चार शब्द
स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंतीचे हे वर्ष असल्याने ‘चार शब्द’ दिवाळी अंकामध्ये यंदा स्वामी विवेकानंद यांच्यावर ‘युगदर्शी स्वामी’ हा विषय घेण्यात आला आहे. सुप्रसिद्ध मुखपृष्ठकार बाळ ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकारलेले स्वामी विवेकानंदांचे मुखपृष्ठावरील अप्रतिम चित्र पाहिल्यावरच अंकातील विषयांचे गांभीर्य लक्षात येऊ शकते. त्या दृष्टीने समर्पक आणि तितकेच लक्षवेधक चित्र हे या दिवाळी अंकाचे वैशिष्टय़ म्हटले पाहिजे.
स्वामी विवेकानंदांविषयीचे आकर्षण ते हयात असताना होते तेवढेच आजही आहे, हे अंकातील सर्व लेख वाचताना सहज लक्षात येईल. डॉ. यशवंत पाठक, डॉ. सच्चिदानंद शेवडे, डॉ. पद्माकर विष्णू वर्तक, डॉ. विजया वाड, क्रांतिगीता महाबळ, प्रा. प्रतिभा सराफ, मल्हार कृष्ण गोखले अशा मान्यवरांच्या उद्बोधक ठरणाऱ्या लेखांबरोबरच ‘स्वामी आणि मुंबई नगरी’, ‘स्वामी आणि तरुणाई’ असे वाचनीय लेखही यात आहेत. बुलढाणा जिल्हय़ातील मेहकर तालुक्यातील हिवरा बुद्रुक या गावी महाराजश्री शुकदास यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी भारले गेल्याने विवेकानंद आश्रम सुरू केला. लोककल्याणाच्या हेतूने शुकदास यांनी केलेले काम यावर विजय साखळकर यांचा लेख असून हिवरा बुद्रुक या छोटय़ा गावीसुद्धा मानवी कल्याणासाठी लोक काम करतात याची माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकेल. किंबहुना स्वामी विवेकानंद यांचे व्यक्तिमत्त्व आणि विचार यातून प्रेरणा घेऊन विविध क्षेत्रांत लोक कसे काम करून दाखवतात याचेच हे उत्कृष्ट उदाहरण ठरावे.
संपादक : अरुण मानकर,
पृष्ठे  : २१२, किंमत : ९० रुपये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अक्षरगंध
यंदाच्या तिसऱ्या दिवाळी अंकात विलेपार्ले येथे राहणारे दिग्गज लेखक तसेच कलावंत यांच्यावर संपूर्ण अंक आहे. विलेपाल्र्यात पु. ल., रवींद्र पिंगे, माधव गडकरी, विजय तेंडुलकर, स. ह. देशपांडे, डॉ. विद्याधर पुंडलिक असे अनेक प्रतिभावंत राहत होते. त्यांच्याविषयी किंवा त्यांनी केलेले लेखन अंकात समाविष्ट करण्यात आले आहे. दिवाळी अंक म्हणून हा अंक वाचताना सहजपणे संपादकांनी संबंधित वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामवंतांची जन्मतारीख आणि मृत्यूची तारीख याचा उल्लेख करून संदर्भासाठीचे ‘डॉक्युमेन्टेशन’ करण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. लेखकांबरोबरच चंद्रकांत गोखले, दत्ता भट, अरुण जोगळेकर, कमलाकर सारंग यांच्याविषयीचे लेखही वाचनीय आहेत. अक्षर हे एक चित्रच असते, या भूमिकेतून विजयराज बोधनकर यांनी तयार केलेले अंकाचे मुखपृष्ठ अतिशय सुंदर आहे. विलेपाल्र्यात वास्तव्य केलेल्या कवींचा परिचय करून देणारा मजकूर असल्यामुळे साहित्य-कला या दोन्ही क्षेत्रांतील पार्लेकर व्यक्तींची एकाच अंकात दिलेली माहिती आणि महती हेच या अंकाचे यंदाचे वैशिष्टय़ ठरावे.
संपादिका : मधुवंती सप्रे,  
पृष्ठे : २००, किंमत :१२० रुपये  

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Welcome to diwali magazine
First published on: 27-11-2012 at 11:27 IST