच्या लग्नाची कल्पना फारशी पसंत नव्हती; पण आता सत्यजितच्या आईनेच संमती दिली म्हटल्यावर तिचा विरोध मावळला.

लग्नाला आईने परवानगी दिल्यानंतर सत्यजितनी राहण्यासाठी मोठे घर पाहण्यास सुरुवात केली. लवकरच त्यांना लेक अव्हेन्यूवर दोन बेडरूम, दोन बाथरूम, हॉल, किचन आणि डायिनग रूम व व्हरांडा असलेला प्रशस्त फ्लॅट किरायाने मिळाला. लग्नाची तारीख ३ मार्च १९४९ ठरली होती. लग्नाची तयारी करण्यासाठी, खरेदी वगरेसाठी सत्यजितनी विजयाला त्यापूर्वी काही दिवस कोलकात्याला येण्यास कळविले. ‘रजनी’ या चित्रपटाचे थोडे काम उरले होते; पण नितीन बोस यांनी ‘ते काम आपण नंतर करू, तू लग्नाला जा,’ असे सांगितले. शक्य तितक्या लवकर परत येऊन तेवढे काम पूर्ण करून देण्याचे विजयाने मान्य केले व ती लवकरच कोलकात्याला आली.

इकडे सत्यजितच्या आईने लग्नाची तयारी तर झकास केली होती. सुनेसाठी तिने कितीतरी उत्तमोत्तम साडय़ा व मॅचिंग ब्लाऊज खरेदी करून ठेवले होते. एवढेच नव्हे तर विजया जेव्हा आली तेव्हा आईने तिला आपला दागिन्यांचा डबा काढून दिला. बंगाली विवाहित स्त्रीने परिधान कराव्यात असा संकेत असलेल्या दोन सोन्याच्या बांगडय़ा तिने स्वत: विजयाच्या हातावर चढविल्या. तिने विजयाला सून म्हणून स्वीकारले होते याची ही पावती होती. याचा विजयाला आणि सत्यजितनाही अतिशय आनंद झाला.

मुलाचे लग्न लावण्यासाठी सत्यजितच्या आईने शांतिनिकेतनहून कृष्णमोहनबाबू यांना खास बोलावले होते. ३ मार्च १९४९ रोजी ब्राह्मो समाजाच्या रीतीप्रमाणे सत्यजित आणि विजया यांचे विधिवत लग्न लावण्यात आले. सुमारे बारा वर्षांच्या प्रदीर्घ सहवासाच्या व निश्चित-अनिश्चिततेच्या दोलायमान कालखंडानंतर शेवटी एकमेकांवर अंत:करणपूर्वक प्रेम करणारे दोन जीव एकत्र आले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Two marriages of satyajit ray loksatta diwali issue 2019 dd

ताज्या बातम्या