-सुनिता कुलकर्णी

करोनामुळे यावर्षी नोकरदारांचं अपरायजल झालं नाही, त्यामुळे साहजिकच वार्षिक पगारवाढ झाली नाही. सर्वसामान्यांचं हे असंच असतं. त्यांची आर्थिक प्रगती कासवाच्या गतीने होते आणि महागाई त्यांना सशाच्या वेगाने गाठते.

पण रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी काही आपल्यासारखे सर्वसामान्य नाहीत. त्यामुळे करोना काळातही त्याचं भरभक्कम अप्रायजल झालं आहे. फोर्ब्जच्या एप्रिल २०२० मध्ये जाहीर झालेल्या जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये मुकेश अंबानीचं स्थान २१ वं होतं. तर १० जुलै रोजी जाहीर झालेल्या फोर्ब्जच्या रिअल टाईम बिलेनियर्सच्या यादीत ते जगात सातव्या स्थानावर आहेत. म्हणजे ते आता जगातली सातव्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी आता वॉरन बफेंनाही श्रीमंतीत मागे टाकलं आहे.

फोर्ब्जच्या १० जुलै रोजी जाहीर झालेल्या या यादीतील माहितीनुसार मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ७०.१० अब्ज डॉलर म्हणजेच ५.२५ लाख कोटी रुपये आहे. हे एवढे पैसे आपल्या देशातल्या नऊ राज्यांच्या जीडीपीइतके आहेत.

आधीच आर्थिक मंदी, त्यात करोनामुळे टाळेबंदी आणि सगळे आर्थिक व्यवहार ठप्प होणं अशा वातावरणात आपल्यासारख्यांसाठी हे आकडे अबबबबब वाटावेत असेच आहेत. खरं तर ‘रईसी’ ही काय चीज असते तेच आपल्याला माहीत नसतं. आपल्याला आपल्या शेजाऱ्यापेक्षा जास्त पगार मिळतो, यावरच खूष असणारा सामान्य माणूस तिची कल्पनही करू शकत नसतो. कारण घराचे, कारचे असे कशाकशाचे हप्ते फेडण्यात आयुष्य जात असल्यामुळे त्याने ती कधी बघितलेलीच नसते. त्याला बिचाऱ्याला एक कोटी म्हणजे एकावर नेमकी किती शून्यं हे सांगतानाही गडबडायला होतं.

तसंही इथे कुणाला करता येते श्रीमंतीची कल्पना? दोन खोल्यांच्या घरात राहणाऱ्याला चार खोल्यांचा फ्लॅट म्हणजे श्रीमंती वाटत असते, तर चार खोल्यांचा फ्लॅट असणाऱ्याला बंगला असणं ही श्रीमंती वाटत असते. जगण्यासाठी रोजची धावपळ करणाऱ्याला ती करण्याची गरज पडू नये इतका पैसा असणं ही श्रीमंती वाटत असते. तितका पैसा असणाऱ्याला त्या रांगेतल्या पुढच्या माणसाला मागे टाकायचं असतं.

आता आपल्या दृष्टीने फोर्ब्जच्या यादीत मुकेश अंबानींचं भरभक्कम अप्रायजल होऊन, ते श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सातव्या स्थानावर पोहोचले असले तरी प्रत्यक्षात मुकेश अंबानींना या यादीमधल्या पहिल्या स्थानावर पोहोचायचं असूच शकतं. त्यांच्या दृष्टीने खरा श्रीमंत माणूस कदाचित तोच असू शकतो.

असो, आपण श्रीमंत नसूही, पण जगातला सातव्या क्रमांकाचा श्रीमंत माणूस आपल्या आसपास आहे, आपण त्याच्याच फोनवरून बोलतो हेही नसे थोडके.