रशियाने सात वर्षांपूर्वी क्रिमियाचा घास घेतल्यानंतर रशिया-युक्रेन संघर्ष अटळ ठरला होताच. तो कधी पेटणार, इतकाच प्रश्न होता. गेल्या महिन्यापासून रशियाने क्रिमिया आणि पूर्व युक्रेनच्या सीमेवर सैन्य तैनातीस सुरुवात केली. त्यामुळे रशिया २०१४ च्या आक्रमणाची पुनरावृत्ती करणार की, हे केवळ शक्तिप्रदर्शन आहे, याबाबत माध्यमांत चर्चा सुरू आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या मनात नेमके काय आहे, याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोपनीय माहितीचोरीच्या आरोपावरून युक्रेनच्या राजनैतिक अधिकाऱ्यावर रशियाने नुकतीच कारवाई केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून युक्रेननेही रशियाच्या राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. उभय देशांदरम्यानच्या संघर्षांचा हा केवळ पापुद्रा. रशियाने युक्रेनच्या सीमेलगत आणि क्रिमियामध्ये सुमारे ८० हजार सैनिक तैनात केल्याचा युक्रेन सरकारचा दावा आहे. त्यामुळे युक्रेनच्या अंगणात नेमके काय सुरू आहे, हे मांडताना ‘बीबीसी’ने सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर रशियन फौजांच्या आतापर्यंतच्या कारवायांचा वेध घेतला आहे. क्रिमिया ताब्यात घेतल्यानंतर रशियन समर्थक फुटीरवाद्यांनी पूर्व युक्रेनचा काही भाग ताब्यात घेतला. खरे तर त्याच वेळी युक्रेनचे विभाजन करण्याचा रशियाचा डाव होता. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियासमर्थक तीन वाहिन्यांवर घातलेली बंदी आणि पुतिन यांच्या समर्थकांवर घातलेल्या र्निबधांमुळे या संघर्षांने पुन्हा डोके वर काढले. शिवाय, रशियामध्ये पुतिन यांचे कडवे टीकाकार अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांच्या समर्थनार्थ आंदोलन बळकट होऊ लागले आहे. अशा स्थितीत युक्रेनमधील रशियन नागरिकांचे संरक्षण करत असल्याचे चित्र उभे करणे आणि राष्ट्रवादाची भावना चेतवणे पुतिन यांच्यासाठी फलदायी असल्याचे विश्लेषण ‘बीबीसी’ने केले आहे.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukraine border again akp
First published on: 19-04-2021 at 00:09 IST