वैयक्तिक पातळीवर पुढील वर्ष कसं जाईल या प्रश्नाइतकंच सामाजिक, राजकीय पातळीवर कोणकोणत्या घडामोडी घडतील ते समजून घेणं अनेकांसाठी महत्त्वाचं असतं.

नव्या म्हणजे २०१८ या वर्षांच्या सुरुवातीला विरोधीकृत नावाचं २०७४ हे संवत असेल. त्याचे प्रमुख बुध आणि मंत्री गुरू असतील. त्यामुळे काही धार्मिक गुरूंसाठी हा त्रासदायक काळ आहे. काही धार्मिक गुरूंवर मानहानीचे प्रसंग येतील. त्याचबरोबर काही धार्मिक गुरूंबद्दलची लोकांची आस्था वाढेल. तंत्रज्ञानापासून फायदा करून घेण्याची वृत्ती या काळात वाढणार आहे.

या वर्षांचा प्रमुख गुरू असल्यामुळे धनधान्य भरपूर पिकेल. पण नफेखोरांमुळे त्याचे दर चढेच राहतील. प्रमुख नेत्याची प्रतिमा उजळवण्याचे बळेबळेच प्रयत्न होतील. प्रमुख नेते आणि मंत्र्यांमध्ये छुपे मतभेद निर्माण होतील. काही प्रकरणांमध्ये सरकार, प्रशासन आणि लष्कर यांच्यात तीव्र मतभेद होतील. मंत्रिमंडळात सूर्य हा सस्येश पूर्वधान्येश म्हणजेच धान्यपती असल्याने दरोडे, लूटमार, अपहरण, चोऱ्या, आर्थिक फसवणूक अशा घटना वाढतील. देशाच्या पूर्वेकडे गुन्ह्यांचं प्रमाण वाढेल. ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांचं प्रमाण वाढेल. वेगवेगळ्या देशांमधले आपापसातले ताणतणाव वाढतील. राष्ट्रप्रमुखांच्या अहंकारामुळे सशस्र संघर्षांच्या शक्यताही निर्माण होतील. काही देशांनी केलेल्या लष्करी कवायती इतर देशांना अस्वस्थ करतील.

पश्चिम धनेशपदी शनी असल्यामुळे संपत्तीविषयक वाद उफाळून येतील. बिल्डरांवर आणि व्यावसायिकांवर दाखल होणाऱ्या खटल्यांचं प्रमाण वाढेल. त्यातले काहीजण पळून जातील, तर काहीजण तुरुंगात जातील. दुधाचं उत्पादन घटेल. त्यामुळे दूध तसंच दुग्धजन्य पदार्थाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. विचित्र प्रकारचे आजार फैलावण्याची शक्यता आहे. लोकांमध्ये असलेली उदासी आणि भावनात्मक क्रूरता हे चिंतेचे विषय असतील. लोकांचे क्लेष आणि अलिप्तपणाची भावना वाढीला लागेल.

गुरू मेघेशपदी असल्यामुळे धान्य विपुल प्रमाणात निर्माण होईल, पण ते नीट ठेवलं न गेल्यामुळे सडण्याची शक्यता आहे. त्यामुळे धान्याचा अभाव निर्माण होऊन ते आयात करावे लागेल. रसदार फळांचे भरपूर उत्पादन होईल, पण अकाली पावसामुळे तसंच कीड लागल्यामुळे त्यांचं नुकसान होईल. असं होऊनही सामान्य लोकांना या वर्षी भरपूर फळफळावळ खायला मिळेल.

या वर्षी यज्ञ, होमहवन तसंच धार्मिक कार्यक्रमांमध्ये वाढ होईल. प्रमुख नेते, मोठमोठे लोक पुढील वर्षी मंदिर, मशिदींमध्ये मोठय़ा प्रमाणात फेऱ्या मारताना दिसतील. सुधारणावादी प्रयत्नांचे दूरगामी फायदे पुढे कधीतरी नक्कीच मिळतील. पण येत्या वर्षी मात्र जनतेचं कंबरडं मोडेल अशीच शक्यता आहे.

मंगळ रसेश असल्यामुळे सरकार तसंच प्रशासन हे सामान्य जनता आणि व्यापाऱ्यांशी क्रूरपणे वागेल. मूठभर लोकांच्या फायद्यासाठी बाकी सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागेल.

सूर्य निरसेश असल्यामुळे सोन्याच्या भावात थोडी वाढ आणि नंतर घट होण्याची शक्यता आहे. दागिने महाग होऊनसुद्धा व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होताना दिसणार नाही. दागदागिन्यांबाबतची लोकांची आवड एकदम कमी होऊन जाईल. लोकांमध्ये धैर्य कमी होईल आणि बेचैनी तसंच भांडण करण्याची वृत्ती वाढेल.

बुध फलेश असल्यामुळे मर्यादित धन अथवा संपत्तीमधून फायदा मिळवण्याची वृत्ती अथवा तंत्र वाढेल. व्यक्तिगत तसंच कौटुंबिक संबंधांमध्ये माधुर्य वाढेल. फुलांचं उत्पादन तसंच निर्यात वाढण्याची शक्यता आहे.

धनेशपदी सूर्य असल्यामुळे अन्नधान्य बाजारातही बडे व्यापारी भरपूर फायदा कमावतील. पशूंचा व्यापार करणारेही फायद्यात असतील.

दुर्गेशपदी गुरू असल्यामुळे नवीन योजनांमध्ये वाढ होईल. शहरापासून ते ग्रामीण भागातील लोकापर्यंत भरपूर योजना जाहीर केल्या जातील. पण त्यांचा फायदा प्रत्यक्ष होण्यापेक्षा त्या फक्त कागदोपत्री असतील.

२६ एप्रिल २०१८ ला पराधावी नावाचं नवीन संवत सुरू होईल. त्याचे प्रमुख सूर्य आणि मंत्री शनी असतील. यामुळे कौटुंबिक पातळीवर, सामाजिक पातळीवर, देशाच्या पातळीवर तसंच इतर देशांच्या पातळीवर वैमनस्य निर्माण होईल. सत्ताधीशांमध्येही भीतीची भावना निर्माण होईल. पण विपरीत परिस्थितीत विकासाचा मार्ग मोकळा होतो. तसे काहीसे होऊ  शकते. प्रमुखपदी सूर्य असल्यामुळे सगळीकडे सतत बेचैनी असेल. आग लागून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. चोरीचे प्रमाण वाढेल. काही मोठय़ा लोकांच्या मृत्यूच्या शक्यता आहेत. या वर्षी कमी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन कमी होईल. धान्य तसंच फळांचे उत्पादन कमी होईल. शनी मंत्रिपदी असल्यामुळे जगात पैशाची कमतरता असल्याचा आभास निर्माण होईल. नेत्यांचं दु:साहस आणि विवेकहीन वागणं लोकांना बेचैन करेल. सरकारी अधिकारी लोकांशी क्रूरपणे वागतील.

सस्येशपदी मंगळ असल्यामुळे तांदूळ, मूग, उडीद, गहू तसंच तिळाचे भाव चढे राहतील. दुर्गेश पदी शुR  असल्यामुळे सुरक्षेबाबत सतत सतर्क राहावं लागेल. त्यामुळे लोकांची चिंता वाढेल. धनेशपदी चंद्र असल्यामुळे नव्या श्रीमंतांचा उदय होईल. आधीचे श्रीमंत लोक नेस्तनाबूत होतील.

रसेशपदी गुरू असल्यामुळे वाहन सुख कमी होईल. योग तसंच आध्यात्मिक मूल्यांमध्ये वाढ होईल. नद्यांमध्ये पाणी भरपूर असेल. सूर्य धान्येशपदी असल्यामुळे एखादा रोग फैलावण्याची शक्यता आहे.

निरसेशपदी चंद्र असल्यामुळे वस्रोद्योग साखर, चांदी यांच्या व्यापारात वाढ होईल. शुR  फलेश असल्यामुळे आध्यात्मिक आवड वाढण्याची शक्यता दिसत आहे. मेघेश पदी शुR च असल्यामुळे सुख शांततेत कपात होईल. पश्चिमेकडे जास्त पाऊस होईल.

या वर्षी एकाचवेळी परस्पर विरोधी घटनांच्या शक्यता दिसत आहेत. एखाद्या नेत्याबाबतचा वाद उफाळून येईल. विरोधी पक्ष एकत्र यायचा प्रयत्न करतील. पण या वर्षी त्यांना त्यात फारसं यश मिळणार नाही. या वर्षी आगी लागणं, रस्त्यावरील अपघात संघर्ष, खून, अपहरण अशा घटना घडतील. असंघटित गुन्ह्य़ांमध्ये वाढ होईल. शनी कर्मेश असल्यामुळे न्यायालयं कठोर भूमिका घेताना तसंच सक्रिय होताना दिसतील.

अवृष्टी आणि अतिवृष्टी असेही प्रकार घडतील. एखादा प्रसिद्ध उद्योगपती किंवा अभिनेता किंवा राजकीय नेत्याचा अपमान किंवा अवहेला किंवा त्याच्याशी संबंधित अशी काही घटना घडण्याची शक्यता आहे की ज्यामुळे लोक अवाक होतील. अनेक उद्योगपती कायद्याच्या कचाटय़ात सापडलेले दिसतील.

वीज तसंच उर्जेच्या क्षेत्राचा भरपूर विकास होणार आहे. या क्षेत्रांना आता पुढची अनेक वर्षे भरपूर फायद्यची जाणार आहेत. जानेवारी महिन्यानंतर शेअर बाजारात नवी तेजी येईल. काही क्षेत्रांच्या काही शेअर्सना पुढच्या वर्षी तसंच त्याही नंतर काही वर्षे भरपूर तेजी असेल.

जमीनजुमल्याच्या बाबतीत सध्याच्या सगळ्या गोष्टी पाण्यावरच्या बुडबुडय़ासारख्या ठरतील. या क्षेत्रात नवे टप्पे गाठले जातील. या वर्षी एखाद्या बातमीमुळे लोकांच्या चेहऱ्यावर आनंद येईल.
आनंद जोहरी – response.lokprabha@expressindia.com