News Flash

आसमंतातून : फुलला पाहा पळस

देशात सर्वत्र आढळणारा पळस शंभर टक्केभारतीय आहे बरं का.

‘शिशिर ऋतुच्या पुनरागमनाने एकेक पान गळावया’ असं वर्णन मर्ढेकरांनी केलं असलं तरी याचवेळी निसर्ग लाल भडक पळसाने फुललेलाही असतो..

ऐन बहरातल्या शिशिरमय आसमंतात अनेक ठिकाणी झाडांचे उलटे उभे झालेले खराटे दिसत असतानाच काही हिरव्यागार झाडांचं अस्तित्व नजरेला सुखावून जातं. निसर्गाचं हे मिश्र स्वरूपातलं रूप अनुभवताना अगदी ‘फिलॉसॉफिकल’ व्हायला होतं. कुठे हिरव्या फांद्यांची जीवनासक्ती तर कुठे निष्पर्ण होऊन जणू वैराग्याची अभिव्यक्ती. आसमंतात होणारे हे विविध बदल विचारपूर्वक टिपताना अगदी अवाक् व्हायला होतं. बरेचदा आपण सर्रास निसर्गाला लहरी किंवा बेभरवशी अशी विशेषणं वापरत असतो, पण आपल्या सातत्यपूर्ण बदलांनी निसर्ग आपल्याला खोटं ठरवत असतो. पावसाळ्यात दोन्ही हातांनी भरभरून साधनसंपत्ती उधळणारा निसर्ग, शिशिरात हळूहळू कंजूष होऊन आपले हिरवे हात आखडते घ्यायला लागलेला दिसतो. शतकानुशतकं हे अगदी ठरलेलं असतं. हे लिहीत असताना, का बरं याला बेभरवशी म्हणायचं, असा विचार माझ्या मनात डोकावून गेलाच.

हा शिशिरी मातकट, मळकट रंग आसमंतात पसरत असतानाच अचानक कुठे तरी लाल रंग दिसायला सुरुवात होते. बंडाच्या पताका फडकावण्याचा मान काटेसावरीच्या जोडीलाच, पळसालाही मिळून जातो. बघावं तर काटेसावर फुलत असते आणि मागोमाग हा बाबा फुलायला तय्यारच बसलेला असतो. अनेकदा, झाडं ओळखायला सुरुवात केलेल्या बहुतेकांना लाल फुलांमुळे गोंधळवणारी बहुतेक सगळी झाडं याच काळात फुलायला सुरुवात करतात. ‘पळसाला पाने तीन’ या म्हणीमुळे अगदी लहानपणीच आपल्याला माहीत झालेलं हे झाड अंगभर पानं मिरवतं तेव्हा अनेकांना ओळखताच येत नाही. देशात सर्वत्र आढळणारा पळस शंभर टक्केभारतीय आहे बरं का. पलाश, किंशुक, धाक, फ्लेम ऑफ फॉरेस्ट अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जाणारं हे झाड बुटिया मोनोस्पर्मा अशा वनस्पतीशास्त्रीय नावाने ओळखलं जातं. मागच्या वेळेस नाव लक्षात ठेवायची जी युक्ती मी सांगितली होती ती परत एकदा वापरून या झाडाचं शास्त्रीय नाव आठवायचं. इंग्लंडमधील बूट प्रांताचा उमराव, जॉन स्टुअर्ट याच्या सन्मानार्थ या प्रजातीचं नाव ‘बुटिया’ असं केलं गेलं. आणि याच्या नावातल्या मोनोस्पर्मा याचा अर्थ आहे एकच बी असलेला. किती सोप्पं आहे ना हे नाव आणि अर्थ लक्षात ठेवायला? पळसाची अजून पटकन सांगावी अशी एक मजेशीर गम्मत म्हणजे, आपण खातो ती कडधान्यं ज्या कुळात समाविष्ट आहेत, त्याच फ्याबेसी कुळात पळस गणला जातो. काय म्हणावं या निसर्गाच्या किमयेला? कुठे ती चिमुकली कडधान्यं आणि कुठे हा सहज १५ मीटर्सची उंची गाठणारा पळस.. किती सहजतेने दोघांनाही समान धाग्यात निसर्गाने गुंफून टाकलंय पाहा.

आपल्या फांद्याफांद्यांवर लाल केशरी आणि नारंगी रंगाची पोपटाच्या चोचीसारखी फुलं मिरवणारा पळस हे साधारण मध्यम आकाराचं झाड असतं. वडिपपळाप्रमाणे कधीच पळस घेरदार होत नाही. याची पानं चांगली मोठय़ा देठाची असतात. मूळ फांदीपासून दहा ते बारा से.मी. आकाराच्या त्रिदल पर्णिकेला साधारण दहा ते पंधरा से.मी. लांब ठेवणारा याचा देठ अगदी नजरेत भरेल असाच असतो. ही तीनच असणारी पानं अगदी काळपट हिरव्या रंगाची असतात. या पानांची गम्मत म्हणजे, ज्याप्रमाणे बेलाच्या त्रिवेणीचं मिळून एक पान बनतं, तसंच पळसाच्या तीन पर्णिकांचं मिळून एक पान बनतं. म्हणजे, पळसाला पाने तीनऐवजी पळसाच्या पर्णिका तीन अशी म्हण असायला हरकत नाही. डेहराडूनमध्ये शिकत असताना आणि उत्तरेकडे केलेल्या सफरींमध्ये, देशाच्या उत्तर भागात मी पळस वसंतात फुललेला पाहिला आहे. पण आपल्याकडे मात्र अनेक ठिकाणी, थंडी सुरू झाली रे झाली की विरक्त होतोय न होतोय असं वाटणारा हा संन्याशी जणू युद्धाचे झेंडे अंगाखांद्यावर धरायला सुरुवात करतो. ह्य़ाचे हे झेंडे म्हणजेच फुलं अगदी सुंदर म्हणावी अशीच असतात. किंशुक, म्हणजेच पोपटाच्या चोचीसारखीच वाकडी असणारी ही फुलं साधारण बोटाच्या पेरांपासून तळहातापर्यंत मोठी असतात. याच्या पाच-सहा सेमी लांब पाकळ्या तरल मुलायम असतात. अतिशय भडक व चित्ताकर्षक लाल रंगाच्या या फुलांमध्ये भरपूर मधुररस असतो. पळसाचं झाड पूर्ण बहराला आलं की ही फुलं परिसरातल्या किडय़ांना, खारींना, पक्ष्यांना मधुररस प्राशनाला येण्याचं आवतण देतात. बरेचदा सकाळच्या कोवळ्या उन्हात शेकत शेकत माकडांच्या टोळ्या पळसाच्या कोवळ्या कळ्या आणि फुलांच्या जोडीला फांद्यांवर आलेली कोवळी पालवी आणि कुठे आलेल्या शेंगांचा नाश्ता करताना बघणं म्हणजे निव्वळ नेत्रसुखद असतं. पळसाच्या शेंगा नजरेत भरणाऱ्या नसतात. या काटेसावरीसारख्या बियांचा पसारा इथेतिथे न करता वाऱ्यावर उडून लांबवर पडतात नि लग्गेच रुजतात. या बियांपासून बनवलेलं ‘किनो ऑइल’ औद्योगिक कामांमध्ये वापरलं जातं. पळसाच्या मुळांचा वापर नेत्र तेलात केला जातो. ‘ढाक जडका तेल’ म्हणून ते ओळखलं जातं. कातडी कमावण्यासाठी याच्या सालीचा वापर केला जातो. फुलांच्या हंगामात उत्तरेकडे पळसाच्या कोवळ्या फुलांची आणि कळ्यांची भाजी केली जाते. तसं पाहायला गेलं तर पळस बहुगुणी आहे. याच्याबद्दल लिहावं तितकं कमीच म्हणायला हरकत नाही.

अशा बहुगुणी पळसाची फुलं बहरल्यावर त्यातला मधुररस पिण्यासाठी पळसावर जणू आनंदमेळाच भरतो. या आनंदमेळ्यात निसर्गातली देवाणघेवाण होते. आनंदमेळ्यात सहभागी होऊन फुलांचं परागीकरण करणारे पक्षी पळसफुलांमधला रस पितात नि परागकण वाहून नेतात. यात आघाडीवर असतो तो बारकुटला सनबर्ड, अर्थातच सूर्यपक्षी. मराठीत शिंजीर म्हणून ओळखला जाणारा हा चिमुकला आपण अनेकदा पाहिलेला असतो, पण हाच तो सनबर्ड हे काही लक्षात येत नाही. आपल्याकडे या सूर्यपक्ष्यांचे साधारण पाच प्रकार दिसून येतात. देशांतर्गत स्थलांतर करणारे हे चिमणीपेक्षा लहान आकाराचे पक्षी नेक्टभरनिडी कुटुंबातले सदस्य आहेत. या पळसाच्या फुलण्याच्या काळात, पळसाच्या फुलांवर बागडणाऱ्या जांभळ्या सूर्यपक्ष्याच्या विणीचा हंगाम असल्याने नराचा मूळचा तपकिरी रंग बदलला जातो आणि चकचकीत काळा होतो. अंगावर ऊन पडल्यावर हा काळा रंग जांभळा दिसतो म्हणूनच याला जांभळा सूर्यपक्षी अर्थात इंडियन पर्पल सनबर्ड असं संबोधलं जातं. हा शिंजीर पानगळीची विरळ जंगलं, माळरानाच्या जोडीलाच अगदी आपल्या बागांमध्ये, उद्यानांमध्येही सहज दिसून येतो. सतत इकडेतिकडे वेगाने उडत राहाणारा शिंजीर भारतातल्या सर्वात लहान आकाराच्या पक्ष्यांमध्ये गणला जातो. आपल्या लांबसडक आणि टोकेरी चोचीने हा पळसाच्या फुलांमधला मधुररस लीलया पिऊन टाकतो. परागकण, मधुररस आणि कीटक असा आहार असलेले शिंजीर अगदी फुलटोच्या पक्ष्यासारखंच पानं जोडून पिशवीसारखी घरटी बनवतात. या घरटय़ाला वर लहानसं भोक असतं. हे पक्षी सालीचे दोरे, सुकलेली गवताची पाती यांचा वापर करून घरटे बनवून शिवून टाकतात. आता पळस पहाल तेव्हा हा शिंजीरपण जरूर पाहा. आणि त्याची चिमणी- अशी नोंद नवीन बनवलेल्या नोंदवहीत करायला विसरू नका.

काटेसावर, कांचन, पळसाच्या जोडीला सध्या अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला जंगली बदामाची झाडं फुललेली दिसताहेत. ठिकठिकाणी भरपूर कचरा करणाऱ्या आणि बदाम म्हणून संबोधल्या जाणाऱ्या त्या खोटय़ा बदामाच्या झाडात नि या खऱ्या देशी बदामात भरपूर अंतर आहे. ज्याला बदाम म्हणून आपण संबोधतो, ते झाड ना बदामाचं आहे ना देशी झाड. जावा ऑलिव्ह किंवा वाइल्ड आल्मंड म्हणून ओळखलं जाणारं. देशी बदाम मस्त उंच होणारं पानझडी प्रकारचं झाड आहे. शिशिरात याची पानं गळून जातात नि नजरेत भरतात ते त्याच्या अंगाखांद्यावर लटकणारे मोठय़ा फळांचे घोसच्या घोस. या घोसांमुळेच आपलं लक्ष ह्य़ा झाडाकडे वेधलं जातं. स्टेरक्युलिआ फोइटिडा म्हणून वनस्पतीशास्त्राला परिचीत असलेले हे पानझडी प्रकारातलं झाड अगदी २०-२५ मीटर्सची उंची गाठतं. हिवाळ्याच्या उतरणीला निष्पर्ण होणाऱ्या या झाडाला घाणेरडय़ा वासाची फुलं येतात. या फुलांच्या वासाचं वर्णन करायला एकच उपमा वापरावी ती म्हणजे घोडा किंवा गोधनाच्या सडक्या विष्ठेचा वास जसा येतो तसाच वास या फुलांना येतो. म्हणूनच की काय, याचं नाव स्टारक्युलिया फिटीडा असं ठेवलं गेलंय. यातल्या स्टारक्युलिया या शब्दाचा अर्थ आहे जनावराची विष्ठा आणि फिटीडा म्हणजे दरुगध असलेला. अशी ही घाण वासाची जेमतेम एखाद्या सेमी आकाराची फुलं फुलतात तेव्हा तो परिसर जणू काही काळासाठी जनावरांचा गोठाच होतो इतका वास येत राहातो. या फुलांनंतर येतात ती गुटगुटीत फळं. फुलांचा लालसर गुलाबी रंग या फळांमध्ये व्यवस्थित उतरलेला दिसून येतो. सुरुवातीस हिरवी मग पिकल्यावर लाल गुलाबी नि पूर्ण उमलल्यावर राखाडी काळी होणारी ही फळं साधारण दहा ते पंधरा सेमी लांब असतात. थोडीशी वाकुडलेली कठीण आवरणाची ही फळं करंजीच्या आकाराची वाटतात. प्रत्येक फळाच्या करंजीच्या आकाराच्या साधारण पाच फाका असतात. या पिकल्यावर गुच्छात एकाच बाजूने उकलतात. आतल्या काळ्या रंगाच्या दीड ते दोन सेमी आकाराच्या बिया पडायला सुरुवात होते. शंभर टक्के भारतीय असणाऱ्या वृक्षांचे, झाडांचे उपयोग आयुर्वेदाला सुपरिचीत आहेत. जंगली बदामाच्या सालीचा वापर आयुर्वेदात उत्तम रीतीने केला गेलाय.

मागेच मी लिहिलं होतं ना की शिशिर हा एक शब्द घेऊन बसले तर भली मोठी यादी तयार होईल आसमंतात घडणाऱ्या घटनांची. अशी बरीचशी झाडं परिसरात बहरताना दिसताहेत. हळूहळू दिवस मोठा व्हायला सुरुवात झालीय. पानगळ होतानाच पुनíनमिर्तीच्या कडय़ा जुळवायला निसर्गही सुरुवात करतोय. विरळलेल्या झाडांच्या वाळक्या काडय़ा वाऱ्याने गळून पडताहेत. या गळक्या काडय़ा चोचींनी उचलून बघायचा चाळा कावळे उगाचच करताना दिसताहेत. जणू काही घर बांधायची प्रॅक्टिसच सुरू केलीय. कोवळी पिसं असलेल्या चिमण्या धूळ स्नानाचा आनंद कलकलाटी साळुंक्यांच्या वरताण लुटताहेत. जणू काही धुळीचं वाणच.. मळकटलाय तरी नवनिर्मितीची आस निसर्गाने सोडली नाहीए. ती पाहायलाच हवी. उगाचच नाही, जगजीत सिंग गाऊन गेलेत,

‘धुप में निकलो,

घटाओं में नहाकर देखो,

जिंदगी क्या है,

किताबों को हटाकर देखो.’
रुपाली पारखे-देशिंगकर –

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2016 1:02 am

Web Title: butea monosperma palash tree
Just Now!
X