17 July 2019

News Flash

मराठीतील ‘अँग्री यंग लेखक’

विनोदी साहित्यापासून ते गंभीर आशय असणाऱ्या सर्वच साहित्याला एकाच तागडीत तोलण्याचा प्रकार केला जातो.

अवधूत डोंगरे याची कादंबरी मनोहर श्याम जोशी यांच्यासारखेच अफाट ताकदीने प्रयोग राबवताना दिसते.

पंकज भोसले – response.lokprabha@expressindia.com
टीकायन
कादंबऱ्यांमध्ये आपल्या विलक्षण निरीक्षणशक्तीने कथन-नियमांना उलटपालट करणाऱ्या अवधूत डोंगरे याची ‘भिंतीवरचा चष्मा’ ही कादंबरी काही महिन्यांपूर्वी दाखल झाली आहे. या कादंबरीच्या निमित्ताने त्यांच्या चारही कादंबऱ्यांमधील सूत्र पकडण्याचा केलेला हा प्रयत्न..

आधुनिकोत्तर साहित्याचा देशी अवतार…

अलीकडच्या काळात मराठी वृत्तपत्रीय समीक्षेत आणि त्यामुळे सामान्य चर्चेत साहित्य आणि इतर कलांसाठी ‘समृद्ध करणारा अनुभव’ हा शिक्का बनला असा वाटावा इतक्या वेळा त्याचे अढळ स्थान असते. गंमत म्हणजे सर्वच प्रकारच्या साहित्याला या तीन शब्दांच्या कोंदणात बसविले जात असल्याने होते काय, की विनोदी साहित्यापासून ते गंभीर आशय असणाऱ्या सर्वच साहित्याला एकाच तागडीत तोलण्याचा प्रकार केला जातो. त्यामुळे विरंगुळ्याचे-मन रिझविणारे, शब्दच्छल करणारे किंवा डोक्याला झिणझिण्या आणणारे हे सारखेच ‘समृद्ध करणारा अनुभव’ कसे ठरू शकते, हा प्रश्न थक्क करणारा बनून जातो.

साठोत्तरी काळात साहित्यात बंडखोरी झाली, ती मुळातच तथाकथित समृद्ध करणाऱ्या प्रस्थापित गुळगुळीत साहित्याच्या विरोधात. पुढे आशय आणि रूपबंधाच्या दृष्टीने त्या काळाच्या पुढे ठरलेल्या एका बंडखोराची निर्मितीच बहुसंख्य वाचकांना इतकी समृद्ध करणारी वाटायला लागली, की तिला गिरविण्यातच आपली आधुनिक आणि अत्याधुनिक साहित्यिकांची फौज नव्वदीच्या दशकापर्यंत वाया गेलेली दिसली. पुढे संगणकात विंडोज या प्रणालीच्या दरसाल येत राहणाऱ्या विस्तारित व्हर्शन्ससारखी साठोत्तरी ते नव्वदोत्तरीपर्यंत एकाच आराखडय़ात उद्ध्वस्त तरुणमनाचा अतिउद्ध्वस्त अवकाश अनुभवांचा पोत बदलत येत राहिला.

नव्वदीच्या आसपास जन्मलेल्या पिढीचा भवताल इतका आक्राळ-विक्राळ आणि चक्रावून टाकणारा होता, की त्यांना वैचारिक गोंधळांच्या अनंत आवर्तनांतून या परिघामध्ये आपल्या आकलन तसेच अनाकलनाच्या पातळ्यांमध्ये समतोल साधावा लागला. आपल्यावर ‘समृद्ध’ असल्याचे सांगून लादले जात असणारे साहित्यसंस्कार झुगारून देणारे नवे आदर्श या पिढीवर याच काळात झाले, ते मराठीत आलेल्या आधुनिकोत्तर साहित्यामुळे. आता हे आधुनिकोत्तर किंवा पोस्ट मॉडर्न साहित्य म्हणजे काय, तर निवेदनाच्या पारंपरिक पद्धतीला, कलाकृतीच्या रूपबंधाला झुगारून देऊन नव्या वाटेने जाऊ पाहणारी निर्मिती. म्हणजेच मघाच्या परिच्छेदासारखेच उदाहरण द्यायचे झाले, तर विंडोजच्या सालाबादप्रमाणे येणाऱ्या व्हर्शन्सऐवजी नवीच ऑपरेटिंग सिस्टम (कार्यप्रणाली) संगणकात बसवावी, तसे काहीसे करणे आहे.

तर आधुनिकोत्तर साहित्याचा मराठीत जोरकस वावर झाला, तोच श्याम मनोहर यांच्या (‘कळ’, ‘खूप लोक आहेत’) अपारंपरिक कादंबऱ्यांमुळे. ‘अ’पासून ‘ज्ञ’पर्यंत गुंत्यांची उकल करणाऱ्या एकरेषीय रचनेला मोडून ठेवून तयार होणाऱ्या या प्रवाहात श्रीधर तिळवे यांची हजार-सव्वाहजार पृष्ठांची ‘अ‍ॅ डॉ हॉ का बा ना सु ना’ ही (अनेक कादंबऱ्या एकत्र असलेली) महाकादंबरी आली. मकरंद साठे यांची ‘अच्युत आठवले आणि आठवण’ आली. पुढे जगण्यातील वास्तवभान आणखी अजब पद्धतीने मांडणारी प्रवीण बांदेकर यांची ‘चाळेगत’ आली. या साऱ्या साहित्याला आधुनिकोत्तर म्हणता येईल. पण त्याचबरोबर या तुरळक लेखकांचे साहित्य सर्वार्थाने वाचकांपर्यंत न पोहोचण्याने आणि त्यामुळे उत्तर आधुनिक साहित्याचे प्रमाण मराठी प्रांगणात कायमच कमी राहिले.

हिंदी कथन साहित्यामध्ये आधुनिकोत्तर (किंवा उत्तर आधुनिक म्हणा हवे तर) लक्षणांचा आढळ हा मराठीपेक्षा बऱ्याच जोमाने झालेला पाहायला मिळतो. लेखक जितक्या ताकदीने प्रयोग करतात तितक्याच चांगल्या प्रमाणात वाचक त्यांचे स्वागतही करताना दिसतात. याउलट मराठी साहित्यात रूपबंधापासून व्यक्त होण्याचा साचीव मार्ग सोडण्याचा प्रयत्न झाला की कथा-कादंबरी आणि त्याचा कर्ता यांच्याबाबत वृत्तपत्रांसह नियतकालिक समीक्षेकडून ‘आगळ्या-वेगळ्या’ विशेषणासह ‘समृद्ध करणारा अनुभव’ या कौतुकाची फोड करून सांगण्याचे धारिष्टय़ दाखविले जात नाही. परिणामी मराठी आधुनिकोत्तर साहित्यिक आणि त्याचे वाचक यांचे प्रमाण आत्यंतिक कमी आहे. याउलट आपण अनेक बाबतीत मागास म्हणून ओळखत असलेल्या हिंदीभाषक राज्यांच्या पट्टय़ांमध्ये पोस्ट मॉर्डनिझमच्या निकषांवर खरे उतरणारे साहित्य तयार होत आहे.

आपल्याकडे जेव्हा कोसला, अमुकचे स्वातंत्र्य, राडा, सात सकं त्रेचाळीस या मॉर्डन म्हणून वाखाणल्या आणि समृद्ध करणारा अनुभव वाचकांना देत होत्या, त्या दरम्यान हिंदी साहित्यात हजारीप्रसाद द्विवेदी ‘बाणभट्ट की आत्मकथा’द्वारे अमृतलाल नागर ‘अमृत और विष’द्वारे, धर्मवीर भारती ‘सुरज का सातवाँ घोडा’ द्वारे पोस्ट मॉर्डन साहित्य लिहीत होते. पुढे मनोहर श्याम जोशी यांनी ‘क्याप’, ‘कसप’, ‘कुरु कुरु स्वाहा’, ‘हरिया हरक्यूलीज की हैरानी’ आणि ‘ट-टा प्रोफेसर’ या कादंबऱ्यांद्वारे आधुनिकोत्तर परिमाणाचा कळस हिंदी साहित्यावर चढविला. गेल्या दशकातील उदय प्रकाश यांच्यानंतर आज मध्य प्रदेशामध्ये गीत चतुर्वेदी (सावंत आँटी की लडकीयाँ, पिंक स्लीप डॅडी), झारखंडमध्ये पंकज मित्र (जिद्दी रेडिओ), दिल्लीमधील प्रवीण कुमार (छबीला रंगबाज का शहर) या आधुनिकोत्तर लेखकांना वाचकपणाचा पल्ला वाढविण्यासाठी (अनुवादाची वाट न पाहता) मूळ भाषिक ताकदीसह आवर्जून तपासायलाच हवे.

मनोहर श्याम जोशी यांची आठवण मराठी आधुनिकोत्तर साहित्याच्या बाबतीत होण्याचे कारण म्हणजे रचनेच्या बाबतीत आपल्याकडे गेल्या सात-आठ वर्षांमध्ये अवधूत डोंगरे याची कादंबरी मनोहर श्याम जोशी यांच्यासारखेच अफाट ताकदीने प्रयोग राबवताना दिसते.

रत्नागिरीत बालपण घालविलेल्या अवधूत डोंगरे याची जडणघडण वेगवेगळ्या भागांत झाली. पुण्यात अल्पकाळ वृत्तपत्रात पत्रकारिता केली, गडचिरोलीमधील नक्षलवादी चळवळीचा भेट देऊन अभ्यास केला, मासिकात नोकरी केली. मार्क्‍सवादाच्या उदय-अस्तावर वाचन आणि चिंतन केले. ईशान्येच्या राज्यांची भटकंती, तिथल्या राष्ट्रवादाच्या चळवळीचा अभ्यास केला आणि त्या अनुभवांदरम्यान वेगवेगळ्या पातळीवर घासून-पुसून एकाच शंृखलेत बसविता येतील अशा कादंबऱ्या लिहिल्या. ‘स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट’ (२०१२) ही त्याची पहिली कादंबरी आपल्या खास स्वाभिमानी बाण्याने त्याने स्वत:च प्रकाशित केली. आपल्या लेखनक्षमतेची (निगर्वीपणासह) पुरेपूर जाणीव असलेल्या लेखकाच्या या पहिल्याच प्रयत्नाला २०१४ सालाचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळण्याआधी त्याने लिहिलेली ‘एका लेखकाचे तीन संदर्भ’ ही कादंबरी पुण्यातील प्रफुल्लता प्रकाशन संस्थेने दाखविलेल्या विश्वासाच्या बळावर प्रसिद्ध झाली. पुढल्या दोन्ही कादंबऱ्यांसाठी त्याने नामवंत प्रकाशकांचा शोध न घेता प्रफुल्लता प्रकाशनाकडेच आपली पुस्तके आनंदाने सोपविली.

जगातल्या कुठल्याही लेखकाची लौकिकप्राप्तीची मूलभूत स्वप्ने ही सातत्याने नियतकालिकांत आपली लेखनचुणूक झळकवणे, एखादा प्रथितयश-वृत्तपत्रस्नेही प्रकाशकाद्वारे आपले पुस्तक प्रकाशित करणे ही असतात. मात्र अवधूत डोंगरे दिवाळी अंकात लिहिताना दिसत नाही. वृत्तपत्रांना अनेकदा लेखन टाळतो. आपल्या विचारांचे मंथन करण्यासाठी ब्लॉग त्याला उपयुक्त वाटतो आणि भीडभाड न ठेवता आपल्या तिरकस मतांना मांडणे त्याला उत्तम जमते. ब्लॉगवरच्या नॉन-फिक्शन लेखनात त्याची चुणूक दिसते, त्याच्या कैक पटींनी अधिक कादंबरीमध्ये ती उतरते. वाचनाभिसरणातून कमावलेल्या विचारसरणीने त्याची तिरकस भाषाशैली कवितेसह आकर्षकपणे उतरत जाते. रूढार्थाने पारंपरिक कथानक आणि त्यातील तणावाच्या कक्षांना बाजूला ठेवत त्याची कथनशैली सुरू राहते. झाडाच्या पानापासून बगळा-मांजरीपर्यंत कुणीही निवेदन करू शकते. आवश्यकतेनुसार बातम्या, लेख, मुलाखती यांचे तुकडे कादंबरीतील घटकांशी एकरूप होताना त्यातील कौशल्याचे कुतूहल वाढायला लागते.

कोणताही लेखक ‘चला, आधुनिकोत्तर कादंबरी लिहूया’ असे ठरवून लिहीत नाही. तर त्याच्या व्यक्त होण्याच्या लक्षणांवरून त्याला तसे ओळखले जाते. मराठीतील पट्टीचे वाचक आणि समीक्षक निखिलेश चित्रे यांच्या ‘आडवाटेची पुस्तकं’ या आपल्या ग्रंथात मनोहर श्याम जोशी यांच्या ‘कुरु कुरु स्वाहा..’वर लिहिताना जगभरातील आधुनिकोत्तर कादंबऱ्यांच्या लक्षणांचा ल. सा. वि. काढला आहे. अवधूत डोंगरे यांच्या लेखनासंदर्भात इथे काय म्हणायचे आहे, त्याला अधिक स्पष्ट करण्यासाठी हे मुद्दे उपयुक्त ठरू शकतील.

चित्रे म्हणतात की, १. आधुनिकोत्तर कादंबऱ्यांचे नायक आयुष्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करीत नाहीत. आपल्याला तो कधीच कळणार नाही, हे त्यांच्या ध्यानात आलेलं आहे.

२. त्यांची निवेदनपद्धती पारंपरिक निवेदन उलटंपालटं करून टाकणारी आहे. ‘कथासरित्सागर, पंचतंत्र, अरेबियन नाईट्स, डेकॅमेरॉन अशा प्राचीन कथाग्रंथांच्या शैलीशी हे निवेदन सलगी करतं.

३. निवेदनात खेळकरपणा, मस्करी, उपरोध यांचा अटळ उपयोग होतो.

४. एकरेषीय निवेदन पूर्णपणे टाळून बहुरेषीय निवेदनाचे अनेक प्रकार आजमावून पाहिले जातात.

५. प्रत्यक्ष आयुष्यातल्या व्यक्तींना लेखकाच्या कल्पनेनं वेगळ्या मिती देऊन त्याचं पात्रात रूपांतर केलं जातं.

६. वाचक एक कल्पित कृती वाचतोय याची त्याला सतत जाणीव करून दिली जाते. म्हणजेच पात्रं, अवकाश, कथासूत्र इत्यादी विश्वसनीय वाटावी यासाठी लेखक कोणतेही प्रयत्न करीत नाही.

‘स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट’ या छोटेखानी कादंबरीपासून ते काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘िभतीवरला चष्मा’पर्यंतच्या अवधूत डोंगरे याच्या चारी कादंबऱ्या अनुभवताना वरील बहुतांश लक्षणे त्यांना लागू असल्याचे जाणवायला लागते. कादंबरी जगणारा किंवा जगण्याची अफलातून कादंबरी घडविणारा अवधूत डोंगरे मराठीतील ‘अँग्री यंग लेखक’ आहे. साहित्याची पूर्वकालीन िंकंवा समकालीन धारणा झुगारून देऊन बनलेली त्याची देशी आधुनिकोत्तर कादंबरी एकाच वेळी वाचनाबाबत ‘समृद्ध करणाऱ्या अनुभवा’सह हादरवूनही टाकते.

चार कादंबऱ्यांमधील एकसंध जग…

साधारणत: २००८ च्या काळापासून वृत्तपत्रीय धबडग्यात असलेल्या अवधूत डोंगरे याची धारणा कादंबरी लिहिण्याबाबतच पक्की दिसते. ‘स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट’ डायरीतील पानांचा किंवा सुटय़ा नोंदींचा एकत्रित कोलाज म्हणावा असा प्रकार. जागतिकीकरणानंतर अनुभवांची विस्तृत हवा रुळल्यानंतरच्या काळात मुंबईतील वृत्तपत्राच्या पुण्याच्या आवृत्तीत प्रादेशिक विभागात काम करणाऱ्या यातल्या नायकाचे एका शहरात रुजण्याचा प्रयत्न करताना आपल्या भवतालाचे तिरकस विच्छेदन येते. यात पत्रकारितेतील वृत्ती-प्रवृत्तींची सूक्ष्म निरीक्षणे, पुण्यातील रस्त्यांवरच्या निर्थक भटकंतीची आवर्तने, लाकडी पुलावरील पुस्तकविक्रीचे जग, रस्त्यावर पेपराचे वाचन करणारा भणंग म्हातारा, तीन पायांचा कुत्रा हे नोंदींतील महत्त्वाचे घटक आहेत. कादंबरीच्या पहिल्या दोन परिच्छेदामध्येच जागतिक घडामोडींशी एकरूप झालेल्या निवेदकाचा विचारपैस समोर येतो.

‘‘मी त्याला नक्की कधीपासून ओळखायला लागलो माहीत नाही. नक्की तारीख माहिती नाही. साधारण सांगता येईल. २० जानेवारी २००९ ला जर्नलिझम डिपार्टमेण्टमधलं एक झाड करकरत मोडून पडलं. तेव्हाच बराक ओबामाचा शपथविधी झाला किंवा त्याच्या वर्षभरआधीच्या जरा आधी युगोस्लाव्हियाची मारून छोटा पण अख्खा कोसोवो नावाचा देश बाहेर पडला. किंवा सुदानमध्ये दार्फरचं लफडं चालू होतं किंवा सप्टेंबर २००८ मुंबई. किंवा बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राला सुवर्णपदक मिळालं किंवा ए.आर. रेहमानला ऑस्कर मिळालं किंवा सप्टेंबर २००८ मुंबई किंवा बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राला सुवर्णपदक मिळालं किंवा ए.आर रेहमानला ऑस्कर किंवा सप्टेंबर २००८ मुंबई. किंवा बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राला सुवर्णपदक मिळालं किंवा ए.आर. रेहमानला ऑस्कर किंवा सप्टेंबर २००८ मुंबई किंवा बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राला सुवर्णपदक मिळालं किंवा ए.आर. रेहमानला ऑस्कर किंवा सचिन तेंडुलकरनं दोनशे केल्या किंवा १३ मार्च २०१० ला कनू सन्यालनी आत्महत्या केली.’’  निवेदक स्वत:ला फालतू कधीपासून समजायला लागला, त्याची घटनांची पुनरावृत्ती करणाऱ्या या नोंदी आहेत.

पुढे पत्रकारितेकडून येणाऱ्या शंभर व्होल्टच्या विचारचक्रांच्या झटक्यांचे येथे तपशिलात वर्णन आहे. पुण्यात जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या बातमीसह, २०१० साली कनू सन्यालने आत्महत्या केली, त्याच्या पडसादापर्यंत एका सजग तरुणाची जगण्याची अस्वस्थ खदखद आहे. एकटय़ा पाडू पाहणाऱ्या भवतालच्या कोलाहलात लाकडी पुलावर सेकण्डहॅण्ड पुस्तके विकून कुटुंबकबिला चालविणारा सुधाकर, पुठ्ठे घेऊन बसणारा म्हातारा यांना स्वत:शी जोडू पाहणाऱ्या इथल्या निवेदकाचे जगण्याचे भान अफाट आहे. पत्रकारितेत असल्याने वृत्तपत्र वाचनातून तयार होत जाणाऱ्या मतांचीही तटस्थपणे खिल्ली उडवत, स्वत:च्या जगण्याच्या दुभंगले, तिभंगलपेणाची तपशीलवार मांडणी केली आहे.

‘स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट’ कादंबरी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यानंतर बहुतांश वाचकांपर्यंत पोहोचली. मात्र त्या दरम्यान त्याच्या ‘एका लेखकाचे तीन संदर्भ’ या नव्या कादंबरीची चर्चा २०१४-१५ दरम्यान बऱ्यापैकी रंगली होती. या कादंबरीच्या तीन संदर्भापैकी दुसऱ्या संदर्भाचा आधार चौथ्या ‘भिंतीवरचा चष्मा’ या कादंबरीला आहे. अन् त्यातील सौम्य आणि सावली या व्यक्तिरेखा ‘पान, पाण आणि प्रवाह’ या तिसऱ्या कादंबरीतही ‘एक गोष्ट’ बनून समोर येतात.

काही वर्षांच्या अंतराने आलेल्या या कादंबऱ्या वरवर पाहताना स्वतंत्र भासत असल्या तरी त्यात एकसंध असे जग आहे. केवळ व्यक्तिरेखांच्या बाबतच नाही, तर ती मांडणाऱ्या निवेदकाच्या भवतालाचा विस्तार या कादंबऱ्यांमध्ये होतो. अ‍ॅब्सर्ड तरी आकर्षक आणि पकडून ठेवणाऱ्या नोंदी करणारा निवेदक पुढल्या कादंबऱ्यांमध्ये पाहायला मिळतो. स्वत:ला फालतू समजणाऱ्या आधीच्या कादंबरीतील निवेदकी तिकडमपणा ‘एका लेखकाचे तीन संदर्भ’मध्ये आणखी वैचारिक जोर काढताना दिसतो.

इथली तीन परस्परसंबंध असलेली (किंवा नसलेलीही) कथानके सरधोपट नाहीत. पहिल्या संदर्भामध्ये निवेदक एका रंगांधळ्या नायकाची गोष्ट सांगतो. हा रंगांधळा नायक अर्थशास्त्रात पीएच.डी करण्यासाठी म्हणून आर्ट्स शाखा घेतो आणि तिथे कविताही करू लागतो. त्याबाबतचे त्याचे निवेदन पाहा.

‘‘अकरावीत आल्यानंतर तो कवितासुद्धा करायला लागला. त्यानं तशा इतर कुणाच्या कविता वाचलेल्या किंवा असंच काही नाही. प्रचंड गर्दी जमविणाऱ्या कवितांचे कार्यक्रम त्यानं बघितले. अकरावीत आल्यानंतरच. साधारण अकरावीच्याच मध्यात दिवाळीच्या जरासं नंतर त्याला कविता व्हायला लागल्या. चांगली थंडी पडलेली. त्या थंडीपासून ते तो सत्तावीस वर्षांचा झाला. त्या वर्षीच्या थंडीपर्यंत त्याला कविता होत होत्या.’’ आता या कालावधीपर्यंत कविता का होत होत्या आणि त्यानंतर कवितेचे काय झाले, याचा पुढला तपशील अफाट आहे. पण या साऱ्या कवितांच्या स्वरूपाचे त्याचे वर्णनही आकर्षक आहे.

‘‘ग्रुपमध्ये मुली तीनच होत्या. आणि कविता कित्येक होत्या. ‘तुझ्या नयनांतील अश्रुधारा, पाहुनी हा धुंद वारा, शहारला तो शुभ्र तारा, उजळवी आसमंत सारा’, ही त्याच्या पाच कवितांमधली एक होती अकरावीतली.’’ या कवींची यथेच्छ संभावना करीत त्यांना तुकाराम वाचण्याचा सल्ला देणाऱ्या एका द्वेष्टय़ाची निवेदक सांगत असलेल्या नायकाने उडविलेली रेवडी तर ‘काव्यगत न्याया’चा विलक्षण नमुना आहे. या तिरकस नायकाचे पुढे कॉलेज सुटल्यावर कवितांपासून लांब जाणे आणि गाडी सव्‍‌र्हिसिंगला टाकताना प्रेम जुळणे हा पारंपरिक प्रेमकथांपासून फार वेगळ्या वाटेवरचा प्रवास आहे. त्याला फीट येऊ लागल्यामुळे आणि तिच्या बीजधारणेत अडचणी येऊ लागल्यामुळे लग्नानंतर दोघांनी मूल होऊ न देण्याचा निर्णय इथे आत्यंतिक क्षुल्लक बाब म्हणून समोर येते. अन् या गोष्टीमुळे तो किंवा ती दु:खात आहे, हे निवेदकाला कधीच दिसत नाही. उलट आता नक्की आनंद वाटून घ्यायला पाहिजे की दु:ख वाटून घ्यायला पाहिजे, याचा त्यांनी निकालच लावलेला नाही.

‘‘अजून खूप चांगल्या गोष्टी झाल्यात. आता तो आणि शाल्मली आता एकमेकांच्या शरीरांचा मनसोक्त आनंद घेतात. आणि त्यानंतर काहीच मिळणार नसल्याचं माहीत असल्यामुळं कोणत्याही सार्वजनिक अपेक्षेशिवाय आनंद घेऊ शकतात.’’

या कादंबरीच्या दुसऱ्या संदर्भात मुंबईतल्या चाळीतून पुण्यात शिकायला आलेल्या व पुढे शिक्षण झाल्यानंतर जळगावमध्ये प्राध्यापक बनलेल्या सावली आणि सौम्य यांच्या प्रेमकथेचा धागा आहे. तोही वाचलेल्या प्रेमकथांहून उफराटय़ा गोष्टीचा आस्वादक आपल्याला ठरवू पाहतो. तिसरा संदर्भ मात्र कादंबरीचा निवेदक आणि तो थेट कादंबरीवर छापून आलेल्या नावाला आरोपी बनवणारा आहे.

हा तिसरा संदर्भ अनेकांना चक्रावून सोडू शकतो. निवेदक कादंबरीवर नाव छापून आलेल्या लेखकाची यथेच्छ झोडपणी करीत राज्यशास्त्रात एम.ए. करायची इच्छा अर्धवट सोडून पेपरमध्ये जाहिराती टाइप करण्याची काही तासांची सहा हजारांची नोकरी करताना दिसतो. त्याच्या म्हणण्याप्रमाणे ‘स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट’ या कादंबरीचा लेखकही तोच आहे. मला सुचलेल्या सगळ्या गोष्टी तो कादंबरीवर नाव असलेला लेखक घेऊन जातो, असा या निवेदकाचा दावा असतो.

‘मेटाफिक्शन’ ही श्याम मनोहरांनीदेखील उत्तमरीत्या राबविली. श्रीधर तिळवे यांनीही आपल्या ‘अ‍ॅ डॉ हॉ का बा ना सु ना’ कादंबरीतील एका पात्राचे नाव ‘श्रीधर तिळवे’ रचले. मनोहर श्याम जोशींच्या ‘कुरु कुरु स्वाहा..’मध्ये त्यांच्याच नावाची एक व्यक्तिरेखा येते. इथे ‘पुस्तकावरील लेखकाचे नाव’ तयार करत अवधूत डोंगरे यांनी आणखी गंमत उडवून दिली आहे.

तिसऱ्या ‘पान, पाणी प्रवाह’ या कादंबरीत अवधूत डोंगरे या लेखकाच्या विस्तारलेल्या समाजभानाची आणि लेखनाला आलेल्या तीक्ष्ण धाराची कल्पना येऊ शकते. ही त्याची सवरेत्कृष्ट कादंबरी असून दशकातल्या सर्वोत्तम कलाकृतींमध्ये तिची दखल घ्यायला हवी. या कादंबरीला समीक्षेच्या आवाक्यात पेलता येणेही कठीणच आहे. प्रसिद्ध समीक्षक आणि कादंबरी या प्रकाराचे तत्त्वचिंतक हरिश्चंद्र थोरात यांनी फेसबुकवर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यावर केलेल्या छोटेखानी पण चपखल टिपणातून या कादंबरीची ढोबळ ओळख होऊ शकेल.

‘‘वाचणाऱ्याची परीक्षा पाहणारी ही कादंबरी प्रत्येकाने वाचायलाच हवी अशी आहे. कोणी वाचकाने ती वाचू नये याचे प्रामाणिक प्रयत्न लेखकाने केलेले असले तरी तिच्या कसाला उतरण्याची इच्छा वाचकाच्या मनात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

सर्वसाधारणपणे कुठलीही कादंबरी हे एक कथन असतं. हे कथन लिहिलेलं असतं. सर्वसाधारणपणे लिहिणं मागं राहत असतं आणि कथन पुढं येतं. काही कादंबऱ्यांत असं घडत नाही. त्यांत लिहिणं पुढं आणलं जातं. कथन मागं ठेवलं जातं. पान, पाणी नि प्रवाह या प्रकारची कादंबरी आहे, असं वाटतं. मात्र हे मी शपथेवर सांगणार नाही.

पान म्हणजे काय, पाणी म्हणजे काय, प्रवाह म्हणजे काय याबद्दल मी इथं काही लिहिणार नाही. दु:ख, मृत्यू, हिंसा, राजकारण, समाज, इतिहास, अशा अनेक गोष्टींचा कादंबरीशी संबंध आहे. माणसं मरतात. माणसं मारली जातात. माणसं सकारण मारली जातात. माणसं अकारण मारली जातात. त्याबद्दल अर्थपूर्ण रीतीनं कसं लिहिता येईल हा कादंबरीतल्या लेखकापुढचा प्रश्न आहे.

इथं व्यवस्था आहे. तिच्याशी जमवून न घेता येणं आहे. त्यातून पुढे आलेली नक्षलवादी चळवळ आहे. चळवळ संपवण्याचा प्रयत्न करणारी यंत्रणाही आहे. दोन्हीकडचे कच्चे दुवे आहेत. व्यवस्थेसारखीच भाषा आहे. तिच्याशी जमवून घेणं अवघडच आहे. कशाशीही जमवून घेता येत नसल्यामुळं निर्माण झालेलं अस्ताव्यस्त अस्थिरपणही इथं आहे.

मर्यादित अर्थाने ही राजकीय कादंबरी नाही. व्यापक अर्थाने आहे, मानवी परस्परसंबंधांच्या राजकारणाचं भान तिच्या रूपातून व्यक्त होतं, असं वाटतं. अर्थात या विधानातही फारसा अर्थ आहे असं म्हणता येत नाही. कादंबरी खुली आहे. काय लावायचा तो अर्थ लावा. पण तिचं आव्हान स्वीकाराच वाचक महाशय.

मला वाचायला खूप आवडली. तुमचं काय ते तुम्ही बघा.’’ ( फेसबुकवरील नोंद ८ मे २०१६)

या कादंबरीच्या सुरुवातीला उपोद्घातच्या आधी ‘घात’ हे प्रकरण आहे आणि उपसंहाराच्या नंतर ‘संहार’ हे प्रकरण आहे. स्मार्ट निवेदनाची ‘फालतू समजण्याची गोष्ट’ पासूनच्या परंपरेला चिंतनाची आणि उपरोधाची तीव्र शक्ती लाभली आहे. त्यातील कथाघटकांना पकडायला जाताना समुद्रकिनारी हातून सुटणाऱ्या वाळूच्या अनुभवांसारखी जाणीव होईल.

इथे कलासक्ततेचे कातडे अंगावर उभारून एकमेकांची री ओढणाऱ्या समाजाचे तिरकस आणि आसूड ओढणारे वर्णन आहे. ग्लोबलायझेशननंतर जग वगैरे जवळ आल्यामुळे ऑस्ट्रियामध्ये कामाला लागलेल्या मुलाचा आनंद नातेवाईकांना सांगताना ‘मुलगा ऑस्ट्रेलियामध्ये कामाला लागला’ असे पूर्णपणे चूक सांगणारा उत्साही बाप आहे. अन् तसे सांगण्यातील परिमार्जन म्हणून उच्चारदक्ष बनत आयुष्याची सकाळ-संध्याकाळ संपवण्याची या बापाची दिनचर्या आहे.

यातल्याच एका कमी महत्त्वाच्या श्रीधर नावाच्या पात्राची ओळख पाहा..

‘ह्य़ा वरच्या टेकडीला लागून रस्ता पुढं एका उपनगरात जातो. तिथं पाच हजार रुपये भाडय़ाच्या घरात श्रीधर राहतो. पुस्तकं, बायको, मुलगा यांच्या सान्निध्यात श्रीधर अंधारून आलेल्या जगातून वाट काढतोय. या वाटेत त्याला डॉ. आंबेडकर आणि कार्ल मार्क्‍स यांची सोबत वाटते आणि आपलं रोजचं काम बौद्धिक नाहीये, अशी खंतही त्याला वाटते.’’

नक्षलवादी चळवळीच्या आरंभापासून सक्रिय असलेल्या भास्करच्या संपूर्ण कारकीर्दीचा विस्तृत आढावा यात आहे. अन् त्या निमित्ताने चळवळीने मिळविलेल्या यश-अपयशाची चर्चा आहे.

भास्कर इतक्याच महत्त्वाच्या असलेल्या सावली नावाच्या पात्राची इथली ओळख पाहा..

‘‘सावलीला भास्कर व्हायचं नाहीए. तिला तसं काहीच मु्द्दाम व्हायचं नाहीए. व्हायचं नव्हतं कधीच. पण ती सध्या राजकीय चळवळींशी जोडली गेली. तिच्याशी जोडलं गेल्यामुळे ती काही ना काही झालेली आहे एवढं नक्की. पण नक्की काय, हे उलगडणं अवघड आहे.’’

झाडाच्या एका पानाच्या तुटून पडण्याच्या संदर्भाने सुरू झालेले यातले निवेदन या कादंबरीच्या आनंद मानवी या लेखकाने केलेल्या परीक्षणापर्यंत पोहोचत राहते. ‘पान, पाणी नि प्रवाह’ हा मराठी साहित्यातील अचाट प्रयोग आहे. तो पकडताना प्रचंड दमसास आवश्यक आहे.

काही महिन्यांपूर्वी आलेल्या त्याच्या ‘भिंतीवरला चष्मा’ या कादंबरीमधले जग ईशान्य भारतामध्ये घडते. आधीच्या दोन्ही कादंबरीमध्ये असलेल्या सावली आणि सौम्य यांच्यावर ती आधारली आहे. पण मिरालॅण्ड या ईशान्येतील कल्पित भागाच्या स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहासही येथे त्यानिमित्ताने रचला आहे. सावलीचा हार्ट अ‍ॅटॅकने अकाली मृत्यू झाल्यानंतर तिचे भूत या मिरोलॅण्डमध्ये अस्तित्वात असल्याचा शोध लागल्यानंतर सौम्य तिथल्या विद्यापीठात शिल्लक असलेल्या प्राध्यापकाच्या जागेवर नोकरी धरतो. तिथल्या एकाकी जगण्यासोबत निसर्गाचे, लोकांचे आणि एका घटनेमुळे ढवळून निघणाऱ्या सौम्यच्या आयुष्याविषयीचे संदर्भ या कादंबरीचा मुख्य भाग आहे. यात त्याने आनंद मानवी या लेखकाचे काल्पनिक कथाजगही उभे केले आहे. ‘काळ्या भिंतीतले कोनाडे’ नावाचा कथासंग्रह, त्याच्या आवृत्तीच्या प्रकाशन सालासह, कोणत्या नियतकालिकांमध्ये कथा छापून आल्यात त्याचे वास्तव वाटावे असे तपशील नोंदविले आहेत.

अवधूत डोंगरे याच्या चारही कादंबऱ्यांमध्ये जी एकसंधता आढळते ती उत्तरोत्तर अधिक स्मार्ट होत जातानाही आपले खास वैशिष्टय़ सोडून जाणाऱ्या निवेदनात. इथले बहुतांश निवेदक जगात घडणाऱ्या नोंदींची दखल घेताना आणि त्या नोंदींना आपल्या परिप्रेक्ष्यात अडकविण्याचा प्रयत्न करतो. ‘फालतू समजण्याची गोष्ट’मधला निवेदक कनू सन्यालच्या आत्महत्येच्या बातमीनंतर           चे गव्हेराला बोलिव्हियात सीआयएवाल्यांनी उडविला, त्याची आठवण काढतो. ‘एका लेखकाचे तीन संदर्भ’मधल्या तिसऱ्या संदर्भात वृत्तपत्राच्या जाहिराती बडविण्याचे फुटकळ काम करणारा निवेदक नॉर्वेमधील सत्त्याहत्तर लोकांना गोळीने आणि आठ जणांना बॉम्बने उडविणाऱ्या माथेफिरूच्या बातमीने जगाच्या विचित्रपणाबद्दल आश्चर्य व्यक्त करताना दिसतो. ‘पान, पाणी नि प्रवाह’मधल्या निवेदकाच्या समविचारी मित्राच्या नोंदीमध्ये गॅब्रियल गार्सिया मार्खेज याच्या मृत्यूनंतर घडणाऱ्या घटनांचा आलेख येतो. तर ‘भिंतीवरला चष्मा’मध्ये आनंद मानवी यांच्याबरोबर वॉल्टर शुल्झ आणि ए. सी. बेंजामिन यांच्या अनुक्रमे ‘व्हॉइड इन द वॉटर’ आणि ‘क्राफ्ट इन द नॉव्हेल’ या कलाकृती लिहिणारी काल्पनिक लेखक मंडळी येतात.

जगण्यातील घटकांची सूक्ष्म निरीक्षणे…

कथानक आणि कथन मागे नेऊन निरीक्षणांचे लिखाण पुढे करणाऱ्या अवधूत डोंगरेच्या चारही कादंबरीतील सूक्ष्मातिसूक्ष्म वर्णने ही त्याच्या लेखनाची वैशिष्टय़े आहेत. सरधोपट वळणांनी ती वर्णने जराही जाऊ इच्छित नाहीत. अन् वर्णन करणारे निवेदक सजीव, निर्जीव असे दोन्ही प्रकारचे असले, तरी त्यांच्या सांगण्यातील तपशिलाचा पट मोठा आहे.

साधारणत: दहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रांतील पेड न्यूजवरून वादंग झाला. बऱ्याच चर्चाना ऊत आला. पत्रकारितेच्या तळ्यात नव्याने हात-पाय मारून स्थिर राहण्याची कला आत्मसात करणाऱ्या निवेदकाचे आपल्या भवतालाविषयीचे वर्णन पाहा..

‘‘पत्रकारसुद्धा अतोनात होते. गॉगल लावणारे होते, गॉगल न लावणारे होते. जॅकेट घालणारे होते, जॅकेट न घालणारे होते. दुनिया च्युत्याए असं समजणारे पत्रकार होते, असं न समजणारे होते. इंटरनेटवरून लेख मारणारे होते, त्यापेक्षा काहीच न लिहिणारे होते. जिल्ह्य़ात बातमीदारी करणारे होते, जिल्ह्य़ाची पाने लावणारे होते, शहरात बातमीदारी करणारे, पानं लावणारे, एजन्सीच्या बातम्यांचं भाषांतर करणारे असे अतोनात. पत्रकार संघावर मांडी ठोकलेले होते, कधीच स्वत:हून बातमी न लिहिणारे पत्रकार होते. सगळ्याच्या आतली बातमी आपल्याला माहितीए असे समजणारे होते, या कशाशीच काही संबंध नसलेले होते. अतिउत्साही पत्रकार होते, अतिनिरुत्साही पत्रकार होते. अतिउत्साही अजून उत्साहित होत गेले आणि अतिनिरुत्साही अजून निरुत्साही होत गेले, तेव्हा तो दैनंदिनी आणि निवेदनं तयार करीत होता. बाजूला एसीची घरघर.’’

गेल्या पन्नास-साठ वर्षांमध्ये वृत्तपत्रांच्या विभागीय आवृत्त्यांमधील न बदलू शकणाऱ्या चित्राचे हे चित्रण जितके लाईव्ह आहे, तितकेच ‘भिंतीवरील चष्मा’मधील सौम्यचे विद्यापीठातील दोन दिवसीय चर्चासत्रांमध्ये येणाऱ्या सेमिनार्थीवरचे वर्णन फालतू समजण्याची गोष्टनंतर तब्बल आठ वर्षांनंतरचे आहे. पण त्यातील सूक्ष्म तपशिलांनी ते मघाच्या वर्णनासारखेच रंगतदार ठरणारे आहे.

‘‘सेमिनार तसं नेहमीच्या अकादमिक कामकाजांसारखं होतं. काही लोक करिअरचा काटेकोरपणा जपायला तिथं आलेले असतात. काही लोक असेच बडेजाव मिरवायला आलेले असतात, काही लोकांना इथला अभ्यास म्हणजे हिमालयाचं टोक वाटत असतं. काही नवख्यांना आपली पत वाढल्यासारखं वाटत असतं, काही जाणत्यांना जाणतेपणाची पत ठेवत वावरायचं असतं, काही लोक आपापल्या परीनं अभ्यास करायचा प्रयत्न करत तिथं आलेले असतात, काही जण नियम म्हणून आलेले असतात. काही लोक असेच प्रेक्षक म्हणून आलेले असतात. प्रेक्षकांमध्येही काहींना हे कामकाज म्हणजे मोठा बुद्धिजीवी व्यवहार वाटत असतो, काहींना या व्यवहाराबद्दल तुच्छता वाटत असते. काहींना काहीच वाटत नसतं.’’

अवधूत डोंगरे याने गेल्या दशकभरात रचलेल्या चार कादंबऱ्यांमधील जग साधे नाही. आपल्या जगण्याच्या मिती तपासत त्याचे लेखन घडत गेले आहे. प्रयोगांच्या सर्वच शक्यता पडताळून जगाचे भान त्याच्या कादंबरीमध्ये स्पष्ट होते. विषय सांगता येत नसला, तरी त्याचा निवेदक आपल्यापेक्षा वाचक जाणकार असल्याचे कबूल करीत त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करतो. पान, पाणी नि प्रवाहमध्ये तर तो वाचकांना सोबत घेऊन कादंबरी घडवितो. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, बातम्या, लेख, मुलाखत, छायाचित्रे, चित्रे, परीक्षणे वृत्तपत्रातील अग्रलेख या सगळ्यांची सांगड घालत त्याच्या कादंबरीने जागतिक परिमाणांशी नाते सांगणारी कलाकृती दरएक कादंबरीमधून उभारली आहे. या चारही कादंबऱ्यांच्या मुखपृष्ठावरची छायाचित्रे (फालतू समजण्याची गोष्टची दुसरी आवृत्ती) अवधूत डोंगरे याने स्वत: काढून कादंबरीचा आशय परिणाम साधण्याचा प्रयत्न केला आहे. आधीच्याच कादंबऱ्यांप्रमाणे सूत्र नसलेल्या सूत्राभोवती फिरणारी ‘पाण्यातली पोकळी’ ही आणखी एक कादंबरी येणार असल्याची घोषणा त्याने भिंतीवरच्या चष्मामध्ये दिलेल्या टीपात्मक निवेदनामध्ये केली आहे.

जगभरातील साहित्यामध्ये सध्या प्रयोगांचा महापूर आलेला आहे. मराठीतल्या तुलनेने छोटय़ाशा साहित्य व्यवहारामध्ये दशकोन्दशके काही लेखकांना देवत्व बहाल करून आणि पारंपरिक रचनेला महत्त्व देऊन वाचनाच्या कक्षा रुंदावू नयेत, यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. या धर्तीवर रंजनवादापलीकडे वाचकाला आपल्या वाचनकक्षेचा विकास करू देण्याची क्षमता अवधूत डोंगरे याच्या लेखनामध्ये आहे. शेवटी वाचक सजग झाला, तर खऱ्या अर्थाने समृद्ध होण्याची त्याची प्रक्रिया चांगली घडू शकते हे नक्की.

First Published on March 4, 2019 12:20 pm

Web Title: avadhut dongre bhintivarcha chashma representation of anger and agony in the writings