|| कमल परुळेकर

बॅ. नाथ पै हे उत्कृष्ट वक्ते, संसदपटू आणि लोकाभिमुख, संवेदनशील नेते होते. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष शनिवारपासून (२५ सप्टेंबर) सुरू झाले, त्या निमित्ताने त्यांच्या आठवणी…

ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
arjun meghwal
साहित्य अकादमीच्या स्वायत्ततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह; केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीवर आक्षेप, सी. राधाकृष्णन यांचा सदस्यपदाचा राजीनामा
Kailash Gahlot ED custody
अरविंद केजरीवालांनंतर आता आपच्या आणखी एका मंत्र्याच्या मागे ईडीचा ससेमिरा; कोण आहेत कैलाश गेहलोत?

देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळात उच्चविद्याविभूषित असल्याने सर्व सुखे पायी लोळण घेण्याची संधी लाथाडून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात जिवाची बाजी लावलेले आणि स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाही मूल्ये जपत समाजातील शेतकरी-कष्टकरी वर्गासाठी समर्पित जीवन जगलेले तत्कालीन भारतीय राजकारणातील एक अधिनायक म्हणजे बॅरिस्टर नाथ पै!

नाथ पै यांचे मूळचे नाव पंढरीनाथ. पण सगळे त्यांना ‘नाथ’ म्हणून साद घालीत आणि पुढे तेच नाव रूढ झाले. ते आठ महिन्यांचे असतानाच वडिलांचे निधन झाले. आई व सर्व मोठी भावंडे नाथवर खूप प्रेम करत. शाळेत शिकत असताना एकदा त्यांचे गणित चुकले. शिक्षकांनी हाता-पायावर वळ उठेपर्यंत मारले. नाथने घरी काही सांगितले नाही. पण वळ पाहून सर्वच कुटुंबीय कळवळले. गुरुजींना जाब विचारू म्हणून भावंडे उठली. पण नाथने लहान असूनही त्यांना समजावले की, माझ्या हितासाठीच गुरुजींनी शिक्षा केली. तुमच्या तक्रारीमुळे ते मला मारणार नाहीत, पण माझ्याकडे दुर्लक्षही करतील. त्यात माझेच नुकसान होईल. लहान वयात केवढा हा नाथचा समंजसपणा!

नाथ जेमतेम विशीत असताना १९४२ची ‘भारत छोडो’ चळवळ सुरू झाली. पण काळ त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. समाजवादी कार्यकर्ते व गांधीवादी कार्यकर्ते इंग्रजांना सळो की पळो करण्याच्या कारवाया आखत. पण गांधीवादी हिंसेच्या विरोधात, तर समाजवादी मंडळींना त्यात वावगे वाटत नव्हते. दोन गट पडले. पण नाथने त्यांना समजावले की, स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगू, कोणाचा वध होणार नाही, याची दक्षता घेऊ. आणि काय आश्चर्य… दोन्ही गटांतील फूट टळली. मग बेळगावची पोलीस चौकी नाथ आणि त्याच्या मित्रांनी फोडली. सर्वांवर तब्बल १८ खटले दाखल झाले. नाथ आणि इतर मित्र पकडले गेले. त्यापैकी एकाला माहिती काढण्यासाठी पोलीस रात्रभर बडवत होते. शेवटी पहाटे त्याला उलटे टांगले. मार असह्य होऊन त्याने, नाथच्याच नेतृत्वाखाली चौकी जाळली, अशी कबुली दिली. मग नाथला पकडून पोलिसांनी प्रचंड मारले. सुंद्री म्हणजे वेताची छडी. ती मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवली जाई आणि पकडलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना त्या छडीने फोडून काढले जाई. रक्त फुटून मिठामुळे आगआग होत असे अंगाची. नाथला पोलिसांनी या सुंद्रीचा प्रसाद दिलाच, वर भरमाप्पाही मिळाला. भरमाप्पा म्हणजे चामड्याच्या चपला मिठाच्या पाण्यात भिजवून, त्याला नाल ठोकून मार दिला जाई. तारुण्यात पदार्पण केलेल्या नाथला पोलिसांनी हे दोन्ही प्रसाद दिलेच, वर लाथा-बुक्क्यांनी मारले. नाथला रुग्णालयात दाखल करावे लागले. यातूनच त्याला अँजायना पेक्टोरिस हा आजार कायमचा जडला आणि १९७१ला याच रोगाने नाथचा बळी घेतला. तुरुंगातही नाथने सहकैद्यांना निर्भीड बनवले. तुरुंगातील कदान्न बदलायला भाग पाडले. म्हणून सरकारने नाथला अंधारकोठडीतही डांबले. पण तो डगमगला नाही, की माघारही घेतली नाही.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाथ पै बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले. पण अंतिम परीक्षा जवळ आली असताना १९५२ ची लोकसभा व विधानसभा निवडणूक जाहीर झाली. त्यांना बेळगाव समाजवादी पक्षाने शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. नाथ लढले, पण त्यांना अपयश आले. निराश न होता ते परत इंग्लंडला गेले आणि पुढल्या वर्षी, १९५३ मध्ये पहिल्या श्रेणीत बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण होऊन मायदेशी परतले.

संसदीय कारकीर्द

स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच देशाच्या राजकीय-सामाजिक जीवनाशी समरस झालेल्या नाथ पैंनी १९५७ ते १९७१ या काळात राजापूर लोकसभा मतदारसंघाचे संसदेत अतिशय प्रभावीपणे प्रतिनिधित्व केले. माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू अनेकदा त्यांना न्याहारीसाठी निमंत्रित करून विविध विषयांवर मते जाणून घेत असत. आपल्या अमोघ वक्तृत्वाने नाथ पैंनी संसद गाजवली. एकदा तर लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष हुकुमसिंग यांनी आसनावरून उठून उत्कृष्ट भाषणाबद्दल त्यांची पाठ थोपटली.

संसद आणि न्यायसंस्था यांच्यात श्रेष्ठ कोण, हा वाद पूर्वीपासून होत आला आहे. १९६७ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला नाथ पै आणि ज्येष्ठ विधिज्ञ बॅ. नानी पालखीवाला हे दोघे जण व्यासपीठावर उपस्थित होते. त्या वेळी बोलताना पालखीवाला यांनी, ‘दर पाच वर्षांनी बदलणाऱ्या संसदेत कोण, कसा माणूस निवडून येईल, याची खात्री नाही. नाथ पै यांच्यासारखा मर्यादा पुरुषोत्तम संसदेत कायम असू शकत नाही. म्हणून याबाबत संसदेच्या अधिकारांना मर्यादा असली पाहिजे,’ असे ठासून सांगितले. त्यावर भाष्य करताना पै यांनी, घटनाबदलाचे अधिकार लोकनियुक्त प्रतिनिधींच्याच हातात असले पाहिजेत, असे मत आपल्या मृदू, आर्जवी, पण प्रभावी सुरात मांडले. पण त्यांच्या या उदात्त हेतूचा दुरुपयोग पुढे कै. इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निमित्ताने पाहायला मिळाला.

देशाच्या परराष्ट्रीय धोरणातील उणिवाही त्यांनी संसदेत या विषयावरील चर्चेत सहभागी होताना अधोरेखित केल्या होत्या. आपला देश रशिया व अमेरिका या दोन्ही बाजूंना कसे हेलकावे खातो, हे सोदाहरण स्पष्ट करून आपला अलिप्ततावाद पार मोडकळीस आल्याची टीका त्यांनी या संदर्भात बोलताना केली होती.

लोकाभिमुख संवेदनशीलता

अशा प्रकारे संसद गाजवत असतानाच नाथ पै यांचे त्यांच्या मतदारसंघावर बारीक लक्ष असायचे. वेंगुर्ले-शिरोडा मार्गावर मोचेमाडच्या खाडीत एक लग्नाचे वऱ्हाड बुडाले. वधू-वरासह त्यांचे अनेक नातेवाईक बुडून मृत्युमुखी पडले. ही बातमी वाचताच पै यांनी वेंगुर्ले गाठले. मृतांच्या नातेवाईकांना भेटले. सांत्वन केले आणि तडक मुंबईत जाऊन बांधकाम विभागाच्या सचिवांना भेटून यंत्रणा कामाला लावली. त्यानंतर १५ दिवसांतच खात्याचे मुख्य सचिव, मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता इत्यादी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोचेमाडला भेट दिली. पुलाची जागा निश्चित करून आराखडा व अंदाजपत्रक तयार केले आणि प्रशासकीय मान्यताही मिळवून दिली. दुर्दैवाने जमीनमालकानी खो घातल्याने नाथांच्या हयातीत पूल झाला नाही, पण त्यांच्या मृत्यूनंतर हा पूल आज दिमाखात उभा आहे. नाथ पै यांच्या स्मरणार्थ पुलाला त्यांचेच नाव देण्यात आले आहे. नाथने जे काम कोणी न सांगताही समजून घेतले आणि ते पूर्णत्वास नेले. असे म्हटले जाई की, कोकणी माणसाच्या पायास झालेली दुखापतसुद्धा दिल्लीत नाथांच्या मस्तकापर्यंत पोहोचत असे आणि ती दूर करण्यासाठी ते अपार मेहनत करत! अशी दाद मिळवणाऱ्या लोकाभिमुखतेमुळेच ते जनतेच्या गळ्यातला ताईत बनले होते.

जुन्या काळातील अखंड रत्नागिरी जिल्ह्यात १९६१ मध्ये प्रचंड वादळ झाले. सर्वत्र हाहाकार माजला. नाथ पै तेव्हा बेळगावात होते.आकाशवाणीवरून त्यांनी रात्री बातमी ऐकली. पहाटे सावंतवाडीत पोहोचले. तेथे समाजवादी साथी जयानंद मठकर यांना म्हणाले, चल वेंगुर्लेत जाऊ. पण झाडे रस्त्यात पडून रस्ते तर बंद झाले होते. ते ऐकून नाथ म्हणाले, चल सायकलने जाऊ. तासाभराचा प्रवास होता, पण त्यांना त्याच प्रवासाला सुमारे सहा तास लागले. पण कधी सायकलने, तर कधी सायकल हातात धरून पायी प्रवास, तर कधी चक्क सायकल डोक्यावर धरून पायपीट करत त्यांनी वेंगुर्ले गाठलेच. वाटेत ग्रामस्थांच्या सभा घेत, ‘शासकीय यंत्रणा सर्वत्र वेळीच पोहोचणे कठीण आहे, त्यामुळे आपले रस्ते आपणच अडथळे दूर करून वाहतुकीस मोकळे केले पाहिजेत’ असे सांगायला ते विसरले नाहीत, आणि काय आश्चर्य, दुसऱ्या दिवशी लोकांनी श्रमदानाने रस्ते मोकळे केले. नंतर थकले असतानाही त्यांनी संपूर्ण मतदारसंघाचा दौरा केला. तेथूनच मुंबईत मुख्यमंत्र्यांना वादळाची कल्पना देऊन ते दिल्लीला पंतप्रधानांना भेटायला गेले व वादळग्रस्तांना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न केले. तोपर्यंत सरकारने वादळाची अधिकृत चौकशीही केली नव्हती. नाथ पै यांच्या कोकणवासीयांविषयीच्या आत्मीयतेपोटीच हे घडले.

कोकण रेल्वे प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी कै. मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस आणि रामकृष्ण हेगडे या त्रिकुटाचे प्रयत्न कारणीभूत ठरले, तरी या प्रकल्पाचे पहिले सर्वेक्षण, नाथ पैंनी या विषयावर १९६९ मध्ये संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलेल्या कपात सूचनेमुळे झाले, हे विसरता येणार नाही.

कर्नाटकच्या सीमेवरील बेळगाव, निपाणी, कारवार आदी शहरांतील मराठी भाषकांना महाराष्ट्रात सामावून घ्यावे यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती सातत्याने लढतेच आहे. त्यात नाथ पै यांचेही मोठे योगदान ठरले आहे. आयुष्यातील शेवटचे भाषणही त्यांनी सीमा प्रश्नावर बेळगावातच केले होते. त्यानंतर १७ जानेवारी १९७१ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

नाथकालीन राजकारण आणि आजच्या राजकारणाचा विचार केला तर तेव्हाचे सौजन्य, सौहार्द, सर्वसमावेशकतेचे राजकारण लोप पावून तसे विचार पुसण्याचे आणि एका विशिष्ट विचारधारेचे देशात जात, धर्म, पंथ यांच्या आधारे तुकडे पाडू  पाहणाऱ्यांचा खोटा इतिहास तरुण पिढीसमोर आणण्याचे प्रयत्न देशात जाणीवपूर्वक चालू आहेत. पाशवी बहुमताच्या जोरावर घटनेचे धर्मनिरपेक्ष स्वरूपच बदलण्याचा घाट घातला जात आहे. अशा वेळी नाथांसारख्या मूल्यनिष्ठ नितळ राजकारण्यांची उणीव तीव्रतेने जाणवते. लेखिका अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडण्याच्या कामी  सक्रिय आहेत.