आजकाल सर्वत्रच संशयाचं आणि शंकेचं वातावरण; विश्वासच उरलेला नाही. कदाचित त्यामुळेच ‘त्या’ दिल्ली-बडोदे प्रवासाची सारखी आठवण येत असावी.

त्याचं असं झालं.. १९७०च्या मे महिन्यात बी. ए.चा रिझल्ट लागला. कसाबसा रडतखडत पास तर झालो. आता पुढे काय? नोकरीसाठी भटकंती सुरू केली. शेवटी इन्कमटॅक्स ऑफिसातल्या एका दूरच्या मामाच्या वशिल्याने ‘भारत एन्टरप्रायझेस’च्या वडोदरा शाखेत ज्युनिअर क्लार्क म्हणून रुजू झालो.

Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

अभ्यासात अगदी जेमतेम असलो तरी व्यवहारांत खूप कुशल होतो. कोणाशी काय, किती व कशा प्रकारे बोलायचं, कोणाला कसं खूश ठेवायचं इत्यादी अनेक कला उपजतच होत्या. त्यामुळे ऑफिसमध्ये जम बसायला मुळीच वेळ लागला नाही. कामही मार्केटिंगचं, माझ्या अत्यंत आवडीचं आणि मी ते उत्साहाने करीत होतो. म्हणूनच की काय दिल्ली हेड ऑफिसमध्ये काहीही काम असल्यास ब्रॅन्च मॅनेजर मलाच धाडीत असे. त्या वाऱ्यांपैकी एक वारीत घडलेली ही कथा.

कनॉट प्रेसमधील हेड ऑफिसची अनेक लहानमोठी कामं आटोपून मी दुपारी चार वाजताच दिल्ली स्टेशन गाठलं. एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर माझी नेहमीची दिल्ली- मुंबई एक्स्प्रेस लागलेली होती. थर्ड क्लास स्लीपरच्या ‘एस-९’ डब्यात माझं रिझव्‍‌र्हेशन होतं. दरवाजा जवळचा माझा बर्थ होता, आठ नंबरचा, बाजूचा पण वरचा. बॅग ठेवण्यासाठी खाली वाकलो तेव्हा खालच्या सर्वच जागा गच्च भरलेल्या दिसल्या. बडोद्यातील विख्यात आणि विशाल अशा ‘चंदन स्टोर्स’चे मालक चन्दूभाई ठक्कर आणि कुटुंबीयांनी सहा बर्थ रिझव्‍‌र्ह केलेले होते. सामानाची थोडीशी जुळवाजुळव करून मी माझी छोटी सुटकेस कशीबशी घुमवली.

चंदन स्टोर्सचे अनेक बडोदेकर गिऱ्हाईक; त्यांचपैकी मी एक. ही मंडळी अधूनमधून कामानिमित्त माझ्या ऑफिसमध्ये येत असत. सर्वात मोठे चन्दूभाई व त्यांच्या पत्नी सुभद्राबेन, मगनबाई आणि त्यांच्या पत्नी शीलाबेन, सर्वात धाकटे आणि अविवाहित रणछोडभाई आणि चन्दूभाईंचा नुकताच धंद्यात शिरलेला २०-२२ वर्षांचा तरुण मुलगा, उदय- अशी ही सहाजण दिल्ली व परिसर बघण्याच्या इराद्याने आली होती; पण एवढय़ा जंगी खरेदीनंतर दिल्ली किती बघितली असेल ते परमेश्वरालाच ठाऊक.

मला डब्यात बघून ठक्कर मंडळी खूश झाली होती. कारण माझा अत्यंत बोलघेवडा, मोकळा स्वभाव. सिनेमा, संगीत, क्रिकेट, शेअर मार्केट इत्यादी अनेक विषयांवर मी एखाद्या चांगल्या माहीतगारासारखा बोलत असल्यामुळे सर्व प्रवास खूप मजेत जाणार याची सर्वानाच खात्री होती.  गाडी सुटायला एक-दोन मिनिटंच असतील, आणि..

एन्ट्री घेतली एका काटकुळ्या, सावळ्या, डोक्यावर कुरळ्या केसांचे अमर्याद रान असलेल्या तरुणाने. तपकिरी तंग विजार आणि काळपट मळकट टी-शर्ट असा त्याचा वेष होता. टी-शर्टवर यु एस प्रिझन झीरो झीरो सेव्हन असं पुढेमागे छापलेलं होत. असेल चोवीशी-पंचविशीचा. पायात प्लॅस्टिकच्या सपाता व हातात वर्षांनुवर्षे वापरून अगदी जुनाट झालेली ब्रीफकेस. हिंदी सिनेमातला व्हीलन नव्हे, पण व्हीलनच्या टोळीतला उगाच दातओठ खाणारा गुंड म्हणून शोभून दिसला असता. दोन-तीन दिवसांची दाढी वाढलेली होती. दाढीचे खुंट गालांवर व हनुवटीवर दिसत होते. दातही वेडेवाकडे, पिवळे झालेले..

अशा या ‘असामान्य’ व्यक्तिमत्त्वाच्या आगमनामुळे आमचं हसणं-खिदळणं काय संभाषणदेखील एकदम बंद. नुसती भन्नाट शांतता. आनंदाच्या दूधसागरात हा मिठाचा खडा? सात नंबरचा बर्थ त्याचा; बाजूला व खालचा. त्याने खाली वाकून सामानासाठी जागा शोधण्याचा प्रयत्न केलाच नाही; त्याची गरजच नव्हती, कारण त्याच्याकडे सामान म्हणजे त्याची छोटी, जुनाट ब्रीफकेस. त्याने आम्हा सर्वाकडे नजर टाकली. थोडंसं हास्य ओठांवर आणलं देखील, पण आम्हा सर्वाकडून थंडगार प्रतिसाद. तो थोडासा कावराबावरा झालेला वाटला. धीर करून माझ्या समोरच्या सीटवर स्थानापन्न झाला. काही तरी बोलायचा प्रयत्न करतो आहे हे जाणून आम्ही नजरा दुसरीकडे वळविल्या. त्याच्या आगमनामुळे आमची खूप निराशा झालेली आहे हे त्याच्या लक्षात आलेच असावे. आमच्या या विचित्र, तुसडय़ा वर्तनाने तो काहीसा चिडलेला दिसला. नंतर त्याने आमच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करायचं ठरवलं. आपली ब्रीफकेस मांडीवर ठेवून त्याने खटकन् उघडली व त्यांतून ‘पिवळा हत्ती’चे पाकीट व माचिस काढून घेतली. बॅग सीटवर ठेवून तो दरवाजाकडे गेला आणि सिगारेटचा आस्वाद घेऊ लागला. आता सर्व प्रवासांत सिगारेटचीच साथसोबत असणार याची त्याला खात्री झाली होती. मूठ बंद करून दोन बोटांत धरून सिगारेट पिण्याची त्याची लकब लक्षात राहण्यासारखीच होती. सिगारेट संपवून तो सीटवर बसला तेव्हा मी त्याला दबकत विचारले, ‘‘काय, कुठे निघालात आपण? बडोद्याला की मुंबईला?’’ त्याने माझ्याकडे आश्चर्याने नजर टाकली आणि मोठय़ा नम्रतेने त्याच्या शुद्ध हिंदीत उत्तर दिले. ‘‘मी जातोय मुंबईला, कंपनीच्या कामासाठी.’’ ‘‘किती दिवसांसाठी?’’ मी. ‘‘निदान दहा दिवस तरी मुक्काम करावा लागेल. कामच तसं महत्त्वाचं आहे म्हणून. अ‍ॅम्बॅसेडर हॉटेलात रिझव्‍‌र्हेशन आहे; कारण सर्व कामं त्याच परिसरात असल्यामुळे,’’ तो म्हणाला. मी अगदी स्तब्ध आणि स्तिमित. ‘‘काय लेकाचा बंडला फेकतोय? आम्हाला चिडवायलाच काही तरी बडबडत असेल,’’ मनाशी म्हटलं. दहा दिवस मुंबईत ऑफिसच्या कामासाठी जाणाऱ्या या माझ्या अज्ञात मित्राकडे सामान म्हणून काय तर एक जुनाट ब्रीफकेस! सगळंच कसं विचित्र आणि संशयास्पद! ठक्कर मंडळी हा आमचा संवाद जिवात जीव आणून ऐकत होती. संशयाने संपूर्ण ताबा मिळविला होता. भीती- नैराश्याची घोर छाया त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसायला लागली होती.

आता हा इसम भातातल्या खडय़ासारखा प्रवासभर त्रास देत राहाणार? भातातला खडा तोंडातून काढून बाहेर फेकून तरी देता येतो; पण याचं काय करायचं? च्यायला, काय ध्यान आहे? काय त्याचा तो मवाल्यासारखा अवतार?

बाजूचा खालचा बर्थ त्याचा आणि त्याच्याकडे काहीच सामान नाही? त्या छोटय़ाशा ब्रीफकेसमध्ये काय असू शकेल? नक्की, हा चोर बदमाशच असणार. रात्री आपल्या किमती बॅगा लंपास केल्या तर? स्टेशनास्टेशनावर त्याचे साथीदार असतील तर? आपल्याच डब्यातदेखील काही साथीदार असतील तर? यांसारखे अनेक प्रश्न ठक्कर मंडळींना सतावू लागले. मजेदार प्रवासाची त्यांची व माझीही स्वप्न अक्षरश: धुळीला मिळाली. त्यांच्या सर्वच बॅगातला ऐवज फार किमती होता तेव्हा त्यांची भीतीही रास्त होती. पण यावर आपल्याकडे काही उपाय आहे का? मग उगीच काळजी करून डोक्याला त्रास कशाला करून घ्यायचा? मग करायचं तरी काय? काही सुचेना. डोकंच काम करेना. त्याला गुजराती अजिबात कळत नसल्यामुळे आमचं त्याला शिव्याशाप देणं चालूच राहिलं. शिवाय आम्ही त्याच्याशी अबोला धरल्यामुळे तो त्याच्या सीटवर जास्त वेळ टिकतच नव्हता. एकुलती एक ब्रीफकेस हातात घेऊन मुक्तपणे गाडीभर संचार करत होता. साथीदारांशी सल्लामसलत करण्यासाठी तर हा भामटा फिरत नसेल? आम्हा सर्वाच्या संशयग्रस्त मनात आलेली एक शंका.

या भणंग मवाल्याचं काय करायचं? याचा बंदोबस्त तरी कसा करायचा? असे अनेक प्रश्न भेडसावीत असतानाच डब्यात शिरला देवेश बारोट, थर्ड- क्लास स्लीपर कोचचा कंडक्टर. अडीअडचणीला ‘बर्थ’ देणारा; अर्थात् पैसे घेऊनच. नियमितपणे याच रुटवर प्रवास करणाऱ्या आम्हा सर्वाचा परिचित. देवेशच्या रूपाने प्रत्यक्ष देवच उभा ठाकला म्हणायचा. मी त्याला ओढून बाजूला नेले आणि आमची समस्या थोडक्यात सांगितली. चन्दूभाईदेखील उठून आले आणि त्यांनी त्या तरुण ‘खलनायका’ला दुसऱ्या डब्यात जागा देण्याचा आग्रहच धरला. चन्दूभाईंना तो डोळ्यासमोर देखील नको होता. मे महिना, गाडीला खूप गर्दी. तेव्हा तो पर्याय अशक्यच होता. ‘‘देवेशभाई प्लीज तुम्ही त्याची चौकशी करा. दहा दिवसांसाठी मुंबईला जातोय असं म्हणतो. अरे! अ‍ॅम्बॅसेडर हॉटेलांत राहाणार असंही म्हणतो. पण साला, बरोबर सामान काय तर म्हणे एक जुनाट ब्रीफकेस? कसं शक्य आहे? देवेशभाई माझं ऐका; हा नक्की चोरच असणार. आमचं किमती सामान चोरायलाच कोणीतरी पाठवला असणार. तुम्ही रेल्वे पोलिसांना तर सांगा?’’

देवेशने त्या तरुणाकडे पाहिले. त्याचा ‘अवतार’ बघून थोडासा साशंक झाल्यासारखा वाटला. त्याने त्याच्या दीर्घ कारकीर्दीत असे अनेक प्रसंग हाताळले होते. तो म्हणाला, ‘‘अहो, चन्दूभाईशेठ, अशी उतावीळ करू नका. मी तपास करतो. तुम्ही निश्चित राहा. अहो, सामान कमी असणं किंवा बिलकूल नसणं हा गुन्हा होऊ शकत नाही. एवढंच काय, पण आमची रेल्वे तर ‘ट्रॅव्हल लाइट’चा भरपूर प्रचार करते. तुमच्याकडेच ज्यादा लगेज आहे. तुम्हालाच चार्ज भरावा लागेल.’’ चन्दूभाई थोडे वरमले आणि आवाजात शक्य तेवढी नरमाई आणून त्यांनी पुन्हा एकदा देवेशला त्या ‘खलनायका’ची चौकशी करण्याची विनंती केली. स्वत:च्या एक्सेस लगेजची योग्य भरपाई करण्याचं आश्वासनही दिलं. नुसत्या आश्वासनानेच देवेश खूश झाला आणि सटकला पुढच्या कामाला; पण वीक एन्ड हॉल्ट बडोद्यात करताना चन्दूभाईंना भेटण्याचे मनाशी ठरवूनच. आश्वासनाला वेळच्या वेळीच काही ‘ठोस’ रूप नको का द्यायला?

आम्हा सर्वाच्या चेहऱ्यावर प्रेतकळा कायम आणि मनात त्या नवख्या तरुणाबद्दल बळावलेला संशय आणि.. अत्यंत तिटकारा. अगदी विनाकारणच नाही का? पण आमच्या संशयग्रस्त, कलुषित मनाची समजूत घालणार कोण? सर्व मंडळी चिंतेत बुडालेली; संभाषणदेखील मंदावलेले, जुजबीच, अगदी कामापुरते.

एवढय़ात अंगात एखादं भूत शिरावं त्याप्रमाणे चन्दूभाईंचा उदय ताडकन् उभा राहिला आणि त्या तरुणाला आपल्या धेडगुजरी हिंदीत म्हणाला, ‘‘तू कोण असशील तो; पण मिस्टर, तुझा बेत काय आहे? तुला हे सर्व जड जाणार, सांगून ठेवतो. पोलिसांत आमच्या खूप ओळखी आहेत. काही गडबड करायचा प्रयत्नदेखील करू नकोस.’’ या अनपेक्षित हल्ल्यांमुळे तो तरुण थोडासा हादरलाच. आम्हीदेखील अस्वस्थ झालो. चन्दूभाईंनी उदयला चूप राहाण्यास फर्मावले. तो तरुण थोडा वेळ गप्प राहिला आणि मग अगदी नम्रपणे म्हणाला, ‘‘तुला काय समजायचं ते समज. माझ्याशी विनाकारण वाद घालू नकोस. तुझ्याशी किंवा कोणाशीही काहीच बोलायचं नाहीये. नुसत्या कपडय़ावरून माणसाची ओळख पटली असती तर काय हवं होतं?  अरे, जग दिसतं नं, तसं नसतं.’’ असं तत्त्वज्ञान पाझरून तो उठला; ब्रीफकेसमधून एक सिगारेट व माचिस काढून तडक टॉयलेटमध्ये शिरला. माझ्यातला डिटेक्टिव्ह जागा झाला. तो टॉयलेटमध्ये आहे याची परत एकदा खात्री करून घेतली आण मग त्याची ब्रीफकेस उघडली आणि आत बघितलं. ब्रीफकेसमध्ये एक उघडलेले अणि एक सीलबंद अशी दोन ‘पिवळा हत्ती’ ची पाकिटं, एक माचिस, मोडका, दातपडका कंगवा, मळका नॅपकीन आणि एक पिवळं धम्मक केळं.. मी पटकन ब्रीफकेस बंद करून त्याच्या सीटवर ठेवली. ठक्कर मंडळींची उत्सुकता शिगेला पोचली होती.

‘‘काय रे? काय आहे त्या बॅगेत?’’ सर्व ठक्कर एकमुखाने अक्षरश: खेकसले.

‘‘अहो, सबूर करा! सर्व सांगतो,’’ मी.

‘‘जास्त भाव खाऊ नकोस रे बाबा. चटकन सर्व सांग’’ चन्दूभाई.

सर्वाच्या नजरा माझ्यावर रोखलेल्या आणि कान टवकारलेले. मी मुद्दाम त्यांची उत्कंठा वाढवीत आहे, असं त्यांना वाटत असावं; आणि ते फारसं खोटंही नव्हतं.

‘‘आता लक्ष देऊन ऐका. त्याच्या छोटय़ाशा ब्रीफकेसमध्ये अनेक वस्तू आहेत; सिगारेटची पाकिटं व माचिस आहेत. एक मोडका कंगवा आणि मळका नॅपकीन आहे,’’ मी.

‘‘एवढंच? कसं शक्य आहे? अरे, या चोराकडे तमंचा, म्हणजे पिस्तूल हो; किंवा भला, लांबलचक सुरा वगैरे काही नाही? रामपुरी चाकू, सुंगवायची बाटली पण नाही? तू नीट बघितलं नसशील, परत एकदा बघ.’’ इति- सुभद्राबेन.

‘‘हो, अगदी बरोबर. पिस्तूल, चाकू नव्हते, पण आणखी एक वस्तू होती,’’ मी.

‘‘अरे, मग लवकर बोल की!’’ सर्वच ओरडले.

‘‘त्या बॅगेत एक खूप पिकलेलं पिवळ धमक केळं मात्र आह.े’’ मी.

त्या परिस्थितीत सर्वाना थोडं हसू तर आलंच. पण मनातला संशय शतपटीने बळावला.

‘‘त्याचा इरादा स्पष्ट आहे असं तुम्हाला नाही वाटत?’’ मगनभाई म्हणाले. रणछोडभाईंनीही री ओढली.

पुन्हा निराशा, चिंता व भीतीचे वातावरण. या ‘चोरा’चं करायचं काय? आपण गाडी बदलायची तर ते शक्य नाही. एवढं जंगी सामान घेऊन कुठल्या गाडीत जागा मिळणार? त्याला गाडीबाहेर काढणं तर त्याहूनही अशक्य.

एवढय़ा खाण्याच्या वस्तू बरोबर होत्या, पण अन्नावरची वासनाच उडाली होती. काहीही झालं तरी अखेर या परिस्थितीवर तोडगा आपल्यालाच काढायचा आहे. हे नक्की. देवेशवर सर्वस्वी विसंबून राहाणेदेखील योग्य नाही असं सर्वाचंच मत पडलं. ‘‘तोही यात सामील असेल तर? हल्ली कोणाचं काही सांगता येत नाही,’’ शीलाबेनची रास्त शंका.

आपापसांत खूप खलबतं झाली आणि त्या अंती असं ठरलं की रात्री दहा ते सकाळी सातपर्यंत आळीपाळीने जागं राहून सामानावर लक्ष द्यायचं आणि त्या चोराचे आणि त्याच्या साथीदारांचे सर्व प्रयत्न हाणून पाडायचे. रात्री एक ते सकाळी सहा पर्यंत कोणी जागायचं यावर बरीच चर्चा झाली, मतभेदही झाले; पण शेवटी रात्री दहा ते एक सर्व वडील मंडळींना सोपवून मी आणि उदयने उरलेल्या वेळात पहारा देण्याचं सर्वानुमते संमत झाले. दहा ते एक वडील मंडळींनी पत्ते खेळायचं ठरविलं आणि आम्ही दोघांनी आराम करायचा बेत केला. कोणाकडूनही खाण्यापिण्याची कुठलीच वस्तू स्वीकारायची नाही असंही ठरलं; अगदी रेल्वेच्या माणसाकडूनही नाही. काय सांगता, सगळेच या कटात सामील असेल तर? नाहीतर या भणंग मवाल्याला बरोबर बाजूचा, खालचा व दरवाजाजवळाचा बर्थ कसा काय मिळाला? थोडक्यात म्हणजे संशयाच्या भूताने सर्वाच्या मनाचा व बुद्धीचा संपूर्ण ताबा मिळविला होता. ते भूत कोणाच्याही मानगुटीवरून उतरायला तयार नव्हते.

आमच्या दृष्टीने आमची संरक्षण व्यवस्था चोख झाली होती. तो परत आला. विजयी मुद्रेने आम्ही त्याच्याकडे पाहू लागलो. त्याला काहीच बोध होईना. सर्व समस्यांवर आम्ही अफलातून तोडगा काढला आहे हे त्याला कळवायचं होतं. आम्ही स्वत:वरच खूश; जग जिंकल्याचा आनंद चेहऱ्यावर. ‘तो’ मात्र स्थितप्रज्ञासारखा.

युद्धरेखा आखल्या गेल्या होत्या. एका बाजूला ‘तो’ आणि त्याचे असंख्य, अदृश्य साथीदार व दुसऱ्या बाजूला आमची सप्तरंगी सेना. लढाईला कधी तोंड फुटणार याचा सर्वजण विचार करीत असतानाच देवेश बारोट समोरून आला. त्याने गंभीर मुद्रा धारण केलेली होती. आमचा संशय अगदी खरा असल्याची सर्वाना खात्री पटली.

तशीच गंभीर मुद्रा कायम ठेवून देवेश एका सीटवर बसला. काही वेळ बोलेनाच. आमचे चेहरे अधिकच त्रस्त आणि चिंतित. इतक्यात काय झाले, कोण जाणे पण तो वेड लागल्यासारखा हसू लागला. एवढय़ा मोठय़ाने हसू लागला की आम्ही सर्व आश्चर्यचकित. देवेशने चन्दूभाईंना जवळ बोलावून कानात काही तरी सांगितले. ते क्षणभर भांबावल्यासारखे वाटले आणि मग तेही खो खो हसू लागले. आम्हाला काही कळेना. विजेचा झटकाच बसला होता; पण चन्दूभाईंना दिलखुलास हसताना पाहून मनावरचा ताण मात्र खूप कमी झाला हेही तितकंच खरं.

आम्ही सर्वानी चन्दूभाईं भोवती कोंडाळं केलं. ते हलक्या, दबक्या आवाजात म्हणाले, ‘‘अरे, या ‘चोरा’ने आपल्याला सपशेल फसविलं की; पण सर्व घोटाळा आपणच केला. याच्या एकंदर अवतारावरून आपल्याला वेगळंच वाटलं, नाही का? पण हकिकत अशी आहे की या आपल्या चोराचा साहेब, वेद मेहरा फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करत आहे आणि हा आपला चोर त्याचा अ‍ॅटेन्डन्ट या नात्याने थर्डक्लास स्लीपर कोचमध्ये आपल्याबरोबर आहे. कंपनीचा तसा नियमच आहे म्हणे.’’

‘‘तो देवेशभाई तुम्हाला काही तरी सांगतो आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता? अहो, थोडा तरी विचार कराल की नाही? नोकर असला तरी एवढय़ा मोठय़ा दहा दिवसांच्या प्रवासासाठी त्याच्याकडे सामान नको?’’ सुभद्राबेननी पृच्छा केली.

‘‘अगं, याच्या साहेबांनीच याची बॅग स्वत:जवळ ठेवून घेतली आहे. विचार, विचार का म्हणून?’’ चन्दूभाई.

‘‘अहो, सांगा की सर्व पटापट. आता तुम्ही मात्र भाव खाऊ नका.’’ सुभद्राबेन म्हणाल्या.

पुन्हा एकदा चन्दूभाईंना हास्याचा झटका आला. ते हसत हसतच म्हणाले, ‘‘त्याच्या साहेबाने त्याची बॅग ठेवून घेतली ती थर्ड क्लासमध्ये चोरांचा सुळसुळाट फार म्हणून. दुसऱ्या दिवशीच मुंबईत खूप काम असल्यामुळे ‘चोरा’ला रात्री स्वस्थ झोप मिळावी म्हणूनदेखील. कळलं? नाईलाजाने सामानाशिवायच तो आपल्या डब्यात चढला. जुनी ब्रीफकेस व नॅपकीन तो उशी म्हणून वापरतो. आता पडला ना डोक्यात लख्ख प्रकाश?’’

हे सर्व ऐकून मनापासून आणि मनसोक्त हसलो तर खरे; पण क्षणभरच. आम्हाला आमचीच लाज वाटायला लागली. मनातल्या मनात खूप खजील झालो. त्या ‘चोरा’ने कसं शिताफीनं फसविलं? इतकी साधी गोष्ट आम्हा कोणाच्याच लक्षात आली नाही. संशयपिशाच्चाने पूर्ण ताबा मिळविला होता हेच खरं. साधासुधा, सरळ विचार मनात येईल तर ना? त्याच्याकडे तोंड वर करून साधं पाहायची देखील हिंमत होईना. थोडय़ा वेळाने या ‘शॉक’ ची असर काहीशी कमी झाल्यावर मी त्याच्याकडे एक चोरटा दृष्टिक्षेप केला. आश्चर्य म्हणजे इतका वेळ मख्खपणे बसून राहिलेला, चेहऱ्यावर कसलेच भाव न दाखविणारा ‘तो’ गालांतल्या गालात हसत होता, असं वाटलं. आम्हाला कळेना की हा का असा हसतोय म्हणून. कदाचित् आमच्या मूर्खपणाला? आमच्या कोत्या मनोवृत्तीला? की आमच्यांत अकारण वास करून असलेल्या अहंगंडाला? काहीच उलगडा होईना.

काही वेळाने परिस्थिती थोडीशी निवळल्यासारखी वाटली म्हणून मी त्याच्या समोरच्या सीटवर बसलो आणि त्याला म्हटले, ‘‘तू केलंस ते योग्य नव्हते. तू अगोदरच सर्व खुलासा केला असतास तर असा घोटाळा झालाच नसता.’’ त्याने ऐकलं न ऐकल्यासारखं केलं. काहीच बोलला नाही. स्वत:शीच काहीतरी अस्पष्ट पुटपुटत होता. आपल्या शुद्ध हिंदीत आम्हाला शिव्या देत असेल. परत एक दीर्घ शांतता आणि मग तो म्हणाला, ‘‘मी हे सर्व तुम्हाला सांगायचा खूप प्रयत्न करत होतो; पण तुम्ही ऐकण्याच्या मूडमध्येच नव्हता. तुमच्या तुटक, तुसडय़ा वागण्यामुळे मलाही राग आला. हो, भयंकर राग आला; पण तुम्हा सर्वाचा नाही हो; माझ्या या कपडय़ांचा आणि माझ्या गरिबीचा; म्हणूनच मी गप्प राहण्याचं ठरवलं. आश्चर्य म्हणजे तो शुद्ध गुजरातीत बोलत होता.

त्याचे शुद्ध गुजरातीतले बोलणे ऐकून धक्काच बसला. अरे! म्हणजे आपण जे सर्व काही बरळत होतो ते या लेकाला समजत होते? ‘‘तुला गुजराती कसं काय येतं? उदयने आश्चर्याने विचारले.’’. ‘‘अहो, माझं वतन भोपाळ असलं तरी माझं शाळा-शिक्षण दाहोदमध्ये झालेलं आहे. माझे पिताजी पोस्टात कारकून होते. त्यांच्या अकाली मरणानंतर मी माझ्या आईला व दोन छोटय़ा बहिणींना घेऊन इंदूर गाठलं. अग्रवालशेठांच्या बंगल्यावर आईला नोकरी व राहायला दोन खोल्या मिळाल्या. आई बंगल्यावर काम करू लागली आणि बहिणी शाळेत जाऊ लागल्या. घरी आल्यावर आईला सर्व कामात मदत करू लागल्या. बंगल्यावर राहिल्यामुळे खाण्या-पिण्याचा प्रश्न सुटला होता. मी मात्र अनेक बारीकसारीक नोकऱ्या करून जेमतेम बी.ए. झालो. तेव्हाच ठरवलं की आता आईला किंवा बहिणींना काम करू  द्यायचं नाही; आपण सर्व जबाबदारी घ्यायची; म्हणून लगेच जी मिळाली ती नोकरी पत्करली. मी मेहरासाहेबांच्या ऑफिसमध्ये प्यून आहे. निझामुद्दिन स्टेशनच्या जवळ झोपडपट्टीत राहातो. आईला सुखात ठेवायची आणि बहिणींची लग्न करून द्यायची एवढीच इच्छा आहे. चारचौघांसारखे कपडे घालणं परवडत नाही. अहो, रोजच्या रोज दाढी करणे महाग पडते. आता साहेबांबरोबर फिरायचं म्हणून हे सर्व करावं लागतं आणि साहेब मला त्यासाठी पैसे देतात. स्वत:च्या खिशातून. माझी परिस्थिती त्यांना माहीत आहे. माझ्या झोपडीतही येऊन गेले आहेत अनेक वेळा. फारच उमदा माणूस. उत्तर हिंदुस्थानात खूप प्रवास करून आजच दिल्लीत आलो. दाढी करायलादेखील वेळ मिळाला नाही. स्वच्छतेची आवडही नाही आणि परवडतही नाही. तरीपण मंडळींनो, माझं चुकलंच. मला माफ करा तुम्ही. मनापासून क्षमा मागतो तुम्हा सर्वाची.’’ असं म्हणून त्याने सर्वाना वाकून नमस्कार केला.

तो सहजपणे हे सर्व बोलून गेला; पण त्याचा टोमणा अगदी वर्मी लागला. आम्ही खूप वरमलो; शरमलोदेखील. नंतर बराच वेळ शांतता, स्तब्धता. कोणीच काही बोलेना. बोलणार तरी काय?

सुभद्राबेन जागेवरून उठल्या. खाली वाकून त्यांनी नेमका काजूकतलीचा डबा बाहेर काढला. डबा उघडून त्याच्यासमोर धरला आणि गद्गदित स्वरांत म्हणाल्या, ‘‘बेटा, काजूकतली खा आणि आमच्यावरचा कडवट राग गिळून टाक. आम्ही तुझे गुन्हेगार आहोत. शक्य असेल तर तूच आम्हाला माफ कर.’’

सुभद्राबेनच्या या वागण्यामुळे मनावरचं ओझं खूप कमी झाल्यासारखं वाटलं. क्षणभर तोही भांबावला. त्याने स्वत:ला सावरले; वाकून सुभद्राबेनच्या दोन्ही पायांना स्पर्श केला. हातातील काजूकतली तोंडात टाकली आणि चघळत बसला. त्याने बोलणंच बंद केलं. अगदी शांत; विचारांच्या तंद्रीतच होता. बराच वेळ एक बोचरी, अस्वस्थ करणारी शांतता आणि त्यानंतर त्या तरुणाचे भयानक दीर्घ हास्य; त्यांत कारुण्य भरपूर होतं अणि विषाददेखील.

 प्रा. शरद सबनीस – response.lokprabha@expressindia.com