चित्रातील रूपाकारांचे सुलभीकरण झाले आहे. चित्रांमधील फॉर्म्सना सहजभाव प्राप्त झाला आहे. याला माजगावकरी सहजयोग असेही म्हणता येईल.

कोल्हापूरस्थित प्रसिद्ध चित्रकार  जी. एस. माजगावकर माहीत नाहीत, असा रसिक महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रात तरी सापडणार नाही. गेली तब्बल चाळीसहून अधिक वर्षे माजगावकर चित्रकलेच्या क्षेत्रात नानाविध प्रयोग करत आहेत. काळ बदलत गेला तसे त्यांच्या चित्रांतील प्रयोगही बदलत गेले. अनेकदा  केवळ उमेदीच्या कालखंडातच कलावंत स्वतच्या शैलीच्या शोधात असतात आणि मग एकदा शैली सापडली व ती शैली रसिकांना आवडू लागली किंवा परिचित झाली की, त्याच शैलीत ते आयुष्यभर खेळत बसतात. माजगावकर यांचे मात्र असे कधीच झाले नाही. माजगावकर यांचे प्रदर्शन म्हणजे निसर्गदृश्य हे माहीत असले तरी त्यात यंदा नवीन काय असणार असा प्रश्न नियमित प्रदर्शनांना येणाऱ्या रसिकांच्या मनात हमखास असणारच. मुंबईतील जहांगीर कलादालनात माजगावकर यांचे प्रदर्शन अलीकडेच पार पडले. यावेळचे खास म्हणजे जपानी चित्रपरंपरेचा प्रभाव त्यांच्या चित्रांवर जाणवत होता. पण ही केवळ जपानी चित्रशैलीतील चित्रे नव्हती तर जपानी पारंपरिक पद्धती माजगावकरी शैलीत पाहायला मिळाली, हे विशेष

Dignitaries in Kolhapur, kolhapur lok sabha seat, Dignitaries in Kolhapur Urge for Democratic Vigilance, Democratic Vigilance, Dignitaries in Kolhapur appeal win shahu maharaj, shahu maharaj, Hatkanangale lok sabha seat,
कोल्हापुरातील समाज धुरीण एकवटले; फोडाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची राजकीय नैतिकता गमावल्याची चिंता
duvartanacha vedh marathi book
वर्तन कारणांचे उत्खनन
Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!

निसर्गचित्रणाच्या सुरुवातीस सर्वाना असे वाटते की, समोर जे जसे दिसते ते तसेच चितारणे म्हणजे निसर्गचित्रण. माजगावकर यांना अगदी सुरुवातीच्याच काळात जाणीव झाली की, जे दिसते ते नाही तर डोळ्यांना जे जाणवते ते चित्रात आले पाहिजे. मग जे दिसत होते त्यातील अनेक गोष्टी चित्रांतून आपोआप वजा होत गेल्या. आज माजगावकरी शैली म्हणून जे परिचित आहे त्यात रूपाकारांचे सुलभीकरण झाले आहे. चित्रांमधील फॉम्र्सना सहजभाव प्राप्त झाला आहे. याला माजगावकरी सहजयोग असेही म्हणता येईल. झाडं, फुल, पानं, निसर्गातील अनेक घटक या सर्वानाच हा माजगावकरी सहजयोग प्राप्त झाला.

पण गेल्या तीन- चार वर्षांमधील चित्रे आता आणखीन बदललेली दिसतात. या खेपेस या चित्रांमध्ये जपानी चित्रशैलीचाही सहजयोगी मिलाफ पाहायला मिळाला. आधीच अस्तित्वात असलेल्या माजगावकरी शैलीमध्ये जपानी शैली बेमालूम मिसळून गेलेली दिसते. हा जपानी शैलीचा प्रभाव वाटेलही कुणाला, पण ते तसे नाही. जपानी शैलीतील सौंदर्यमूल्ये आता माजगावकरी शैलीने आत्मसात केलेली दिसतात. अनेकदा गोष्टी आत्मसात करताना, माणसे बदलतात. तशी मूळ माजगावकरी शैली बदललेली नाही. तर माजगावकरी शैली अधिकचे ‘चार चाँद’ लेवून समोर आली आहे. त्यामुळेच माजगावकर हे वाटत असले तरी ते रूढार्थाने यथार्थवादी नाहीत. त्यांच्या शैलीमध्ये आधुनिकता आहे. आता जपानीशैलीसोबतचा संयोग हाही पारंपरिक नाही तर आधुनिकतेच्या अंगाने जाणारा आहे.

माजगावकर यांचा हा सारा कलाप्रवास सुरू झाला तो कोल्हापुरातील  त्यांच्या घराच्या गल्लीमध्येच. प्रसिद्ध चित्रकार  गणपतराव वडणगेकर घराजवळच राहायचे. वडील शंकरराव गणेश मूर्ती साकारायचे. मुलगा जीडीआर्ट झाला तर गणपतीही वेगळे, सुबक असतील  व्यवसाय चांगला होईल, अशी वडिलांची इच्छा होती.

औपचारिक कलाशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सांगली येथील कलाविश्व महाविद्यालयात अध्यापनास सुरुवात केली. एक एक पायरी पुढे जात अखेरीस २००६ साली निवृत्त झाले त्यावेळेस जी. एस. माजगावकर प्राचार्य होते. यात २००४ साली त्यांना राज्य पुरस्काराने गौरविण्यातही आले. अध्यापनाची सर्वच वर्षे त्यांनी कोल्हापूर ते सांगली असा रोजचा प्रवास केला. अनेक मंडळी सांगलीला मुक्काम करून आठवडय़ाअखेरीस कोल्हापूरला जायची. पण मग असे का, असे विचारता माजगावकर सांगतात, कोल्हापुरातील मान्यवर व दिग्गज कलावंतांचा सहवास खूप महत्त्वाचा होता. त्याचा प्रभाव पूर्ण कला कारकिर्दीवर आहे. कोल्हापूरात रवींद्र मिस्त्री यांच्यासारखा दिग्गज कलावंत असायचा. त्यांच्या स्नेहाचा व मार्गदर्शनाचा खूपच फायदा झाला, तशी कलापरंपरा त्यावेळेस सांगलीला नव्हती. चित्रकाम व्हायचे ते मात्र शनिवार— रविवार सुट्टीच्या कालखंडातच.

माजगावकर यांनी सुरुवात तशी पारदर्शक तैलरंगांपासून केली. १० टक्के ओपेक आणि ९० टक्के पारदर्शक असे सुरुवातीचे काम होते. कोल्हापूरचा परिसर निसर्गरम्य असल्याने तो सतत चित्रांमधून डोकावायचा.

साधारणपणे १९८१च्या सुमारास गटप्रदर्शनांना सुरुवात झाली. महाविद्यालयीन जीवनातील मित्र गुलजार गवळी, मुकुंद देशमुख आणि माजगावकर अशा त्रयीने नंतर तब्बल डझनभर प्रदर्शने एकत्र केली. गट प्रदर्शनांमध्ये चित्र- शिल्पकारांचा गट तयार होतो आणि साधारणपणे त्यानंतरच्या तीन- चार प्रदर्शनांमध्येच त्यांच्यात मतभेद होऊन मंडळी आपापल्या मार्गाने जाऊ लागतात. या पाश्र्वभूमीवर हा गट दीर्घकाळ टिकला. सर्वानीच एकत्र येऊन त्यानंतर एकमताने स्वतंत्रपणे प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अलीकडेच पार पडलेले माजगावकर यांचे प्रदर्शन हे चौथे एकल प्रदर्शन होते.

माजगावकर यांचे रंगलेपन आणि रंगहाताळणी नेहमीच वेगळी राहिली आहे. त्यात आता जपानी मिलाफ पाहायला मिळतो. त्याबद्दल ते सांगतात, मध्यंतरी जपोनिझम नावाचे पुस्तक हाती आले. त्यात व्हॅन गॉगसह सर्वच गाजलेल्या चित्रकारांवर जपानी शैलीचा प्रभाव किती व कसा आहे. ते जाणवले. मग आपण का नाही, असा प्रश्न पडला, त्याचे उत्तर कॅनव्हॉसवर शोधले,  त्यातून जे गवसले ते आज जगासमोर आहे.

उत्तम चित्रणाचे म्हणून असलेले सर्व रूढ निकष या चित्राला लागू होतात. पण आधुनिक चित्रकलेच्या प्रेमात असलेल्यांना ‘ती’ आधुनिकता यात सापडणार नाही. पण त्याचा शोधही घेऊ नये. ही चित्रे जपानी झेन गार्डनप्रमाणे आहेत. ती तुम्हाला एक वेगळा आनंद देतात! त्या आनंदाचा अर्थ शोधत बसायचा नसतो!
विनायक परब – vinayak.parab@expressindia.com @vinayakparab